गृह मंत्रालय
'ऑपरेशन सिंदूर' द्वारे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेल्या यशस्वी आणि निर्णायक प्रतिसादावर लोकसभेतील विशेष चर्चेत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह झाले सहभागी
Posted On:
29 JUL 2025 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जुलै 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' द्वारे दहशतवादी तळ आणि दहशतवाद्यांचे सूत्रधार नष्ट केले आणि 'ऑपरेशन महादेव' मध्ये पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले
सेना, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त 'ऑपरेशन महादेव' मध्ये पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेले तिन्ही दहशतवादी - सुलेमान उर्फ फैजल जट, हमजा अफगाणी आणि जिब्रान मारले गेले
विरोधी सरकारच्या काळातील तत्कालीन गृहमंत्री "दहशतवादी पाकिस्तानातून आले होते " याचा पुरावा मागून पाकिस्तानला ‘क्लीन चिट’ देण्याचे काम करत आहेत
मोदी सरकारच्या काळात, आमच्या सैन्याने पाकिस्तानात घुसून विरोधी पक्षाच्या राजवटीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारांनाही ठार मारले
ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचा खरा चेहरा जगापुढे आणला, आपल्या सैन्याने पाकिस्तानची युद्धक्षमता नेस्तनाबूत केली
सर्व दहशतवादाचे मूळ पाकिस्तान आहे, विरोधी पक्षाच्या अनेक चुकांमुळे आजचा पाकिस्तान निर्माण झाला आहे, जर देशाचे विभाजन झाले नसते तर आज पाकिस्तान अस्तित्वातच नसता
आज चीन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य आहे तर भारत नाही, आणि यासाठी फक्त जवाहरलाल नेहरू जबाबदार आहेत
दाऊद इब्राहिम, सय्यद सलाहुद्दीन, टायगर मेमन, अनीस इब्राहिम, रियाझ भटकळ, इकबाल भटकळ, मिर्झा सदा बेग... हे सर्व दहशतवादी विरोधी पक्षांनी त्यांच्या राजवटीत त्यांनी काहीही कारवाई केली नाही, त्यामुळे देश सोडून पळून जावू शकले, असेही गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी सांगितले
2004 ते 2014 या 10 वर्षांच्या कार्यकाळामध्ये 7,217 दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडल्या तर मोदी सरकारच्या काळात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 70 टक्क्यांनी घट झाली
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत, 'ऑपरेशन सिंदूर' या भारताच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला दिलेल्या जोरदार, यशस्वी आणि निर्णायक प्रतिसादावरील विशेष चर्चेत भाग घेतला.
चर्चेत भाग घेत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पहलगाममध्ये धर्माच्या आधारे निष्पाप नागरिकांच्या हत्येचा तीव्र निषेध केला आणि मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय नागरी लक्ष्यांवर केलेल्या गोळीबारात मारले गेलेल्या आणि जखमी झालेल्या भारतीय नागरिकांबद्दलही त्यांनी तीव्र शोक व्यक्त केला.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी काश्मीरमधील दाचीगाम येथे भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सुलेमान, हमजा अफगाणी (अफगाण) आणि जिब्रान या तीन दहशतवाद्यांना काल ठार मारण्यात आल्याची माहिती सभागृहाला दिली. त्यांनी सांगितले की सुलेमान हा लष्कर-ए-तोयबाचा 'अ' श्रेणीचा कमांडर होता जो पहलगाम आणि गगनगीरमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता. अफगाण आणि जिब्रान हे लष्कर-ए-तोयबाचे 'अ' श्रेणीचे दहशतवादी होते ज्यांनी बैसरन खोऱ्यात आपल्या निष्पाप नागरिकांना मारले होते आणि काल संयुक्त कारवाईमध्ये या तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. गृहमंत्र्यांनी या यशाबद्दल सभागृह आणि संपूर्ण देशाच्या वतीने भारतीय लष्कराच्या 4 पॅरा या विशेष युनिटचे, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या जवानांचे अभिनंदन केले.