राष्ट्रपती कार्यालय
79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारताच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा राष्ट्राप्रती संदेश
Posted On:
14 AUG 2025 7:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2025
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. प्रत्येक भारतीय व्यक्ती स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन जोषाने आणि उत्साहाने साजरे करते ही आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. हे दिवस आपल्या भारतीयत्वाच्या गौरवाची विशेष जाणीव करून देतात.
15 ऑगस्टचा दिवस आपल्या सामूहिक स्मृतीमध्ये खोलवर कोरला गेला आहे. दीर्घकालीन वसाहतवादी राजवटीदरम्यान देशवासीयांच्या अनेक पिढ्यांनी हे स्वप्न पाहिले होते की एक दिवस देश स्वतंत्र होईल. देशाच्या प्रत्येक भागात राहणारे पुरुष आणि स्त्रिया, वृद्ध आणि तरुण- सर्वजण परकीय राजवटीच्या शृंखला तोडून टाकण्यासाठी व्याकूळ झाले होते. त्यांच्या संघर्षामध्ये निराशेचा नव्हे तर सशक्त आशेचा भाव होता. आशेचा हाच भाव स्वातंत्र्यानंतर आपल्या प्रगतीला ऊर्जा देत आला आहे. उद्या जेव्हा आपण आपल्या तिरंग्याला अभिवादन करत असू, तेव्हा- ज्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाच्या बळावर 78 वर्षांपूर्वी 15 ऑगस्टच्या दिवशी भारताला स्वातंत्र्यप्राप्ती झाली, त्या सर्वांचे आपण स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करू.
आपलं स्वातंत्र्य पुन्हा प्राप्त करून घेतल्यावर आपण अशा लोकशाहीच्या वाटेवर पुढे निघालो, ज्यामध्ये सर्व प्रौढांना मतदानाचा अधिकार होता. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, आपल्या नियतीला आकार देण्याचा अधिकार आपण भारतीयांनी स्वतःप्रति अर्पण केला. अनेक लोकशाही व्यवस्थांमध्ये लिंग, धर्म आणि अन्य आधारांवर लोकांच्या मताधिकारावर निर्बंध असत. पण आपण असे केले नाही. अनेक आव्हाने असूनही भारतीयांनी लोकशाहीचा यशस्वी अंगीकार केला. लोकशाहीचा अंगीकार म्हणजे आपल्या प्राचीन लोकशाही मूल्यांची सहज अभिव्यक्ती होती. भारतभूमी ही जगातील सर्वात प्राचीन गणराज्यांची धरती राहिली आहे. तिला लोकशाहीची जननी म्हणणं सर्वथा योग्य आहे. आपण अंगीकारलेल्या संविधानाच्या आधारशिलेवर आपल्या लोकशाहीचा प्रासाद उभारला गेला आहे. लोकशाही कार्यशैलीला बळकटी देणाऱ्या, लोकशाहीवर आधारित अशा संस्थांची निर्मिती आपण केली. आपल्यासाठी आपले संविधान आणि आपली लोकशाही यांचे स्थान सर्वोच्च आहे.
भूतकाळाकडे पाहताना, देशाच्या फाळणीमुळे झालेली पीडा आपण कदापि विसरता कामा नये. आज आपण विभाजन विभीषिका स्मृती दिवस पाळला. फाळणीमुळे हिंसेचे भयानक दर्शन घडले आणि लक्षावधी लोकांना नाइलाजाने विस्थापित व्हावे लागले . इतिहासातल्या चुकांना बळी पडलेल्या लोकांना आज आपण श्रद्धांजली अर्पण करतो आहोत.
प्रिय देशबांधवांनो,
आपल्या लोकशाहीची सुदृढता कायम राखण्यासाठी स्तंभाचे कार्य करणाऱ्या चार मूल्यांचा आपल्या संविधानात उल्लेख आहे. ती मूल्ये म्हणजे- न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आपल्या संस्कृतीच्या या सिद्धांतांना आपण स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात पुन्हा एकदा जिवंत केले . मला असे वाटते की, व्यक्तीच्या प्रतिष्ठेची संकल्पनाच या सर्व मूल्यांच्या मुळापाशी आहे. प्रत्येक व्यक्ती समान आहे आणि आपली प्रतिष्ठा जपणारी वागणूक मिळण्याचा अधिकार सर्वांना आहे. आरोग्य सेवा आणि शिक्षण सुविधा समान पद्धतीने सर्वांच्या आवाक्यात असल्या पाहिजेत. सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. जे लोक पारंपरिक व्यवस्थेमुळे वंचित राहिले होते त्यांना मदतीची गरज होती.
