पंतप्रधान कार्यालय
ऑपरेशन सिंदूरवरील विशेष चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेले भाषण
Posted On:
29 JUL 2025 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जुलै 2025
माननीय अध्यक्ष महोदय जी,
संसदेचे पावसाळी सत्र सुरू होत असताना जेव्हा मी प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलत होतो तेव्हा मी सर्व माननीय संसद सदस्यांना आवाहन करताना एका गोष्टीचा उल्लेख केला होता. संसदेचे हे सत्र भारताच्या विजयोत्सवाचे सत्र आहे. संसदेचे हे सत्र भारताचे गौरव गान करण्याचे सत्र आहे.
माननीय अध्यक्ष महोदय जी,
जेव्हा मी विजयोत्सवाबद्दल बोलतो तेव्हा हा विजयोत्सव दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत करण्याबद्दल आहे. हा विजयोत्सव सिंदूरची शपथ पूर्ण करण्याबद्दल आहे. हा विजयोत्सव भारतीय सैन्याच्या अदम्य शौर्य आणि सामर्थ्याच्या विजयगाथेचा आहे. हा विजयोत्सव 140 कोटी भारतीयांची एकता, इच्छाशक्ती आणि त्यामुळे मिळालेल्या विजयाचा आहे, असे मी सांगू इच्छितो.
माननीय अध्यक्ष महोदय जी,
मी याच विजयी भावनेने सभागृहात भारताची बाजू मांडण्यासाठी उभा आहे. आणि ज्यांना भारताची बाजू समजून घेता येत नाही त्यांना आरसा दाखवण्यासाठी उभा आहे.
माननीय अध्यक्ष महोदय जी,
मी 140 कोटी देशवासीयांच्या भावनेमध्ये आपला सुर मिळवण्यासाठी येथे उपस्थित आहे. 140 कोटी देशवासीयांच्या भावनेची जी अभिव्यक्ती आहे, ती सदनातील सर्वांपर्यंत पोहोचत आहे, मी देखील त्यातच आपला सूर मिळवण्यासाठी येथे उभा आहे.
माननीय अध्यक्ष महोदय जी,
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्याप्रकारे देशवासीयांनी मला साथ दिली, मला आशीर्वाद दिले, त्यासाठी देशातील जनतेचा मी ऋणी आहे. मी देशवासियांप्रति आभार व्यक्त करतो. मी देशवासीयांचे अभिनंदन करतो.
माननीय अध्यक्ष महोदय जी,
22 एप्रिल रोजी पहेलगाम मध्ये ज्या प्रकारे अत्यंत क्रूर घटना घडली, ज्या प्रकारे दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या, ती क्रौर्याची पराकाष्ठा होती. भारताला हिंसेच्या अग्नीत ढकलून देण्याचा हा एक विचारपूर्वक रचलेला कट होता. हा भारतात दंगली सुरू करण्याचा कट होता. मी आज देशवासीयांना धन्यवाद देतो कारण देशाने एकता दाखवत हा कट हाणून पाडला.
माननीय अध्यक्ष महोदय जी,
22 एप्रिल नंतर मी सार्वजनिक रूपाने बोलताना आणि सर्व जगालाही समजावे यासाठी इंग्रजी भाषेतील काही वाक्यांचा प्रयोग केला होता आणि सांगितले होते की हा आमचा संकल्प आहे. आम्ही दहशतवाद्यांचा खात्मा करू आणि मी सार्वजनिक रूपाने बोलताना म्हणालो होतो की या दहशतवाद्यांच्या मास्टर माईंडना देखील शिक्षा होईल आणि ती शिक्षा कल्पनेपेक्षाही मोठी असेल. 22 एप्रिल रोजी मी परदेशात होतो. ही घटना घडताच मी ताबडतोब मायदेशी परतलो. परत येताच मी एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीत आम्ही स्पष्ट शब्दात निर्देश दिले होते की दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे आणि हा आमचा राष्ट्रीय संकल्प आहे.
माननीय अध्यक्ष महोदय जी,
आमचा आमच्या सैन्य दलांच्या बळावर पूर्ण विश्वास आहे, पूर्ण भरोसा आहे. आमच्या सैन्य दलांच्या क्षमतेवर, त्यांच्या सामर्थ्यावर, त्यांच्या सहसावर आमचा पूर्ण विश्वास आहे. सैन्याला दहशतवाद विरोधी कारवाई करण्यासाठी पूर्ण मुभा देण्यात आली. तसेच, कधी, केव्हा, कशी, कोणत्या प्रकारे ही कारवाई करायची हे सैन्याने ठरवावे, याचेही स्वातंत्र्य देण्यात आले. या सर्व बाबींवर या बैठकीत उघड उघड चर्चा झाली. या बैठकीतील काही मुद्दे प्रसार माध्यमांमध्ये चर्चिले गेले होते. आम्हाला याचा गर्व आहे की आम्ही दहशतवाद्यांना शिक्षा दिली, आणि अशी शिक्षा दिली की त्यांच्या ‘आकांची’ झोप आजही उडालेली आहे.
माननीय अध्यक्ष महोदय जी,
मी आपल्या सेनेची सफलता, त्याच्याशी संबंधित भारताची बाजू सभागृहाच्या माध्यमातून देशवासीयांसमोर मांडू इच्छितो. पहिला मुद्दा, पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याला अंदाज आला होता की भारत नक्कीच कुठलीतरी मोठी कारवाई करणार. त्यांच्या बाजूने अणुअस्त्राच्या धमक्या देणारी वक्तव्ये केली जाणे देखील सुरू झाले होते. भारताने 6 मेच्या रात्री आणि 7 मेच्या सकाळी, ज्याप्रमाणे ठरवले होते त्याप्रमाणे कारवाई केली आणि पाकिस्तान काहीच करू शकला नाही. 22 एप्रिलचा प्रतिशोध 22 मिनिटात या निर्धारित लक्ष्याला समोर ठेवून आपल्या सैन्याने कामगिरी केली. दुसरा मुद्दा, आदरणीय अध्यक्ष महोदय जी, पाकिस्तानबरोबर आपली लढाई अनेक वेळा झाली आहे. मात्र, प्रथमच भारताने अशी रणनीती बनवली की ज्याद्वारे आपण पूर्वी कधीही सर करु शकलो नव्हतो असे लक्ष्य आपण यावेळी प्राप्त केले. पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यातील दहशतवादी अड्ड्यांना आपण उध्वस्त केले. दहशतवादाचे असे अड्डे, जेथे कोणी पोहोचण्याची कल्पना देखील करू शकत नव्हते. बहावलपूर आणि मुरीदके येथील दहशतवादी अड्ड्यांना देखील जमीनदोस्त करण्यात आले.
माननीय अध्यक्ष महोदय जी,
आपल्या सैन्याने दहशतवादी अड्ड्यांना ध्वस्त करून टाकले. तिसरा मुद्दा, पाकिस्तानच्या अण्वस्त्राच्या धमकीला आम्ही खोटे ठरवले. भारताने हे सिद्ध केले की आता न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग चालणार नाही आणि न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग समोर भारत आता झुकणार नाही.
माननीय अध्यक्ष महोदय जी,
चौथा मुद्दा, भारत आणि आपली तांत्रिक क्षमता प्रदर्शित केली. पाकिस्तानच्या मर्मस्थानावर थेट प्रहार केला. पाकिस्तानच्या हवाई तळांना खूप मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचवली, त्यामुळे त्यांचे अनेक हवाई तळ आजही अतिदक्षता विभागात उपचार घेत पडलेले आहेत. आज तंत्रज्ञान आधारित युद्धाचे युग आहे. ऑपरेशन सिंदूर या कौशल्यातही यशस्वी सिद्ध झाले आहे. गेल्या दहा वर्षात आपण जी सज्जता केली, जर ती केली नसती तर या तंत्रज्ञानाच्या युगात आपले किती नुकसान झाले असते, याचा आपण अंदाज लावू शकतो. पाचवा मुद्दा, ऑपरेशन सिंदूर दरम्यान प्रथमच जगाला आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ओळख झाली. स्वदेशात निर्मित ड्रोन, स्वदेशात निर्मित क्षेपणास्त्रे यांनी पाकिस्तानच्या संपूर्ण शस्त्रास्त्रांची धूळधाण उडवली.
माननीय अध्यक्ष महोदय जी,
अजून एक महत्त्वपूर्ण काम झाले आहे, जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते त्यांच्या कार्यकाळात जे संरक्षण मंत्रालयाचे काम पाहणारे एक राज्यमंत्री होते. जेव्हा मी लष्कर प्रमुख पदाची घोषणा केली होती तेव्हा ते राज्यमंत्री खूप आनंदी होऊन मला भेटायला आले होते, ते खूप खूप आनंदी होते. यावेळी या कारवाईत नौदल लष्कर आणि हवाई दल या तिन्ही दलांनी एकत्रित केलेली कारवाई, तिन्ही दलांमधला समन्वय यामुळे पाकिस्तान नामोहरम झाला.