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, 22 मे 2025 रोजी ऑपरेशन महादेव सुरू करण्यात आले. ते म्हणाले की, 22 मे2025 रोजी गुप्तचर विभागाला (आयबी) ला मानवी गुप्तचर यंत्रणेद्वारे दाचीगाम परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली. ते म्हणाले की, दाचीगाममध्ये ‘अल्ट्रा सिग्नल कॅप्चर’ करण्यासाठी आमच्या एजन्सींनी बनवलेल्या उपकरणांद्वारे मिळालेल्या माहितीची पुष्टी करण्यासाठी आयबी आणि लष्कराने 22 मे ते 22 जुलै पर्यंत सतत प्रयत्न केले. आयबी, लष्कर आणि सीआरपीएफचे आमचे अधिकारी आणि जवान त्यांचे सिग्नल मिळवण्यासाठी थंड आणि उंच भागात पायी चालत राहिले. ते म्हणाले की, 22 जुलै रोजी आम्हाला सेन्सर्सद्वारे यश मिळाले आणि दहशतवाद्यांच्या उपस्थितीची पुष्टी झाली. ते म्हणाले की, त्यानंतर 4 पॅराच्या नेतृत्वाखाली सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या जवानांनी दहशतवाद्यांना एकत्र घेरले आणि या कालच्या कारवाईत, आमच्या निष्पाप, निरपराध नागरिकांना मारणारे तिन्ही दहशतवादी मारले गेले.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या तीन दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना आधीच अटक केली आहे, असे अमित शाह यांनी सभागृहात सांगितले. जेव्हा या तीन दहशतवाद्यांचे मृतदेह श्रीनगरला आणले तेव्हा चार जणांनी त्यांना ओळखले आणि या तीन दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये दहशतवादी घटना घडवून आणली असल्याचे त्यांनी सांगितल्याचे शाह म्हणाले. त्यानंतर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणाहून जप्त केलेल्या काडतुसांच्या एफएसएल अहवालाच्या आधारे, दाचिगाममध्ये या तीन दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या तीन रायफलशी ती काडतुसे जुळवली गेली. या तीन रायफल्स काल रात्री एका विशेष विमानाने चंदीगडला नेण्यात आल्या. पहलगाम हल्ल्यात सापडलेले गोळे रायफल्सच्या बॅरल्सशी आणि गोळीबारानंतर बाहेर पडलेल्या गोळ्यांशी जुळवले गेले आणि नंतर हे निश्चित झाले की पहलगाममधील आपल्या निष्पाप नागरिकांना मारण्यासाठी या तीन रायफल्सचा वापर करण्यात आला होता, असे शाह म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना संपवण्याचे काम केले आणि काल आपल्या सैन्याने आणि सीआरपीएफने त्या तीन दहशतवाद्यांनाही ठार केले, असे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह म्हणाले. ऑपरेशन महादेव हे आपले सैन्य, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे खूप मोठे संयुक्त यश असून देशभरातील 140 कोटी लोकांना त्याचा अभिमान आहे, असे ते म्हणाले.
ज्या दिवशी लष्कर आणि त्याची संघटना टीआरएफने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली, त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला होता की राष्ट्रीय तपास संस्था, एनआयए या हल्ल्याची चौकशी करेल. पहलगाम हल्ल्याच्या तपासाची सूत्रे त्वरित एनआयएकडे सुपूर्द करण्यात आली आणि हे दहशतवादी देश सोडून जाऊ नयेत आणि पाकिस्तानला पळून जाऊ नयेत याकरता सैन्य, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संपूर्ण सज्जता ठेवली. या तपासाच्या सुरुवातीपासूनच हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधला जात होता, पर्यटक, खेचर मालक, पोनी मालक, छायाचित्रकार, कर्मचारी आणि दुकानातील कामगार अशा एकूण 1055 लोकांची 3000 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली आणि