शिक्षण मंत्रालय
विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण, विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन
Posted On:
09 FEB 2025 12:21PM by PIB Mumbai
खरे तर परीक्षा या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अनेकदा तणावाचा विषय ठरतात, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "परीक्षा पे चर्चा" उपक्रमाने या संकल्पनेत सकारात्मक बदल घडवला आहे. यावर्षी 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता यंदाच्या परीक्षा पे चर्चा या उपक्रमाचे सत्र होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी आणि पालकांशी थेट संवाद साधणार आहेत. प्रत्येक वर्षी होणारे परीक्षा पे चर्चा या उपक्रमाचे सत्र, हे परीक्षेसंदर्भातील तणाव दूर करण्यासाठी नवा आणि अभिनव दृष्टिकोनच मांडत असते आणि त्यातून शिकणे आणि जगण्याकडे एकप्रकारचा सोहळा साजरा करण्याच्या दृष्टीकोनातून पाहण्याच्या मानसिकतेला नव्याने चालना देत असते.

नवे विक्रम प्रस्थापित करणारी परीक्षा पे चर्चा 2025
यंदा 10 फेब्रुवारी 2025 रोजी परीक्षा पे चर्चा या उपक्रमाचे 8 वे सत्र होणार आहे. खरे तर या उपक्रमाने या आधीच नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. यंदाच्या उपक्रमासाठी तब्बल 5 कोटींपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. त्यामुळे एका अर्थाने या उपक्रमाने एका लोकचळवळीचे स्वरुपच धारण केले असून, हा उपक्रम शिकण्याच्या सामुदायिक सोहोळ्यामागची प्रेरणाच ठरू लागला आहे. यंदा, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील तिथल्या स्थानिक शिक्षण मंडळाच्या शासकीय शाळा, केंद्रीय विद्यालये, सैनिकी शाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि नवोदय विद्यालयांमधून 36 विद्यार्थ्यांची निवड केली गेली आहे. यंदाच्या परीक्षा पे चर्चा 2025 मध्ये एकूण 7 प्रेरणादायी सत्रे होणार आहे. यात विविध क्षेत्रांमधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वे विद्यार्थ्यांना जीवन आणि शिक्षणाच्या महत्त्वाच्या पैलूंविषयी मार्गदर्शन करतील. या प्रत्येक सत्रातील मुख्य विषय पुढे दिले आहेत. :
क्रीडा आणि शिस्त – या सत्रात एम.सी. मेरी कोम, अवनी लेखरा आणि सुहास यथिराज हे विद्यार्थ्यांसोबत ध्येय उद्दिष्ट निश्चित करणे, संयम आणि शिस्तीच्या माध्यमातून तणावाचे व्यवस्थापन करणे या विषयांवर चर्चा करतील.
मानसिक आरोग्य – या सत्रात दीपिका पदुकोण या विद्यार्थ्यांना आत्म अभिव्यक्तीचे तसेच मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
पोषण – या सत्रात आहार तज्ञ शोनाली सभरवाल, ऋजुता दिवेकर आणि रेवंत हिमतसिंगका (फूड फार्मर) आरोग्यदायी आहाराच्या सवयी, झोप आणि एकंदरीत आरोग्याचे महत्व अधोरेखित करणारी चर्चा करतील.
तंत्रज्ञान आणि अर्थविषयक – या सत्रामध्ये गौरव चौधरी (टेक्निकल गुरुजी) आणि राधिका गुप्ता हे दोघेजण तंत्रज्ञानाचा शिकण्यासाठीचे साधन म्हणून वापर आणि आर्थिक साक्षरतेवर चर्चा करणार आहेत.
सर्जनशीलता आणि सकारात्मकता – या सत्रात विक्रांत मॅसी आणि भूमी पेडणेकर हे दोघेजण आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यासाठी तसेच नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रेरित करतील.
मनावरचा ताबा आणि मानसिक शांती – या सत्राच्या माध्यमातून सद्गुरू एकाग्रता आणि मानसिक पातळीवरील स्पष्टतेसाठी व्यावहारिक तंत्रांविषयी माहिती देणार आहेत.
यशोगाथा – या सत्रात केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC), भारतीय तंत्रज्ञान संस्था - संयुक्त प्रवेश परीक्षा (IIT-JEE), सामायिक कायदा प्रवेश परीक्षा (CLAT), केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE), राष्ट्रीय संरक्षण अकादमी प्रवेश परीक्षा (NDA), भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र परीक्षा (ICSE) या परीक्षांमध्ये अव्वल स्थान मिळवणारे विद्यार्थी आणि या आधीच्या परीक्षा पे चर्चा उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी, पालक आणि शिक्षक परीक्षा पे चर्चा या उपक्रमाने परीक्षेसाठीच्या त्यांच्या पूर्वतयारीमध्ये आणि याबाबत त्यांची सकारात्मक मानसिकता घडवण्यामध्ये कशाप्रकारची भूमिका बजावली आहे, याविषयीचे अनुभव सहभागींसोबत सामायिक करणार आहेत.
परीक्षा पे चर्चा या उपक्रमाचा गेल्या वर्षानुवर्षांचा प्रवास
2024: संपूर्ण देशभरातून सहभाग
मागच्या वर्षी 29 जानेवारी 2024 रोजी परीक्षा पे चर्चा या उपक्रमाची 7 वी आवृत्ती आयोजित केली गेली होती. त्यावेळच्या कार्यक्रमासाठी MyGov पोर्टलच्या माध्यमातून 2.26 कोटी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांच्या हा इतक्या मोठ्या प्रमाणातील सहभाग म्हणजे या उपक्रमाची लोकप्रियता आणि विद्यार्थ्यांसाठी त्याची आवश्यकताच अधोरेखित होते. महत्वाचे म्हणजे त्यावेळी पहिल्यांदाच 100 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला होता. परीक्षा पे चर्चा या उपक्रमाची ही 7 वी आवृत्ती नवी दिल्लीतल्या प्रगती मैदान इथल्या भारत मंडपम, ITPO इथे नगर सभा स्वरुपात अर्थात टाऊन हॉल स्वरुपात आयोजित केली होती. त्यावेळी प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणीच 3,000 विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि कला उत्सवातील विजेते सहभागी झाले होते.


परीक्षा पे चर्चा 2024
2023: सहभागाचा विस्तार
परीक्षा पे चर्चा या उपक्रमाच्या 6 व्या आवृत्तीचे आयोजन 27 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम इथे केले गेले होते. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी आणि पालकांशी संवाद साधला आणि त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, महत्वाच्या सूचनाही केल्या. महत्वाचे म्हणजे अनेक दूरचित्रवाहिन्या आणि युट्यूब वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण केले गेले. या माध्यमातून सुमारे 718110 विद्यार्थी, 42337 शिक्षक आणि 88544 पालकांनी हा कार्यक्रम थेट पाहिला. या कार्यक्रमातील पंतप्रधानांचा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसोबत झालेला संवाद अत्यंत प्रेरणादायी आणि नवी ऊर्जा जागवणारा ठरला.


परीक्षा पे चर्चा 2023
2022: प्रत्यक्ष संवादात्मक देवाणघेवाणीला नवा आयाम
परीक्षा पे चर्चा या उपक्रमाची 5 वी आवृत्ती देखील 1 एप्रिल 2022 रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम इथेच पार पडली होती. या कार्यक्रमातही पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी आणि पालकांशी संवाद साधून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, महत्वाच्या सूचनाही केल्या. 9,69,836 विद्यार्थी, 47,200 कर्मचारी आणि 1,86,517 पालकांनी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहिला. अनेक दूरचित्रवाहिन्या आणि युट्यूब वाहिन्यांवरूनही या कार्यक्रमाचे थेट प्रसारण केले गेले होते.


2021: डिजिटल स्वरुपातला आभासी संपर्क / संवाद
खरे तर ज्यावेळी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची 4 थी आवृत्ती झाली, ते 2021 हे वर्ष कोरोना महामारीच्या प्रभावाखालचे वर्ष होते. त्यामुळे 7 एप्रिल 2021 रोजी या 4 थ्या आवृत्तीचे आयोजन ऑनलाइन स्वरूपात केले गेले होते. कोरोना महामारीने निर्माण केलेल्या अगणित आव्हाने असतानाही पार पडलेला हा कार्यक्रमातील पंतप्रधानांसोबतचा संवाद विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रेरणा देणाराच ठरला. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी आपल्या संवादाचा भर हा प्रामुख्याने लवचिकता आणि कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्यावर, जगण्याशी संबंधित महत्वाच्या कौशल्यांवर आणि विद्यार्थ्यांना अनपेक्षित अशा नकारात्मक परिस्थितीत सहकार्य करण्यावरच ठेवला होता.

परीक्षा पे चर्चा 2021
2020: सहभागाच्या व्याप्तीचा विस्तार
20 जानेवारी 2020 रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअममध्ये परीक्षा पे चर्चा या उपक्रमाची त्यावर्षीची आवृत्ती, अर्थात या उपक्रमाची तिसरी आवृत्ती झाली होती. यावेळचा कार्यक्रम हा एखाद्या नगर सभा स्वरुपात म्हणजेच टाऊन हॉल स्वरुपात झाला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद साधला. या उपक्रमाच्या व्याप्तीचा विस्तार करण्यासाठी त्यावेळी ऑनलाइन स्पर्धा घेतली गेली होती. या स्पर्धेत तब्बल 2.63 लाख जण सहभागी झाले होते. महत्वाचे म्हणजे भारतासह 25 इतर देशांमधले भारतीय विद्यार्थी देखील त्यावेळच्या या उपक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी साधलेल्या संवादातून यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रथम समोर असलेल्या आव्हानांचा स्वीकार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.


परीक्षा पे चर्चा 2020
2019: वाढती व्याप्ती
या उपक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजनही नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवरच झाले होते. 29 जानेवारी 2019 रोजी हा उपक्रम आयोजित केला गेला होता. त्यावर्षीचे महत्वाचे यश म्हणजे उपक्रमातील सहभागींचे प्रमाण प्रचंड वाढले होते. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी तब्बल 90 मिनिटांपेक्षा जास्त वेळ विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसोबत संवाद साधला. या संवादात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी पंतप्रधानांच्या संवादाला सहजपणे, कधी हसत तर कधी टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली. एका अर्थाने या संवादाला पंतप्रधानांच्या निरीक्षणांममधील त्यांच्या विनोदबुद्धीचा आणि प्रतिभेचा अनोखा स्पर्श लाभला होता.


परीक्षा पे चर्चा 2019
2018: या उपक्रमाच्या अविरत वाटचालीचा प्रारंभ करणारा पहिला संवाद
परीक्षा पे चर्चा या उपक्रमाचा शुभारंभ झाला तो 16 फेब्रुवारी 2018 रोजी. त्यावेळीही नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवरच या उपक्रमाची शुभारंभाची आवृत्ती पार पडली होती. शुभारंभाच्या या पहिल्या कार्यक्रमाला 2,500 पेक्षा जास्त विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 8.5 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दूरदर्शन, विविध दूरचित्रवाहिन्या आणि रेडिओच्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहिला तसेच ऐकलाही. या पहिल्या कार्यक्रमातील संवादातून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना सर्वांगिण विकास, परिस्थितीशी जुळवून घेणे आणि परीक्षेदरम्यान संतुलन राखण्याचे महत्त्व समजावले. खरे तर या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानेच या उपक्रमाच्या भविष्यातील आवृत्त्यांच्या आयोजनाचा एक मजबूत पायाच रचला होता.


परीक्षा पे चर्चा 2018
परीक्षा पे चर्चेचा प्रभाव
खरे तर गेल्या काही वर्षांमधले परीक्षा पे चर्चा (PPC) या उपक्रमाचे आयोजन म्हणजे, विद्यार्थी-पालक-शिक्षकांना परीक्षेसंबंधी जाणवणाऱ्या तणावाचे एका वेगळ्याच सकारात्मक ऊर्जेत रूपांतर करणारा महत्त्वाचा संवाद मंच बनला आहे. या कार्यक्रमातील आजवरच्या संवादातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षेसंबंधीचे दडपण हलके करण्याच्या उद्देशाने वास्तवातील प्रश्नांना उत्तरे दिली आहेत, आणि त्यावर तातडीने करता येतील असे वास्तव उपायही सुचवले आहेत. या संवादांतून पंतप्रधानांनी धोरण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यांमधील दरी दूर करत, विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जाण्यासाठी खऱ्या अर्थाने सक्षम केले आहे. या उपक्रमाची डिजिटल व्याप्ती, या उपक्रमाचा अभिनव दृष्टिकोन आणि सर्वसमावेशकता या पैलुंमुळेच हा कार्यक्रम दरवर्षी अधिक प्रभावी होत गेला असून, विद्यार्थ्यांसोबतच्या प्रतिसादात्मक संवादाचा खरा पायाही ठरला आहे. खरे तर परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाने प्रत्येक परीक्षा म्हणजे काही शेवट नाही तर ती सुरुवात आहे हा संदेश अधिकाधिक ठोस केला आहे.
संदर्भ
वार्षिक अहवाल 2023-24 ते 2018-19 https://www.education.gov.in/documents_reports?field_documents_reports_tid=All&field_documents_reports_category_tid=All&title=&page=1
https://innovateindia1.mygov.in/#skip-main
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2092794
https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2000010
https://pib.gov.in/Pressreleaseshare.aspx?PRID=1561793
https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2100184
पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
***
S.Kane/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2101146)
Visitor Counter : 89