माननीय अध्यक्ष महोदय जी,
देशात पूर्वी देखील दहशतवादी हल्ले झाले होते. मात्र पूर्वी दहशतवाद्यांचे मास्टरमाइंड हल्ल्यानंतरही निश्चिंत असायचे आणि ते पुढील हल्ल्याचा कट शिजवण्यात व्यस्त असायचे. त्यांना माहिती होते की त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आता हल्ला केल्यानंतर त्या हल्ल्याच्या मास्टरमाईंडची झोप पळून गेली आहे, कारण त्यांना आता कळले आहे की भारतीय सैन्य येईल आणि हल्ला करून जाईल. हे न्यू नॉर्मल भारताने स्थापित केले आहे.
माननीय अध्यक्ष महोदय जी,
आपल्या सैन्य कारवाईची व्याप्ती किती मोठी आहे, प्रमाण किती मोठे आहे हे जगाने पाहिले आहे. भारतीय सैन्याने सिंदूर पासून सिंधूपर्यंत पाकिस्तानविरोधी कारवाई केली आहे. ऑपरेशन सिंदूरने हे दाखवून दिले आहे की भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या दहशतवाद्यांच्या आकांना आणि पाकिस्तानला या हल्ल्यांची खूप मोठी किंमत मोजावी लागेल, त्यांना कदापी माफ केले जाणार नाही.
माननीय अध्यक्ष महोदय जी,
भारताने तीन सूत्र स्वीकारले असल्याचे ऑपरेशन सिंदूर मधून स्पष्ट होते. पहिले सूत्र, जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर आम्ही आपल्या पद्धतीने, आपल्या अटींवर, आपल्या वेळेनुसार त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणारच. दुसरे सूत्र म्हणजे कसल्याही प्रकारचे न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग आता चालणार नाही. तिसरे सूत्र म्हणजे आम्ही दहशतवाद्यांना मदत करणारी सरकारे आणि दहशतवाद्यांचे ‘आका’ यांना वेगळे मानणार नाही.
माननीय अध्यक्ष महोदय जी,
या काळात परदेशी धोरणावर देखील अनेक चर्चा झाल्या. जगाच्या पाठिंब्याबाबत देखील वेगवेगळी वक्तव्ये समोर आली. मी आज सभागृहात काही गोष्टी अगदी स्पष्ट शब्दात मांडू इच्छितो. जगातील कोणत्याही देशाने भारताला आपल्या सुरक्षेसाठी कारवाई करण्यापासून रोखले नाही. संयुक्त राष्ट्रातील 193 देश, आणि केवळ 3 देश, 193 देशांपैकी केवळ 3 देशांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला पाठिंबा देणारी विधाने केली होती, केवळ 3 देश.क्वाड परिषद असो किंवा ब्रिक्स संघटना, फ्रान्स, रशिया, जर्मनी कोणत्याही देशाचे नाव घ्या, जगभरातील सगळ्या देशांनी भारताला पाठिंबा दिला होता.
आदरणीय अध्यक्ष जी,
संपूर्ण जगातून पाठिंबा तर मिळाला, जगातल्या अनेक देशांनी भारताचे समर्थन केले, परंतु दुर्दैव असे की, माझ्या देशाच्या वीर सैनिकांनी केलेल्या पराक्रमाला कॉंग्रेसचे समर्थन मिळाले नाही. 22 एप्रिलच्या नंतर, 22 एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्यानंतर तीन-चार दिवस हे लोक अगदी उड्या मारत, खूप मोठ-मोठ्याने बोलत होते की, ‘कुठे गेली 56 इंच छाती?‘ कुठे हरवले मोदी? मोदी तर अपयशी आहेत! या हल्ल्याची जणू ही मंडळी पूर्ण मौज लुटत होते. त्यांना वाटत होते, वाह! चला आपणच बाजी मारली. पहलगाम इथे झालेल्या निर्दोष- निरपराध लोकांच्या हत्येच्या घटनेचेही राजकारण कसे करता येईल, यामध्ये विरोधकांनी संधी शोधली. आपल्या स्वार्थी राजकारणासाठी माझ्यावर निशाणा ते साधत होते. परंतु त्यांच्या या वक्तव्यांनी आणि कद्रू विचार सरणीमुळे देशाच्या सैनिकांचे मनोबल कमी होत होते. कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा तर भारताच्या सामर्थ्यावर विश्वास नव्हता, की भारताच्या सेनेच्या क्षमतेवर भरवसा नव्हता. त्यामुळे ते सातत्याने ‘ऑपरेशन सिंदूर‘ वर प्रश्नचिन्ह निर्माण करीत होते. असे बोलून, वागून हे लोक प्रसार माध्यमांमध्ये ‘शीर्षका’ची बातमी ठरत होते, प्रसिद्धी नक्कीच मिळवत होते, परंतु त्यांना देशाच्या जनतेच्या हृदयामध्ये काही स्थान मिळू शकले नाही.
आदरणीय अध्यक्ष जी,
10 मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सुरू असलेली कारवाई काही काळासाठी रोखण्याची घोषणा केली. याविषयी अनेक प्रकारच्या गोष्टींची चर्चा केली गेली. ज्या गोष्टी सीमेपलिकडून मुद्दाम पसरविल्या जातात, त्याच गोष्टींचा विरोधकांनी प्रसार केला. काही लोकांनी भारतीय लष्कराकडून कारवाईचे जे पुरावे दिले होते, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराप्रमाणेच त्यांनीही बोलणे सुरूच ठेवले. वास्तविक याबाबतीत भारताची भूमिका नेहमीच अतिशय स्पष्ट आहे.
आदरणीय अध्यक्ष जी,
काही गोष्टींचे यावेळी मी स्मरण करून देवू इच्छितो. ज्यावेळी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले, त्यावेळी आम्ही लक्ष्य निश्चित केले होते. आमच्या सैनिकांना सज्ज केले होते. त्यांनी शत्रूपक्षाच्या क्षेत्रामध्ये जायचे आणि तिथे असलेले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून परत यायचे. आणि त्यावेळी सर्जिकल स्ट्राईक म्हणजे एका रात्रीचे ऑपरेशन होते. आमच्या वीर जवानांनी सूर्योदय होण्यापूर्वी हे काम पूर्ण केले आणि ते मायभूमीत परतले. लक्ष्य निर्धारित केले होते, त्यानुसार त्यांनी हे काम करायचे होते. ज्यावेळी बालाकोट हवाई हल्ले केले, त्यावेळी आमचे लक्ष्य निश्चित होते. तिथे असणारे दहशतवादी प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त करण्याचे आम्ही लक्ष्य निश्चित केले होते. आणि आमचे असे लक्ष्य होते की, दहशतवादी कारवाया ज्या स्थानावरून चालतात, जिथून त्यांना सर्व सामुग्री पुरवली जाते, त्यावर हल्ला करून ते संपूर्ण केंद्र उद्ध्वस्त करणे. तसेच पहलगाममधल्या दहशतवादी कृत्याची जिथे योजना तयार झाली, जिथून दहशतवाद्यांना प्रशिक्षण मिळाले, या निर्घृण कृत्यासाठी जिथून दहशतवाद्यांना सामुग्री मिळाली, त्या संपूर्ण व्यवस्थेवर हल्ला करण्याची योजना आम्ही आखली. आम्ही त्यांच्या मूळ नाभी-गाभा केंद्रावरच हल्ला केला. पहलगाम कृत्यासाठी जिथे दहशतवाद्यांची भर्ती झाली, प्रशिक्षण दिले गेले, या हल्ल्यासाठी जिथून त्यांना निधी मिळाला, तसेच प्रशिक्षणासाठी आवश्यक असणा-या सर्व तांत्रिक गोष्टींचा पुरवठा झाला होता, शस्त्रास्त्रांची सुविधा दिली गेली, ती सर्व स्थाने आम्ही चिह्नीत केली आणि आम्ही अगदी त्याच स्थानांना लक्ष्य बनवले. ही मोहीम अगदी सटीकपणे नेमक्या केंद्रस्थानी हल्ले करणारी होती. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांच्या केंद्रस्थानी प्रहार केला.
