इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादक देश म्हणून उदयाला येत आहे: 2014 मधील अवघ्या दोन युनिट्सवरून झेप घेत आज देशभरात 300 युनिट्स कार्यान्वित : अश्विनी वैष्णव


आयातीपासून आत्मनिर्भरतेपर्यंत : भारतात विकल्या जाणाऱ्या मोबाईल फोनपैकी 99.2% स्वदेश निर्मित आहेत, 2024 मध्ये निर्यातीने 1,29,000 कोटी रुपयांचा टप्पा पार करून उत्पादन मूल्य 4,22,000 कोटी रुपयांवर पोहोचले

मेक इन इंडिया अभियानाने चार्जर, बॅटरी पॅकपासून कॅमेरा मॉड्युल, डिस्प्ले मॉड्युल इत्यादी प्रमुख इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत देशांतर्गत उत्पादनांना चालना दिली आहे

सेमीकंडक्टर चिप्स आणि फाइनर कंपोनंट्सच्या विकासावर भर देऊन आणि उत्पादनाची मूल्य साखळी अधिक मजबूत करून भारत नवे वळण घेत आहे

Posted On: 04 FEB 2025 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2025 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मेक इन इंडिया हे ध्येयधोरण देशाला जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उदयाला आणण्यात मदत करत आहे. मेक इन इंडिया अभियान आपल्या दशकपूर्तीच्या आतच देशाला आत्मनिर्भर बनवत असून उत्पादनाला चालना देत आहे आणि रोजगार निर्मिती करत आहे. या संदर्भात माहिती देताना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या दशकात भारतातील मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात झालेल्या उल्लेखनीय परिवर्तनावर प्रकाश टाकला.

आयातीपासून आत्मनिर्भरतेपर्यंत  : मोबाइल उत्पादनात भारताची झेप

भारताने मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात लक्षणीय प्रगती केली असून  जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादन करणारा देश बनला आहे. 2014 मध्ये, भारतामध्ये फक्त 2 मोबाइल निर्मिती युनिट्स होती परंतु आज देशात  300 पेक्षा जास्त युनिट्स कार्यान्वित झाली आहेत.  या उल्लेखनीय कामगिरीमुळे या महत्त्वपूर्ण क्षेत्रातील विस्तार अधोरेखित होतो.

वर्ष 2014 -15 मध्ये भारतात विकल्या जाणाऱ्या  मोबाईल फोन पैकी केवळ 26% मोबाईल फोन भारतात बनवले जात होते, तर उर्वरित आयात केले जात होते.  आज भारतात विकले जाणारे 99.2 % मोबाईल फोन भारतातच  बनवले जातात. आर्थिक वर्ष 24 मध्ये मोबाइल फोनचे निर्मिती  मूल्य 18,900 कोटी रुपयांवरून 4,22,000 कोटी रुपये इतके वाढले आहे.

भारतात दरवर्षी 32.5 ते 33 कोटीहून अधिक मोबाईल फोन तयार केले जातात आणि सरासरी एक अब्ज मोबाईल फोन वापरात आहेत. भारतीय मोबाईल फोनने देशांतर्गत बाजारपेठ जवळपास  संपूर्ण व्यापली आहे आणि त्यामुळे मोबाईल फोनच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. 2014 मध्ये जवळपास अस्तित्वातच नसलेली निर्यात आता 1,29,000 कोटी रुपयांहून अधिक झाली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात रोजगार निर्मितीचे दशक 

या क्षेत्राचा विस्तार हा रोजगाराचा एक प्रमुख निर्माता देखील असून दशकभरात सुमारे 12 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. या रोजगार संधींनी असंख्य कुटुंबांचा आर्थिक दर्जा उंचावला तर आहेच, सोबतच देशाच्या सामाजिक-आर्थिक जडणघडणीतही योगदान दिले आहे.

हे टप्पे गाठण्यात ‘मेक इन इंडिया’ उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे. यामुळे चार्जर, बॅटरी पॅक, सर्व प्रकारचे मेकॅनिक्स, यूएसबी केबल्स आणि लिथियम आयन सेल्स, स्पीकर आणि मायक्रोफोन, डिस्प्ले असेंब्ली आणि कॅमेरा मॉड्यूल यासारख्या अधिक जटिल घटकांचे देशांतर्गत उत्पादन शक्य झाले आहे.

मूल्य साखळी अधिक खोलवर नेणे: भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात प्रगती करणे

आता मूल्य साखळीत अधिक खोलवर विस्तारण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे, ज्यामध्ये फाइन कंपोनंट्स  आणि सेमीकंडक्टर उत्पादनावर अधिक भर दिला जाईल, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. यामुळे इलेक्ट्रॉनिक घटक परिसंस्थेचा स्वदेशातील विकास सुनिश्चित होईल आणि जागतिक स्तरावर आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठ म्हणून भारताची भूमिका आणखी मजबूत होईल, असेही ते म्हणाले. 

1950 ते 1990 दरम्यान, प्रतिबंधात्मक धोरणांमुळे निर्मितीत  अडथळा निर्माण झाला होता. मात्र, 'मेक इन इंडिया' मूल्य साखळी विस्तारून  घटक आणि चिप्सचे उत्पादन वाढवून ही पद्धत मोडीत काढत आहे.

‘मेक इन इंडिया’ नवीन आर्थिक युगाला आकार देत आहे

खेळण्यांपासून ते मोबाईल फोनपर्यंत, संरक्षण उपकरणांपासून ते ईव्ही मोटर्सपर्यंत या सर्व वस्तूंचे उत्पादन भारतात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मेक इन इंडिया'  संकल्प भारताला जागतिक निर्मिती  केंद्र बनवण्यासंदर्भात आहे. ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम आत्मनिर्भरता, उत्पादन वाढवणे आणि रोजगार निर्माण करणे या उद्दिष्टाद्वारे देशाच्या आर्थिक बळकटीत लक्षणीय योगदान देत आहे. 

 

 

 

 

 

* * *

S.Kakade/Bhakti/Shraddha/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2099856) Visitor Counter : 117