पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांसोबतचा संवाद

Posted On: 07 SEP 2024 5:38PM by PIB Mumbai

 

शिक्षक - माननीय प्रधानमंत्री महोदय, नमोनमः अहम आशा रानी 12 उच्च विद्यालय, चंदन कहरी बोकारो झारखंड त: (संस्कृतमध्ये)

महोदय, एक संस्कृत शिक्षक असल्याने, माझे असे स्वप्न होते की मी मुलांना भारताच्या संस्कृतीची जाणीव करून द्यावी, ज्यामुळे त्यांना आपल्या सर्व मूल्यांची जाणीव होते, ज्याद्वारे आपण आपली मूल्ये आणि जीवनाचे आदर्श ठरवतो. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मी मुलांमध्ये संस्कृत भाषेची आवड निर्माण करून त्याला नैतिक शिक्षणाचा आधार बनवून विविध श्लोकांच्या माध्यमातून मुलांना जीवनमूल्ये शिकवण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान - तुम्ही कधी विचार केला आहे का, की जेव्हा तुम्ही त्यांना संस्कृत भाषेकडे आकर्षित करता त्यावेळी याच्या माध्यमातून त्याला तुम्ही ज्ञानाच्या भांडाराकडे घेऊन जाता? हे आपल्या देशात शिकवले जाते; वैदिक गणित म्हणजे काय हे या मुलांनी कधी शिकले आहे का? तर संस्कृतचे शिक्षक असणे किंवा तुमच्या शिक्षकांच्या खोलीतील शिक्षकांमध्ये, वैदिक गणित म्हणजे काय? कधीतरी चर्चा झाली असेल.

शिक्षक- नाही महोदय, या विषयी मी स्वतः…

पंतप्रधान – नाही झाली, तुम्ही कधीतरी प्रयत्न करा, म्हणजे काय होईल की, तुम्हा सर्वांना देखील त्याचा उपयोग होईल. Online Vedic Mathematic चे क्लास देखील चालतात. यूके मध्ये तर already काही जागी syllabus मध्ये आहे Vedic Mathematic.  ज्या बालकांना maths मध्ये रस नसतो त्यांनी जर हे थोडेसे जरी पाहिले तर त्यांना वाटेल की हे magic आहे. एकदम त्यांना हे शिकावेसे वाटू लागेल. तर संस्कृतमधून आपल्या देशात जितके काही विषय आहेत, त्यांना त्यापैकी काहींचा देखील परिचय करणे, तसे तुम्ही पण करा कधीतरी प्रयत्न.

शिक्षक – मी ही… खूपच चांगली गोष्ट सांगितली महोदय. मी जाऊन सांगेन.

पंतप्रधान – चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

शिक्षक – धन्यवाद.

शिक्षक – माननीय पंतप्रधान महोदय सादर प्रणाम. मी महाराष्ट्रातील कोल्हापूरचा आहे, कोल्हापूरहून, तोच जिल्हा राजर्षी शाहूजींची जन्मभूमी.

पंतप्रधान – तुमचा घसा इथे येऊऩ खराब झाला की तो असाच आहे.

शिक्षक – नाही सर, असाच आवाज आहे.

प्रधानमंत्री जी – अच्छा, आवाजच तसा आहे.

शिक्षक – हो, तर मी कोल्हापूरचा आहे, महाराष्ट्रातील. समालविया शाळेत मी कला शिक्षक आहे. कोल्हापूर, हीच आहे  राजर्षी शाहू महाराजांची जन्मभूमी.

पंतप्रधान- म्हणजे कलेमध्ये कशात?

शिक्षक – कलेमध्ये मी चित्र, नृत्य, नाट्य, संगीत, गीत वादन, शिल्प सर्व काही शिकवतो.

पंतप्रधान – ते दर दिसत आहे.

शिक्षक – त्यामुळे साधारणपणे असे होते की बॉलिवुड किंवा हिंदी चित्रपटाच्या आवृत्त्या सर्वत्र सुरू असतात तर माझ्या शाळेत मी, मी जेव्हापासून तिथे आहे 23 वर्षांपासून, तर आपली भारतीय संस्कृती आहे आणि लोकनृत्य आणि आपली शास्त्रीय नृत्य, त्यांच्या आधारावरच मी ही रचना केली आहे. मी शिव तांडव स्तोत्र केले आहे. आणि ते देखील मोठ्या संख्येने मी करत असतो, 300-300, 200 मुलांना घेऊन, ज्याचे विश्वविक्रम देखील झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर देखील मी केले आहे, त्याची देखील जागतिक विक्रमात नोंद झाली आहे आणि मी शिव तांडव केले आहे, मी देवीची…हनुमान चालीसा केली आहे, मी देवीच्या रुपाचे दर्शन केले आहे, त्यामुळे या सर्व प्रकारांनी माझ्या नृत्यामुळे

पंतप्रधान – तुम्ही तर करत असाल…

शिक्षक – मी स्वतः देखील करतो आणि माझी मुले देखील करतात.

पंतप्रधान– नाही तुम्ही तर करत असालच... पण ज्या विद्यार्थ्यांसाठी तुमचे आयुष्य आहे, त्यांच्यासाठी काय करता?

शिक्षक – तेच सर्व करतात सर!

पंतप्रधान –  ते काय करतात?

शिक्षक – 300-300, 400 मुले एका नृत्याविष्कारात काम करतात… आणि फक्त माझ्या शाळेतील मुलं नाही. माझ्या आजूबाजूला झोपडपट्टी आहे, काही सेक्स वर्करची मुलं, काही व्हील चेअर असलेली मुलं, त्यांनाही मी पाहुणे कलाकार म्हणून घेतो.

पंतप्रधान- पण त्या मुलांना तर आजच्या चित्रपटातली गाणी आवडत असतील.

शिक्षक – हो सर पण मी त्यांना सांगतो की लोकनृत्यात किती जिवंतपणा आहे आणि माझे हे भाग्य आहे की मुलं मी सांगितलेलं ऐकतात.

पंतप्रधान – ऐकतात?

शिक्षक – हो, 10 वर्षांपासून मी हे सर्व करत आहे.

पंतप्रधान – आता शिक्षकांचे ऐकले नाही तर मुलगा जाणार कुठे…? किती वर्षांपासून तुम्ही हे करत आहात?

शिक्षक – एकूण मला 30 वर्षे झाली सर.

पंतप्रधान – मुलांना जेव्हा शिकवता आणि नृत्याच्या माध्यमातून कला तर शिकवतच असाल, पण त्यातून तुम्ही एखादा संदेश देता का? तो कोणता संदेश देता तुम्ही?

शिक्षक – सामाजिक संदेशावर बनवत असतो मी. जसे drunk & drive जे असते त्यासाठी मी नृत्यनाटिका बसवली होती ज्याचे प्रदर्शन मी संपूर्ण शहरात केले होते. पथ नाट्याच्या स्वरुपात. त्याच प्रकारे दुसऱ्यांदा मी स्पर्श नावाचा एक लघुपट बनवला होता. ज्याची संपूर्ण टेक्निकल टीम माझ्या विद्यार्थ्यांची होती.

पंतप्रधान (सर्वांना)– तर मग दोन ते तीन दिवस तुम्ही लोक जागोजागी जात असाल, तुम्ही थकून जात असाल. कधी याच्या घरी, कधी त्याच्या घरी, कधी दुसऱ्याच्या घरी, असेच चालत असेल. तर त्यांच्यासोबत तुमचा काही विशेष परिचय झाला आहे का? कोणी लाभ घेतला आहे का कोणत्या प्रकारचा?