आणि आदरणीय अध्यक्ष जी,
यावेळी आमच्या सेनेने अगदी शंभर टक्के लक्ष्य प्राप्त करून देशाच्या सामर्थ्याचा परिचय करून दिला. काही लोकांना हे सगळे अगदी कळत असूनही त्यांनी काही गोष्टी विसरण्यात रस दाखवला. मात्र देश काहीही विसरत नाही. देशाला सर्व गोष्टी चांगल्या लक्षात राहतात. 6 मे ची रात्र आणि 7 मे च्या पहाटे ऑपरेशन सिंदूर पार पाडले. आणि 7 मे रोजी सकाळी आमच्या सेनेच्यावतीने एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये भारताने काय केले, हे अगदी स्पष्ट करण्यात आले होते. आणि पहिल्याच दिवशी इतके स्वच्छ, स्पष्ट सांगितले होते की, आमचे लक्ष्य हे दहशतवादी आहेत, दहशतवाद्यांचे मूळ, त्यांना सर्व व्यवस्था पुरविणारी मंडळी आहेत, दहशतवाद्यांचे म्होरके आहेत, आणि तेच अड्डे आम्ही उद्ध्वस्त करू इच्छितो. आणि आम्ही त्या पत्रकार परिषदेमध्ये असेही सांगितले होते की, आम्ही जे ठरविले होते, ते काम आम्ही केले आहे. आम्ही ज्या कामाचा निर्धार केला होता, ते काम पूर्ण केले आहे. आणि म्हणूनच 6-7 मे च्या दरम्यान आम्ही केलेले ऑपरेशन यशस्वी झाल्यामुळे आम्ही आनंदी होतो. त्याविषयी काल संरक्षण मंत्री राजनाथ जी, यांनी जे सांगितले होते, तेच मी आत्ता डंका वाजवून- पिटवून अगदी उच्चरवामध्ये पुन्हा एकदा सांगतो की, भारताच्या सेनेने पाकिस्तानच्या लष्कराला काही मिनिटांच्या अवधीमध्ये दाखवून दिले की, आमचे हे लक्ष्य होते, आणि आम्ही ते लक्ष्य साध्य केले आहे. त्यामुळे त्यांना माहिती व्हावे की, आणि आपल्यालाही माहिती असावे की, त्यांच्या डोक्यात कोणत्या प्रकारचे विचार सुरू आहेत. आम्ही आपले लक्ष्य अगदी पूर्ण शंभर टक्के साध्य केले आहे. आणि पाकिस्तानलाही हे चांगलेच समजले पाहिजे की, दहशतवाद्यांची पाठराखण त्यांनी थेट जाहीरपणे करण्याची चूक यापुढे करता कामा नये. त्यांनी निर्लज्ज होवून दहशतवाद्यांच्या बरोबरीने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. मग आम्हीही पूर्ण तयार होतो. आम्हीही संधी शोधत होतो, परंतु आम्ही संपूर्ण जगाला दाखवून दिले की, आमचे लक्ष्य दहशतवाद आहे, दहशतवादाला खत पाणी घालणारे त्यांचे म्होरके आहेत. दहशतवादी तयार करणारी स्थाने आहेत, आम्ही या गोष्टी उद्ध्वस्त करण्याचे आम्ही आमचे काम पूर्ण केले आहे. परंतु ज्यावेळी पाकिस्तानने दहशतवाद्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी मैदानामध्ये उतरण्याची चूक केली, यावेळी भारताच्या सेनेने असे काही सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे की, भारताकडून झालेल्या या जबरदस्त हल्ल्याचे स्मरण त्यांना यापुढची अनेक वर्षे राहील. 9 मे च्या मध्यरात्री आणि 10 मे च्या पहाटे आमच्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या प्रत्येक कोनामध्ये असलेल्या तळांवर प्रचंड प्रहार केला. हे हल्ले किती भीषण, शक्तिशाली असतील , याची कल्पनाही पाकिस्तानने आधी केली नसणार. त्यामुळे पाकिस्तान या हल्ल्यांनंतर पाकिस्तनला लगोलग गुडघे टेकवावे लागले. आणि आपल्या दूरचित्रवाणीवर तुम्ही सर्वांनीही पाहिले असेलच. ते काय दाखवत होते ? हल्ल्यांविषयी काय वक्तव्य प्रसारित केले जात होते? पाकिस्तानचे लोक म्हणत होते की, अरे मी तर तरणतलावामध्ये स्नान करीत होतो; कोणी म्हणत होते, मी तर कार्यालयामध्ये जाण्याची तयारी करीत होतो. आम्ही काही विचार करण्याआधीच भारताने तर हल्लाच केला. पाकिस्तानच्या लोकांनी दिलेली अशी वक्तव्ये आहेत आणि हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. कोणी तरणतलावामध्ये स्नान करीत होते आणि त्यावेळी इतका जबरदस्त हल्ला त्या देशावर झाला की, असे काही होईल, याचा साधा विचारही पाकिस्तानने केला नव्हता. त्यावेळी पाकिस्तानने दूरध्वनी करून - डीजीएमओ यांच्यासमोर दूरध्वनी करून विचार मांडला की, आता थांबा, खूप हल्ले झाले. आता यापुढे आणखी हल्ले झेलण्याची ताकद आमच्यामध्ये राहिली नाही., कृपया हल्ले थांबवावेत. ही गोष्ट पाकिस्तानच्या डीजीएमओने दूरध्वनी करून बोलली होती आणि भारताने तर पहिल्याच दिवशी सांगितले होते की, 7 तारखेला जी भारताने पत्रकार परिषद घेतली आहे, ती त्यांनी पहावी. आम्ही आमचे ध्येय पूर्ण केले आहे. यापुढे जर तुम्ही आणखी कागाळी काढली तर मात्र ती गोष्ट तुम्हाला खूप महागात पडेल. मी आज पुन्हा एकदा सांगतो की, हे भारताचे अगदी स्पष्ट धोरण होते. अतिशय शांतचित्ताने योग्य विचााराने निश्चित केलेली ही नीती होती. सेनेबरोबर चर्चा करून त्यांचा विचार घेवून भारताने हे धोरण स्पष्ट केले होते. दहशतवाद्यांचे तळ, त्यांची केंद्रस्थाने, त्यांचे म्होरके, त्यांचे प्रशिक्षण अड्डे हे आमचे लक्ष्य असणार होते आणि आम्ही हीच गोष्ट पहिल्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितली होती. आम्ही हेही स्पष्ट केले होते की, आमची कृती ही ‘नॉन एस्कलेटरी‘ असणार आहे. आम्हाला संघर्ष वाढवायचा नाही, परंतु आमच्यावर झालेल्या हल्ल्याला आम्ही सडेतोड प्रत्युत्तर देणारच. जे आम्ही सांगितले होते, ते काम आम्ही पूर्ण केले आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, आम्ही हल्ले रोखले.
अध्यक्ष जी,
जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ही मोहीम रोखण्याविषयी भारताला काहीही सांगितले नाही. त्याच काळामध्ये 9 तारखेला रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी माझ्याशी बोलण्यासाठी प्रयत्न केला. ते एक तास प्रयत्न करीत होते. परंतु मी त्यावेळी सेनेच्या अधिकारी वर्गाबरोबर सुरू असलेल्या बैठकीमध्ये व्यग्र होतो. त्यामुळे मी त्यांचा दूरध्वनी घेवू शकलो नाही. त्यानंतर मी त्यांना उलटा फोन केला. मी त्यांना फोनविषयी विचारले, ‘‘ तुम्ही फोन केला होता, मात्र मी तो घेवू शकलो नाही. तुमच्याकडून तीन-चार वेळा फोन आला होता, काय बोलायचे होते? ‘’ असे मी त्यांना विचारले. त्यावेळी अमेरिकेच उपराष्ट्रपती जी मला फोनवर म्हणाले की, पाकिस्तान खूप मोठा हल्ला करणार आहे. ही गोष्ट त्यांनीच मला सांगितली, यावर मी त्यांना जे उत्तर दिले, त्याबाबत कोणाला काही गोष्टी समजू शकल्या नाहीत, आता कुणाला नाही समजल्या तर त्याबाबत काय करणार? याबाबत माझे उत्तर होते की, जर पाकिस्तानचा असा हल्ला करण्याचा निश्चय असेल तर ती गोष्ट त्यांना खूप महागात पडेल. मी हे अमेरिकेच्या उपराष्ट्रतींना सांगितले होते. जर पाकिस्तानने हल्ला केला, तर आम्ही त्यापेक्षाही मोठा हल्ला करून त्याला उत्तर देवू. हेच माझे उत्तर होते आणि त्यापुढे मी एक वाक्य बोललो की, आम्ही बंदुकीच्या गोळीला उत्तर बॉम्बगोळ्या देवू. आमचे हे फोनवरचे बोलणे दिनांक 9 मेच्या रात्री झाले होते. आणि 9 मे च्या रात्री आणि 10 मेच्या पहाटे आम्ही पाकिस्तानच्या सैन्यशक्तीला उद्ध्वस्त केले होते. आणि हेच आमचे उत्तर होते. हाच आमचा मनसुबा होता. आणि आज पाकिस्तानही पूर्णपणे जाणून आहे की, भारताने दिलेले प्रत्येक उत्तर अतिशय तगडे, दमदार असते. त्यांना ही गोष्टही चांगली माहिती आहे की, जर भविष्यात अशी वेळ आली तर भारत यापुढचीही कारवाई करू शकतो आणि म्हणूनच मी लोकशाहीच्या या मंदिरामध्ये पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. पाकिस्तानने पुन्हा कागाळी करण्याची घोडचूक करण्याची साधी कल्पना जरी केली, तर त्याला अतिशय कडक उत्तर दिले जाईल.