हे सर्व व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आले. या चौकशीतून हाती आलेल्या माहितीच्या आधारे दहशतवाद्यांची स्केचेस बनवण्यात आली आणि पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या बशीर आणि परवेझ यांची 22 जून 2025 रोजी, ओळख पटली. बशीर आणि परवेझ यांना अटक केल्यानंतर त्यांनी सांगितले की 21 एप्रिल 2025 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तीन दहशतवादी त्यांच्याकडे आले होते, आणि त्या तिघांकडे एके 47 आणि एम9 कार्बाइन होती. बशीर आणि परवेझ यांच्या आईने देखील मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांना ओळखले आहे आणि आता एफएसएलमुळे त्याची खात्री पटली आहे, असे शाह यांनी सभागृहाला सांगितले. या तिन्ही दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्यात सहभाग होता आणि त्यांच्याकडून जप्त केलेल्या 2 एके 47 आणि एक एम 9 कार्बाइनचा वापर या हल्ल्यात करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, देशाच्या माजी गृहमंत्र्यांनी दहशतवादी पाकिस्तानातून आले होते का असा प्रश्न काल उपस्थित केला होता. आमच्याकडे ते तिन्ही पाकिस्तानी असण्याचे सर्व पुरावे आहेत कारण त्यापैकी दोघांचे पाकिस्तानी मतदार क्रमांक उपलब्ध आहात, तसेच रायफल्स देखील उपलब्ध आहेत, त्यांच्याकडे सापडलेली चॉकलेटस देखील पाकिस्तानात बनवली आहेत. ते म्हणाले की, देशाचे माजी गृहमंत्री संपूर्ण जगासमोर पाकिस्तानला क्लीन चिट देत आहेत आणि असे करताना ते असा प्रश्नही उपस्थित करत आहेत की आपण पाकिस्तानवर हल्ला का केला? अमित शाह म्हणाले की, जगभरातील ज्या ज्या देशांमध्ये आपले खासदार गेले त्या सर्वांनी मान्य केले आहे की पहलगामवरील दहशतवादी हल्ला पाकिस्तानने घडवून आणला होता. मात्र देशाचे माजी गृहमंत्री याचा पुरावा मागतात, पण आज देशातील 140 कोटी लोकांना हे स्पष्टपणे समजले आहे की पाकिस्तानला वाचवण्याचा त्यांचा कट होता.
आपल्या सैन्याने केलेली कारवाई अतिशय संयमित होती आणि त्याहून अधिक संयमाची भूमिका असूच शकत नाही, असेही ते म्हणाले. आपल्या सैन्याने नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि भारताच्या कृतीत एकाही सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला नाही, असे त्यांनी सांगितले. “सर्जिकल स्ट्राईक” आणि “एअर स्ट्राईक” या दोन्ही कारवाया केवळ पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्येच करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आपलाच आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, आपल्या सैन्याने पाकिस्तानच्या आत 100 किलोमीटर आत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला, असे त्यांनी सांगितले. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये अनेक वाँटेड आणि धोकादायक दहशतवादी मारले गेले, अशी माहिती त्यांनी दिली. विरोधी पक्षाच्या सरकारच्या काळात जेव्हा भारतीय भूमीवर दहशतवादी हल्ले झाले, तेव्हा अनेक दहशतवादी लपून बसले होते. आता आपल्या सैन्याने त्यांना एक-एक करून ठार मारले आहे, असे शाह यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, किमान 125 दहशतवाद्यांना निष्प्रभ करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, 7 मे रोजी रात्री 1 वाजून 22 मिनिटांनी आपल्या डीजीएमओ यांनी पाकिस्तानच्या डीजीएमओला कळवले की आम्ही फक्त दहशतवादी तळांवर आणि त्यांच्या मुख्यालयावर हल्ला केला आहे, जो आमचा स्वसंरक्षणाचा हक्क आहे ”. आज देशात नरेंद्र मोदींचे सरकार आहे, त्यामुळे कोणीही उठून आपल्यावर हल्ला करेल आणि आपण फक्त चर्चाच करत राहू हे होणे शक्यच नाही, असे शाह यांनी सांगितले.
