माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारत पॅव्हेलियन: कला ते कोड - वेव्हज 2025 मध्ये भरघोस प्रतिसाद
Posted On:
04 MAY 2025 7:25PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 4 मे 2025
वेव्हज 2025 मध्ये भारताच्या कथाकथन परंपरेच्या अखंडतेच्या अनुभूतीतून मंत्रमुग्ध करणाऱ्या भारत पॅव्हेलियन या प्रदर्शन दालनाला जनतेकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. "फ्रॉम कला टू कोड" या संकल्पनेंतर्गत या दालनात मौखिक आणि दृश्य परंपरांपासून ते आधुनिक डिजिटल नवोन्मेषांपर्यंत माध्यमे आणि मनोरंजनातील भारताच्या उत्क्रांतीची एक आकर्षक कहाणी उलगडण्यात आली.

भारत पॅव्हेलियनने आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संतुलन आधीच सुरू असलेल्या तांत्रिक प्रगतीच्या नवीन लाटांशी साधत भारताचा आत्मा सादर केला. वेव्हज 2025 च्या उद्घाटनाच्या दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅव्हेलियनला भेट दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर अनेक मान्यवरांनी पॅव्हेलियनला भेट दिली आणि भारताची कहाणी सांगण्यातील त्याच्या भूमिकेचे कौतुक केले. या दालनाला भेट देणाऱ्यांची संख्या प्रचंड होती. आपल्या देशातील समृद्ध खजिन्याचा धांडोळा घेताना लोकांना आदर आणि अचंबा वाटत होता.

भारताचा सृजनात्मक प्रवास साजरा करणारे भारत पॅव्हेलियन हे केवळ आशयाचे प्रदर्शन नव्हते तर एक सर्जक म्हणून भारताची एक शक्तिशाली अभिव्यक्ती होती. त्यातून भारताची सांस्कृतिक गहनता, कलात्मक उत्कृष्टता आणि जागतिक कथाकथनात उदयोन्मुख वर्चस्व प्रतीत झाले. पॅव्हेलियनची रचना चार संकल्पनात्मक विभागात करण्यात आली होती, प्रत्येक विभागात भारताच्या सर्जनशील वारशाचे विविधांगी आयाम उलगडले गेले:
श्रुती - मौखिक परंपरांवर: भारताच्या प्राचीन मौखिक कथा वारशाचा सन्मान करताना, या विभागात लय आणि सुरांनी जपलेल्या सामूहिक स्मृतीची अनुभूती मिळाली.
ठळक वैशिष्ट्ये:
- गुरु-शिष्य परंपरा: मौखिक ज्ञान प्रणालींना वंदन.
- गूढ कुजबुज: वैदिक मंत्र आणि आध्यात्मिक परंपरा.
- धुन: सुरांचे संग्रहालय: भारतीय शास्त्रीय वाद्यांचे प्रदर्शन.
- मातीतला आवाज: तल्लीन करणारी लोकगीते.
- संगीतातून तरंग निर्माण करणे: गोहर जानपासून जागतिक उस्तादांपर्यंत
- स्पॉटिफाय मंच: अमान अली बंगश, अयान अली बंगश आणि कुटुंबातील लहान सदस्यांचा सहभाग असलेले वादन
- इंडिया ऑन एअर: ऑल इंडिया रेडिओचा वारसा
- प्लेबॅक नेशन: पार्श्वगायनाच्या प्रतिष्ठेची 100 वर्षे
- ध्वनिमुद्रिका ते क्लाउड: संगीताच्या विविध प्रकारांची उत्क्रांती
- मध्यवर्ती पॉडकास्ट: उच्चारलेल्या शब्दांमधून ध्वनीचा उदय
- ज्ञानाच्या लहरी: भारतात ऑडिओबुक्सचा प्रसार

कृती - शिलालेख आणि लिखित परंपरा: या विभागात भारताच्या सांस्कृतिक स्मृतींचे जतन करण्यात लिखित शब्दाची भूमिका अधोरेखित केली
ठळक वैशिष्ट्ये:
- प्राथमिक खुणा: प्रारंभिक गुहा चित्रे आणि संवाद.
- सिंधूचे ठसे: परस्परसंवादी सिंधू खोऱ्यातील अनुभव.
- संस्कृतींच्या विकासातून रामायण: आशियामधील महाकाव्याचा प्रवास.
- भारतातील आखीव सूचना: अशोकाच्या काळातील शिलालेख.
- जतन केलेले ज्ञान : प्राचीन ग्रंथालयांमधील हस्तलिखिते.
- धातूविषयक स्मृतीलेख: ताम्रपट दस्तऐवजीकरण.
- छापील साहित्याचे सामर्थ्य: भारतीय पत्रकारितेचा उदय.
- भारतीय फडताळ: प्रतिष्ठित पुस्तकांची परस्परसंवादी डिजिटल लायब्ररी.
- मुखपृष्ठ कथा: भारतीय मासिकांचे साजरीकरण.
- चित्रकथा कक्ष: प्राचीन चित्रकथांपासून ग्राफिक कादंबऱ्यांपर्यंत.

दृष्टी - दृश्य परंपरा
दृश्य कथाकथनावर लक्ष केंद्रित करून, हा विभाग गुहेमधील कलाकृतीपासून आधुनिक चित्रपटांपर्यंत विस्तारला आहे.
ठळक वैशिष्ट्ये:
- कला यात्रा: भारताची दृश्य कला उत्क्रांती दृगोच्चर करणारे एलईडीने सुसज्ज भुयार.
- चिरंतन ठेका: हडप्पाच्या नर्तिकेचे होलोग्राफिक नृत्य प्रदर्शन.
- भावनेचे सार: नवरसांचे परस्परसंवादी अन्वेषण.
- नटराज दर्शन: वैश्विक नर्तक म्हणून शिवाला दृश्य स्वरूपात श्रद्धांजली.
- लोककला इतिहास: लोकनृत्य, कठपुतळी आणि आदिवासी अभिव्यक्ती.
- भूतकाळातील चौकटी: चित्रपट उत्क्रांतीचे प्रदर्शन.
- वॉल ऑफ फेम: भारतीय चित्रपटांचा प्रतीकात्मक उत्सव.
- प्रकाश कॅमेरा वारसा: चित्रपट निर्माते आणि तंत्रज्ञांना श्रद्धांजली.
- दूरदर्शनची वर्षांनुरूप प्रगती: दूरदर्शनपासून स्ट्रीमिंग युगापर्यंतचे प्रदर्शन.
निर्मात्याची झेप
या विभागात भविष्यातील कथाकथन तंत्रज्ञानातील भारताच्या नवोन्मेषाचे प्रदर्शन घडविले.
ठळक वैशिष्ट्ये:
- एआय, एक्सआर, गेमिंग, मेटाव्हर्स आणि अॅनिमेशनमधील भारतीय प्रगतीचे प्रदर्शन.
- उदयोन्मुख भारतीय बौद्धिक गुणधर्मांचे प्रदर्शन.
- कथाकथनाच्या भविष्याचे प्रतिबिंब दिसणारी परस्परसंवादी प्रात्यक्षिके.
वेव्हज 2025 मधील भारत पॅव्हेलियनमध्ये भारताच्या कथाकथन परंपरा आणि नवोन्मेषाचा बहु-संवेदी उत्सव सादर केला. यातून वारशाची मुळे घट्ट रुजलेले आणि भविष्याकडे झेपावणारे सर्जनशील सामर्थ्य म्हणून भारताची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली.
KOW0.jpeg)

* * *
PIB Mumbai |S.Nilkanth/Vasanti/Sandesh/D.Rane
Release ID:
(Release ID: 2126841)
| Visitor Counter:
14