अध्यक्ष महोदय,
आजचा भारत आत्मविश्वासाने भरलेला आहे. आजचा भारत स्वावलंबनाचा मंत्र घेऊन पूर्ण ताकदीने वेगाने पुढे जात आहे. देश पाहत आहे, भारत स्वावलंबी होत आहे. पण देश हे देखील पाहत आहे की एकीकडे भारत स्वावलंबी होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, परंतु काँग्रेस मुद्द्यांसाठी पाकिस्तानवर अवलंबून राहू लागला आहे. मी आज दिवसभर पाहत होतो, गेल्या सोळा तासांपासून सुरू असलेली चर्चा, दुर्दैवाने काँग्रेसला पाकिस्तानमधून मुद्दे आयात करावे लागत आहेत.
अध्यक्ष महोदय,
आजच्या युद्धात माहिती आणि कथनांचा मोठा वाटा आहे. आख्यायिका तयार करून, एआयचा पुरेपूर वापर करून, सैन्याचे मनोबल कमकुवत करण्याचे खेळही खेळले जातात. जनतेमध्ये अविश्वास निर्माण करण्याचेही अनेक प्रयत्न केले जातात. दुर्दैवाने, काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष पाकिस्तानच्या अशा कटांचे प्रवक्ते बनले आहेत.
अध्यक्ष महोदय,
देशाच्या लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला.
अध्यक्ष महोदय,
देशाच्या सैन्याने सर्जिकल स्ट्राईक यशस्वीरित्या पार पडला, तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी लगेच सैन्याकडून पुरावे मागितले. पण जेव्हा त्यांनी देशाचा मूड पाहिला, तेव्हा त्यांचा सूर बदलू लागला आणि तो बदलल्यानंतर त्यांनी काय म्हटले? काँग्रेसचे लोक म्हणाले, या सर्जिकल स्ट्राईकमध्ये काय मोठी गोष्ट आहे, आम्हीही ते केले होते. एकाने म्हटले, तीन सर्जिकल स्ट्राईक केले होते. दुसऱ्याने म्हटले, सहा सर्जिकल स्ट्राईक केले होते. तिसऱ्याने म्हटले, पंधरा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले. नेता जेवढा मोठा, तेवढा मोठा आकडा होता.
अध्यक्ष महोदय,
यानंतर लष्कराने बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला. आता हवाई हल्ला असा होता की ते काहीही बोलू शकत नव्हते, म्हणून ते म्हणाले नाहीत, की आम्हीही तो केला होता. त्यात त्यांनी समजूतदारपणा दाखवला, पण फोटो मागू लागले. जर हवाई हल्ला झाला असेल तर फोटो दाखवा. काय म्हणालात, पडले? काय नुकसान झाले? किती नुकसान झाले? किती लोक मरण पावले? ते केवळ तेच विचारत राहिले! पाकिस्तानही ते विचारत होता, म्हणून तेही तेच विचारत होते. एवढेच नाही...
अध्यक्ष महोदय,
जेव्हा वैमानिक अभिनंदनला पकडण्यात आले तेव्हा पाकिस्तानमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक होते, कारण त्यांनी भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाला पकडले होते, मात्र पण इथेही काही लोक होते जे सर्वांच्या कानात कुजबुजत होते, की आता मोदी अडकले, अभिनंदन तिथे आहे, मोदींना त्याला परत आणून दाखवावे, आता मोदी काय करतात ते पाहूया, आणि अभिनंदन परतला. आम्ही अभिनंदनला परत आणले, तर यांची बोलती बंद झाली. त्यांना वाटले, हा भाग्यवान माणूस आहे! आमचे शस्त्र हातातून निसटले.
अध्यक्ष महोदय,
पहलगाम हल्ल्यानंतर, आपल्या एका बीएसएफच्या जवानाला पाकिस्तानने पकडले, तेव्हा त्यांना वाटले की व्वा! एक मोठा मुद्दा हाती आला, आता मोदी अडचणीत येतील. आता मोदी यांची नक्कीच फजिती होईल, आणि त्यांच्या परिसंस्थेच्या सोशल मीडियावर अनेक कथा व्हायरल झाल्या, की या बीएसएफ सैनिकाचे काय होईल? त्याच्या कुटुंबाचे काय होईल? तो परत येईल का? तो कधी येईल? तो कसा येईल? यांनी काय काय पसरवले.
अध्यक्ष महोदय,
तो बीएसएफ जवानही सन्मानाने आणि अभिमानाने परतला. दहशतवादी रडत आहेत, दहशतवाद्यांचे आश्रयदाते रडत आहेत आणि त्यांना रडताना पाहून येथील काही लोकही रडत आहेत. आता बघा, सर्जिकल स्ट्राईक चालू होता, त्यानंतर त्यांनी एक खेळ खेळण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला नाही. हवाई हल्ला झाला, तेव्हा आणखी एक खेळ खेळण्याचा प्रयत्न झाला, तो देखील यशस्वी झाला नाही. जेव्हा ऑपरेशन सिंदूर झाले, तेव्हा त्यांनी नवा पवित्रा घेतला, काय केले, ते का थांबवले? वा, धाडसी विधान! तुम्हाला निषेध करण्यासाठी काहीतरी निमित्त हवे आहे आणि म्हणूनच फक्त मीच नाही तर संपूर्ण देश तुम्हाला हसत आहे.
अध्यक्ष महोदय,
लष्कराला विरोध, लष्कराबद्दल एक अज्ञात नकारात्मकता, ही काँग्रेसची जुनी वृत्ती आहे. देशाने नुकताच कारगिल विजय दिवस साजरा केला, पण देशाला हे चांगलेच माहीत आहे की त्यांच्या कार्यकाळात आणि आजपर्यंत काँग्रेसने कारगिलचा विजय स्वीकारलेला नाही. कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला नाही, किंवा कारगिल विजयाचा गौरवही करण्यात आला नाही. अध्यक्ष महोदय, इतिहास साक्षीदार आहे, जेव्हा आपले सैन्य डोकलाममध्ये आपले शौर्य दाखवत होते, तेव्हा काँग्रेसचे नेते कोणाकडून गुप्तपणे माहिती घेत होते, हे आता संपूर्ण जगाला माहिती आहे. तुम्ही टेप काढा, पाकिस्तानची सर्व विधाने आणि इथे आम्हाला विरोध करणाऱ्या लोकांची विधाने पूर्णविराम, स्वल्पविरामासकट एकसारखी आहेत. याला काय म्हणायचे? खरे बोलले तर वाईट वाटते. पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळला होता.
अध्यक्ष महोदय,
देश आश्चर्यचकित झाला आहे, काँग्रेसने पाकिस्तानला क्लीन चिट दिली आहे. त्यांचे हे धाडस आणि सवय जात नाही. पहलगामचे दहशतवादी पाकिस्तानी होते याचा पुरावा द्या. तुम्ही लोक काय म्हणत आहात? ही कोणती पद्धत आहे? आणि हीच मागणी पाकिस्तान करत आहे, जी काँग्रेस करत आहे.
अध्यक्ष महोदय,
आज जेव्हा पुराव्यांची कमतरता नाही, सर्व काही आपल्या डोळ्यांसमोर दिसत आहे, तेव्हा ही परिस्थिती आहे. जर पुरावे नसते तर या लोकांनी काय केले असते, तुम्हीच सांगा?
अध्यक्ष महोदय
अध्यक्ष महोदय, ऑपरेशन सिंदूरच्या एका भागावर बरीच चर्चा होते आणि त्याकडे लक्ष वेधले जाते. पण देशासाठी अभिमानाचे काही क्षण असतात, शक्तीचे प्रदर्शन असते आणि त्याकडे लक्ष वेधणे देखील गरजेचे असते. आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेची जगभरात चर्चा आहे. आपल्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानची क्षेपणास्त्र आणि ड्रोन उद्ध्वस्त केले.
अध्यक्ष महोदय,
आज मला एक आकडेवारी सांगायची आहे. संपूर्ण देश अभिमानाने फुलून जाईल. काही लोकांचे काय होईल हे, माहित नाही, पण संपूर्ण देश अभिमानाने फुलून जाईल. नऊ मे रोजी पाकिस्तानने सुमारे एक हजार, एक हजार क्षेपणास्त्रे आणि शस्त्रास्त्र सज्ज ड्रोनने भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जर ही क्षेपणास्त्रे भारताच्या कोणत्याही भागात पडली असती तर त्यामुळे मोठा विनाश घडला असता, परंतु भारताने आकाशातच एक हजार क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केले. संपूर्ण देशाला याचा गौरव आहे, पण काँग्रेसचे लोक वाट पाहत होते की काहीतरी चूक होईल, मोदी फासतील! ते कुठेतरी अडकतील! पाकिस्तानने आदमपूर एअरबेसवरील हल्ल्याबद्दल खोटी माहिती पसरवली, ते खोटे खपवण्याचा प्रयत्न केला, सर्व शक्तीनिशी प्रयत्न केला. मी दुसऱ्याच दिवशी आदमपूरला पोहोचलो आणि त्यांचा खोटेपणा मी स्वतः उघडकीला आणला. तेव्हाच त्यांना समजले, की हे खोटे आता चालणार नाही.