शिक्षक – होय सर, असे अनेक लोक आहेत mostly जे higher मधून आहेत त्या लोकांनी सांगितले होते की सर जर आम्ही तुम्हाला बोलवले तर तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये याल?

पंतप्रधान –  म्हणजे तुम्ही पुढची दिशा ठरवली आहे. म्हणजे तुम्ही commercially सुद्धा करता कार्यक्रम.

शिक्षक - commercially सुद्धा करतो पण त्याचे

पंतप्रधान – मग तर तुम्हाला खूप मोठे मार्केट मिळाले आहे.

शिक्षक – नाही सर, त्याची देखील मी एक गोष्ट सांगेन. commercially मी जे काही काम करतो. मी चित्रपटांसाठी कोरियोग्राफ केले आहे. पण मी 11 अनाथ बालकांना दत्तक घेतले आहे. मी त्यांच्यासाठी commercially काम करतो.

पंतप्रधान – त्यांच्यासाठी कोणते काम करता तुम्ही?

शिक्षक – ते अनाथ आश्रमात होते आणि त्यांच्यासाठी कला होती, तर अनाथ आश्रमाची एक पद्धत असते की 10वी नंतर त्यांना आयटीआय मध्ये टाकतात. तर मी ही धारणा तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी सांगितले की नाही आम्ही लोक यासाठी त्यांना allow नाही करणार. तर मग मी त्यांना बाहेर आणले, एका खोलीत त्यांना ठेवले. जसजशी मुले मोठी होऊ लागली त्या ठिकाणी राहून. त्यांना शिक्षण दिले, त्यांच्यापैकी दोन जण कला शिक्षक म्हणून काम करत आहेत. दोन जण आहेत ते नृत्य शिक्षक म्हणून सरकारी शाळेत लागले आहेत. म्हणजे सीबीएसई.

पंतप्रधान - तर तुम्ही करत असलेले हे एक उत्तम काम आहे. हे कसे घडले, ते शेवटी सांगत आहात. तुमच्या मनात त्या मुलांबद्दल सहानुभूती जागी होणे, आणि जर त्यांना कोणी सोडले असेल तर मी त्यांना सोडणार नाही, असा भाव जागणे ही मोठी गोष्ट आहे. तुम्ही त्यांना दत्तक घेतले आहे, तुम्ही खूप काम केले आहे.

शिक्षक - सर, याचा माझ्या जीवनाशी संबंध आहे. मी स्वतः अनाथाश्रमात वाढलो आहे. म्हणूनच मला असे वाटते की मला ते मिळाले नव्हते, माझ्याकडे तर काहीच नव्हते, आणि आता माझ्याकडे जे संचित आहे, त्यातून मी वंचितांसाठी काही केले तर ते माझे सर्वात मोठे भाग्य आहे.

पंतप्रधान- चला, तुम्ही केवळ कलाच नव्हे, तर मूल्यांसह आयुष्य जगले आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे.

शिक्षक- धन्यवाद सर.

पंतप्रधान- तर खरोखरच आपले सागर हे नाव यथार्थ आहे.

शिक्षक- होय सर, आपल्याशी बोलण्याची संधी मिळाली, ही गोष्ट मोठी भाग्याची आहे.

पंतप्रधान- खूप खूप शुभेच्छा, हार्दिक अभिनंदन.

शिक्षक – धन्यवाद सर!

शिक्षक – माननीय पंतप्रधान महोदय, नमस्कार!

पंतप्रधान- नमस्कार!

शिक्षक- मी डॉ. अविनाशा शर्मा हरियाणा शिक्षण विभागात इंग्रजी व्याख्याता म्हणून कार्यरत आहे. आदरणीय महोदय, हरियाणातील वंचित समाजाची मुले. जी अशा पार्श्वभूमीतून आली आहेत, जिथे त्यांना इंग्रजी भाषा ऐकणे आणि समजणे थोडे कठीण आहे. त्यांच्यासाठी मी प्रयोगशाळा उभारली आहे. ही भाषेची प्रयोगशाळा केवळ इंग्रजी भाषेसाठीच नसून, त्यात प्रादेशिक भाषा आणि मातृभाषा या दोन्हींचा समावेश करण्यात आला आहे. महोदय, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगद्वारे मुलांना शिकवायला प्रोत्साहन देते. या बाबी लक्षात घेऊन मी या भाषा प्रयोगशाळेत कृत्रिम बुद्धिमत्तेचाही समावेश केला आहे. जसे जनरेटिव्ह टूल्स, स्पीकमेदर आणि टॉकपल हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे आहेत. त्यांच्या सहाय्याने विद्यार्थी  भाषेचे योग्य उच्चार शिकतात आणि समजून घेतात. महोदय, आपल्याला हे सांगताना मला आनंद वाटत आहे, की मी युनेस्को, युनिसेफ, इंडोनेशिया आणि उझबेकिस्तान सारख्या देशांमध्ये माझ्या राज्याचे प्रतिनिधित्व केले आणि त्याचा प्रभाव माझ्या वर्गापर्यंत पोहोचला. आज हरियाणातील एक सरकारी शाळा जागतिक अभ्यास वर्ग बनली आहे आणि त्याद्वारे मुले इंडोनेशियातील कोलंबिया विद्यापीठात बसलेल्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि आपल्या अनुभवांचे आदान प्रदान करतात.

पंतप्रधान- हे कसे करता, थोडा आपला अनुभव सांगा, म्हणजे सर्वांना माहिती मिळेल.

शिक्षक – सर, मायक्रोसॉफ्ट स्कार्पथेन हा एक प्रकारचा प्रोग्राम आहे जो मी माझ्या विद्यार्थ्यांना  शिकवला आहे. जेव्हा मुले कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापकांशी संवाद साधतात. त्यांची संस्कृती, त्यांची भाषा, ते दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या गोष्टी, ते आपले ज्ञान कसे वाढवतात, हे सर्व आमच्या मुलांना शिकायला मिळते. सर, एक अतिशय सुंदर अनुभव सांगायचा आहे. जेव्हा मी उझबेकिस्तानला गेले होते, तेव्हा तिथून माझे अनुभव माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगितले. त्यावरून त्यांना हे समजले की जशी इंग्रजी ही त्यांची शिक्षणाची भाषा आहे, तसेच उझबेकिस्तानमधील लोक त्यांची मातृभाषा उझबेक बोलतात. रशियन ही त्यांची अधिकृत भाषा, आणि राष्ट्रभाषा आहे, इंग्रजी ही शिक्षणाची भाषा आहे, त्यामुळे आपण या जगाशी जोडले  गेलो आहोत, असे त्यांना वाटते. इंग्रजी ही आता त्यांच्यासाठी केवळ अभ्यासक्रमाचा भाग राहिलेला नाही. त्यांची या भाषेबद्दलची आवड वाढू लागली आहे, कारण आता केवळ परदेशातच इंग्रजी बोलली जाते असे नाही. त्यांच्यासाठी आता हे सुलभ आहे. त्यांच्यासाठी हे जेवढे आव्हानात्मक आहे, तेवढेच ते आपल्या भारतीय मुलांसाठीही असू शकते.

पंतप्रधान - तुम्ही मुलांना जग दाखवत आहात हे चांगले आहे, पण तुम्ही देशही दाखवत आहात का?

शिक्षक- होय सर.

पंतप्रधान - तर आपल्या देशाबद्दलच्या काही गोष्टी, जसे त्यांना इंग्रजी शिकावेसे वाटेल, असे काही.

शिक्षक – सर, मी या प्रयोगशाळेत भाषा कौशल्य विकासावर काम केले आहे. त्यामुळे इंग्रजी भाषा ही अभ्यासक्रमाची भाषा झाली आहे. पण भाषा कशी शिकली जाते? कारण माझ्याकडे येणारी मुलं हरियाणवी वातावरणातली आहेत. रोहतकमधील विद्यार्थ्याशी मी बोलले, तर नोहा मधल्या विद्यार्थ्यापेक्षा तो पूर्णपणे वेगळ्या भाषेत बोलतो.

