गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह 14 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे राजभाषा अमृतमहोत्सव समारंभ आणि चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाच्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार


राजभाषा अमृत महोत्सवानिमित्त ‘राजभाषा भारती’ मासिकाच्या अमृतमहोत्सवी विशेषांकाचे गृहमंत्र्यांच्या हस्ते होणार प्रकाशन

अमृतमहोत्सवानिमित्त केंद्रीय गृहमंत्री विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचे प्रकाशन करणार

केंद्रीय गृहमंत्री भारतीय भाषा अनुभागाचे उद्घाटन करणार 

Posted On: 13 SEP 2024 3:08PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह शनिवारी, 14 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे राजभाषा अमृतमहोत्सव समारंभ आणि चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाच्या उद्घाटन सत्राला संबोधित करतील. हिंदीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली, त्याला 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त, राजभाषा विभागाने 14-15 सप्टेंबर 2024 रोजी भारत मंडपम, नवी दिल्ली येथे चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे आयोजन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली प्रेरणा, आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली, गृह मंत्रालयाचा राजभाषा विभाग वर्ष 2021 पासून दरवर्षी अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे आयोजन करत आहे.

राजभाषा अमृतमहोत्सवानिमित्त केंद्रीय गृहमंत्री ‘राजभाषा भारती’ या मासिकाच्या अमृतमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन करतील. अमृतमहोत्सवाच्या स्मृती प्रीत्यर्थ, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, यावेळी विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचे देखील प्रकाशन करतील. यावेळी गृहमंत्री राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कार प्रदान करतील. तसेच आणखी काही पुस्तके आणि मासिकेही प्रकाशित केली जातील.

या कार्यक्रमात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री भारतीय भाषा अनुभागाचा (विभागाचा ) शुभारंभ करतील. हिंदी आणि इतर भारतीय भाषांच्या विकासावर आणि त्यांच्यातील उत्तम समन्वयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने भर देत आहेत.

संविधानाचा हेतू आणि पंतप्रधानांचे निर्देश लक्षात घेऊन, हिंदीसह इतर भारतीय भाषांच्या वापराला चालना मिळावी आणि त्यांच्यात अधिक चांगला समन्वय प्रस्थापित व्हावा, या उद्देशाने, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाने भारतीय भाषा अनुभाग स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. केंद्रीय गृहमंत्र्यांनी वर्ष 2019 मध्ये  देशातील विविध शहरांमध्ये हिंदी दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची संकल्पना मांडली होती.

ही संकल्पना साकार करून 2021 मध्ये वाराणसी येथे हिंदी दिवस आणि पहिले अखिल भारतीय राजभाषा संमेलन आयोजित करण्यात आले. त्यानंतर 2022 मध्ये सुरत आणि 2023 मध्ये पुणे येथे हिंदी दिवस आणि दुसरे आणि तिसरे अखिल भारतीय राजभाषा संमेलन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांनी देशभरातील राजभाषा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये नवीन उर्मी जागृत केली आहे.

राष्ट्रीय राजधानीत हिंदी दिवस कार्यक्रम आणि चौथे अखिल भारतीय राजभाषा संमेलन आयोजित करणे हे देखील विशेष औचित्य ठरले आहे कारण राजभाषा विभाग हा  अमृत महोत्सव म्हणून साजरा करत आहे. हिंदी ही राजभाषा म्हणून मान्यता पावण्याच्या 75 वर्षांच्या प्रवासात अनेक महत्त्वाचे टप्पे पार करण्याबरोबरच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही सातत्याने प्रगती झाली आहे.

दोन दिवसीय चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात हिंदीच्या राजभाषा, लोकभाषा आणि संपर्क भाषा म्हणून गेल्या 75 वर्षांतील प्रगतीवर गहन चर्चा होणार आहे. 14 सप्टेंबर रोजी परिषदेच्या पहिल्या दिवशी भोजनोत्तर सत्रात 'राजभाषा अमृत महोत्सव - राजभाषा, लोकभाषा आणि संपर्क भाषा म्हणून 75 वर्षांतील हिंदीची प्रगती' या विषयावर चर्चा होईल. तर 'भारताचा सांस्कृतिक वारसा आणि हिंदी' याविषयावर दुसरे सत्र असेल. ज्यात लोकप्रिय हिंदी कवी आणि वक्ते डॉ. कुमार विश्वास यांचे भाषण होईल.

15 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिषदेच्या तिसऱ्या सत्रात 'भाषा अध्यापनातील शब्दकोशाची भूमिका आणि देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य' या विषयावर देशातील प्रसिद्ध भाषातज्ज्ञ आणि कोशकार आपली मते मांडणार आहेत. चौथे सत्र 'तंत्रज्ञानाच्या युगात राजभाषा हिंदीच्या अंमलबजावणीत "नगर राजभाषा समिती'चे योगदान' या विषयावर असेल.

'भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष  अधिनियम 2023: एक चर्चा' या विषयावर पाचवे सत्र असून केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल त्याला  संबोधित करतील. 'भारतीय चित्रपट, हिंदी भाषेच्या विकासासाठी एक सशक्त माध्यम' याविषयावरील समारोप सत्रात प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी संबोधित करतील.

या दोन दिवसीय परिषदेत 10,000 हून अधिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे, ज्यात देशभरातील राजभाषा अधिकारी तसेच हिंदी विद्याप्रचुर आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे.

***

S.Kakade/R.Agashe/V.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2054568) Visitor Counter : 56