अध्यक्ष महोदय,
आमचे छोट्या पक्षांमध्ये सहयोगी आहेत, जे राजकारणात नवीन आहेत, त्यांना सरकारमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली नाही, त्यांच्याकडून काही गोष्टी घडल्या, तर ते आपण समजू शकतो. पण काँग्रेस पक्षाने या देशावर बराच काळ राज्य केले आहे. त्यांना प्रशासनाच्या व्यवस्थेचे पूर्ण ज्ञान आहे. ते या सर्व गोष्टींमधून गेले आहेत. शासन व्यवस्था काय असते, याची त्यांना पूर्ण समज आहे. त्यांच्याकडे अनुभव आहे. त्यानंतरही परराष्ट्र मंत्रालयाने तात्काळ उत्तर द्यावे, ही गोष्ट मान्य नाही. परराष्ट्र मंत्र्यांनी उत्तर दिले, मुलाखत दिली, पुन्हा पुन्हा सांगितले, तरी ते मान्य नाही. गृहमंत्र्यांनी सांगितले, संरक्षणमंत्र्यांनी सांगितले, कोणावरच विश्वास नाही. ज्यांनी एवढी वर्षे राज्य केले, त्यांचा देशाच्या व्यवस्थांवर विश्वास नसेल, तर तर त्यांना काय झाले आहे असा प्रश्न पडतो.
अध्यक्ष महोदय,
आता काँग्रेसचा विश्वास पाकिस्तानच्या रिमोट कंट्रोलने ठरतो, आणि बदलतो.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
एक अगदी नव्यानेच निवडून आलेले काँग्रेस सदस्य आहेत, खरं म्हणजे त्यांना तर क्षमा करायला हवी , नवीन सदस्याला काय म्हणणार. पण काँग्रेसचे जे सर्वेसर्वा आहेत, जे त्यांना लिहून देतात आणि त्यांच्याकडून बोलून घेतात, त्यांच्यात स्वतः बोलण्याचं धैर्य नाही, ते इतरांकडून बोलून घेतात की ऑपरेशन सिंदूर हा तर तमाशा होता. ज्या क्रूर घटनेत 26 लोकांचा मृत्यु झाला, त्या दहशतवादी हल्ल्याला तमाशा म्हणणे म्हणजे त्या जखमेवर अॅसिड टाकण्यासारखा पाप आहे. तमाशा म्हणता? तुम्ही याच्याशी सहमत आहात ? काँग्रेस नेते त्याला ते म्हणायला लावतात.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
काल आपल्या सुरक्षा दलांनी ऑपरेशन महादेव राबवून पहलगामच्या हल्लेखोरांचा खात्मा केला. पण मला आश्चर्य वाटतं, की इथे हसत-हसत विचारले गेलं की हे आत्ताच का घडले? हे कालच का झालं? मला हे समजलं नाही. या ऑपरेशनसाठी श्रावण महिन्यातील सोमवार शोधला जात होता का? या लोकांना काय झाले आहे? इतकी हताशा-निराशा टोकाला गेली आहे? खरंतर हेच मागील काही आठवड्यांपासून म्हणत होते, होय होय, ऑपरेशन सिंदूर झाले, ठीक आहे. पण पहलगामच्या अतिरेक्यांचं काय झालं? आणि आता तेही झालं, तर विचारतात कालच का झालं? आधी का नाही? अध्यक्ष महोदय , काय अवस्था झाली आहे यांची?
आदरणीय अध्यक्ष महोदय,
शास्त्रांमध्ये म्हटलं आहे, शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्र चिंता प्रवर्तते, म्हणजे जेव्हा राष्ट्र शस्त्रांनी सुरक्षित असते, तेव्हाच ज्ञान-धर्मावर चर्चा सुरू होऊ शकते. जेव्हा सीमेवर आपले सैन्य सक्षम असतात, तेव्हाच लोकशाही बळकट होते.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
ऑपरेशन सिंदूर हे गेल्या दशकात आपल्या सैन्याच्या सक्षमीकरणाचे एक जिवंत उदाहरण आहे. हे असेच घडले नाही. काँग्रेसच्या काळात सैन्याला आत्मनिर्भर करण्याबाबत विचारही केला गेला नाही. आजही 'आत्मनिर्भर' या शब्दाची थट्टा केली जाते. तो शब्द तर महात्मा गांधींकडूनच आलेला आहे, तरीही आज त्याची थट्टा होते. काँग्रेसला प्रत्येक संरक्षण करारात संधीच शोधायची असते. लहानसहान शस्त्रांसाठीही परदेशांवर अवलंबून राहावे लागायचे, हीच त्यांची कामगिरी होती. बुलेटप्रूफ जॅकेट, नाईट व्हिजन कॅमेरेसुद्धा उपलब्ध नव्हते. तशी तर यादी खूप मोठी आहे , जीप, बोफोर्स, हेलिकॉप्टर या प्रत्येक गोष्टीत घोळ घातला आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
आपल्या सैन्याला आधुनिक शस्त्रास्त्रांसाठी दशके वाट पहावी लागली. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि इतिहासात भारताची संरक्षण उत्पादनात ताकद होती. जेव्हा तलवारींनी युद्धे लढली जायची, तेव्हा भारतातील तलवारी सर्वोत्तम समजल्या जायच्या. पण स्वातंत्र्यानंतर, संरक्षण उपकरणांचा जो आमचा वारसा होता, जी यंत्रणा होती ती विचारपूर्वक नष्ट करण्यात आली, तिला कमकुवत केले गेले, संशोधन व उत्पादनाचे मार्ग बंद करण्यात आले. जर आपण त्याच धोरणावर चाललो असतो, तर 21 व्या शतकात भारत ऑपरेशन सिंदूरसारख्या कृतीचा विचारही करू शकला नसता. अशी अवस्था करून ठेवली होती, भारताला विचार करावा लागायचा की, कारवाई करायची असेल तर शस्त्र कुठून आणायचे? साधने कुठून मिळणार? स्फोटके वेळेवर मिळतील का? मध्येच अडथळा येणार तर नाही ना ? ही भीती वाटायची.
आदरणीय अध्यक्ष,
गेल्या दशकात 'मेक इन इंडिया' अंतर्गत सैन्याला मिळालेल्या शस्त्रास्त्रांनी या ऑपरेशनमध्ये अत्यंत निर्णायक भूमिका बजावली आहे.
आदरणीय अध्यक्ष,
एक दशकापूर्वी आपल्या देशवासीयांनी संकल्प केला, आपला देश सक्षम, आत्मनिर्भर आणि आधुनिक राष्ट्र होईल. संरक्षण व सुरक्षेच्या प्रत्येक क्षेत्रात बदलांसाठी एकामागोमाग एक ठोस पावले उचलली गेली. अनेक सुधारणांची मालिका राबवण्यात आली आणि सैन्यात स्वातंत्र्य नंतर प्रथमच व्यापक सुधारणा राबवल्या. संरक्षण प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली, हा काही नवीन विचार नाही. जगभरात त्याची अंमलबजावणी होत होती, पण भारतात निर्णय होत नव्हते. हि फार मोठा सुधारणा होती, जी आम्ही केली. खरे तर या प्रसंगी मी आपल्या तिन्ही दलांचे अभिनंदन करतो, की त्यांनी ही रचना मनापासून स्वीकारली आणि सहकार्य केले. सर्वात मोठी ताकद म्हणजे संयुक्तता आणि एकात्मता. नौदल असो, हवाई दल असो किंवा लष्कर असो, एकात्मतेमुळे आपली ताकद मोठ्या प्रमाणात वाढली. आणि त्याचा परिणाम आपण प्रत्यक्ष पाहिला. हे आम्ही करून दाखवले आहे. सरकारच्या संरक्षण उत्पादनामध्ये सुधारणा केल्या. सुरुवातीला आंदोलने, संप, गोंधळ घडवण्याचे प्रयत्न झाले, अजूनही ते पूर्ण थांबलेले नाहीत, पण देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत सरकारी व्यवस्थेतील संरक्षण उद्योगातील आपल्या लोकांनी ते मनावर घेतले, सुधारणा स्वीकारल्या. आज त्या कंपन्याही अत्यंत उत्पादनशील बनल्या आहेत. इतकेच नाही तर आम्ही खाजगी क्षेत्रासाठी संरक्षणाचे दरवाजे देखील उघडले आहेत आणि आज भारताचे खाजगी क्षेत्र पुढे येत आहे. आज संरक्षण क्षेत्रात आमचे 27-30 वर्षांचे तरुण, टियर टू, टियर थ्री शहरातील तरुण, काही ठिकाणी मुली देखील स्टार्टअप्सचे नेतृत्व करत आहेत. संरक्षण क्षेत्रात शेकडोंच्या संख्येने स्टार्टअप्स कार्यरत आहेत. ड्रोन्स या क्षेत्रात बद्दल बोलायचे तर सध्या जितके ड्रोन्स संबंधित उपक्रम देशात चालू आहेत, त्यात बहुतेकांची वय सरासरी 30-35 आहे. शेकडोंच्या संख्येने हे लोक काम करत आहेत आणि त्यांचे योगदान ऑपरेशन सिंदूरमध्ये फार उपयुक्त ठरले आहे. मी त्यांचे खूप आभार मानतो आणि त्यांना विश्वास देतो पुढे चला, आता देश थांबणार नाही.