पंतप्रधान- म्हणजे आपल्याकडे पूर्वीच्या काळात जसा टेलीफोन असायचा.

शिक्षक- होय सर.

पंतप्रधान – तो बॉक्स फोन आहे. आपल्या घरी गरीब कुटुंबातील महिला कामासाठी येते. तेवढ्यात बेल वाजते आणि ती फोन उचलते. ती उचलताच ती हॅलो म्हणते. हे ती कशी शिकली?

शिक्षक- याला भाषा कौशल्य विकास म्हणतात सर. भाषा ऐकून आणि वापरून येते.

पंतप्रधान – आणि म्हणूनच संभाषणातून भाषा फार लवकर शिकता येते. मला आठवतं, मी गुजरातमध्ये असताना, नडियाद मध्ये महाराष्ट्रातील एक कुटुंब माझ्याकडे नोकरीसाठी आले होते, ते प्राध्यापक होते, नोकरीसाठी आले होते. त्यांच्या बरोबर त्यांची वृद्ध आई होती. आता हे गृहस्थ दिवसभर शाळा-कॉलेजात असायचे पण सहा महिने उलटूनही भाषेच्या बाबतीत त्यांची प्रगती शून्यच राहिली. आणि त्यांची आई शिकलेली नव्हती, पण ती मात्र उत्तम गुजराती बोलू लागली. मी एकदा त्यांच्या घरी जेवायला गेलो होतो, तेव्हा मी विचारले, त्या म्हणाल्या, माझ्या घरी काम करायला जी बाई येते, तिला दुसरी कोणतीच भाषा येत नाही, त्यामुळे मी तिची भाषा शिकले. बोलून भाषा शिकता येते.

शिक्षक- खरंय सर.

पंतप्रधान - मी लहान असताना माझ्या शाळेतले शिक्षक मला आता स्पष्टपणे आठवतात. ते थोडे कडक होते. आणि कडकपणाचा मला थोडा त्रास व्हायचा. पण राजाजींनी रामायण आणि महाभारत लिहिले आहे. त्यामुळे रामायणातील अतिशय परिचित संवाद सर्वांनाच परिचित आहेत. रामायण राजाजींनी लिहिलं आहे. ते खूप आग्रह करायचे, हळू हळू वाचायला सुरुवात करा. कथा माहित होती पण भाषा माहित नव्हती. पण त्यांनी उत्तम संवाद साधला. एक-दोन शब्द ऐकल्यावरही समजत असे, की हो, ते आता माता सीतेबद्दल बोलत आहेत.

शिक्षक- खरंय सर.

पंतप्रधान- चला, खूप छान!

शिक्षक – धन्यवाद सर, धन्यवाद!

पंतप्रधान- हर हर महादेव,

शिक्षक – हर हर महादेव.

पंतप्रधान- काशी मधील लोकांचा दिवस हर हर महादेवनेच सुरु होतो.

शिक्षक - सर, आज तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला. सर, मी कृषी विज्ञान संस्थेत वनस्पती रोगांवर संशोधन करत आहे आणि त्यात माझा सर्वात मोठा प्रयत्न हा आहे की आपण  शाश्वत शेतीबद्दल बोलत असतो, ते अद्याप प्रत्यक्षात उतरलेले नाही. म्हणूनच माझा प्रयत्न आहे की आपण शेतकऱ्यांना असे तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यायला हवे जे सोपे असेल आणि त्याचे अभूतपूर्व परिणाम शेतात दिसून येतील. आणि या प्रयत्नात मुले, विद्यार्थी, पुरुष आणि महिला सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे असे मला वाटते. आणि म्हणूनच माझा प्रयत्न आहे की मी विद्यार्थ्यांसोबत गावोगावी जातो आणि शेतकऱ्यांसोबतच महिलांनाही पुढे नेण्याचा माझा प्रयत्न असतो. जेणेकरून हे छोटे छोटे तंत्रज्ञान जे आपण विकसित केले आहे. याद्वारे शाश्वततेच्या दिशेने आपण पावले टाकत आहोत. आणि याचा फायदा शेतकऱ्यांनाही होत आहे.

पंतप्रधान - तुम्ही सांगू शकता का काय केले आहे?

शिक्षक - सर, आम्ही बीज प्रक्रियेचे अचूक तंत्र बनवले आहे. आम्ही काही स्थानिक सूक्ष्मजंतू ओळखले आहेत. जेव्हा आम्ही त्यापासून बीजांवर प्रक्रिया करतो, तेव्हा जी मुळे येतात ती आधीच विकसित झालेली मुळे असतात.  त्यामुळे ते झाड देखील खूप निरोगी बनते. त्या झाडावर रोगांचा कमी प्रादुर्भाव होतो कारण मुळे इतकी मजबूत असतात, ती कीड आणि रोगांशी लढण्यासाठी  झाडाला आतून ताकद  देतात.

पंतप्रधान - प्रयोगशाळेत होणाऱ्या कामाबद्दल सांगत आहात. प्रत्यक्ष शेतात कसे करता? लॅब टू लँड. तुम्ही म्हणता, तुम्ही स्वत: शेतकऱ्यांकडे जाता, ते कसे करतात आणि ते कशी सुरुवात करतात?

शिक्षक - सर, आम्ही पावडर फॉर्म्युलेशन तयार केले आहे आणि आम्ही हे पावडर फॉर्म्युलेशन शेतकऱ्यांना देतो आणि त्यांच्या हातून बियाण्यांवर प्रक्रिया करतो आणि आम्ही हे प्रयत्न अनेक वर्षांपासून सातत्याने करत आहोत. आणि आता आम्ही हे काम वाराणसीच्या आसपासच्या 12 गावांमध्ये केले आहे आणि महिलांच्या संख्येबद्दल बोलायचे तर सध्या तीन हजारांहून अधिक महिला हे तंत्रज्ञान वापरत आहेत.

पंतप्रधान: बरं, हे जे शेतकरी आहेत ते इतर शेतकऱ्यांनाही तयार करू शकतात का?

शिक्षक - हो सर, कारण जेव्हा एखादा शेतकरी पावडर घ्यायला येतो तेव्हा तो त्याच्याबरोबर इतर चार शेतकऱ्यांसाठी घेऊन जातो. ते पाहून इतर  शेतकरी खूप काही शिकतात आणि मला याचा आनंद आहे की आम्ही जितक्या लोकांना शिकवले आहे त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक  लोकांनी त्याचा अवलंब केला  आहे. माझ्याकडे अजून पूर्ण आकडेवारी  नाही.

पंतप्रधान – कोणत्या पिकांवर सर्वाधिक परिणाम झाला आणि कसा ?

शिक्षक - भाजीपाला आणि गव्हावर.

पंतप्रधान – भाजीपाला आणि गहू यावर, आमचा नैसर्गिक शेतीवर भर आहे. आणि ज्यांना धरती मातेला वाचवायची इच्छा आहे. ते सर्व चिंतित आहेत, ज्याप्रकारे आपण धरती मातेच्या आरोग्याशी खेळत आहोत. त्या मातेला  वाचवणे खूप गरजेचे झाले आहे. आणि त्यासाठी नैसर्गिक शेती हा एक चांगला उपाय असल्याचे दिसून येते.  त्या दिशेने शास्त्रज्ञांमध्ये काही चर्चा सुरू आहे का?

