परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांसोबत (28 फेब्रुवारी, 2025) संयुक्त पत्रकार परिषदेत दिलेले निवेदन

Posted On: 28 FEB 2025 4:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2025

 

महामहिम, युरोपियन कमिशन अध्यक्ष,

युरोपियन कॉलेज ऑफ कमिशनर्स,

प्रतिनिधी,

माध्यमांमधील मित्रांनो,

नमस्कार !

युरोपियन कमिशन अध्यक्ष  आणि कॉलेज ऑफ कमिशनर्सची  ही भारत भेट अभूतपूर्व आहे.

ही  युरोपियन कमिशनची केवळ पहिलीच भारत भेट नाही तर कोणत्याही एका देशात युरोपियन कमिशनचा इतका व्यापक सहभाग असलेली पहिलीच भेट आहे. तसेच, नवीन कमिशनच्या नव्या कार्यकाळातील सुरुवातीच्या दौऱ्यांपैकी हा पहिलाच दौरा आहे. या ऐतिहासिक प्रसंगी, मी युरोपियन कमिशनच्या  अध्यक्ष आणि कॉलेज ऑफ कमिशनर्सचे भारतात स्वागत करतो.

मित्रांनो,

भारत आणि युरोपियन युनियनमधील ही दोन दशकांची धोरणात्मक भागीदारी नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. तिच्या केंद्रस्थानी विश्वास, लोकशाही मूल्यांमधील सामायिक विश्वास आणि समृद्धी तसेच सामायिक प्रगतीप्रति परस्पर वचनबद्धता आहे.

याच भावनेतून, आम्ही काल आणि आज  विविध क्षेत्रांच्या जवळजवळ 20 मंत्रिस्तरीय बैठका घेतल्या आहेत. विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर प्रामाणिक आणि अर्थपूर्ण चर्चा झाली. आमच्या भागीदारीला नव्या उंचीवर नेण्यासाठी तसेच गती देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

आम्ही व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, नवोन्मेष, हरित विकास , सुरक्षा, कौशल्य आणि गतिशीलता या क्षेत्रात सहकार्यासाठी एक आराखडा तयार केला आहे. आम्ही आमच्या चमूंना या वर्षाच्या अखेरपर्यंत परस्परांना  फायदेशीर द्विपक्षीय मुक्त व्यापार करार पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

मित्रांनो,

गुंतवणूक चौकट मजबूत करण्यासाठी, गुंतवणूक संरक्षण आणि जीआय करारासंदर्भात  पुढे जाण्याबाबतही चर्चा झाली आहे. तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात, एक विश्वासार्ह आणि सुरक्षित मूल्य साखळी हे आमचे सामायिक प्राधान्य आहे.

आम्ही सेमीकंडक्टर्स , एआय, हाय परफॉरमन्स कम्प्यूटिंग  आणि 6G मध्ये सहकार्य वाढविण्यावर देखील सहमती दर्शविली आहे. आम्ही अंतराळ संवाद सुरू करण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

मित्रांनो,

पर्यावरणशास्त्र आणि अर्थव्यवस्था यांच्यातील संतुलन ही आमची सामायिक वचनबद्धता आहे आणि या दिशेने आमचे सहकार्य मजबूत राहिले आहे. आम्ही ग्रीन हायड्रोजन फोरम आणि ऑफशोअर विंड एनर्जी बिझनेस समिट आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ईव्ही बॅटरी, सागरी प्लास्टिक आणि हरित हायड्रोजनवर संयुक्तरित्या संशोधन  केले जाईल. आम्ही शाश्वत शहरी विकासावरील आमची संयुक्त योजना देखील पुढे नेऊ.

कनेक्टिव्हिटीच्या (दळणवळण) क्षेत्रात भारत - मध्य पूर्व - युरोप आर्थिक कॉरिडॉर, "आयएमईईसी" पुढे नेण्यासाठी ठोस पावले उचलली जातील.”

मला ठाम विश्वास आहे की, आगामी काळात "आयएमईईसी" हे जागतिक व्यापार, शाश्वत विकास आणि समृद्धीला चालना देणारे इंजिन म्हणून काम करेल.

मित्रहो,

संरक्षण आणि सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवरील आपले वाढते सहकार्य, हे आपल्या परस्परांवरील विश्वासाचे निदर्शक आहे. सायबर सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि दहशतवादविरोधी उपायांमध्येही आपण आपले सहकार्य पुढे नेऊ.

हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील शांतता, सुरक्षा, स्थैर्य आणि समृद्धीच्या महत्त्वावर दोन्ही बाजूंचे  एकमत आहे. 'इंडो पॅसिफिक ओशन्स इनिशिएटिव्ह' मध्ये सहभागी होण्याच्या युरोपियन युनियनच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र आणि आफ्रिकेमधील शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासाठी त्रिकोणी विकास प्रकल्पांवर आपण एकत्र काम करू.

मित्रहो,

परस्परांच्या जनतेमधील संपर्क, ही आपल्या नात्याची बहुमोल संपत्ती आहे. आज आपण शिक्षण, संशोधन आणि उद्योग क्षेत्रातील परस्पर भागीदारी वाढवण्याबाबतचा नवीन करार केला. मला विश्वास आहे, की भारताची युवा प्रतिभा आणि युरोपचा नवोन्मेश, एकत्र येऊन अमर्याद शक्यता निर्माण करतील.

युरोपियन युनियनच्या नवीन व्हिसा कॅस्केड व्यवस्थेचे आम्ही स्वागत करतो. यामुळे भारतातील प्रतिभावान तरुणांच्या क्षमतेला अधिक चांगली गती मिळेल.

आज आपण 2025 च्या पुढील कालावधीसाठी  भारत-युरोपियन युनियन भागीदारीकरिता एक धाडसी आणि महत्त्वाकांक्षी पथदर्शक आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला. भारत-युरोपियन युनियन दरम्यानच्या पुढील शिखर परिषदेत त्याचे प्रकाशन केले जाईल.

महोदय,

आपल्या भारत भेटीने आपल्यातील भागीदारीला नवी गती, ऊर्जा आणि उत्साह मिळाला आहे. हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी असून, तो आपल्या महत्त्वाकांक्षेचे कृतीत रूपांतर करेल.

पुढील भारत-युरोपियन युनियन शिखर परिषदेसाठी भारतात आपले स्वागत करण्याच्या संधीची मी आतुरतेने वाट पाहत आहे.

धन्यवाद.

 

* * *

S.Kakade/Sushma/Rajshree/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2106934) Visitor Counter : 20