पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातव्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन समारंभाला केले संबोधित


बिहार मध्ये आयोजित खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंना शुभेच्छा, या मंचावर तुमच्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन घडावे आणि खऱ्या क्रीडा उत्कृष्टतेला प्रोत्साहन मिळावे : पंतप्रधान

वर्ष 2036 मधील ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याच्या दृष्टीने आज भारत प्रयत्नशील : पंतप्रधान

देशातील क्रीडाविषयक पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यावर केंद्र सरकारने केले लक्ष केंद्रित

गेल्या दशकभरात क्रीडाक्षेत्रासाठीची अर्थसंकल्पीय तरतूद तिपटीने वाढ; यंदाच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी 4,000 कोटी रुपये निधी

देशात चांगले खेळाडू आणि उत्कृष्ट क्रीडा व्यावसायिक घडविण्‍याच्या उद्देशाने आम्ही नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात क्रीडा विषयाला मुख्य प्रवाहाचा भाग बनवले : पंतप्रधान

Posted On: 04 MAY 2025 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 मे 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन समारंभाला आज दूरदृश्‍य प्रणालीच्या  माध्यमातून संबोधित केले. यावेळी उपस्थित खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा कर्मचाऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की,  या स्पर्धेत देशभरातील खेळाडू सहभागी होत असून त्यांचे अद्वितीय कौशल्य आणि दृढनिश्चय दिसून येत आहे. देशाच्या क्रीडा क्षेत्रातील चैतन्यदायी उत्साहात योगदान देत हे खेळाडू दाखवत असलेले समर्पण आणि कठोर परिश्रम यांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. खेळाडूंचे कौशल्य आणि वचनबद्धता उल्लेखनीय आहे, खेळाचा ध्यास आणि सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या त्यांच्या निर्धाराचा देशाला अभिमान आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भविष्यातील उज्ज्वल कामगिरीसाठी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांदरम्यान बिहारमधील पटना, राजगीर, गया, भागलपूर आणि बेगुसराय यासह अनेक शहरांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध  स्पर्धांचा उल्लेख करुन पंतप्रधान म्हणाले की,  येत्या काळात सहा हजारांहून अधिक तरुण खेळाडू सहभागी होतील आणि त्यांची स्वप्ने आणि आकांक्षा सोबत घेऊन जातील. भारतातील खेळ आता एक वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ओळख म्हणून विकसित होत आहेत, असं सांगता त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. जसजशी भारताची क्रीडा संस्कृती विकसित होईल तसतशी भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ –  जागतिक स्तरावर झळकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच देशातील तरुणांना एक प्रमुख व्यासपीठ उपलब्ध करून देण्यामध्ये खेलो इंडिया युवा क्रीडा  स्पर्धांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

खेळाडूंच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होण्याच्या आवश्यकतेवर भर देऊन खेळाडूंनी अधिकाधिक सामने खेळण्याचे आणि आपल्या कौशल्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले तसेच केंद्र सरकारने आपल्या धोरणांमध्ये या पैलूला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे ते म्हणाले. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांअंतर्गत  - विद्यापीठ खेळ, युवा खेळ, हिवाळी खेळ आणि पॅरा खेळ - अशा विविध क्रीडा स्पर्धा देशभरात वर्षभर विविध पातळ्यांवर आयोजित केल्या जातात यावर त्यांनी भर दिला. अशा प्रकारच्या सातत्यपूर्ण स्पर्धांमुळे खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावतो आणि त्यांच्यातील कौशल्य पुढे येते, असे ते म्हणाले. या संदर्भात क्रिकेटचे उदाहरण देत आय पी एल क्रिकेट स्पर्धेत अतिशय लहान वयात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बिहारच्या वैभव सूर्यवंशी याचे कौतुक केले. वैभवने घेतलेले कठोर परिश्रम महत्त्वाचे असले  तरी, अनेक स्पर्धांमधील अनुभवाने त्याच्या प्रतिभेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली यावर त्यांनी भर दिला. खेळाडू जितके जास्त खेळतात, तितका त्यांचा खेळ जास्त बहरतो, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमुळे तरुण खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरील खेळांमधील  बारकावे समजून घेण्याची आणि मौल्यवान अनुभव मिळविण्याची संधी मिळते, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात ऑलिम्पिक आयोजित करण्याचे प्रत्येक नागरिकाचे खूप वर्षांपासूनचे स्वप्न असल्याचे नमूद करत, 2036 मध्ये ऑलिम्पिक भारतात आणण्यासाठी देशाच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारताची उपस्थिती बळकट करण्याच्या राष्ट्राच्या वचनबद्धतेची पुनरुक्ती केली. त्यांनी शालेय स्तरावर क्रीडा प्रतिभा ओळखणे आणि त्यांना संरचित प्रशिक्षण देण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केल्याचे अधोरेखित केले. खेलो इंडिया आणि टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) योजनेसारख्या उपक्रमांनी बिहारसह देशभरातील हजारो खेळाडूंना लाभ देत एक मजबूत क्रीडा परिसंस्था निर्माण करण्यात योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. खेळाडूंना विविध खेळांचा शोध घेण्याच्या संधी देण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. खेलो इंडिया युथ गेम्समध्ये गटका, कलारीपायट्टू, खो-खो, मल्लखांब आणि योगासन यांसारख्या पारंपरिक आणि स्वदेशी खेळांचा समावेश करून भारताच्या समृद्ध क्रीडा वारशाला प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी नवीन आणि उदयोन्मुख खेळांमध्ये भारतीय खेळाडूंच्या वाढत्या उपस्थितीची प्रशंसा केली. वुशु, सेपक टकराव, पेनकॅक सिलाट, लॉन बाउल्स आणि रोलर स्केटिंग यांसारख्या शाखांमधील अलीकडील उल्लेखनीय कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांनी 2022 च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारताच्या महिला संघाने लॉन बाउल्समध्ये पदक मिळवून भारतात या खेळाला जागतिक मान्यता मिळवून देण्याच्या ऐतिहासिक क्षणाची आठवण करून दिली.

पंतप्रधानांनी भारताच्या पायाभूत क्रीडा सुविधांच्या आधुनिकीकरणावर सरकारच्या लक्ष केंद्रित असल्याचे नमूद केले. गेल्या दशकात क्रीडा अर्थसंकल्पात तीन पटींहून अधिक वाढ झाली असून, यंदा तो सुमारे 4,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे, त्याचा मोठा हिस्सा पायाभूत सुविधा विकासासाठी देण्यात आला आहे. देशभरात 1,000 हून अधिक खेलो इंडिया केंद्रे कार्यरत असून, त्यापैकी बिहारमध्ये तीन डझनहून अधिक केंद्रे आहेत. बिहारला केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त प्रयत्नांचा लाभ मिळत असून, राज्य सरकार आपल्या स्तरावर अनेक उपक्रमांचा विस्तार करत आहे. पंतप्रधानांनी राजगीर येथील खेलो इंडिया राज्य उत्कृष्‍टता केंद्र, बिहार क्रीडा विद्यापीठ आणि राज्य क्रीडा अकादमी यांसारख्या संस्थांच्या स्थापनेला मान्यता दिली. त्यांनी पाटणा - गया महामार्गावरील क्रीडा नगरीचे बांधकाम आणि बिहारच्या खेड्यांमधल्या क्रीडा सुविधांच्या विकासावर प्रकाश टाकला. खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धांमुळे बिहारची राष्ट्रीय क्रीडा नकाशावर उपस्थिती आणखी बळकट होईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

"क्रीडा जग आणि त्याच्याशी संबंधित अर्थव्यवस्था क्रीडांगणापलीकडे विस्तारलेली असून खेळ तरुणांसाठी रोजगार आणि उद्योजकतेचे नवीन मार्ग निर्माण करत आहेत", असे प्रतिपादन मोदी यांनी केले. त्यांनी फिजिओथेरपी, डेटा अॅनलिटिक्स, क्रीडा तंत्रज्ञान, प्रसारण, ई- स्पोर्टस आणि व्यवस्थापन यासारख्या विविधांगी करिअर संधी देणाऱ्या विविध उदयोन्मुख क्षेत्रांचा उल्लेख केला. त्यांनी असे नमूद केले की तरुण व्यावसायिक प्रशिक्षक, फिटनेस प्रशिक्षक, भरती एजंट, कार्यक्रम व्यवस्थापक, क्रीडा विधिज्ञ आणि माध्यम तज्ज्ञ म्हणून भूमिका शोधू शकतात. "आज, स्टेडियम हे केवळ सामन्यांचे ठिकाण राहिलेले नाही तर हजारो नोकऱ्यांचे स्रोत बनले आहे", असे मोदी यांनी नमूद केले. राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठांची स्थापना आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे खेळांना मुख्य प्रवाहातील शिक्षणात समाविष्ट करणे यासारख्या उपक्रमांसह क्रीडा उद्योजकतेतील वाढत्या संधींवर त्यांनी भर दिला. खेळाद्वारे सांघिक भावना, सहकार्य आणि चिकाटी वाढीस लागते हे अधोरेखित करताना मोदींनी जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये खिलाडूवृत्तीचे महत्त्व अधोरेखित केले. खेळाडूंना प्रोत्साहन देत, त्यांनी त्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आणि ब्रँड अँबेसेडर म्हणून 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेचे प्रतिनिधित्व करण्याचे आवाहन केले. खेळाडू बिहारमधील गोड आठवणी सोबत नेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्याबाहेरून येणाऱ्या खेळाडूंना लिट्टी चोखा आणि बिहारच्या प्रसिद्ध मखानाचा आस्वाद घेण्यासही त्यांनी प्रोत्साहित केले.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमुळे सहभागींमध्ये क्रीडा भावना आणि देशभक्ती दोन्ही उंचावेल अशी आशा व्यक्त करून, पंतप्रधानांनी खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धांच्या सातव्या पर्वाच्या प्रारंभाची अधिकृत घोषणा केली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, रक्षा खडसे, रामनाथ ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

 

* * *

S.Bedekar/N.Chitale/Bhakti/Nikhilesh/Vasanti/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2126879) Visitor Counter : 21