या सिद्धान्तांना सर्वोच्च स्थान देत आपण 1947 मध्ये एक नवा प्रवास सुरू केला. दीर्घकालीन परकीय राजवटीनंतर स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारत घोर दारिद्र्याच्या समस्येशी झुंजत होता. परंतु तेव्हापासून आतापर्यंतच्या 78 वर्षांत आपण सर्व क्षेत्रांमध्ये असामान्य प्रगती केली आहे. आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून घडण्याच्या वाटेवर भारतानं मोठी वाटचाल केली आहे आणि दुर्दम्य आत्मविश्वासानं पुढे जात आहे.
आर्थिक क्षेत्रातले आपले यश स्पष्टपणे दिसू शकते . गेल्या आर्थिक वर्षात 6.5 टक्के इतका जीडीपी वृद्धिदर सांभाळत भारत जगातल्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक वेगाने प्रगती करणारा देश ठरला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेसमोर समस्या उभ्या असूनही देशांतर्गत मागणीत वेगाने वाढ होत आहे. चलनवाढीवर नियंत्रण कायम आहे. निर्यातीत वाढ होत आहे. सर्व प्रमुख निर्देशांक अर्थव्यवस्थेची स्थिती बळकट असल्याचे दाखवत आहेत. आपल्या श्रमिक आणि शेतकरी बंधू-भगिनींच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबरोबरच हा, विचारपूर्वक केलेल्या सुधारणा आणि कुशल आर्थिक व्यवस्थापनाचाही परिणाम आहे.
सुशासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यात आले आहे. सरकार गरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. जे लोक दारिद्र्यरेषेतून वर तर आले परंतु अद्यापि बळकट स्थितीत नाहीत, त्यांनाही अशा योजनांचे कवच उपलब्ध आहे, जेणेकरून ते पुन्हा एकदा दारिद्र्यरेषेखाली जाऊ नयेत. सामाजिक सेवांवरील वाढत्या खर्चात हे कल्याणकारी प्रयत्न प्रतिबिंबित होतात. उत्पन्नातील विषमता कमी होत चालली आहे. प्रादेशिक विषमताही कमी होत आहेत. पूर्वी कमकुवत आर्थिक कामगिरीसाठी ओळखली जाणारी राज्ये आणि प्रदेश आता आपली खरी क्षमता दाखवून देत आहेत आणि आघाडीवरच्या राज्यांशी बरोबरी करण्याच्या दिशेने पुढे जात आहेत.
आपले आघाडीवरचे व्यावसायिक, लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापारी यांनी नेहमीच काहीतरी करून दाखवण्याची भावना व्यक्त केली आहे. समृद्धी निर्माण करण्याच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्याची गरज होती. गेल्या दशकभरात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात घडून आलेल्या विकासावरून हेच स्पष्टपणे दिसून येतं. आपण भारतमाला प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्याचा विस्तार आणि मजबूतीकरण केले आहे. रेल्वेनेही नवोन्मेषाला प्रोत्साहन दिले असून अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त नव्या प्रकारच्या रेल्वेगाड्या आणि डब्यांचा वापर होऊ लागला आहे. काश्मीर खोऱ्यात रेल्वे वाहतुकीचा शुभारंभ करणे, हे एक प्रमुख यश आहे. उर्वरित भारताशी खोऱ्याचा रेल्वे संपर्क झाल्यामुळे त्या क्षेत्रातल्या व्यापार आणि पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल आणि नव्या आर्थिक संधींची कवाडे उघडली जातील. काश्मीरमध्ये अभियांत्रिकीचे हे असामान्य यश हे आपल्या देशासाठी एक ऐतिहासिक असा मैलाचा दगडच आहे.
देशात वेगाने शहरीकरण होत आहे. त्यामुळे शहरांची स्थिती सुधारण्याकडे सरकार विशेष लक्ष देत आहे. शहरी वाहतुकीच्या प्रमुख क्षेत्रावर विशेष लक्ष देत सरकारनं मेट्रोरेल्वे सुविधांचा विस्तार केला आहे. गेल्या दशकभरात मेट्रो रेल सेवेच्या सुविधांनी युक्त अशा शहरांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. 'शहरांचा कायापालट आणि शहरी परिवर्तनासाठी अटल मिशन'- म्हणजे अमृत ने हे सुनिश्चित केले आहे की अधिकाधिक घरापर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा विश्वासार्ह पद्धतीने होईल आणि सांडपाणी वाहून नेण्याची सुविधा उपलब्ध असेल.