शिक्षक: हो सर, त्याच दिशेने प्रयत्न चालू आहेत. पण सर, आम्ही शेतकऱ्यांना रसायने वापरू नका हे अजून पूर्णपणे पटवून देऊ शकलो नाही. कारण आपण रसायनांचा वापर केला नाही तर आपल्या पिकांचे काही नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

पंतप्रधान - यावर उपाय निघू शकतो. समजा त्याच्याकडे चार बिघा जमीन आहे. तर 25 टक्के, 1 बिघामध्ये वापरा, उर्वरित तीनमध्ये जे तुम्ही पारंपरिक करता ते करा.म्हणजेच, एक छोटासा भाग घ्या,त्यावर स्वतंत्रपणे या पद्धतीने करा, मग त्याची हिंमत वाढेल. हो, थोडे  नुकसान होईल, फारतर 10%, 20% होईल. मात्र माझा प्रयत्न सुरु होईल. गुजरातचे जे राज्यपाल आहेत, आचार्य देवव्रत जी, त्यांना या विषयात खूप रुची आहे, याबाबत ते खूप काम करतात.

जर तुम्ही वेबसाइटवर गेलात तर तुमच्यासारखे  बरेच लोक दिसतील जे शेतकरी पार्श्वभूमीतील आहेत. तर त्यांनी नैसर्गिक शेतीसाठी मोठी विस्तृत माहिती तयार केली आहे. तुम्ही हे जे एलकेएम पाहत पाहत आहात, इथे पूर्णपणे प्रत्येक गोष्टीचा नैसर्गिक शेतीसाठी वापर होतो. येथे कोणत्याही रसायनांच्या वापराला परवानगी नाही. आचार्य देवव्रत जी यांनी खूप चांगले सूत्र विकसित केले आहे. कोणीही ते करू शकतो. ते गोमूत्र वगैरे वापरून करतात आणि खूप चांगले परिणाम मिळतात. त्याचाही तुम्ही अभ्यास करा, तुमच्या विद्यापीठात काय होऊ शकते ते पहा.

शिक्षक: नक्कीच सर.

पंतप्रधान - चला, तुम्हाला खूप शुभेच्छा.

शिक्षक - धन्यवाद सर.

पंतप्रधान - वणक्कम.

शिक्षक - वणक्कम पंतप्रधान जी. मी धौत्रे गांडीमति. मी त्यागराज पॉलिटेक्निक कॉलेज, सेलम तामिळनाडू येथून आलो आहे आणि मी 16 वर्षांहून अधिक काळ पॉलिटेक्निक महाविद्यालयात इंग्रजी शिकवत आहे. माझे बहुतेक पॉलिटेक्निकचे विद्यार्थी ग्रामीण पार्श्वभूमीचे आहेत. ते तामिळ माध्यमाच्या शाळांमधून आले आहेत , त्यामुळे त्यांना इंग्रजीत बोलणे किंवा तोंड उघडणे कठीण जाते.

पंतप्रधान – मात्र आम्हा लोकांचा हा भ्रम आहे. कदाचित सर्वाना असेच वाटत असेल की तामिळनाडू म्हणजे प्रत्येकाला इंग्रजी येते.

शिक्षक – खरे आहे  सर, ते ग्रामीण लोक आहेत जे स्थानिक भाषेतून शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांना अवघड जाते सर. त्यांच्यासाठी आम्ही शिकवतो

पंतप्रधान – आणि म्हणूनच या नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर जास्त भर देण्यात आला आहे.

शिक्षक - सर, त्यामुळे आम्ही इंग्रजी भाषा शिकवतो आणि एनईपी 2020 नुसार आता आमच्या मातृभाषेतून किमान तीन भाषांमधून शिकत आहोत. आम्हाला आता एक स्वायत्त संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. तंत्रशिक्षण शिकण्यासाठी आता आम्ही आमच्या मातृभाषेचाही समावेश केला आहे.

पंतप्रधान: तुमच्यापैकी कोणी असे आहे का ज्यांनी मोठ्या धैर्याने असा प्रयोग केला आहे ? समजा एका शाळेत 30 मुले आहेत, ते पूर्णपणे इंग्रजी माध्यमातील आहेत आणि तेवढीच इतर 30 मुले आहेत तोच विषय त्यांच्या मातृभाषेतून शिकत आहेत. तर कोण सर्वात पुढे जाते, कुणाला जास्तीत जास्त समजते, तुम्हा लोकांना काय अनुभव येतो ? कारण मातृभाषेत त्याला थेट समजते, इंगजीत मानसिकदृष्ट्या तो आपल्या भाषेत अनुवादित करेल आणि नंतर समजून घेण्याचा प्रयत्न करेल, त्यासाठी त्याची खूप ऊर्जा खर्ची होते.

त्यामुळे मुलांना त्यांच्या मातृभाषेत आणि नंतर इंग्रजी विषय म्हणून खूप चांगले शिकवायला हवे. म्हणजे जशी ही संस्कृत शिक्षिका वर्गात जात असेल आणि  वर्गातून बाहेर पडत असेल, तेव्हा ती संस्कृतशिवाय अन्य कुठलीही भाषा वापरत नसेल असे मला वाटते.

त्याचप्रमाणे इंग्रजीच्या शिक्षकाने वर्गात प्रवेश केल्यापासून ते बाहेर येईपर्यंत इतर कोणतीही भाषा बोलू नये. जर तुम्ही इंग्रजी शिकवत असाल  तर तीही तुम्ही उत्तम प्रकारे शिकवायला हवी.

पुन्हा असे व्हायला नको की एक वाक्य इंग्रजीमध्ये आणि तीन वाक्ये मातृभाषेतून शिकवायची. तर मग ते मुल आकलन करू शकत नाही. जर भाषेप्रती देखील आपले तितकेच समर्पित असू तर काही वाईट नाही आणि आपण तर आपल्या मुलांना सवय लावली पाहिजे. जास्तीत जास्त भाषा शिकण्याची, त्यांच्या मनात इच्छा जागृत झाली पाहिजे, आणि यासाठीच विद्यालयांमध्ये कधी कधी हे ठरवले पाहिजे की यावेळी आपण आपल्या शाळेत पाच वेगवेगळ्या राज्यांचे गीत मुलांना शिकवूया. एका वर्षात पाच गीते..काही कठीण नाही. तर पाच भाषेतील गीते माहिती होतील, कोणी असामी गीत शिकेल, कोणी मल्याळम गीत शिकेल, कोणी पंजाबी गीत शिकेल, पंजाबी तर माहीत करून घेतीलच. चला, खूप खूप शुभेच्छा. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

शिक्षक - पंतप्रधान जी, जी माझे नाव उत्पल सैकिया आहे आणि मी आसामचा रहिवासी आहे. मी सध्या गुवाहाटी येथील ईशान्य कौशल्य केंद्रात अन्न आणि पेय सेवा विभागात एक प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. आणि ईशान्य कौशल्य केंद्रात माझ्या सेवेची सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि माझ्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 200 हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

पंतप्रधान जी - किती कालावधीचा अभ्यासक्रम आहे तुमचा ?

शिक्षक - एका वर्षाचा अभ्यासक्रम आहे सर.

पंतप्रधान जी - एक वर्ष आणि हॉस्पिटॅलिटी बद्दल माहिती आहे.

शिक्षक - हॉस्पिटॅलिटी, फुड आणि बेव्हरेज सेवा.

पंतप्रधान जी - फुड आणि बेव्हरेज, यामध्ये तुम्ही खास काय शिकवतात ?

शिक्षक - आम्ही शिकवतो - अतिथींबरोबर संवाद कसा साधावा, अन्नपदार्थ कसे वाढले जातात, पेयपान कसे दिले जाते, यासंदर्भात आम्ही वर्गात विद्यार्थ्यांची तयारी करून घेतो. अतिथींच्या अडचणी सोडविण्यासाठी वेगवेगळी तंत्रे शिकवतो, त्यांच्या अडचणी कशा हाताळाव्या हे देखील शिकवतो, सर.

