माहिती आणि प्रसारण मंत्रालय
गोव्यात होणाऱ्या 19 व्या वेव्ह्ज फिल्म बाजारात ‘को-प्रॉडक्शन मार्केट’साठी 20,000 डॉलर्सच्या रोख अनुदानाची, वेव्ह्ज फिल्म बाजार कडून घोषणा
Posted On:
30 AUG 2025 1:46PM by PIB Mumbai
दक्षिण आशियातील सर्वात मोठा चित्रपट बाजार आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट उपक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणून ओळखला जाणारा वेव्ह्ज फिल्म बाजार या उपक्रमाने यावर्षीच्या 19 व्या आवृत्तीसाठी ‘को-प्रॉडक्शन मार्केट’ (चित्रपट सहनिर्मिती बाजारपेठ अर्थात चित्रपट प्रकल्पांसाठी वेगवेगळ्या देशांतील निर्मात्यांना जोडणारे व्यासपीठ) करता अर्ज मागवले आहेत. हा सोहळा 20 ते 24 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोव्यातील मॅरियट रिसॉर्ट येथे पार पडणार आहे.
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया-IFFI या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवा सोबतच आयोजित होणाऱ्या फिल्म बाजारला आता “Waves Film Bazaar” (वेव्ह्ज फिल्म बाजार) असे नवे नाव देण्यात आले आहे. हे नामांतर म्हणजे, भारताला आशय(कॉन्टेंट), सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी) आणि सह-निर्मितीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या व्यापक धोरणात्मक दृष्टिकोनाचा भाग आहे. भारतीय आणि दक्षिण आशियाई चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट व्यवसायातील व्यावसायिकांशी थेट जोडत, वेव्ह्ज फिल्म बाजार ने स्वतःला एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून सिद्ध केले आहे. मागच्या वर्षी या सोहळ्यात 40 हून अधिक देशांमधून 1800 पेक्षा जास्त प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला होता. यावरून या बाजाराचे वाढते महत्त्व आणि चित्रपटसृष्टीतील व्यापक प्रभाव स्पष्ट दिसून येतो.
वेव्ह्ज फिल्म बाजार चे मुख्य आकर्षण असलेले को-प्रोडक्शन मार्केट, या वर्षीही चित्रपट(फीचर फिल्म) आणि माहितीपट (डाॅक्युमेंटरी) प्रकल्पांसाठी प्रस्ताव मागवत आहे. 2007 मध्ये सुरू झाल्यापासून या व्यासपीठाने चित्रपट निर्मात्यांना कलात्मक आणि आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी निवडक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या मार्केटचे उद्दिष्ट, जगभरातील चित्रपट व्यावसायिकांना एकत्र आणणे, आंतरराष्ट्रीय भागीदाऱ्या घडवून आणणे आणि संयुक्त निर्मितीला चालना देणे हे आहे.
द लंचबॉक्स, दम लगाके हयशा, न्यूटन, शिरकोआ: इन लाईज वुई ट्रस्ट, गर्ल्स विल बी गर्ल्स आणि इन द बेली ऑफ अ टायगर सारख्या अनेक प्रसिध्द चित्रपटांच्या यशामध्ये वेव्ह्ज फिल्म बाजारचे योगदान आहे, जे जागतिक चित्रपट क्षेत्रावरील त्याच्या प्रभावाचे द्योतक आहे.
2025 च्या को-प्रॉडक्शन मार्केटसाठी रोख अनुदान :
2025 च्या आवृत्तीत, वेव्ह्ज फिल्म बाजार, को-प्रॉडक्शन मार्केटमधील तीन विजेत्या प्रकल्पांना एकूण $20,000 (डाॅलर्स) रोख अनुदान देणार आहे. स्वरुप असे असेल –
प्रथम पारितोषिक: को-प्रॉडक्शन मार्केट चित्रपट: $10,000
द्वितीय पारितोषिक:को-प्रॉडक्शन मार्केट चित्रपट: $5,000
विशेष रोख अनुदान: को-प्रॉडक्शन मार्केट माहितीपट: $5,000.
2024 मध्ये सुरू झालेल्या रोख अनुदान उपक्रमाचा उद्देश म्हणजे सर्जनशील कल्पना आणि उत्पादन (निर्मिती) यामधील अंतर कमी करणे आणि महत्त्वपूर्ण असा विकास निधी उपलब्ध करून देणे हा होय. मागील आवृत्तीत, पायल सेठी दिग्दर्शित कुरिंजी (The Disappearing Flower) ने प्रथम पारितोषिक जिंकले. दुसरे पारितोषिक संजू सुरेंद्रन दिग्दर्शित आणि प्रमोद संकर निर्मित कोथीयान – फिशर्स ऑफ मेन ला मिळाले, तर प्रांजल दुआ दिग्दर्शित आणि बिच-क्वान ट्रान निर्मित ऑल टेन हेड्स ऑफ रावण ने तृतीय पारितोषिक पटकावले.
सादर करण्याची अंतिम तारीख :
चित्रपट प्रकल्पांसाठी: 7 सप्टेंबर 2025
माहितीपट प्रकल्पांसाठी: 13 सप्टेंबर 2025
निवड झालेल्या चित्रपट निर्मात्यांना उत्पादक, वितरक, विक्री एजंट आणि निधी उपलब्ध करणाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल, ज्यामुळे सह-निर्मिती आणि सहयोगात्मक प्रकल्प वाढवता येतील.
वेव्ह्ज फिल्म बाजार मधील अतिरिक्त उपक्रम :
को-प्रॉडक्शन मार्केटव्यतिरिक्त, वेव्ह्स फिल्म बाजार मध्ये पणनविषयक प्रदर्शन (मार्केट स्क्रीनिंग्स), प्रेक्षण कक्ष (व्ह्युइंग रूम – जिथे सुमारे 200 नवीन आणि अद्याप प्रदर्शित न झालेल्या भारतीय आणि दक्षिण आशियाई चित्रपटांचे चित्रफीत संग्रहालय उपलब्ध असेल),– तसेच, चित्रपट निर्मिती प्रक्रियाधीन मार्गदर्शन कार्यशाळा (वर्क-इन-प्रोग्रेस लॅब), ज्ञानवर्धक सत्रे (नाॅलेज सीरीज), निर्माता कार्यशाळा, देश दालने आणि मार्केट स्टॉल्स यांसारखे उद्योग-केंद्रीत कार्यक्रम आयोजित केले जातात. हे सर्व उपक्रम, वेव्ह्ज फिल्म बाजारच्या, प्रतिभा विकसित करण्याच्या, उद्योग संवाद वाढवण्याच्या आणि दक्षिण आशियाई चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर उंचावण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहेत.
अधिक माहिती व सादरीकरणासाठी films.wavesbazaar.com या संकेतस्थळाला भेट द्या.
***
यश राणे / आशुतोष सावे / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2162236)
Visitor Counter : 32
Read this release in:
English
,
Urdu
,
Nepali
,
Hindi
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam