पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधल्या बिकानेर येथे 26,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केले


गेल्या 11 वर्षात आधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अभूतपूर्व वेगाने काम केले गेले आहे: पंतप्रधान

देशाने आधुनिकीकरण होत असलेल्या रेल्वे स्थानकांना अमृत भारत स्थानके असे नाव दिले आहे, आज यापैकी 100 हून अधिक अमृत भारत स्थानके तयार आहेत: पंतप्रधान

आम्ही एकाच वेळी सिंचन प्रकल्प पूर्ण करत आहोत आणि नद्या जोडत आहोत: पंतप्रधान

आमच्या सरकारने तिन्ही सशस्त्र दलांना मोकळीक दिली आहे, तिन्ही दलांनी मिळून असा 'चक्रव्यूह' निर्माण केला की पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले: पंतप्रधान

'सिंदूर'चे रूपांतर 'बारूद' मध्ये होते तेव्हा काय घडते हे देशाच्या शत्रूंनी आणि जगाने पहिले आहे: पंतप्रधान

ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाचा सामना करण्यासाठी तीन तत्त्वे निश्चित केले आहेत: पंतप्रधान

प्रत्येक दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानला खूप मोठी किंमत मोजावी लागेल आणि ही किंमत पाकिस्तानच्या सैन्याला, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला चुकवावी लागेल, हे भारताने स्पष्ट केले आहे : पंतप्रधान

भारतीयांच्या जीवाशी खेळल्याबद्दल पाकिस्तानला आता मोठी किंमत चुकवावी लागेल : पंतप्रधान

Posted On: 22 MAY 2025 4:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 मे 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील  बिकानेर येथे 26,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या कार्यक्रमाला संबोधित करताना, त्यांनी या कार्यक्रमासाठी  मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांचे स्वागत केले आणि 18 राज्ये व  केंद्रशासित प्रदेशांमधून ऑनलाईनरित्या लक्षणीय संख्येने उपस्थित असलेल्या लोकांचे कौतुक केले.  त्यांनी अनेक राज्यपाल, मुख्यमंत्री, नायब राज्यपाल  आणि इतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीकडे लक्ष वेधले. देशभरातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेल्या सर्व मान्यवर आणि नागरिकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.

करणी मातेचे आशीर्वाद घेतल्यानंतर आपण या कार्यक्रमात आलो  असून  हे आशीर्वाद विकसित भारत निर्माण करण्याच्या देशाच्या संकल्पाला आणखी बळकटी देतात, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. पंतप्रधानांनी  26,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणीचा उल्लेख करताना,  देशाच्या विकासात त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. या परिवर्तनकारी उपक्रमांसाठी त्यांनी नागरिकांचे  अभिनंदन केले.

देशातल्या पायाभूत सुविधांमध्ये सुरू असलेल्या परिवर्तनावर प्रकाश टाकत, आधुनिकीकरणासाठी देशाच्या वचनबद्धतेवर भर देत, पंतप्रधानांनी गेल्या 11 वर्षांत रस्ते, विमानतळ, रेल्वे आणि रेल्वे स्थानकांमध्ये झालेल्या वेगवान प्रगतीकडे लक्ष वेधले. "भारत आता मागील वर्षांच्या तुलनेत पायाभूत सुविधांच्या विकासात सहा पट अधिक  गुंतवणूक करत आहे, या प्रगतीने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे", असे सांगून त्यांनी देशभरातील महत्त्वाच्या  पायाभूत सुविधा प्रकल्पांचा उल्लेख केला.  यामध्ये उत्तरेकडील उल्लेखनीय चिनाब पूल, पूर्वेकडील अरुणाचल प्रदेशातील सेला बोगदा आणि आसाममधील बोगीबील पूल यांचा समावेश होता. त्यांनी पश्चिम भारतातील मुंबईतल्या अटल सेतूचा उल्लेख केला.  तसेच दक्षिण भारतातल्या पंबन पुलाचा उल्लेख केला, जो वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान असलेला अशा प्रकारचा देशातला  पहिला पूल आहे.

देशातील रेल्वे जाळ्याचे आधुनिकीकरण करण्याच्या निरंतर प्रयत्नांवर भर देताना, पंतप्रधान मोदी यांनी वंदे भारत, अमृत भारत आणि नमो भारत गाड्या देशाच्या नवीन गती आणि प्रगतीचे प्रतीक असल्यावर भर दिला. आता जवळजवळ 70 मार्गांवर वंदे भारत गाड्या चालवल्या जात असून यामुळे दुर्गम भागात आधुनिक रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.  त्यांनी गेल्या 11 वर्षांत झालेल्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या प्रगतीकडे लक्ष वेधले. यामध्ये  शेकडो रस्ते ओव्हरब्रिज आणि अंडरब्रिज बांधणे, तसेच 34,000 किलोमीटरहून अधिक नवीन रेल्वेमार्ग घालणे,  यांचा समावेश आहे. ब्रॉडगेज मार्गांवरील मानवरहित लेव्हल क्रॉसिंग काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले, यामुळे सुरक्षितता वाढल्याचे ते म्हणाले.  मालवाहतूक सुलभ करण्यासाठी समर्पित मालवाहतूक  कॉरिडॉरचा जलद विकास आणि भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे सुरू असलेले काम यावरही पंतप्रधान मोदी यांनी  प्रकाश टाकला. या प्रयत्नांसोबतच, प्रवाशांना अधिक चांगला प्रवास अनुभवता यावा यासाठी  1,300 हून अधिक रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे.

आधुनिक रेल्वे स्थानकांना अमृत भारत स्थानके असे नाव देण्यात आले असून अशा 100 स्थानकांच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे हे सांगण्यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला. समाज माध्यमे वापरणाऱ्यांना  या स्थानकांतील अभूतपूर्व परिवर्तन दिसले आहे आणि ही स्थानके स्थानिक कला आणि इतिहासाचे दर्शन घडवत आहेत याकडे त्यांनी निर्देश केला. राजपूत परंपरेचे वैभव दर्शवणारे राजस्थानातील मंडलगड स्थानक आणि मधुबनी कलेसह थावेवाली मातेचे पवित्र अस्तित्व असलेले बिहारमधील थावे स्थानक यांसह इतर उल्लेखनीय उदाहरणांकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. मध्य प्रदेशातील ओरछा रेल्वे स्थानक भगवान रामाचे दैवी सार दाखवते तर श्रीरंगम स्थानक श्री रंगनाथ स्वामी मंदिराकडून प्रेरणा घेते. गुजरातमधील डाकोर स्थानक रणछोडजी यांना वंदन करते, तिरुवन्नमलई रेल्वे स्थानक द्रविडी वास्तुकलेकडून प्रेरणा घेते आणि बेगमपेठ स्थानक काकतिया साम्राज्याच्या वास्तुकलेच्या वारशाचा मूर्तिमंत अविष्कार घडवते असे ते म्हणाले. अमृत भारत स्थानके केवळ भारताच्या हजारो वर्ष प्राचीन वारशाचे जतन करत नाही तर विविध राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देणारा घटक म्हणून देखील कार्य करते आणि यातून तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करते ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. लोकांनी या स्थानकांवर स्वच्छता आणि सुरक्षितता राखली जाईल याची सुनिश्चिती करून घ्यावी कारण तेच या पायाभूत सुविधांचे खरे मालक आहेत असे आवाहन त्यांनी केले.

सरकारने पायाभूत सुविधांच्या उभारणीत केलेली गुंतवणूक विकासाला तर चालना देईलच पण त्याच सोबत व्यापाराला देखील प्रोत्साहन देईल हे अधोरेखित करत पंतप्रधान मोदी म्हणाले की यात खर्च झालेले हजारो कोटी रुपये कामगार, दुकानदार, कारखान्यांतील कामगार तसेच ट्रक आणि टेंपो चालवणाऱ्यांसारख्या वाहतूक क्षेत्रात सहभागी झालेल्यांना थेटपणे फायदेशीर ठरत आहेत. आपले पायाभूत सुविधा प्रकल्प एकदा पूर्ण झाले की त्यांचे फायदे देखील अनेक पटींनी वाढतील. शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने कमी खर्चात, कमी नुकसानासह बाजारापर्यंत पोहोचवता येतील. उत्तम प्रकारे विकसित रस्ते आणि रेल्वेचे विस्तारित जाळे यामुळे नवे उद्योग येथे आकर्षित होतील आणि पर्यटनाला लक्षणीय चालना मिळेल याकडे त्यांनी निर्देश केला. पायाभूत सुविधांवर केलेला खर्च शेवटी प्रत्येक कुटुंबासाठी लाभदायक ठरणार आहे आणि उदयोन्मुख आर्थिक संधींचा सर्वाधिक फायदा तरुणांना होणार आहे असे त्यांनी अधोरेखित केले.

सध्या सुरु असलेल्या पायाभूत सुविधा विकासाच्या कामातून राजस्थानला मोठ्या प्रमाणात लाभ मिळतील यावर मोदी यांनी अधिक भर दिला. ते म्हणाले की, गावांमध्ये तसेच सीमाभागात उत्तम दर्जाचे रस्ते बांधण्यात येत आहेत आणि गेल्या 11 वर्षांत केवळ राजस्थानमधील रस्तेविषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीत 70,000 कोटी रुपयांहून अधिक निधी गुंतवण्यात आले आहेत. वर्ष 2014 पूर्वीच्या पातळीशी तुलना करता या वर्षी त्यात 15 पट वाढ झाली असून राज्यातील रेल्वे विकासावर केंद्र सरकार सुमारे 10,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. बिकानेर आणि मुंबई यांना जोडणाऱ्या नव्या रेल्वे गाडीच्या सेवेची सुरुवात झाल्यामुळे या शहरांतील संपर्क आणखी सुधारेल असे ते म्हणाले. त्याशिवाय विविध भागांतील आरोग्य, पाणीपुरवठा तसेच वीज प्रकल्पांची सुरुवात तसेच पायाभरणी झाल्याचे सांगण्यावर पंतप्रधानांनी यावेळी अधिक भर दिला. राजस्थानातील तरुणांना त्यांच्या स्वतःच्या शहरांमध्ये आणि नगरांमध्ये आश्वासक संधी उपलब्ध होतील याची सुनिश्चिती करत राजस्थानच्या शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील प्रगतीला अधिक वेग देणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे असे त्यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली झालेला राजस्थानातील गतिमान औद्योगिक विकास अधोरेखित करत पंतप्रधान मोदी म्हणाले की मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी विविध क्षेत्रांमध्ये नव्या औद्योगिक धोरणांची सुरुवात केली असून त्यामुळे बिकानेरसारख्या भागांना लाभ मिळणार आहे. बिकानेरी भुजिया आणि बिकानेरी रसगुल्ले यांना जागतिक मान्यता मिळेल आणि त्यातून राज्याच्या अन्नप्रक्रिया उद्योगाला अधिक बळकटी मिळेल यावर त्यांनी अधिक भर दिला. राजस्थानातील तेल शुद्धीकरण प्रकल्प अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पामुळे हे राज्य पेट्रोलियम-आधारित उद्योगांसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून स्थापित होईल अशी टिप्पणी त्यांनी केली. त्यांनी यावेळी गंगानगर, हनुमानगड, बिकानेर, जोधपुर, बारमेर आणि जालोर या शहरांतून जाणाऱ्या अमृतसर ते जामनगर सहापदरी आर्थिक मार्गीकेचे महत्त्व देखील अधोरेखित केले. त्याशिवाय दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचा राजस्थानातील टप्पा पूर्णत्वाकडे जात आहे हे अधोरेखित करून त्यांनी सांगितले की हे दळणवळण प्रकल्प राज्याच्या औद्योगिक विकासाला नव्या उंचीवर घेऊन जातील.