पंतप्रधान जी - एखादे उदाहरण देऊ शकता का. या लोकांच्या घरातील मुले हे खाणार नाही, ते खाणार, ते नाही खाणार अशी कारणे देतात. तेव्हा तुम्ही तुमची क्लुप्ती यांनाही शिकवा.

शिक्षक - मुलांसाठी तर माझ्याकडे काही खास क्लुप्त्या आहेत, मात्र आमच्याकडे हॉटेलमध्ये जे पाहुणे येतात त्यांना कसे हाताळावे, अर्थातच अदबीने, नम्रपणे त्यांचे म्हणणे ऐकून.

पंतप्रधान जी - म्हणजे तुमचा जास्तीत जास्त भर सॉफ्ट स्किल्सवर आहे.

शिक्षक - हो सर, हो सर, सॉफ्ट स्किल्स.

पंतप्रधान जी - तेथून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मुलांना नोकरीची एक संधी कोठे मिळण्याची शक्यता असते.

शिक्षक - संपूर्ण भारतात, जसे की दिल्ली, मुंबई.

पंतप्रधान जी - मुख्यत्वे मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये.

शिक्षक - मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये. म्हणजेच नोकरीची 100 टक्के हमी आहे. नोकरी शोधुन देणारा एक चमू आहे, जे हे काम करतात.

पंतप्रधान जी - तुम्ही गुवाहाटी येथे आहात, जर मी हेमंता जी ना सांगितले की हेमंता जी चे जितके मंत्री आहेत त्यांच्या कर्मचारी वर्गाला तुम्ही प्रशिक्षण द्या आणि त्यांच्यात क्षमता बांधणी करा. कारण त्यांच्या येथे जेव्हा पाहुणे येतात तेव्हा त्यांना हेच ठाऊक नसते की त्यांना उजव्या हाताने पाणी द्यावे की डाव्या हाताने, तर मग त्यांना प्रशिक्षण दिले जाऊ शकते का?

शिक्षक - नक्कीच दिले जाऊ शकते.

पंतप्रधान जी - ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी जेव्हा गुजरातमध्ये मुख्यमंत्री होतो. तेव्हा आमच्या येथे एक हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय होते. तेव्हा मी खूप आग्रह केला होता की माझे जितके मंत्री आहेत, त्यांचा जो व्यक्तीगत कर्मचारी वृंद आहे, त्यांना शनिवार, शनिवार - रविवार हे प्रशिक्षण दिले जावे. मग त्यांनी स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचे मान्य केले आणि माझ्याकडे जितकी मुले काम करत होती, कोणी बागकाम करत होते, कोणी स्वयंपाकाचे काम करत होते. जितके मंत्री होते त्यांचाही कर्मचारी वृंद, सगळ्यांना तिथे 30-40 तास, जवळपास 40 तासांच्या अभ्यासक्रमाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत खुपच फरक पडला होता, आणि घरात पाय ठेवतात त्यांच्यातील बदल जाणवत होता. जाणवत होते की वा काहीतरी नवीन नवीन भासत आहे. आणि जे त्यांचे कुटुंबीय होते, कदाचित त्यांच्या लक्षात हा बदल आला नसेल, पण मला मात्र याचे खूप आश्चर्य वाटत होते. मित्रा, तू हे कसे करून दाखवलेस? याचे मला आश्चर्य वाटायचे. तिथे हे प्रशिक्षण कामी येत होते. तर, मला असे वाटते की कधी हे देखील करून पाहिले पाहिजे, म्हणजे हा एक खूप मोठा ब्रँड बनेल, की हो, एक छोट्यात छोटा, जसे की एखाद्या घरात काम करणारा मनुष्य देखील घरात कोणी येताच आधी ‘नमस्कार’ म्हणेल, जसे की सरकारी कार्यालयात फोनवर बोलण्यासाठी ठेवलेल्या व्यक्तीला या संदर्भात प्रशिक्षण दिलेली असते. ती प्रशिक्षित व्यक्ती ‘जय हिंद’ म्हणूनच फोन उचलते किंवा ‘नमस्कार’ म्हणून संभाषणाला सुरुवात करते, कोणी जर, बोला, काय काम आहे ? असे म्हणून संभाषणाची सुरुवात करत असेल तर, सुरुवातीपासूनच काम बिघडत जाते. म्हणून तुम्ही त्यांना योग्य प्रशिक्षण देऊ शकता?

शिक्षक - शिकवतो सर, शिकवतो.

पंतप्रधान जी - चला, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

शिक्षक - धन्यवाद सर.

पंतप्रधान जी - तर बोरिसागर हे तुमचे कोणी नातलग होते का?

शिक्षक - हा होते सर, ते माझे आजोबा होते.

पंतप्रधान जी - आजोबा होते? अच्छा! ते एक मोठे हास्य लेखक होते. तर मग तुम्ही काय करता?

शिक्षक - सर मी अमरेली येथे प्राथमिक शाळेत शिक्षक आहे आणि तेथे ‘श्रेष्ठ विद्यालय निर्मितीतून श्रेष्ठ राष्ट्र निर्माणा’ च्या जीवन मंत्राचा अवलंब करत गेल्या 21 वर्षापासून काम करत आहे, सर…

पंतप्रधान जी - काय वैशिष्ट्य काय आहे तुमचे ?

शिक्षक - सर मी आपली जी लोकगीते आहेत ना….

पंतप्रधान - असे ऐकले आहे की तुम्ही खूप पेट्रोल जाळता ?

शिक्षक - हो सर, तुमच्याद्वारे शिक्षकांसाठी 2003 पासून सुरू करण्यात आलेला यशस्वी कार्यक्रम ‘प्रवेश उत्सव’ आहे, त्यात मी बाईकवर फिरून आपले जे स्थानिक गरबा गीत आहेत त्याला शिक्षण आणि गीतामध्ये परिवर्तित करून मी गातो. जसे की ‘पंखीडा है हमारा’, सर जर आपली परवानगी असेल तर मी दोन ओळी गाऊन दाखवू शकतो का ?

पंतप्रधान जी - हो, नक्की गाऊन दाखवा.

पंतप्रधान जी - हे खूप प्रसिद्ध गुजराती लोकगीत आहे

शिक्षक - हो सर, हे गरबा गीत आहे.

पंतप्रधान जी - त्यांनी या गीताच्या ओळी बदलल्या आहेत आणि ते या गीतातून सांगत आहेत की मुलांनो, तुम्ही शाळेत चला, अभ्यास करण्यासाठी चला. म्हणजे आपल्या परिने मुलांना प्रोत्साहित करत आहेत.

शिक्षक - हो सर, आणि सर मी 20 भाषांमधील गीते गाऊ शकतो.

पंतप्रधान जी - 20, अरे वा!

शिक्षक - जर मी केरळ राज्याबद्दल मुलांना शिकवत असेल तर.., जर तामिळ भाषेत शिकवत असेल तर… तमिळ मित्र आहेत येथे…वा म्हणजे या, पधारो वेलकम, जर मी मराठीत शिकवत असेल, जर कन्नड मध्ये शिकवत असेल ……….. भारत मातेला वंदन करतो, सर! जर मी राजस्थानी भाषेत हे गीत गायले तर……

पंतप्रधान जी - खूप खूप छान!

शिक्षक - धन्यवाद सर, सर, ‘एक भारत - श्रेष्ठ भारत’ हाच माझा जीवनमंत्र आहे, सर!