आदरणीय अध्यक्ष,
संरक्षण क्षेत्रात 'मेक इन इंडिया' हा फक्त नारा नव्हता. त्यासाठी अर्थसंकल्पात, धोरणांमध्ये बदल, नवे उपक्रम सुरू करणे. हे सर्व पावले उचलली गेली.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्पष्ट दृष्टिकोनासह, संरक्षण क्षेत्रात 'मेक इन इंडियाला गती देण्यात आली.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
एका दशकात संरक्षण अर्थसंकल्प जवळपास तीनपट वाढला आहे. संरक्षण उत्पादनात सुमारे 250 टक्क्यांची वाढ झाली आहे. 11 वर्षांत संरक्षण निर्यातीत 30 पटीने वाढ झाली आहे. आज भारताची सरंक्षण निर्यात जवळपास 100 देशांमध्ये पोहोचली आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
काही गोष्टी इतिहासावर मोठा प्रभाव टाकतात.ऑपरेशन सिंदूरने संरक्षण बाजारपेठेत भारताचा झेंडा फडकवला आहे. आज भारतीय शस्त्रांची मागणी वाढत आहे. यामुळे भारतातील उद्योगांनाही बळकटी मिळेल,लघु आणि मध्यम उद्योग एमएसएमईंना बळकटी मिळेल. यामुळे आपल्या तरुणांना रोजगार मिळेल आणि आपले तरुण त्यांनी तयार केलेल्या वस्तूंनी जगात आपली ताकद दाखवू शकतील. हे आज दिसून येते. संरक्षण क्षेत्रात आपण स्वावलंबी भारताकडे उचलत असलेली पावले पाहून मला आश्चर्य वाटते. काही लोकांना अजूनही वाईट वाटत आहे, जणू त्यांची तिजोरी लुटली गेली आहे. ही कोणत्या प्रकारची मानसिकता आहे? असे लोक देशाला ओळखावे लागतील.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
आजच्या शस्त्रास्त्र स्पर्धेच्या युगात जागतिक शांततेसाठी भारत संरक्षणात स्वावलंबी असणे देखील आवश्यक आहे.यावेळी आणखी एक गोष्ट स्पष्ट करणे गरजेचे आहे, मी आधीही म्हटले आहे की, भारत हा युद्धाचा नव्हे तर बुद्धांचा देश आहे. आपल्याला समृद्धी आणि शांतता हवी आहे, परंतु आपण हे कधीही विसरू नये की, समृद्धी आणि शांतीचा मार्ग दृढतेतून जातो.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
आपला भारत हा छत्रपती शिवाजी महाराज, महाराजा रणजित सिंह, राजेंद्र चोला, महाराणा प्रताप, लाचित बोरफुकन आणि महाराजा सुहेलदेव यांचा देश आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
आम्ही विकास आणि शांततेसाठी लढाऊ सामर्थ्यावर देखील लक्ष केंद्रित करतो.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
काँग्रेस पक्षाकडे राष्ट्रीय सुरक्षेचे धोरण पूर्वी कधीही नव्हते आणि आता तर प्रश्नच येत नाही. काँग्रेसने नेहमीच राष्ट्रीय सुरक्षेबाबत तडजोड केली आहे. आज जे लोक प्रश्न विचारत आहेत की पाकव्याप्त काश्मीर परत का नाही मिळवले? खरेतर ते हा प्रश्न मलाच विचारू शकतात, दुसऱ्या कोणाला विचारू शकतील? मात्र, हा प्रश्न विचारणाऱ्यांना आधी या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल की, कोणाच्या सरकारने पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचा अधिकार दिला होता? उत्तर स्पष्ट आहे, उत्तर अगदी स्पष्ट आहे, जेव्हा जेव्हा मी नेहरुजींचा विषय काढतो तेव्हा तेव्हा काँग्रेस आणि त्यांची संपूर्ण प्रणाली घाबरीघुबरी होते, माहित नाही हा काय प्रकार आहे?
आदरणीय अध्यक्ष महोदय,
आम्ही एक शेर ऐकत आलो आहोत, मला याचे फारसे ज्ञान नाही, मात्र आम्ही ऐकत आलो आहोत. ‘लम्हों ने खता की और सदियों ने सजा पाई’ स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच जे निर्णय घेण्यात आले त्याची शिक्षा देश आजपर्यंत भोगत आला आहे. या ठिकाणी एका गोष्टीचा वारंवार उल्लेख झाला आहे आणि मी पुन्हा उल्लेख करीन, अक्साई चीनच्या संपूर्ण क्षेत्राला नापीक जमीन म्हटले गेले. नापीक आहे असे सांगून देशाची 38,000 स्क्वेअर किमी जमीन आपल्याला गमवावी लागली.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
मला माहित आहे, माझे बोलणे काहीवेळा टोचणारे असेल. 1962 आणि 1963 दरम्यान कॉंग्रेसचे काही नेते जम्मू-काश्मीरचा पूंछ, उरी, नीलम व्हॅली आणि किशनगंगा हा भाग सोडून देण्याचा प्रस्ताव मांडत होते. भारताची भूमी.......
आदरणीय अध्यक्ष महोदय,
आणि हेही शांतता रेषा, शांतता रेषा या नावाने करण्यात येत होते.1966 मध्ये याच लोकांनी राणा कच्छबाबत मध्यस्थ होणे मान्य केले. ही होती त्यांची राष्ट्रीय सुरक्षेची दूरदृष्टी, पुन्हा एकदा त्यांनी भारताची सुमारे 800 चौरस किलोमीटर क्षेत्र पाकिस्तानच्या हाती सोपवले, यामध्ये क्षणबेट देखील समाविष्ट आहे, काही ठिकाणी त्याला क्षणाबेटदेखील म्हणतात.1965 च्या लढाईत आपल्या सेनेने हाजी पीर पास पुन्हा जिंकून घेतले, पण काँग्रेसने ते पुन्हा पाकिस्तानला परत दिले. 1971 च्या युद्धानंतर पाकिस्तानचे 93,000 सैनिक आपल्याकडे कैद होते, आपल्या सैन्याने पाकिस्तानचा हजारो चौरस किलोमीटरचा भाग ताब्यात घेतला होता. आपण खूप काही करू शकलो असतो, आपण विजयाच्या स्थितीत होतो. त्या दरम्यान थोडी दूरदृष्टी असती, थोडीशी समज असती तर पाकव्याप्त काश्मीर पुन्हा आपल्याकडे परत घेण्याचा निर्णय होऊ शकला असता. ती एक संधी होती आणि ती संधी देखील सोडून देण्यात आली, आणि इतकेच नव्हे तर एवढ्या गोष्टी समोर टेबलवर सादर करण्यात आल्या होत्या, किमान कर्तारपूर साहिब तरी आपल्याकडे घेऊनच शकत होते, पण तेही त्यांना जमले नाही. 1974 मध्ये कच्चातीवु बेट श्रीलंकेला उपहारस्वरूप देण्यात आले, आजपर्यंत आमच्या मच्छिमार बंधू-भगिनींना यामुळे त्रास होतो आहे, कधीकधी त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो आहे.तामिळनाडूमधील माझ्या मच्छिमार बंधू-भगिनींनी असा काय गुन्हा केला होता की तुम्ही त्यांचे हक्कच हिरावून घेतलेत आणि परक्यांना त्याची भेट देऊन टाकलीत? सियाचिनमधून सैन्य परत बोलवावे असा हेतू गेली कित्येक दशके, काँग्रेस मनात ठेवत आली आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
2014 मध्ये देशाने यांना संधी दिली नाही म्हणून, नाहीतर आज सियाचिन देखील आपल्याकडे राहिले नसते.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
आजकाल काँग्रेसचे लोक आम्हाला राजकीय मुत्सद्देगिरीचे धडे देत आहेत. मी त्यांना त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची आठवण करून देऊ इच्छितो, जेणेकरून त्यांना देखील काही आठवेल, काही गोष्टी समजतील. 26/11 च्या भयंकर हल्ल्यानंतर....खूप मोठा दहशतवादी हल्ला होता तो..त्यानंतर काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम कमी झाले नाही. इतकी मोठी 26/11 ची घटना घडली होती. हल्ल्यानंतर काही आठवड्यांतच परकीय दबावाखाली झुकून काँग्रेस सरकारने पाकिस्तानशी वाटाघाटी सुरु केल्या.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