आपण पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ला केला, पण पाकिस्तानने याला स्वतःवर झालेला मानले आणि संपूर्ण जगाला सांगू लागले की पाकिस्तानचा दहशतवादाशी काहीही संबंध नाही. पण, जेव्हा पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले तेव्हा पाकिस्तान हा राष्ट्र पुरस्कृत दहशतवादाचा केंद्रबिंदू म्हणून संपूर्ण जगासमोर उघडा पडला, असे ते म्हणाले. 8 मे रोजी पाकिस्तानने भारतातील नागरी वस्त्यांवर आणि सैनिकी ठिकाणांवर हल्ला केला ज्यात एक गुरुद्वारा आणि मंदिराचे नुकसान झाले तसेच आपले काही नागरिकही मृत्यूमुखी पडले, असे शाह म्हणाले. त्याच्या प्रत्युत्तरात, दुसऱ्याच दिवशी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या 11 हवाई तळांना मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की पाकिस्तानने आपल्या नागरी भागांवर हल्ला केला पण आपण पाकिस्तान मधील एकाही नागरी भागावर हल्ला केला नाही. भारताने केवळ पाकिस्तानच्या हवाई तळांना आणि हवाई संरक्षण प्रणालींना लक्ष्य केले, जेणेकरून त्यांची आक्रमण करण्याची क्षमता कमकुवत होईल, असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, या कारवाईनंतर, पाकिस्तानकडे कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही म्हणूनच 10 मे रोजी पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओंना फोन केला आणि सायंकाळी 5 वाजता आम्ही युद्धविरामाची घोषणा केली, असे ते म्हणाले. विरोधी पक्ष असा प्रश्न विचारत आहेत की जर आपण इतक्या मजबूत स्थितीत होतो तर आपण युद्ध का सुरू ठेवले नाही? यावर उत्तर देताना शाह यांनी सांगितले की युद्धाचे अनेक परिणाम होतात आणि निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागतो. जर आपण देशाच्या इतिहासावर नजर टाकली तर 1948 मध्ये आपले सैन्य काश्मीरमध्ये निर्णायक टप्प्यावर होते, परंतु सरदार पटेलांच्या आक्षेपांना न जुमानता, जवाहरलाल नेहरूंनी एकतर्फी युद्धविराम जाहीर केला होता, असे ते म्हणाले. जर आज पाकव्याप्त काश्मीर (पीओके) अस्तित्वात आहे तर तो केवळ नेहरूंच्या युद्धविरामामुळेच, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, 1960 मध्ये, आपली भौगोलिक आणि धोरणात्मक स्थिती सिंधू नदीच्या बाबतीत खूप मजबूत होती, पण तरीही सरदार पटेल यांच्या विरोधानंतरही नेहरूंनी सिंधू जल करारावर स्वाक्षरी करून भारताचे 80 टक्के पाणी पाकिस्तानला दिल्याचे शाह यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की 1965 च्या युद्धादरम्यान आपण हाजी पीरसारखी महत्त्वाची ठिकाणे जिंकली होती, मात्र 1966 मध्ये ती पाकिस्तानला परत दिली. त्यांनी सांगितले की 1971 च्या युद्धात आपल्याकडे 93,000 पाकिस्तानी युद्धकैदी होते आणि आपण 15,000 चौरस किलोमीटर पाकव्याप्त भूभागावर नियंत्रण मिळवले होते. मात्र, त्या वेळच्या सरकारने शिमला करारावर स्वाक्षरी केली आणि पाकव्याप्त काश्मीर घेण्याचेच आपण विसरून गेलो. त्यांनी सांगितले की जर त्या वेळी पाकव्याप्त काश्मीर घेतले असते, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. अमित शाह पुढे म्हणाले की आपण पाकव्याप्त काश्मीर तर घेतलाच नाही, तर आपल्या ताब्यात आलेला 15,000 चौरस किलोमीटर भूभागही पाकिस्तानला परत दिला.
अमित शाह यांनी विरोधकांना विचारले की 1962 च्या युद्धात काय झाले आणि 38,000 चौरस किलोमीटरचा अक्साई चीनचा हिस्सा चीनला का दिला गेला ? त्यांनी सांगितले की संसदेत चर्चेदरम्यान, त्या वेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की तिथे एकही गवताची काडी उगवत नाही, त्यामुळे त्या जागेचा उपयोग काय? अमित शाह म्हणाले की नेहरूंनी आकाशवाणीवरून आसामलाही जवळपास अलविदा म्हटले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी “Selected Works of Jawaharlal Nehru” मालिकेतील खंड 29, पृष्ठ 231 चा उल्लेख करत सांगितले की, चीनला संयुक्त राष्ट्रांमध्ये (यूएन) प्रवेश द्यावा मात्र सुरक्षा परिषदेत सामील करण्यात येऊ नये, असे अमेरिकेने म्हटले होते. मात्र, नेहरूंनी सांगितले की हे मान्य नाही कारण यामुळे चीनबरोबरचे आपले संबंध बिघडतील आणि चीनसारखा मोठा देश नाराज होईल. अमित शाह म्हणाले की आज चीन सुरक्षा परिषदेचा सदस्य आहे आणि भारत सुरक्षा परिषदेच्या बाहेर आहे.