जगण्याच्या पायाभूत सुविधांवर नागरिकांचा अधिकार आहे, अशी सरकारची भूमिका आहे. 'जल जीवन अभियानांतर्गत' ग्रामीण घरांमध्ये नळाने पाणी पोहोचवण्यात प्रगती होत आहे.
'आयुष्मान भारत' ही तशा प्रकारची जगातली सर्वात मोठी आरोग्यसेवा योजना असून त्या अंतर्गत विविध पावले उचलली गेली आहेत. त्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून आरोग्यसेवा क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आलेले दिसत आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 55 कोटींहून अधिक लोकांना सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे. सरकारने सत्तर वर्षं आणि त्यावरील वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना- त्यांचे उत्पन्न कितीही असले तरी- या योजनेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आरोग्यसुविधा आवाक्यात असण्याविषयीच्या असमानता दूर झाल्यामुळे गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना देखील शक्य तितक्या सर्वोत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत.
या डिजिटल युगात स्वाभाविकपणेच भारतातली सर्वाधिक प्रगती माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झाली आहे. जवळपास सर्व गावांमध्ये 4G मोबाईल कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. उर्वरित काही हजार गावांमध्येही लवकरच ही सुविधा पोहोचवण्यात येईल. यामुळे आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल तंत्रज्ञान आपलेसे करणे मोठ्या प्रमाणात शक्य झाले आहे. डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात भारत कमी काळातच जगातला आघाडीवरचा देश बनला आहे. यामुळे थेट लाभ हस्तांतरणालाही प्रोत्साहन मिळाले आहे आणि लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत कल्याणकारी योजनांचा निधी कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि गळतीशिवाय पोहोचण्याची खात्री होत आहे. जगभरात होणाऱ्या एकूण डिजिटल व्यवहारांपैकी अर्ध्याहून अधिक व्यवहार भारतात होतात. अशा परिवर्तनांनी एका गतिमान डिजिटल अर्थव्यवस्थेची निर्मिती झाली असून देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नात तिचे योगदान वर्षागणिक उंचावत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI हा तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा पुढचा टप्पा असून तिने आपल्या जीवनात तिचे स्थान निर्माण केले आहे. देशाच्या AI क्षमता सशक्त करण्यासाठी सरकारने India-AI अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत, भारताच्या विशिष्ट गरजा भागवणारी प्रतिमाने विकसित केली जातील. वर्ष 2047 पर्यंत भारत जागतिक दर्जाचं कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र व्हावा अशी आपली आकांक्षा आहे. त्या दिशेने, सर्वसामान्य लोकांसाठी तांत्रिक प्रगतीचा सर्वोत्तम उपयोग आणि प्रशासन व्यवस्थेत सुधारणा करून त्यांचे जीवन अधिक चांगले करण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
सामान्य जनतेचं जीवन अधिक चांगलं करण्यासाठी व्यवहार-सुलभतेबरोबरच जीवन-सुलभतेवरही तितकाच भर दिला जात आहे. सीमान्त किंवा वंचित लोकांपर्यंत मदत पोहोचेल आणि त्यांना नवीन संधी मिळतील तेव्हा विकास अर्थपूर्ण ठरतो. त्याखेरीज आपण शक्य त्या प्रत्येक क्षेत्रात अधिक आत्मनिर्भर होत आहोत. याद्वारे आपला आत्मविश्वास उंचावला आहे आणि विकसित भारत घडवण्याच्या आपल्या प्रवासाचा वेग वाढला आहे.
गेल्या आठवड्यात 7 ऑगस्टला, देशात राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा झाला. आपल्या विणकरांचा आणि त्यांचा उत्पादनांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. आपल्या स्वातंत्र्यलढ्यात 1905 मध्ये सुरू केलेल्या स्वदेशी आंदोलनाच्या स्मृतीप्रीत्यर्थ 2015 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. भारतीय कारागीर आणि शिल्पकारांनी घाम गाळून, कष्टपूर्वक आणि अतुलनीय कौशल्याने निर्माण केलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी, महात्मा गांधींनी स्वदेशीची भावना अधिक बळकट केली होती. स्वदेशीचा विचार 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत अभियान' अशा राष्ट्रीय प्रयत्नांना प्रेरणा देत आला आहे. 'आपण आपल्या देशात तयार झालेली उत्पादने विकत घेऊ आणि वापरू', असा संकल्प आपल्या सर्वांना करायचा आहे.
प्रिय देशबांधवांनो,
सर्वांगीण आर्थिक विकास आणि त्याला पूरक अशा सामाजिक क्षेत्रातल्या प्रयत्नांच्या बळावर भारत 2047 पर्यंत एक विकसित अर्थव्यवस्था म्हणून घडण्याच्या मार्गावर पुढे जात आहे. अमृतकाळाच्या या टप्प्यावर, पुढे जाण्याच्या राष्ट्रीय यात्रेत सर्व देशवासीय यथाशक्ती सर्वाधिक योगदान देतील असे मला वाटते . माझ्या मते, प्रगतीच्या या वाटेवर समाजातले तीन वर्ग आपल्याला पुढे घेऊन जातील. ते तीन वर्ग म्हणजे- आपला युवावर्ग, स्त्रिया आणि दीर्घकाळापासून वंचित असलेले समुदाय.
अंतिमतः आता, आपल्या युवकांना स्वतःची स्वप्ने साकारण्यासाठी अनुकूल परिस्थिती मिळाली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून दूरगामी बदल करण्यात आले आहेत. शिक्षणाला जीवनमूल्यांशी आणि कौशल्यांना परंपरेशी जोडले गेले आहे. रोजगाराच्या संधी वेगाने वाढत आहेत. उद्योजकतेची आकांक्षा असणाऱ्या लोकांसाठी सरकारने सर्वाधिक अनुकूल वातावरण उपलब्ध करून दिले आहे. युवा प्रतिभेच्या ऊर्जेतून शक्ती प्राप्त करून, आपल्या अंतराळ कार्यक्रमाचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या शुभांशु शुक्ला यांच्या प्रवासाने एका संपूर्ण पिढीला उत्तुंग स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली आहे याची मला खात्री वाटते. 'गगनयान' या भारताच्या आगामी मानव अवकाश उड्डाण कार्यक्रमासाठी हा अंतराळ प्रवास अत्यंत सहाय्यभूत सिद्ध होईल. नव्या आत्मविश्वासाने परिपूर्ण असे आपले युवक- युवती, क्रीडाजगतात आपली ओळख निर्माण करत आहेत. उदाहरणार्थ- बुद्धिबळात भारताच्या युवावर्गाचे जसे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे तसे पूर्वी कधीही नव्हते . राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 च्या उद्दिष्टांनुसार - अशा आमूलाग्र परिवर्तनाची कल्पना आपण करत आहोत ज्याच्या बळावर भारत एक जागतिक क्रीडा महासत्ता म्हणून उदयाला येईल.
आपल्या कन्या आपल्या अभिमानबिंदू आहेत. संरक्षण आणि सुरक्षा यांसह प्रत्येक क्षेत्रात अनेक अडथळे पार करून त्या पुढे जात आहेत. खेळ म्हणजे उत्कृष्टता, सबलीकरण आणि क्षमतांचे महत्त्वाचे निदर्शक असे मानले जाते . जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदासाठी 'फिडे महिला विश्वचषक' स्पर्धेचा अंतिम सामना भारताचीच 19 वर्षीय कन्या आणि 38 वर्षीय महिला यांच्यात खेळला गेला. आपल्या स्त्रियांची पिढीगणिक उंचावत गेलेली शाश्वत, सातत्यपूर्ण आणि जागतिक स्तरावरची उत्कृष्टता या यशामुळे अधोरेखित होते. रोजगारामध्ये स्त्री-पुरुष विषमता कमी होत आहे. 'नारीशक्ती वंदन अधिनियमामुळे' महिला सक्षमीकरण ही केवळ घोषणा न राहता यथार्थ ठरत आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय आणि अन्य समुदायांचे लोक हा आपल्या समाजातला एक मोठा भाग आहे. या समुदायांचे लोक आता वंचित असण्याच्या शिक्क्यातून बाहेर येत आहेत. त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक आकांक्षा साकारण्यासाठी, सक्रिय प्रयत्नांच्या माध्यमातून सरकार त्यांना मदत करत आले आहे.
आपली खरी क्षमता प्राप्त करण्याच्या दिशेने भारत आता आणखी वेगाने मार्गक्रमण करत आहे. आपल्या सुधारणा आणि धोरणांमुळे विकासाचा एक प्रभावी मंच तयार झाला आहे. या तयारीच्या बळावर मला एक उज्वल भवितव्य दिसत आहे- त्यामध्ये आपल्या सामूहिक समृद्धी आणि संपन्नतेत आपण सगळे उत्साहपूर्वक योगदान देत आहोत असे भावी चित्र मला दिसत आहे.