26/11 च्या इतक्या मोठ्या घटनेनंतर देखील काँग्रेस सरकारने एकाही राजनैतिक अधिकाऱ्याला भारताबाहेर हाकलून देण्याची हिम्मत दाखवली नाही. ते राहू द्या, एकही व्हिसा सुद्धा त्यांनी रद्द केला नाही, एक व्हिसा रद्द करू शकले नाहीत ते.देशावर पाकिस्तान पुरस्कृत मोठमोठे हल्ले होत राहिले, पण युपीए सरकारने पाकिस्तानला ‘सर्वात पसंतीच्या देशा’चा दर्जा देऊन ठेवला होता तो कधीच मागे घेतला नाही.एका बाजूला देश मुंबई हल्ल्यांबाबत न्यायाची याचना करत होता आणि दुसरीकडे काँग्रेस पाकिस्तानशी व्यापार करण्यात गुंतलेली होती. पाकिस्तान त्यांच्याकडून रक्ताची होळी खेळणाऱ्या दहशतवाद्यांना आपल्याकडे पाठवत राहिला आणि इथे काँग्रेस शांततेच्या आशेने मुशायरे आयोजित करत राहिली...त्याकाळी मुशायरे होत असत. आम्ही दहशतवाद आणि शांततेच्या आशेची ही एक दिशा वाहतूक बंद करून टाकली.आम्ही पाकिस्तानचा एमएफएन दर्जा रद्द केला, व्हिसा देणे बंद केले, अटारी वाघा सीमा बंद केली.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
भारताचे हित गहाण ठेवणे ही काँग्रेसची जुनी सवय आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे सिंधू पाणी करार. सिंधू पाणी करार कोणी केला, नेहरुजींनी केला आणि याचा संबंध कोणाशी होता तर भारतातून वाहणाऱ्या नद्या, येथून उगम पावलेल्या नद्यांचे ते पाणी होते. आणि या नद्या हजारो वर्षांपासून भारताचा सांस्कृतिक वारसा आहेत, भारताची चेतना शक्ती आहेत, भारताला सुजलाम सुफलाम् करण्यात या नद्यांचे फार मोठे योगदान आहे. शतकानुशतके भारताची ओळख असलेल्या सिंधू नदी मुळे भारत जगात प्रसिध्द होता, पण नेहरुजींनी तसेच काँग्रेसने सिंधू आणि झेलमसारख्या नद्यांच्या संदर्भातील वादासाठी निवाड्याचे अधिकार कोणाला दिले, तर जागतिक बँकेला. आता जागतिक बँक निर्णय घेणार की आम्ही काय करायचे ते... नदी आमची..पाणी आमचे. सिंधू पाणी करार सरळसरळ भारताची अस्मिता आणि भारताच्या स्वाभिमानासोबत करण्यात आलेला फार मोठा धोका होता.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
आज देशातील तरुण ही गोष्ट ऐकतील तर त्यांना देखील फार नवल वाटेल की, अशा प्रकारचे लोक आपला देश चालवत होते. नेहरुजींनी धोरणात्मकरित्या आणखी काय केले? हे जे पाणी होते, या नद्या होत्या ज्या भारतात उगम पावत होत्या, त्यांचे 80% पाणी पाकिस्तानला देऊन टाकायला ते तयार झाले. आणि इतका भव्य हिंदुस्तान, त्याला केवळ 20% पाणी. कोणीतरी मला समजावून सांगेल का, की हे कोणत्या पद्धतीचे शहाणपण होते, यात काय देशकल्याण होते, कोणती राजनैतिक मुत्सद्देगिरी होती, काय परिस्थिती निर्माण करून ठेवली होती तुम्ही लोकांनी. इतक्या प्रचंड लोकसंख्येचा आपला देश, आपल्याच देशातून वाहणाऱ्या या नद्या आणि आपल्याला केवळ 20% पाणी. आणि 80% पाणी त्यांनी कोणाला दिले, तर जो देश उघडपणे भारताला शत्रू मानतो, भारताला शत्रू म्हणून संबोधत राहतो, त्या देशाला. आणि या पाण्यावर हक्क कोणाचा होता? आपल्या देशातील शेतकऱ्यांचा, आपल्या देशाच्या नागरिकांचा, आमचा पंजाब, आमचे जम्मू काश्मीर या भागाचा. या एकाच कारणामुळे यांनी देशाच्या एका मोठ्या भागाला पाणीटंचाईच्या संकटात टाकले. आणि आपल्या राज्यांमध्ये पाण्यावरुन आपापसात वाद निर्माण झाले, स्पर्धा निर्माण झाली आणि त्यांचा ज्या पाण्यावर हक्क होता त्या पाण्याच्या जीवावर पाकिस्तान मज्जा करत राहिला. आणि हे जगात स्वतःच्या राजनैतिक मुत्सद्देगिरीचे धडे देत फिरतात.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
जर हा करार झाला नसता, तर पश्चिमेकडील नद्यांवर अनेक मोठे प्रकल्प निर्माण होऊ शकले असते. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली या भागांतील शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळाले असते, पिण्याच्या पाण्याची कोणतीही समस्याच उरली नसती. औद्योगिक प्रगतीसाठी भारत वीजनिर्मिती करू शकला असता, इतकेच नव्हे तर नेहरुजींनी या उपर कोट्यवधी रुपये सुद्धा पाकिस्तानला दिले, जेणेकरून पाकिस्तान कालवे बंधू शकेल.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
यापेक्षा देखील एक मोठी बाब आहे, ती समजल्यावर देशाला धक्का बसेल, या गोष्टी लपवून ठेवण्यात आल्या, खोलवर दडवण्यात आल्या. कुठल्याही ठिकाणी जेव्हा धरण बांधले जाते तेव्हा त्यात एक यंत्रणा अंतर्भूत असते, या धरणाची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, या धरणात माती जमा होते, गवत साचत जाते, त्यातून धरणाची क्षमता कमी होते, तर त्याच्या स्वच्छतेसाठी ही यंत्रणा काम करते. नेहरुजींनी पाकिस्तानच्या सांगण्यावरून अशी देखील अट मान्य केली की या धरणात जी माती येईल. कचरा जमा होईल आणि धरण या गोष्टींनी भरून जाईल तेव्हा देखील भारत याची स्वच्छता करू शकणार नाही, निर्जंतुकीकरण करू शकणार नाही. धरण आपल्या भागात, पाणी आपले, निर्णय मात्र पाकिस्तान घेणार. तुम्ही याचे निर्जंतुकीकरण देखील नाही करू शकणार, इतकेच नव्हे तर, एकदा खोलात जाऊन तपासले तर असे दिसून आले की जिथे निर्जंतुकीकरणासाठी दरवाजा असतो ना, तो दरवाजा देखील वेल्डिंग करून बंद करण्यात आला आहे, जेणेकरून कोणी चुकुनही तो दरवाजा उघडून माती काढून टाकू शकणार नाही.
पाकिस्तानच्या परवानगीशिवाय भारत आपल्या धरणातला गाळ काढणार नाही,असे पाकिस्तानने नेहरूजी यांच्याकडून लिहून घेतले होते. हा करार देशाच्या विरुद्ध होता आणि कालांतरानंतर नेहरूजीनाही आपली चूक मान्य करावी लागली होती. या करारामध्ये निरंजन दास गुलाटी नावाची व्यक्ती संबंधित होती. त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की फेब्रुवारी 1961 मध्ये नेहरूंनी त्यांना म्हटले होते, गुलाटी,हा करार इतर समस्यांच्या निराकरणाचा मार्ग मोकळा करेल अशी मला आशा होती मात्र आपण आधी जिथे होतो तिथेच आहोत. नेहरूजी केवळ तात्कालिक प्रभाव पाहत होते म्हणून आपण जिथे होतो तिथेच आहोत असे ते म्हणाले मात्र खरे पाहता या करारामुळे देश अतिशय मागे राहिला आणि देशाचे अतिशय नुकसान झाले, शेतकऱ्यांचे नुकसान झाले, आपल्या शेतीचे नुकसान झाले आणि नेहरूजींना जी राजकीय मुत्सद्देगिरी ज्ञात होती त्यामध्ये शेतकऱ्यांना थारा नव्हता. अशी परिस्थिती त्यांनी करून ठेवली होती.
आदरणीय अध्यक्ष जी,
पाकिस्तान पुढे दशकांपर्यंत भारताविरुद्ध युद्ध आणि छुपे युध्द करत राहिला मात्र काँग्रेसच्या सरकारनी त्यानंतरही सिंधू जल कराराकडे पाहिले नाही, नेहरूजींनी केलेली चूक त्यांनी सुधारली नाही.