अमित शाह म्हणाले की राजीव गांधी फाउंडेशनने चीनसोबत सामंजस्य करार केला होता, पण त्या कराराचे तपशील कधीच उघड करण्यात आले नाहीत. त्यांनी सांगितले की जेव्हा डोकलाममध्ये आपले जवान चिनी सैन्याला सामोरे जात होते, तेव्हा विरोधी पक्षनेते राहुल गांधी चिनी राजदूतांसह बैठका घेत होते. त्यांनी सांगितले की दहशतवादाचे मूळ पाकिस्तान आहे आणि पाकिस्तान ही विरोधी पक्षांची चूक आहे. जर विरोधी पक्षाने देशाची फाळणी स्वीकारली नसती, तर पाकिस्तान अस्तित्वातच आला नसता. विरोधी पक्षाने त्यांच्या शासनकाळात फाळणी स्वीकारून देश तोडला.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की 2002 मध्ये, त्या वेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने दहशतवाद संपवण्यासाठी ‘पोटा’ कायदा आणला, ज्याला विरोधी पक्षाने विरोध केला. अटलजींच्या सरकारकडे राज्यसभेत बहुमत नव्हते, त्यामुळे हा कायदा पारित होऊ शकला नाही. नंतर दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्यात आले आणि तेव्हाच पोटा कायदा पारित होऊ शकला. देश हे कधीही विसरणार नाही. अमित शाह यांनी विचारले की विरोधी पक्ष पोटा कायदा थांबवून कुणाला वाचवू इच्छित होता? पोटा हा दहशतवाद्यांविरोधात होता, पण विरोधकांनी मतांच्या राजकारणासाठी पोटा थांबवून दहशतवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. 2004 मध्ये विरोधी पक्षाचे सरकार आले आणि त्यांनी पोटा कायदा रद्द केला.
अमित शाह म्हणाले की प्रश्न असा आहे की 2005 ते 2011 या काळात विरोधी पक्षाच्या शासन काळाच्या दरम्यान दहशतवाद्यांनी 27 नृशंस हल्ले केले ज्यामध्ये सुमारे 1000 लोक ठार झाले, पण त्या वेळच्या सरकारने काय केले? केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की आपल्या कारकिर्दीत झालेल्या दहशतवादी घटना या पाकिस्तान प्रायोजित होत्या आणि प्रामुख्याने काश्मीर केंद्रित होत्या. 2014 ते 2025 या काळात देशातील इतर कोणत्याही भागात कुठलीही दहशतवादी घटना घडलेली नाही. त्यांनी सांगितले की नरेंद्र मोदी सरकारमुळे काश्मीरमधील तरुण दहशतवादाकडे वळत नाहीत, त्यामुळे पाकिस्तानवर दहशतवादी पाठवण्याची वेळ आली आहे.
अमित शाह म्हणाले की, जेव्हा 1986 मध्ये दाऊद इब्राहिम कासकर देशाबाहेर पळून गेला, तेव्हा केंद्रात विरोधी पक्ष सत्तेवर होता. 1993 मध्ये सय्यद सल्लाउद्दीन देशाबाहेर गेला, तेव्हाही विरोधक सत्तेवर होते. टायगर मेमन आणि अनीस इब्राहिम कासकर 1993 मध्ये पळून गेले, त्यावेळीही केंद्रात विरोधी पक्षाचे सरकार होते. रियाझ भटकळ 2007 मध्ये, तर इक्बाल भटकळ 2010 मध्ये देश सोडून पळाले, तेव्हाही विरोधी पक्ष सत्तेवर होता. याबाबत विरोधी पक्षनेत्यांनी उत्तर दिले पाहिजे, असेही शाह यांनी सांगितले.
