युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ. मनसुख मांडविया यांनी 'विकसित भारत युवा नेत्यांचा संवाद', पुनर्कल्पित राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 ची केली घोषणा


माय भारत व्यासपीठावर ‘विकसित भारत चॅलेंज’ होणार सुरू; डिजिटल प्रश्नमंजुषा 25 नोव्हेंबर 2024 रोजी होणार खुली

Posted On: 18 NOV 2024 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 नोव्‍हेंबर 2024

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत, राष्ट्रीय युवा महोत्सव (NYF) 2025 ची परिवर्तनात्मक पुनर्कल्पना जाहीर केली. भारताच्या भविष्याला आकार देण्यात तरुणांचा अधिकाधिक सहभाग, हा पंतप्रधानांचा दृष्टिकोन प्रतिध्वनित करणारा पुनर्कल्पित महोत्सव "विकसित भारत युवा नेत्यांचा संवाद" या शीर्षकाने ओळखला जाईल. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात भारतीय तरुणांना त्यांच्या कल्पना आणि दृष्टीकोनांचे योगदान देण्यासाठी हे चैतन्यपूर्ण व्यासपीठ सक्षम बनवेल.

डॉ. मांडविया यांनी सर्व पात्र तरुणांनी या ऐतिहासिक संवादात सहभागी होण्याचे आवाहन केले आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी आपल्या युवा शक्तीच्या क्षमतेचा उपयोग करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. विकसित भारत चॅलेंज: चार टप्प्यांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.

‘विकसित भारत युवा नेत्यांचा संवाद’ या पुनर्कल्पित राष्ट्रीय युवा महोत्सवात, भारताच्या भविष्याला आकार देण्यात तरुणांच्या सहभागाला प्रेरणा देण्यासाठी विकसित भारत चॅलेंज ही चार टप्प्यांची स्पर्धा होणार आहे.  या स्पर्धेतील आव्हाने पुढीलप्रमाणे आहेत :

फेरी 1: विकसित भारत प्रश्नमंजुषा

मेरा युवा भारत (MY Bharat) या व्यासपीठावर 25 नोव्हेंबर 2024 ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान आयोजित  डिजिटल प्रश्नमंजुषेमध्ये कोणतीही व्यक्ती (वय 15-29) सहभागी होऊ शकेल. या प्रश्नमंजुषेत भारताच्या महत्त्वपूर्ण कामगिरी संदर्भात सहभागी व्यक्तीच्या ज्ञानाची आणि जागरूकतेची चाचणी घेतली जाईल.

फेरी 2: निबंध अथवा ब्लॉग लेखन

मागील फेरीतील विजेते 'विकसित भारतासाठी तंत्रज्ञान', 'विकसित भारतासाठी तरुणांनांचे सक्षमीकरण' यासारख्या निश्चित करण्यात आलेल्या सुमारे 10 संकल्पनांवर निबंध लिहून सादर करतील. या निबंधाद्वारे ते राष्ट्रीय विकासाबाबत आपल्या कल्पना मांडतील. ही स्पर्धा माय भारत व्यासपीठावर देखील आयोजित केली जाईल.

तिसरी फेरी: विकसित भारत व्हिजन पिच डेक – राज्य-स्तरीय सादरीकरणे

दुसऱ्या फेरीत पात्र ठरलेले सहभागी त्यांनी निवडलेल्या संकल्पनेवरील त्यांच्या कल्पना राज्य स्तरावर सादर करतील. या सादरीकरणांद्वारे, प्रत्येक राज्य, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी सहभागी निवडण्याच्या उद्देशाने स्पर्धा आयोजित करून निश्चित करण्यात आलेल्या संकल्पनेनुसार विविध संघ तयार करेल.

चौथी फेरी: भारत मंडपम येथे विकसित भारत राष्ट्रीय स्पर्धा

11 - 12 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवात विविध संकल्पनांवर आधारित राज्यस्तरीय संघ एकमेकांशी स्पर्धा करतील. या स्पर्धेतील विजेते संघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विकसित भारतसाठी त्यांची दृष्टी आणि कल्पना मांडतील.

विकसित भारत युवा नेते संवाद – राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 मध्ये तीन वेगवेगळ्या गटातून निवडक तरुणांची एक चैतन्यपूर्ण सभा बोलावली जाईल. पहिल्या गटात नव्याने घोषित केलेल्या विकसित भारत चॅलेंजमधील सहभागींचा समावेश आहे.  दुसऱ्या गटात जिल्हा आणि राज्यस्तरीय युवा महोत्सवांतून उदयास आलेल्या प्रतिभावान तरुणांचा समावेश आहे. हे प्रतिभावंत चित्रकला, विज्ञान प्रदर्शने, सांस्कृतिक प्रदर्शने, घोषणा स्पर्धा इत्यादी विविध श्रेणींमध्ये एकमेकांशी स्पर्धा करतील. तिसऱ्या गटात नवउद्योजकता, क्रीडा, कृषी आणि तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तरुणांचा आणि युवा आदर्शांचा समावेश असेल.

11-12 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी यातून सुमारे 3,000 तरुणांची निवड केली जाणार आहे.

 

 

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2074401) Visitor Counter : 29