आदरणीय अध्यक्ष जी,
मात्र भारताने आता जुन्या काळातल्या चुका सुधारल्या आहेत. ठोस निर्णय घेतले आहेत. नेहरूजींकडून झालेली मोठी चूक, सिंधू जल करार भारताने देशहितासाठी,शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थगित ठेवला आहे. देशाचे अहित करणारा हा करार आता या रुपात पुढे सुरु राहू शकत नाही. रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही हा ठाम निश्चय भारताने केला आहे.
आदरणीय अध्यक्ष जी,
इथे बसलेले सहकारी दहशतवादावर मोठ्या-मोठ्या गोष्टी करतात मात्र ते जेव्हा सत्तेत होते, त्यांना जेव्हा सरकार चालवायची संधी मिळाली होती तेव्हा देशाची काय अवस्था होती हे देश अद्यापही विसरला नाही. 2014 पूर्वी देशामध्ये जी असुरक्षिततेची भावना होती त्याची आठवण झाली की आजही लोकांच्या अंगावर काटा येतो.
आदरणीय अध्यक्ष जी,
आपणा सर्वांना आठवत असेल, नव्या पिढीच्या मुलांना हे माहित नसेल, आपणा सर्वाना माहित आहे.प्रत्येक ठिकाणी सूचना दिल्या जात असत, रेल्वे स्थानकावर जा, बस स्थानकावर जा,विमानतळावर जा,बाजारात जा,मंदिरात जा,जिथे गर्दी असेल अशा कोणत्याही ठिकाणी गेलात तर कोणत्याही बेवारस वस्तूला हात लावू नका, तात्काळ पोलिसांना माहिती द्या अशा सूचना आपण 2014 पर्यंत ऐकत होतो, ही देशाची परिस्थिती होती. देशाच्या कानाकोपऱ्यात अशीच परिस्थिती होती.पावलोपावली जणू बॉम्ब आहेत आणि नागरिकांनी स्वतःला वाचवायचे आहे ,सूचना देऊन त्यांनी हात वर केले होते अशी परिस्थिती होती.
आदरणीय अध्यक्ष जी,
काँग्रेसच्या दुर्बल सरकारांमुळे देशाला किती प्राण गमवावे लागले, आप्तजनांना गमवावे लागले.
आदरणीय अध्यक्ष जी,
दहशतवादाला आळा घालता येऊ शकत होता.आमच्या सरकारने 11 वर्षात हे करून दाखवले आहे, एक मोठा दाखला आहे.
2004 ते 2014 या काळात ज्या दहशतवादी घटना झाल्या होत्या आता अशा घटनांची संख्या घटली आहे.म्हणूनच देश हे जाणू इच्छितो की जर आमचे सरकार दहशतवादाला आळा घालू शकते तर काँग्रेसची अशी काय विवशता होती की त्यांनी दहशतवाद फोफावू दिला.
आदरणीय अध्यक्ष जी,
काँग्रेसच्या काळात दहशतवाद फोफावला याचे एक मोठे कारण म्हणजे तुष्टीकरणाचे यांचे धोरण,व्होट बँकेचे यांचे राजकारण. जेव्हा दिल्लीमध्ये बाटला हाउस चकमक झाली तेव्हा काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या डोळ्यात पाणी आले कारण दहशतवादी मारले गेले म्हणून, मतांसाठी ही बाब हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली गेली.
आदरणीय अध्यक्ष जी,
2001 मध्ये देशाच्या संसदेवर हल्ला झाला तेव्हा काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने अफजल गुरूला संशयाचा फायदा देण्याविषयी बोलले होते.
आदरणीय अध्यक्ष जी,
मुंबईमध्ये 26/11 चा इतका मोठा दहशतवादी हल्ला झाला. एक पाकिस्तानी दहशतवादी जिवंत पकडण्यात आला. पाकिस्तानी माध्यमांनी, जगाने हे मान्य केले की पाकिस्तानी आहे म्हणून.पाकिस्तानचे इतके मोठे पाप, इतका मोठा पाकिस्तानी हल्ला आणि यांचे काय सुरु होते ? काँग्रेस पक्ष व्होट बँकेसाठी काय करत होता ? काँग्रेस पक्ष याला भगवा दहशतवाद म्हणून सिद्ध करण्यासाठी गुंतला होता. काँग्रेस, हिंदू दहशतवाद हा विचार जगाच्या गळी उतरवत होता. काँग्रेसच्या एका नेत्याने तर अमेरिकेच्या एका मोठ्या नेत्याला असेही सांगितले होते की लष्कर ए तैय्यबा पेक्षाही मोठा धोका भारताचा हिंदू गट आहे. असे सांगण्यात आले होते.तुष्टीकरणासाठी काँग्रेसने जम्मू काश्मीर मध्ये भारताचे संविधान,बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान, जम्मू काश्मीर मध्ये येऊ दिले नाही, ते बाहेरच ठेवले. तुष्टीकरणासाठी आणि मतांच्या राजकारणासाठी कॉंग्रेसने नेहमीच देशाच्या सुरक्षेचा बळी देत आली.
आदरणीय अध्यक्ष जी,
तुष्टीकरणासाठीच काँग्रेसने दहशतवादाशी संबंधित कायदे कमजोर केले. गृहमंत्र्यांनी आज सदनात सविस्तरपणे सांगितले आहे त्यामुळे मी आता पुन्हा सांगत नाही.
आदरणीय अध्यक्ष जी,
मी या सत्राच्या सुरवातीलाच सांगितले होते, मी म्हटले होते,पक्ष हितामध्ये आमची मते जुळली नाही तरी देशहितामध्ये आपली मने नक्कीच जुळली पाहिजेत. पहलगाम हल्ल्याने आपल्याला खोल जखमा दिल्या आहेत, संपूर्ण देश त्याने हलला आहे, या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही ऑपरेशन सिंदूर हाती घेतले,सैन्यदलांच्या पराक्रमाने, आपल्या आत्मनिर्भर अभियानाने देशात एक ‘सिंदूर स्पिरीट’ निर्माण केले. जगभरात आपली प्रतिनिधी मंडळे भारताची भूमिका सांगण्यासाठी गेली तेव्हा आपण ही भावना अनुभवली.या सर्व सहकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. भारताची भूमिका आपण अतिशय प्रभावीपणे जगासमोर मांडली.मात्र मला एका गोष्टीचे दुःख होत आहे, आश्चर्यही आहे की, जे स्वतःला काँग्रेसचे मोठे नेते मानतात, त्यांना मात्र पोटशूळ उठला आहे,की भारताची भूमिका जगासमोर का मांडण्यात आली. कदाचित काही नेत्यांना सदनात बोलण्यासाठी मनाई करण्यात आली.
आदरणीय अध्यक्ष जी,
या मानसिकतेमधून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे.मी आपल्या भावना व्यक्त करू इच्छितो, काही ओळी माझ्या मनात आहेत
आदरणीय अध्यक्ष जी,
करो चर्चा और इतनी करो, करो चर्चा और इतनी करो,
की दुश्मन दहशत से दहल उठे, दुश्मन दहशत से दहल उठे,
रहे ध्यान बस इतना ही, रहे ध्यान बस इतना ही,
मान सिंदूर और सेना का प्रश्नों में भी अटल रहे।
हमला मां भारती पर हुआ अगर, तो प्रचंड प्रहार करना होगा,
दुश्मन जहां भी बैठा हो, हमें भारत के लिए ही जीना होगा।
काँग्रेसने एका कुटुंबाच्या दबावाखाली येऊन पाकिस्तानला क्लीन चीट देणे बंद करावे असा या सदस्यांना माझा सल्ला राहील.देशाच्या विजयाचा जो क्षण आहे त्याचा उपहास काँग्रेसने करू नये. काँग्रेसने आपली चूक सुधारावी. मी आज सदनाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की दहशतवाद जिथे फोफावतो तिथेच भारत त्याचा नायनाट करेल.पाकिस्तानला भारताच्या भविष्याशी आम्ही खेळू देणार नाही म्हणूनच ऑपरेशन सिंदूर अजूनही जारी आहे आणि पाकिस्तानसाठीही ही नोटीस आहे की जोपर्यंत भारताविरोधातला दहशतवादाचा मार्ग तो सोडत नाही तोपर्यंत भारत कारवाई करतच राहील. भारताचे भविष्य सुरक्षित आणि समृद्ध राखणे हाच आमचा संकल्प आहे. याच भावनेने सर्व सदस्यांना या अर्थपूर्ण चर्चेसाठी धन्यवाद देतो आणि
आदरणीय अध्यक्ष जी, मी भारताची भूमिका सादर केली आहे,भारताच्या लोकांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.सदनाचे मी पुन्हा एकदा आभार मानतो.खूप-खूप धन्यवाद.
जयदेवी पुजारी-स्वामी/निलीमा चितळे/सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/राजश्री आगाशे/श्रद्धा मुखेडकर/राज दळेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2150752)