पंतप्रधान जी - चला, खूप खूप….

शिक्षक - आणि सर, 2047 पर्यंत देशाला ‘विकसित भारत’ बनवण्यासाठी देखील मी उत्साहाने काम करेन.

पंतप्रधान जी - जेव्हा मी त्यांचे आडनाव पाहिले तेव्हा आज मला आठवले की त्यांचे आजोबा माझ्या परिचयाचे होते. त्यांचे आजोबा माझ्या राज्यात खूप चांगले हास्य लेखक होते आणि त्यांचे चाहते देखील अनेक होते, पण मला हे ठाऊक नव्हते की तुम्ही त्यांचा वारसा सांभाळत आहात. मला खूप चांगले वाटले.

 

मित्रांनो

माझ्याकडून काही विशेष, किंवा खास असा तुम्हा लोकांना संदेश आहे, असे म्हणता येणार नाही, परंतु मी एक गोष्ट नक्की सांगू इच्छितो की, अशी निवड होणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. एका खूप मोठ्या प्रक्रियेनंतर ही निवड केली जाते. आधी काय होत असे, याची काहीही चर्चा  मी करणार नाही. परंतु आज प्रयत्न असा असतो की , देशामध्ये असे  हुशार, प्रतिभावंत, बुद्धिजीवी लोक आहेत, ते काही ना काही तरी नवीन करीत असतात. अर्थात, याचा अर्थ असाही नाही की, आपल्यापेक्षा इतर कोणी शिक्षक चांगले नाहीत. किंवा कोणी इतर कोणत्याही विषयामध्ये काहीच चांगले प्रदर्शन करीत नाहीत, असेही कधी नसते. हा देश तर बहुरत्नांची खाण असलेली वसुंधरा आहे. कोट्यवधी शिक्षक असतील, ते खूप उत्तम काम करीत असतील. परंतु आपल्याकडे लक्ष गेले, याचा अर्थ आपल्यामध्ये काही ना काही विशेषत्व असणार. जी व्यक्ती देशामध्ये विशेषत्वाने नवीन शैक्षणिक धोरणासाठी विशेष प्रयत्न करते आणि तुम्हा लोकांना काही मदत करते,ती व्यक्तीही खास म्हणावी लागेल. असे पहा, आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जसे की, भारतामध्ये एक विषय आपल्या आर्थिक व्यवस्थेला खूप बळकटी देवू शकतो. आणि भारताने याआधी ही संधी गमावली आहे. आपल्याला पुन्हा एकदा ती संधी प्राप्त व्हावी, यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि ही गोष्ट आपल्या शाळेपासून सुरू होवू शकते; आणि ही गोष्ट आहे ती म्हणजे -पर्यटन. 

आता तुम्ही म्हणााल की, आम्ही मुलांना शिकवायचे की पर्यटन घडवून आणायचे? मला काही तुम्ही त्यांना पर्यटनाला घेवून जा, असे अजिबात म्हणायचे नाही. परंतु शाळांमध्ये तर सहलीचा उपक्रम राबवला जातच असेल. त्याला तुम्ही बहुतांशवेळा ‘टूर’ असे म्हणत असणार. शिक्षकांनी जे स्थान पाहिलेले नाही, तिथे अशी टूर जात असते. विद्यार्थ्यांना काय पहायचे आहे, तिथे काही टूर जात नाही. जर शिक्षकांचे उदयपूर पहायचे राहिले असेल तर, मग तसा कार्यक्रम तयार केला जातो. यावेळी उदयपूरला शाळेची सहल जाईल, असे ठरवले जाते. आणि मग सहलीसाठी सर्वांकडून पैसेही घेतले जातात. तिकिटाचा खर्च जमा केला जातो. आणि मग सहल काढली जाते. परंतु माझ्यासाठी तर ही गोष्ट अशी आहे की, ज्याप्रमाणे आई  मुलाला  आइसक्रीम खायचे आहे का असे फक्त विचारते! अशी ही गोष्ट झाली. तर आपण मंडळींनी कधीतरी यावर विचार करावा. आणि ज्याप्रमाणे वर्षभराचे वेळापत्रक तुम्ही तयार करता, त्यावेळी कुणी कोणते काम करायचे हे निश्चित करीत असता. तसेच तुम्ही आत्तापासून पुढील वर्षासाठी, म्हणजे 2024-2025 मध्ये सहलीसाठी इयत्ता 8वी अथवा 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी अमूक एक सहलीचे स्थान निश्चित करावे. कदाचित एखादी शाळा तीन स्थाने निश्चित करू शकेल. तर एखाद्या शाळा सहलीसाठी  पाच वेगवेगळी स्थाने निवडू शकते. मुलांना वर्षभरासाठी त्या स्थानाविषयी वेगवेगळे प्रकल्प तयार करण्याचे काम देता येईल. जर तुम्हाला पुढच्यावर्षी सहल घेवून केरळला जायचे असेल तर 10 विद्यार्थ्यांचा एक गट तयार करून केरळच्या सामाजिक पद्धती, तिथले रितीरिवाजयांच्याविषयी प्रकल्प तयार करून घेता येईल. दुस-या 10 विद्यार्थ्यांच्या गटाकडून केरळच्या धार्मिक परंपरा कशा आहेत. मंदिरांची बांधकाम शैली कशी आहे, तिथली मंदिरे किती प्राचीन आहेत, यावर प्रकल्प तयार करू शकेल. तर आणखी वेगळा 10 जणांचा गट केरळच्या इतिहासाची माहिती जमा करणारा प्रकल्प तयार करेल. वर्षभरामध्ये अशा विषयांवर एक-एक, दोन-दोन तास यावर चर्चा घडवून आणता येतील. एकूण काय तर विद्यार्थ्यांमध्ये केरळ, केरळ, केरळ हा विषय मनात घोळत राहील आणि मग तुम्ही त्यांना तिथेच सहलीला घेवून जावू शकता. ज्यावेळी आपले ही मुले प्रत्यक्षात केरळला जातील, त्यावेळी एकप्रकारे संपूर्ण केरळ ते पूर्णपणे आत्मसात करूनच परत येतील. त्यांनी वर्षभरामध्ये प्रकल्प करण्याच्या निमित्ताने जे जे वाचले, जे जे काम केले, त्याच्याशी ‘को-रिलेट’ करण्याचे काम ते केरळच्या सहलीमध्ये करतील.