राजस्थानमधील प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेची जलद प्रगती पंतप्रधानांनी अधोरेखित केली. राजस्थानमधील 40,000 हून अधिक लोकांना या उपक्रमाचा फायदा झाला असून या योजनेमुळे त्यांचे वीज बिल कमी झाले आहे, यासोबतच सौर उर्जेद्वारे उत्पन्न मिळवण्याची संधी त्यांना मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधानांनी  वीजनिर्मिती-संबंधित अनेक प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमांचा उल्लेख केला. या विकासामुळे राजस्थानचा वीजपुरवठा आणखी वाढेल, असेही त्यांनी सांगितले.राज्यातील वाढती वीज निर्मिती औद्योगिक विकासाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे यावर त्यांनी भर दिला.

राजस्थानच्या भूमीचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी महाराजा गंगा सिंह यांच्या वाळवंटातील भूभागाचे सुपीक जमीनीत रूपांतर करण्याच्या दूरदर्शी प्रयत्नांची आठवण करून दिली. या प्रदेशासाठी पाण्याचे महत्त्व तसेच बिकानेर, श्री गंगानगर, हनुमानगड आणि पश्चिम राजस्थानसारख्या क्षेत्रांच्या विकासात पाण्याची भूमिका पंतप्रधानांनी अधोरेखित केली.सरकार सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे आणि त्याचबरोबर नदीजोडणी उपक्रम राबवत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पार्वती-कालिसिंध-चंबळ जोडणी प्रकल्पाचा प्रभाव  पंतप्रधानांनी अधोरेखित केला.या प्रकल्पामुळे राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांना फायदा होईल तसेच शेतकऱ्यांना चांगल्या कृषी संधी मिळतील आणि प्रदेशाची शाश्वतता वाढेल, असे पंतप्रधान म्हणाले.

राजस्थानच्या अतूट  भावनेवर भर देत, देश आणि देशातील नागरिकांपेक्षा काहीही मोठे नाही असे पंतप्रधान म्हणाले. 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारावर निष्पाप लोकांना लक्ष करत त्यांच्यावर केलेल्य हल्ल्याचा पंतप्रधानांनी निषेध केला. या गोळ्या पहलगाममध्ये झाडल्या गेल्या असल्या तरीही त्यांनी 140 कोटी भारतीयांच्या हृदयांचा छेद करत दहशतवादाविरुद्ध संपूर्ण देशाला एकवटले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सशस्त्र दलांनी या हल्ल्याला दिलेल्या निर्णायक प्रत्युत्तरावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. ही मोहीम कशी पूर्ण करायची यासंदर्भात सशस्त्र दलांना संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते, असे ते म्हणाले. अत्यंत काळजीपूर्वक राबवलेल्या या मोहिमेत आपल्या तिन्ही दलांनी एकत्रितपणे पाकिस्तानची संरक्षण यंत्रणा  उध्वस्त केली आणि पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडले, असे गौरव उद्गार पंतप्रधानांनी काढले. 22 एप्रिलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने 22 मिनिटांत कारवाई करत पाकिस्तानातील नऊ प्रमुख दहशतवादी अड्डे नष्ट केले, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. "या कृतीने देशाची ताकद जगासमोर प्रकट केली आणि जेव्हा पवित्र सिंदूर अग्निशक्तिमध्ये बदलतो तेव्हा परिणाम निश्चितच  प्रभावी असतो, हे सिद्ध केले", असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी एका महत्त्वपूर्ण योगायोगाकडेही लक्ष वेधले, तो म्हणजे - पाच वर्षांपूर्वी बालाकोट हवाई हल्ल्यानंतरही त्यांची पहिली जाहीर  सभा राजस्थानमध्ये झाली होती. योगायोगाने, आत्ताच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर, त्यांची पहिली सभा पुन्हा राजस्थानच्या बिकानेरमध्ये होत आहे, असे ते म्हणाले. यातून या मरु भूमीत खोलवर रुजलेल्या शौर्य आणि देशभक्तीला पुन्हा एकदा पुष्टी मिळते, हे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांनी चुरूमधील आपल्या वक्तव्याची आठवण करून दिली. चुरूमध्ये बोलताना पंतप्रधानांनी राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला होता  : "या मातीची शपथ घेऊन सांगतो, मी देशाला हार मानू देणार नाही, मी देशाला झुकू देणार नाही." ज्यांनी भारतीय नारीचा पवित्र सिंदूर पुसण्याचा प्रयत्न केला ते मातीत मिसळले आहेत आणि ज्यांनी भारतीयांचे रक्त सांडले त्यांना आता त्याची पूर्ण किंमत मोजावी लागली आहे, असेही पंतप्रधानांनी राजस्थानमध्ये बोलताना जाहीर केले.  भारत या हल्ल्यानंतर गप्प राहिल असे ज्यांनी गृहीत धरले होते ते आता लपून बसले आहेत, तर ज्यांनी आपल्या युद्धशक्तीबद्दल बढाया मारल्या होत्या ते आता ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. ऑपरेशन सिंदूर हे सूडाचे कृत्य नव्हते, तर न्यायाचे एक नवीन रूप होते यावर त्यांनी भर दिला. ऑपरेशन सिंदूर ही केवळ संतापाची अभिव्यक्ती नव्हती तर भारताच्या अटल शक्ती आणि दृढनिश्चयाचे प्रदर्शन होते, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. राष्ट्राने शत्रूवर थेट आणि निर्णायक प्रहार करून धाडसी दृष्टिकोन स्वीकारला आहे, असे त्यांनी सांगितले. "दहशतवादाचा नाश करणे ही केवळ एक रणनीती नाही तर एक तत्व आहे, हा भारत आहे, हा नवा भारत आहे", असे पंतप्रधानांनी निक्षून सांगितले.

भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईत ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून स्थापित झालेल्या तीन प्रमुख तत्त्वांचा पंतप्रधानांनी सविस्तर ऊहापोह केला. यातील पहिले तत्त्व - भारतावर झालेल्या कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल, मात्र ते प्रत्युत्तर कोणत्या वेळी, कोणत्या स्वरुपात द्यायचे याचा निर्णय सर्वथा भारताच्या सैन्य दलांच्या संमतीने घेतलेला असेल. दुसरे म्हणजे, भारत यापुढे अण्वस्त्रांच्या धमक्यांना घाबरणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तिसरे, भारत यापुढे दहशतवादी हल्ल्यांमागचे सूत्रधार आणि त्यांना पाठबळ देणारी सरकारे यांच्यात भेद करणार नाही असे सांगत त्यांनी पाकिस्तानचा सरकारी आणि बिगर - सरकारी हा फरक फेटाळला. दहशतवादाला चिथावणी देण्यात असलेला पाकिस्तानचा हात जगभर उघड करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करत विविध राजकीय पक्षांचे नेते आणि परराष्ट्र धोरण विषयातील जाणकारांचा समावेश असलेले सात स्वतंत्र गट पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर मांडण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत, असेही त्यांनी पुढे सांगितले. यापूर्वी झालेल्या संघर्षांमध्ये देखील पाकिस्तानला वारंवार हार पत्करावी लागली असल्याची आठवण करून देत भारताबरोबरच्या थेट संघर्षात पाकिस्तान कधीही विजयी होऊ शकणार नाही असेही मोदींनी ठामपणे सांगितले. समोरासमोरच्या लढाईत यशस्वी होऊ न शकलेला पाकिस्तान दीर्घकाळापासून दहशतवादाचा  भारताविरुद्ध हत्यार म्हणून वापर करून हिंसाचाराला चिथावणी देऊन भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आला आहे यावर त्यांनी भर दिला. आपल्या नेतृत्वाखाली देश खंबीरपणे पाय रोवून उभा असल्याचे सांगत पाकिस्तानने भारताच्या निर्धाराला कमी लेखल्याचे ते पुढे म्हणाले  "भारतावरील कोणत्याही दहशतवादी हल्ल्याचे गंभीर परिणाम होतील, पाकिस्तानला त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल - त्यांच्या सैन्याला आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला ते सोसावे लागतील," असा इशाराही मोदींनी दिला.