भ्रष्टाचाराप्रति शून्य सहिष्णुता अंगीकारून, अविरत सुशासनाच्या साथीने आपण त्या भविष्याकडे वाटचाल करत आहोत. या संदर्भात मला महात्मा गांधी यांचं एक महत्त्वपूर्ण विधान आठवते. गांधीजींचे उद्गार आता मी उद्धृत करते:
"भ्रष्टाचार आणि दांभिकता हे लोकशाहीचे अपरिहार्य परिणाम असता कामा नयेत."
गांधीजींच्या या आदर्शाला मूर्तरूप देण्याचा आणि भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प आपण सर्वजण करूया.
प्रिय देशबांधवांनो,
यावर्षी आपल्याला दहशतवादाचा प्रहार सोसावा लागला. काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या निष्पाप नागरिकांची हत्या अतिशय भ्याड आणि अत्यंत अमानुष होती. भारताने पोलादी संकल्पासह निर्णायक पद्धतीने याला प्रत्युत्तर दिले . ऑपरेशन सिंदूरने हे दाखवून दिले की जेव्हा राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो, तेव्हा आपली सैन्यदले कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी संपूर्ण समर्थ असल्याचे सिद्ध करतात. सामरिक स्पष्टता आणि तांत्रिक दक्षता यांच्या बळावर आपल्या सैन्यानं सीमापार दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. मला खात्री आहे की, दहशतवादाविरोधात मानवतेच्या संग्रामामध्ये ऑपरेशन सिंदूर एक जाज्ज्वल्य उदाहरण म्हणून इतिहासात नोंदलं जाईल.
प्रत्युत्तरादाखल आपण केलेल्या कारवाईचे सर्वात मोठं वैशिष्ट्य - आपली एकता हेच होते . ज्या शक्ती आपल्याला विभाजित पाहू इच्छितात त्या सर्वांसाठी ही एकता हेच सडेतोड उत्तर आहे. भारताचा दृष्टिकोन स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये गेलेल्या खासदारांच्या बहुपक्षीय प्रतिनिधी- मंडळांमध्येदेखील हीच एकता दिसून आली. जागतिक समुदायानंही आपल्या पवित्र्याची दखल घेतली, की भारत आक्रमणकारी तर होणार नाही परंतु आपल्या नागरिकांच्या रक्षणासाठी प्रत्युत्तराची कारवाई करण्यात तीळमात्र कुचराईही करणार नाही.
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत अभियानाची परीक्षाही ऑपरेशन सिंदूरच्या वेळी बघितली गेली. आपण योग्य मार्गावर आहोत हे आता सिद्ध झाले आहे. आपल्या संरक्षणविषयक बहुतांश गरजा भागवण्यात आपण आत्मनिर्भर झालो असण्याच्या निर्णायक स्तरापर्यंत आता आपले स्वदेशी उत्पादन पोहोचले आहे. या यशाने स्वतंत्र भारताच्या संरक्षण इतिहासात एक नवा अध्याय गुंफला गेला आहे.
प्रिय देशबांधवांनो,
या निमित्ताने मी आपणा सर्वांना आग्रह करू इच्छिते की पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न करावेत. हवामानबदलाच्या आव्हानाशी दोन हात करण्यासाठी आपल्याला स्वतःमध्येही काही बदल करावे लागतील. आपल्याला आपल्या सवयींमध्ये आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात परिवर्तन करावे लागेल. आपल्याला आपल्या धरती, नद्या, पर्वत, झाडझुडपे आणि जीवजंतूंबरोबरच्या आपल्या संबंधांमध्ये बदल करावा लागेल. आपण सर्वजण आपल्या योगदानाने एक अशी पृथ्वी मागे सोडून जाऊ- जिथे जीवन आपल्या नैसर्गिक स्वरूपात बहरत राहील.
प्रिय देशबांधवांनो,
आपल्या सीमांचे रक्षण करणारे सैनिक, पोलीस, आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांकडे माझे विशेष लक्ष आहे. न्यायमंडळ आणि नागरी सेवांच्या सदस्यांनाही मी शुभेच्छा देते. परदेशांमधल्या भारतीय दूतावासांमध्ये कार्यरत भारतीय अधिकारी आणि अनिवासी भारतीय यांनाही माझ्याकडून स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देते.
धन्यवाद !
जय हिंद !
जय भारत !
* * *
जयदेवी पुजारी स्वामी/दूरदर्शन मुंबई/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156554)
Read this release in:
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Odia
,
English
,
Khasi
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Punjabi
,
Gujarati