आता आपण विचार करा की, जर गोव्यातील एखाद्या शाळेने निर्णय घेतला की, आपण यंदाच्या वर्षी मुलांना ईशान्येकडील भागात घेवून जायचे आहे. आता सर्व शाळांनी मिळून 1000-2000 मुलांना ईशान्य भारतात घेवून जाण्याचा निर्णय घेतला तर,त्या मुलांना ईशान्य भारत पहायला मिळेल. अर्थात याचा पर्यटनाचा लाभ ईशान्येला मिळेल की नाही? आता इतके लोक ईशान्य भाग पहायला  जाणार असतील तर तिथल्या लोकांनाही असे वाटेल की, आता आपल्या राज्यात इतके लोक येत आहेत, तर आता त्यांच्या सुविधेसाठी आपण चहा-पाण्याचे दुकान तरी उघडले पाहिजे. कुणाला वाटेल, इथली ही गोष्ट लोकांना जास्त आवडते, त्यावेळी तो ती वस्तू विकण्यासाठी अधिक प्रयत्न करेल. त्याला त्यातून रोजगार मिळेल, त्याचे उत्पन्न वाढेल. भारत इतका मोठा देश आहे, आपण शिक्षणाबरोबरच आपण इतर गोष्टींही विद्यार्थ्यांना सांगितल्या पाहिजेत. सध्या एक ऑनलाइन स्पर्धा सुरू आहे, त्यामध्ये आपल्या शाळेच्या मुलांनी भाग घेतला पाहिजे. मात्र कोणतीही गोष्ट अशीच साधी म्हणून फक्त टिकमार्क करून चालणार नाही. त्याच्यासाठी थोडा तरी अभ्यास केला गेला पाहिजे. ‘देखो अपना देश’ यासाठी पसंतीसाठी ऑनलाइन क्रमवारी लावली जात आहे, लोक मत नोंदवत आहेत. आणि यामध्ये आमचा प्रयत्न असा आहे की, त्या त्या राज्यांच्या लोकांनी मते नोंदवून आपले राज्यातील क्रमांक एकचे कोणते पर्यटन असावे हे निवडावे, इतकेच नाही तर ते स्थान पाहण्यासारखे आहे, त्याविषयी माहिती जाणून घेण्यासारखी गोष्ट आहे, हे सर्वांना समजावे. एकदा का तुम्ही मतदान करून तुम्ही त्या स्थानाची निवड केली की, सरकार काहीतरी आर्थिक तरतूद त्या स्थानाच्या परिसराच्या विकासासाठी करेल. तिथे पायाभूत सुविधा तयार करेल. आणि मग ते स्थान चांगले विकसित करेल. परंतु हे पर्यटन म्हणजे नेमके कसे असते, पर्यटन स्थानांचा विकास म्हणजे असा मुद्दा उपस्थित होतो की, पहिल्यांदा कोंबडी की प्रथम अंडे... काही लोक असे म्हणतात की, पर्यटक आले तर विकास होईल आणि म्हणूनच आपण विद्यार्थ्यांच्या मदतीने एक काम सुरू करू शकतो. विशिष्ट स्थानाचा अगदी नियोजनपूर्वक विकास करण्यासंबंधी आखणी करू शकतो. यासाठी मुलांनी तिथे गेले पाहिजे. एखादी रात्र तिथे मुक्काम केला पाहिजे. तिथल्या परिसरातील लोकांना यामुळे नक्कीच असे वाटेल की, आता रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे त्या भागामध्ये ‘होम स्टे’ ची सुविधा निर्माण होवू लागेल. ऑटो रिक्षावाले तिथे यायला लागतील. आपण फक्त शाळेमध्ये बसूनच या देशातील अव्वल 100 पर्यटन स्थळे तयार करू शकतो. हे काम आपण दोन वर्षांमध्ये करू शकतो. एक शिक्षक किती मोठी क्रांती, परिवर्तन घडवून आणू शकतोयाचे हे उदाहरण आहे. याचा अर्थ  आपण रोज दैनंदिन कामे, शाळेची नोकरी तर नियमित करीत असतोच. तुम्ही ते करीतच आहात. आणि या कामाचा भाग म्हणून तुम्ही मुलांची सहलही घेवून जात असता. मात्र त्या सहलीतून ख-या अर्थाने काही वेगळे शिकणे होत नाही. त्यामुळे जिथे मुलांना सहलीला घेवून जायचे आहे, त्या स्थानाविषयी वर्षभर अभ्यास केला गेला पाहिजे.  यामुळे तुम्ही जे काही शिकवणार, किंवा मुले त्या स्थानाविषयी शिकणार आहेत, ते शिक्षण त्यांना ख-या अर्थाने कामी येणार आहे. मुलांना घेवून ज्या स्थानी जाणार आहात, तिथल्या  अर्थकारणाीला लाभ मिळू शकतो.

अगदी याचप्रमाणे माझा आपल्याला आग्रह आहे की, आपल्या जवळ कुठेही विद्यापीठ असेल तर, इयत्ता 8वी, 9वीच्या मुलांना या विद्यापीठाची सहल एकदा तरी जरूर घडवून आणावी.  याबाबत विद्यापीठाशी बोलावे आणि आमची इयत्ता 8वी तील मुले विद्यापीठ पहायला येणार असल्याचे सांगावे. ज्यावेळी मी गुजरातमध्ये होतो, त्यावेळी माझा एक नियम होता. आता तर अनेक विद्यापीठांकडून मला दीक्षांत समारंभाला बोलवले जाते. त्यावेळी मी त्यांना सांगत असे,‘मी दीक्षांत समारंभाला जरूर येईन. परंतु माझ्याबरोबर माझे 50 पाहुणे येतील. त्यावेळी विद्यापीठाकडून विचारणा होत असे, तुमचे 50 पाहुणे कोण असणार आहेत?’ आणि जर एखादा राजकीय नेता असेल तर त्यांना वाटते की, नेत्याचे चेलेचपेटे, मागेपुढे करणारे कार्यकर्ते येणार असतील. त्यावेळी मी सांगतो की, तुमच्या विद्यापीठाच्या 5 ते 7 किलोमीटर परिघामध्ये ज्या कोणत्या सरकारी शाळा असतील, त्या शाळांमध्ये शिकणारे गरीब घरातले, झोपडपट्टीमध्ये राहणारे 50 मुले माझे पाहुणे असणार आहेत. आणि माझ्या या पाहुण्यांना तुम्हाला पहिल्या रांगेतच बसवावे लागेल. 

आता ही मुले अतिशय गरीब घरातून आलेली असतात, ती मुलं ज्यावेळी पहिल्यांदाच अशा प्रकारचा दीक्षांत समारंभ पाहतात त्यावेळी त्यांच्या मनामध्ये आपणही असेच शिकायचे  या स्वप्नाचे बीज रोवतात. आता मी सुद्धा आणखी काही वर्षांनी अशाच प्रकारची टोपी घालेन, असा कुर्ता घालेन आणि असेच बक्षीस घेण्यासाठी मंचावर जाईन. अशा सर्व भाव-भावना त्या बालमनामध्ये नोंदवल्या जातात. तुम्हीही आपल्या शाळेतल्या मुलांना असे एखादे विद्यापीठ पाहण्यासाठी जरूर घेऊन जावे. विद्यापीठांशी तसे बोलून घ्यावे. ‘सर, तुमच्या विद्यापीठामध्ये इतक्या मोठ-मोठ्या गोष्टी घडत असतात, आमच्या मुलांना त्या दाखवाव्यात अशी इच्छा आहे.

तसेच वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा असतात, कधी कधी आपण काय करतो, जसे की ब्लॉक लेव्हल क्रिडा स्पर्धा असेल तर त्यासाठी तयारी कोण करणारते जाणो आणि त्यांचा शारीरिक प्रशिक्षणाचा शिक्षक जाणो, तो मुलगा जाईल त्याचा- त्याचा.  खरे तर संपूर्ण शाळेला खेळ पाहायला जायला हवे. कबड्डी चालू असली तरी आपण बाजूला बसून टाळ्या वाजवू.  कधीकधी, काही वेळातच, कोणालातरी खेळाडू व्हावेसे वाटते. माझ्या वेडामुळे मी एकटाच खेळाडू झालो असे नाही, असेही खेळाडूला वाटते.  मी खेळ खेळत आहे, याचा अर्थ मी समाजाचे चांगले प्रतिनिधित्व करतो.  त्याच्या आत एक भावना जागृत होते. एक शिक्षक या नात्याने मी अशा नवनवीन गोष्टी करत राहिल्या पाहिजेत आणि कोणतेही अतिरिक्त प्रयत्न न करता मला त्यात अधिक एक जोडायचे आहे, जर आपण हे करू शकलो तर बघा, शाळाही प्रसिद्ध होईल, त्यात काम करणाऱ्या शिक्षकांचा सुद्धा नावलौकिक वाढेल. 