पंतप्रधान म्हणाले की, मी बिकानेर येथे पोहोचल्यावर नल विमानतळावर उतरलो, याच विमानतळाला पाकिस्तानने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यामध्ये त्यांना अजिबात यश आले नाही. मात्र, भारताच्या अचूक लष्करी हल्ल्यांमुळे सीमेपलीकडील पाकिस्तानच्या रहीम यार खान हवाई तळाचे नुकसान होऊन त्याच्या परिचालनावर गंभीर परिणाम झाला असल्याने तो अनेक दिवसांकरिता बंद ठेवणे पाकिस्तानला भाग पडले आहे,असेही त्यांनी अधोरेखित केले. पाकिस्तानशी कोणताही व्यापार अथवा चर्चा केली जाणार नाही, असे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले. जर चर्चा झालीच तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच होईल, असेही ते म्हणाले. पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठवणे सुरूच ठेवले तर त्याला जबर आर्थिक नुकसानाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. भारत आपल्या वाट्याचे पाणी पाकिस्तानला मिळू देणार नाही तसेच भारतीयांच्या जीवाशी खेळ केल्यास त्याचीही जबरदस्त किंमत मोजावी लागेल, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. "हा भारतीयांप्रती असलेल्या वचनबद्धतेसाठीचा निर्धार आहे, जगातील कोणतीही शक्ती त्याला धक्का लावू शकणार नाही," असेही त्यांनी नमूद केले.

“विकसित भारताच्या उभारणीत सुरक्षा आणि समृद्धी या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत,” असे सांगून मोदी म्हणाले की, देशाचा प्रत्येक कोपरा बळकट झाला तरच हे ध्येय साकार होऊ शकते. हा कार्यक्रम भारताच्या संतुलित आणि वेगवान विकासाचे आदर्श उदाहरण आहे. आपल्या भाषणाचा समारोप त्यांनी शौर्याच्या भूमीत उपस्थित असलेल्या सर्वांच्या अभिनंदनाने केला.

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, अर्जुन राम मेघवाल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

देशातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून, पंतप्रधानांनी 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 86 जिल्ह्यांमध्ये ₹1,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केलेली 103 पुनर्विकसित अमृत स्थानके राष्ट्राला समर्पित केली. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत 1,300 हून अधिक स्थानके आधुनिक सुविधांसह पुनर्विकसित केली जात आहेत, जी प्रादेशिक वास्तुरचनांचे प्रतिबिंब आहेत आणि प्रवाशांच्या सोयीसुविधा वाढवण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.

करणी माता मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना सेवा देणारे देशनोक रेल्वे स्थानकावर मंदिराची  वास्तुकला आणि कमान तसेच स्तंभांच्या संकल्पनांचा प्रभाव आहे. तेलंगणामधील बेगमपेट रेल्वे स्थानकावर काकतीय साम्राज्याच्या वास्तुकलेचा प्रभाव आहे. बिहारमधील थावे स्थानकावर 52 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माँ थावेवालीचे प्रतिनिधित्व करणारी विविध भित्तिचित्रे आणि कलाकृती तसेच मधुबनी चित्रे समाविष्ट आहेत. गुजरातमध्ये असलेले डाकोर स्थानक रणछोडरायजी महाराज यांच्यापासून प्रेरित आहे. भारतातील पुनर्विकसित अमृत स्थानके आधुनिक पायाभूत सुविधांना सांस्कृतिक वारसा, दिव्यांगजनांसाठीच्या सुविधांसह प्रवासी-केंद्रित सुविधा आणि प्रवासाचा अनुभव वाढवण्यासाठी शाश्वत पद्धतींशी जोडतात.