गृहमंत्री शाह यांनी सांगितले की, मोदी सरकार जनता, संसद आणि राष्ट्रीय हिताप्रती उत्तरदायी आहे. 2004 ते 2014 या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये 7,217 दहशतवादी घटना घडल्या होत्या, तर 2015 ते 2025 या दहा वर्षांत या घटनांची संख्या 2,150 पर्यंत कमी झाली आहे, म्हणजेच दहशतवादी घटनांमध्ये 70 टक्क्यांची घट झाली आहे, अशी माहिती शाह यांनी दिली. 2004 ते 2014 दरम्यान 1,770 सामान्य नागरिक दहशतवादी हल्ल्यांत मृत्युमुखी पडले होते, तर 2015 ते 2025 या काळात ही संख्या 357 वर आली आहे, म्हणजेच 80 टक्क्यांनी घट झाली आहे. 2004 ते 2014 या कालावधीत सुरक्षा दलाचे 1,060 जवान हुतात्मा झाले होते, तर 2015 ते 2025 मध्ये ही संख्या 542 इतकी आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात दहशतवाद्यांच्या मृत्यूच्या संख्येत 123 टक्क्यांची वाढ झाली आहे. कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी यंत्रणा नष्ट झाली. अनेक वर्षे कलम 370 चे संरक्षण करणाऱ्या विरोधी सरकारांनी दहशतवादी आश्रयाला पाठबळ दिले होते, असेही शाह म्हणाले.
अमित शाह पुढे म्हणाले की, आता जिथे जिथे दहशतवादी मारला जातो तिथे तिथेच त्याचे दफन केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत कोणत्याही दहशतवाद्याचा गौरव करण्यासाठी अंत्ययात्रा काढण्याची परवानगी नाही. आम्ही दहशतवाद्यांच्या समर्थकांना शोधून शोधून तुरुंगात टाकले आहे आणि त्यांचे पासपोर्ट रद्द केले आहेत, तसेच त्यांना दिलेली सरकारी कंत्राटे रद्द केली आहेत.
पूर्वी संघटित दगडफेक घडत असे, पण आता अशा घटनांची संख्या शून्यावर आली आहे. यापूर्वी पाकिस्तानमधून बंदचे फतवे निघत असत आणि काश्मीर खोरे बंद राहत असे, पण आता ना पाकिस्तानात, ना काश्मीरमध्ये असे काही करण्याची कोणाची हिंमत नाही. विरोधी पक्षाच्या सत्ताकाळात दरवर्षी सरासरी 132 दिवस काश्मीर खोरे बंद राहत असे, परंतु मागील तीन वर्षांपासून बंदची संख्या शून्यावर आली आहे. पूर्वी दगडफेकीत दरवर्षी 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू होत असे, तर आता नागरिकांच्या मृत्यू आणि जखमींची संख्या शून्यावर आली आहे.
एक काळ असा होता जेव्हा हुर्रियत नेत्यांना व्हीआयपी वागणूक दिली जात असे. त्यांच्याशी चर्चा होत असे, त्यांचे लाल गालिचे टाकून स्वागत 'केले जात असे. मात्र, आमच्या सरकारने हुर्रियतच्या सर्व संघटनांवर बंदी घातली असून त्यांच्या सर्व नेत्यांना तुरुंगात टाकले आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. 2019 नंतर आमच्या सरकारने अनेक दहशतवादी संघटनांवर बंदी घातली आहे.
पोटा (POTA) कायद्याला विरोध करणाऱ्यांना मोदी सरकारची दहशतवादविरोधी भूमिका पसंत पडणार नाही, दहशतवाद्यांचे संरक्षण करून मतपेटी निर्माण करणाऱ्यांना ही नीती पसंत पडणार नाही. पण हे नरेंद्र मोदी सरकार आहे, दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता, हे आमचे धोरण आहे, असे शाह यांनी ठामपणे सांगितले.
* * *
सोनाली काकडे/ सुवर्णा/ भक्ती/ श्रद्धा/ गजेंद्र/ राज/ दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2149988)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam