माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज (WAVES 2025) अंतर्गत आयोजित रील मेकींग चॅलेंज या स्पर्धेसाठी भारतासह जगभरातील 20 देशांमधून 3,300 पेक्षा जास्त प्रवेशिका आल्या
Posted On:
05 FEB 2025 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2025
वेव्हज अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (World Audio Visual & Entertainment Summit - WAVES) 2025 च्या निमित्ताने आयोजित "रील मेकिंग चॅलेंज" या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमासाठी भारतासह जगभरातील 20 देशांमधून 3,379 जणांनी नोंदणी केली आहे.
भारतात निर्मिती करा (Create in India)
वेव्हज 2025 अंतर्गत एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. या स्पर्धेमधून माध्यमे आणि मनोरंजनाचे जागतिक केंद्र म्हणून भारताचा वाढता प्रभाव अधोरेखित होतो आहे. या सोबतच या स्पर्धेच्या माध्यमातून देशात वेगाने विस्तारत असलेल्या डिजिटल क्रिएटर अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब देखील उमटले आहे. ही स्पर्धा भारत सरकारच्या देश आणि देशाबाहेरील प्रतिभांच्या सक्षमीकरणासाठी आखलेल्या क्रिएट इन इंडिया या संकल्पाशी सुसंगत आहे.
या स्पर्धेसाठी अफगाणिस्तान, अल्बानिया, अमेरिका, अँडोरा, अँटिग्वा आणि बार्बुडा, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी या देशांमधून उल्लेखनीय मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी उल्लेखनीय आंतरराष्ट्रीय सहभाग नोंदविला आहे. जगभर पोहोचलेल्या या स्पर्धेतून, भारताच्या माध्यम निर्मिती क्षेत्राचा वाढता प्रभाव आणि जगभरातील आशय निर्मार्त्यांचे एक प्रमुख व्यासपीठ म्हणून वेव्हजची लोकप्रियताही अधोरेखित झाली आहे.
तवांग ते पोर्ट ब्लेअर : देशभरात कथात्मक मांडणीच्या निर्मितीत वाढ
तवांग (अरुणाचल प्रदेश), दीमापूर (नागालँड), कारगिल (लडाख), लेह, शोपियान (काश्मीर), पोर्ट ब्लेअर (अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह), तेलियामोरा (त्रिपुरा), कासरगोड (केरळ) आणि गंगटोक (सिक्कीम) यांसह भारतातील विविध आणि दुर्गम भागांमधून या स्पर्धेसाठी प्रवेशिका आल्या आहेत. लहान शहरे आणि आशय निर्मितीच्या उदयोन्मुख केंद्रांच्या ठिकाणांहून रील मेकिंग या स्पर्धेला मिळालेला मोठा प्रतिसाद म्हणजे, कथात्मक मांडणीची भारताची समृद्ध परंपरा आणि देशातील वाढत्या डिजिटल आशिय निर्मिती परिसंस्थेचेच द्योतक आहे.
या स्पर्धेअंतर्गत 20 वर्षांवरील स्पर्धकांना भारताच्या सध्याच्या तांत्रिक आणि पायाभूत सुविधांच्या प्रगतीवर प्रकाश टाकणारी विकसित भारत आणि इंडिया@ 2047 या विषयांवरची रील बनवण्याचे आव्हान दिले गेले आहे. एका अर्थाने ही स्पर्धा म्हणजे अवघ्या 30-60 सेकंदांच्या सिनेमॅटिक कलाकृतीच्या माध्यमातून भारताची नवोन्मेषाधारीत वाटचाल मांडण्यासाठी कथात्मक मांडणी करणाऱ्या कलाकारांसाठी उपलब्ध करून दिलेले व्यासपीठच ठरले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सहभागी स्पर्धकांची सर्जनशीलता आणि देशाच्या विकासासाठीच्या त्यांच्या दृष्टीकोनाचे अंतरंगही उलगडणार आहेत.
या रील मेकिंग चॅलेंज उपक्रमातील विजेत्यांना बक्षिस रुपात अनेक विशेष संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मेटाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे आमंत्रण आणि रील्स मास्टरक्लाससाठी निमंत्रण. वेव्हज 2025 या परिषदेकरता संपूर्ण खर्चासह प्रवेश, यासोबतच परिषदेमध्ये त्यांचा सन्मानही केला जाणार
अंतिम फेरीतील स्पर्धकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील आशय निर्मिती (कंटेंट क्रिएटर) स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी मंत्रालयाद्वारे पाठबळ दिले जाणार.
विजेत्या रील्स प्रतिष्ठेच्या वेव्हजचे अधिकृत संकेतस्थळ आणि सर्व समाजमाध्यमांवरील वेव्हज हॉल ऑफ फेममध्ये प्रदर्शित केल्या जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी, https://wavesindia.org/challenges-2025 या संकेतस्थळाला भेट द्या.
* * *
S.Patil/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2100082)
Visitor Counter : 19
Read this release in:
Malayalam
,
Odia
,
Urdu
,
English
,
Khasi
,
Gujarati
,
Nepali
,
Hindi
,
Assamese
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Kannada