भारतीय रेल्वे आपले जाळ्याचे 100% विद्युतीकरण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, ज्यामुळे रेल्वेचे कार्य अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक होईल. या अनुषंगाने, पंतप्रधानांनी चुरू-सादुलपूर रेल्वे लाईनची (58 किमी) पायाभरणी केली आणि सूरतगढ-फलोदी (336 किमी); फुलेरा-डेगाना (109 किमी); उदयपूर-हिम्मतनगर (210 किमी); फलोदी-जैसलमेर (157 किमी) आणि समदडी-बाडमेर (129 किमी) रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण राष्ट्राला समर्पित केले.

राज्यातील रस्ते पायाभूत सुविधांना मोठे बळ देण्यासाठी, पंतप्रधानांनी 3 वाहनांसाठी भुयारी मार्ग बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरण व बळकटीकरणाची पायाभरणी केली. त्यांनी राजस्थानमधील 7 रस्ते प्रकल्प देखील राष्ट्राला समर्पित केले . ₹4850 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे हे रस्ते प्रकल्प वस्तू आणि लोकांच्या सुलभ वाहतुकीला मदत करतील. हे महामार्ग भारत-पाक सीमेपर्यंत विस्तारलेले आहेत, ज्यामुळे सुरक्षा दलांसाठी पोहोच सुलभ होईल आणि भारताच्या संरक्षण पायाभूत सुविधांना गती मिळेल.

सर्वांसाठी वीज आणि हरित व स्वच्छ ऊर्जेची संकल्पना पुढे नेत, पंतप्रधानांनी बिकानेर आणि दिडवाणा कुचामनमधील नावा येथील सौर ऊर्जा प्रकल्पांसह  वीज प्रकल्पांची पायाभरणी केली, तसेच पॉवरग्रिड सिरोही ट्रान्समिशन लि. साठी वीज स्रोतापासून पॉवर ग्रीडकडे वाहून नेण्यासाठी ट्रान्समिशन सिस्टीम्स भाग ब  आणि पॉवरग्रिड मेवाड ट्रान्समिशन लि. साठी भाग ई ची देखील पायाभरणी केली. त्यांनी बिकानेर येथील सौर ऊर्जा प्रकल्प, पॉवरग्रिड नीमच (PowerGrid Neemuch) आणि बिकानेर संकुलातून वीज स्रोतापासून पॉवर ग्रीडकडे वाहून नेण्यासाठी ट्रान्समिशन सिस्टीम, फतेहगढ-2 पॉवर स्टेशनवरील परिवर्तन क्षमतेत वाढ यासह वीज प्रकल्पांचे उद्घाटन केले , ज्यामुळे स्वच्छ ऊर्जा मिळेल आणि कार्बन उत्सर्जन कमी होईल.

पंतप्रधानांनी राजस्थानमधील पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी, वीज पुरवठा, आरोग्य सेवा आणि पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी 25 महत्त्वाच्या राज्य सरकारी प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण केले. यामध्ये एकूण 750 किमी पेक्षा जास्त लांबीच्या 12 राज्य महामार्गांचे उन्नतीकरण आणि देखभालीसाठी 3,240 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्राला समर्पण यांचा समावेश आहे; कार्यक्रमांतर्गत पुढील विस्तारात 900 किमी अतिरिक्त नवीन महामार्ग समाविष्ट आहेत. पंतप्रधानांनी बिकानेर आणि उदयपूर येथे वीज प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यांनी राजसमंद, प्रतापगढ, भिलवाडा, धोलपूर येथे नर्सिंग महाविद्यालयांचे देखील उद्घाटन केले, जे राज्यातील आरोग्य पायाभूत सुविधा वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यांनी झुंझुनू जिल्ह्यातील ग्रामीण पाणी पुरवठा आणि फ्लोरोसिस निवारण प्रकल्प, AMRUT 2.0 अंतर्गत पाली जिल्ह्यातील 7 शहरांमध्ये शहरी पाणी पुरवठा योजनांची पुनर्रचना यासह प्रदेशातील विविध जल पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.

 

 

S.Tupe/S.Kane/S.Kakade/S.Chitnis/S.Mukhedkar/M.Ganoo/S.Patil/P.Malandkar


(Release ID: 2130516)