दुसरे म्हणजे, तुम्ही लोक काही खूप मोठ्या संख्येत नाही आहात, पण इतरांना कोणत्या कारणास्तव हा पुरस्कार मिळाला हे तुम्हा सर्वांना माहीत नसेल.  तुम्हाला कधीच माहीत पडणार नाही, तुम्हाला वाटेल की मला ते मिळाले असेल तर त्यालाही ते मिळाले असेल. मी हे करतो, मला ते पटते, तोही काहीतरी करत असावा, मला ते पटले. असं नाहीये… या सर्वांमध्ये काही ना काही वैशिष्ट्यपूर्ण आहे, या लोकांमध्ये अशी कोणती कर्तव्य भावना आहे की ज्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष त्यांच्याकडे गेलं, हे शोधण्याचा तुमचा प्रयत्न असायला हवा. मी त्यांच्याकडून दोन-चार गोष्टी शिकू शकतो का?   तुमच्यासाठी हे चार-पाच दिवस म्हणजे एक प्रकारचा अभ्यास दौरा आहे.  तुमचा सन्मान आणि गौरव होतोय ही एक गोष्ट आहे.परंतु मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मी तुमच्या सर्वांशी बोलत होतो, तेंव्हा मी तुमच्याकडून शिकत होतो. फक्त तुम्ही कोणती गोष्ट कसे करता हे जाणून घ्यायचे होते.  आता ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. म्हणूनच मला वाटते की तुमची सर्वांची एकत्र मैत्री व्हायला हवी, एके काळी आम्ही तरुण होतो तेव्हा आम्ही पेन फ्रेंड बनवायचं. आता सोशल मीडिया आल्याने ते जग नाहीसे झाले आहे. पण तुम्हा सर्वांचा व्हॉट्सॲप ग्रुप बनवता येईल कासर्वांचा!    बरं ते कालच बनवलं होतं. छान.बरं, 8-10 दिवस झाले आहेत, याचा अर्थ ही एक चांगली सुरुवात आहे. आपापले अनुभव एकमेकांशी सामायिक केले पाहिजेत. आता इथे तामिळनाडूतील एक शिक्षक भेटले. समजा नंतर  तुमचा दौरा तामिळनाडूला जाणार आहे, तुमच्या शाळेचा, आतापासून त्यांना सांगा, फक्त सांगा, बघा तुमची ताकद किती मोठी होईल.  तुम्हाला केरळमधील कोणीतरी सापडेल, तुम्ही सांगाल की मी त्याला ओळखतो, जम्मू-काश्मीर मधलं कोणी आहे तर मी त्याच्याशी परिचित आहे,असं तुम्ही सांगाल. तुम्ही सांगाल की काळजी करू नका, मी त्यांना कॉल करून बोलून घेतो. या गोष्टींचा मोठा प्रभाव पडतो आणि मला तर असे वाटते की तुम्ही अशा लोकांचा समूह व्हावे ज्यांना असे वाटले पाहिजे की आपण जणू काही एक कुटुंबच आहोत. एक भारत, एक उत्तम भारत, यापेक्षा मोठा अनुभव असू शकत नाही. अशा छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास देशाच्या विकासाच्या प्रवासात शिक्षकांचे मोठे योगदान असेल, असे माझे ठाम मत आहे.

तुम्हालाही ऐकून कंटाळा आला असेल. शिक्षक असा असतो, शिक्षक तसा असतो, मग तुम्हालाही वाटते की बोलणाऱ्याने हे थांबवले तर बरे होईल.म्हणजेच मी हे माझ्यासाठी म्हणत नाही.  पण जेव्हा शिक्षकाची स्तुती एवढी चालू असते, तेव्हाही तुम्हाला वाटतं की पुरे झालं. मलाही असे वाटते की टाळ्यांची गरज नाही. त्या विद्यार्थ्याकडे बघूया, त्या कुटुंबाने किती विश्वासाने ते मूल आपल्या स्वाधीन केले आहे. त्या कुटुंबाने मुलाला यासाठी आमच्या स्वाधीन केले नाही की तुम्ही त्याला पेन धरायला शिकवता, कॉम्प्युटर वापरायला शिकवता, यासाठी पण त्या मुलाला तुमच्याकडे सोपवले नाही जेणेकरून तुम्ही त्याला काही अभ्यासक्रम शिकवा, जेणेकरून त्याचे परीक्षेत चांगले निकाल येतील. यासाठी म्हणून ती मुलं पाठवली गेली नाही. पालकांना असे वाटते की ते जे देत आहेत त्यापेक्षा जास्त ते देऊ शकणार नाहीत, जर कोणी अधिक एक असे काही करू शकत असेल तर ते त्यांचे शिक्षक. तेच ते करू शकतात.  आणि म्हणूनच मुलाच्या आयुष्यात शिक्षणात अधिक एक कोण देईलशिक्षक ते करतील. संस्कारात अधिक एक कोण करणारशिक्षक ते करतील. त्याच्या सवयी कोण सुधारणार? अधिक एक शिक्षक जाणार आणि म्हणूनच आपण अधिक एक सिद्धांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या घरून जे काही मिळाले त्यात मी आणखी भर घालेन. त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यात माझे ही काही योगदान असेल. जर हे प्रयत्न तुमच्या बाजूने असतील तर मला खात्री आहे की तुम्ही सर्व शिक्षकांशी खूप यशस्वीपणे बोलाल आणि तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या क्षेत्रातील, तुमच्या राज्यातील शिक्षकांशी बोला.  तुम्ही नेतृत्व करा आणि आमच्या देशाच्या नवीन पिढीला तयार करा कारण आज तुम्ही जी मुले तयार करत आहात ते रोजगारक्षम होतील किंवा 25-27 वर्षांची होतील, तेव्हा हा देश आजच्यासारखा नसणार. तो एक नवीन भारत एक विकसित भारत असेल. त्या विकसित भारतात तुम्ही निवृत्ती निवृत्ती वेतन घेत असाल. परंतु आज तुम्ही ज्या व्यक्तीला तयार करत आहात ते एक शक्तिशाली व्यक्तिमत्व असणार आहे जे विकसित भारताला नवीन उंचीवर नेईल. म्हणजेच तुमच्यावर किती मोठी जबाबदारी आहे हे ओळखा. हा विकसित भारत, हा केवळ मोदींचा कार्यक्रम नाही.

आपण सर्वांनी मिळून विकसित भारतासाठी असा मानवी समूह निर्माण करायचा आहे. असे सक्षम नागरिक आपल्याला तयार करायचे आहेत, असे सक्षम तरुण तयार करायचे आहेत. भविष्यात खेळात 25-50 सुवर्णपदके आणायची असतील तर ते खेळाडू कुठून येणारतुमच्या शाळेत दिसणाऱ्या त्या मुलांमधून तो बाहेर येणार आहे. म्हणूनच ती स्वप्ने आम्ही घेऊन जात आहोत. तुमच्याकडे अनेक लोक आहेत, त्यांची स्वप्ने आहेत पण ही स्वप्ने त्यांच्यासमोर साकार कशी करायची? हे त्यांना सांगणारी माणसे तुम्हीच आहात. तुमच्या मनात सुद्धा जी काही स्वप्न आहेत ती स्वप्ने साकार करण्यासाठीची प्रयोगशाळा तुमच्या समोर आहे.कच्चा माल तुमच्या समोर आहे, ती मुले तुमच्या समोर आहेत. तुम्ही तुमच्या स्वप्नांसह त्या प्रयोगशाळेत प्रयत्न कराल तर नक्कीच तुम्हाला हवे ते परिणाम मिळतील.

मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो!

खूप खूप धन्यवाद!

***

S.Pophale/S.Patil/R.Agashe/S.Kane/S. Mukhedkar/S. Bedekar/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2052932) Visitor Counter : 17