अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील पायाभूत सुविधांचा विस्तार अलीकडच्या वर्षांमधील लक्षणीय वाढीचा साक्षीदार आहे : आर्थिक सर्वेक्षण 2023-24

Posted On: 22 JUL 2024 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2024

गेल्या पाच वर्षांमध्ये वाढलेल्या सार्वजनिक गुंतवणुकीमुळे भारताने भौतिक आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय विस्तार पाहिला आहे, असे  केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2023-24‌ नमूद करण्यात आले आहे.

सर्वेक्षणात असे नमूद करण्यात आले आहे की, साथीच्या रोगामुळे अर्थव्यवस्थेत आलेल्या मंदीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रतिसादांपैकी सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे भांडवली खर्चात झालेली वाढ.  गेल्या पाच वर्षांतील गती कायम ठेवून, सर्वेक्षणानुसार, सरकारच्या भांडवली खर्चात आर्थिक वर्ष 20 च्या पातळीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 24 मध्ये जवळजवळ तीन पटीने वाढ झाली आहे.  रस्ते आणि रेल्वे यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत मालमत्ता या वाढीच्या प्रमुख लाभार्थी असल्याचे यात पुढे म्हटले आहे.

रस्ते पायाभूत सुविधा :

आर्थिक सर्वेक्षणात असे निरीक्षण मांडण्यात आले आहे की धोरणात्मक नियोजन आणि सार्वजनिक गुंतवणुकीत वाढ झाल्यामुळे रस्ते नेटवर्क प्रणालीचे एका लवचिक आणि कार्यक्षम पायाभूत सुविधेमध्ये रूपांतर झाले आहे. आर्थिक वर्ष 2015 मध्ये 0.4 टक्के असणारी सरकारी आणि खाजगी क्षेत्राची भांडवली गुंतवणूक  आर्थिक वर्ष 2024 मध्ये जीडीपीच्या  1.0 टक्क्यापर्यंत (सुमारे ₹3.01 लाख कोटी) वाढली.

यात असे नमूद करण्यात आले आहे की भारतमाला परियोजनेने राष्ट्रीय महामार्ग जाळ्याचा  लक्षणीय विस्तार केला आहे, 2014 ते 2024 दरम्यान द्रुतगती महामार्गांची लांबी 12 पटीने आणि 4 पदरी रस्त्यांची लांबी 2.6 पटीने वाढली आहे. आर्थिक वर्ष 2014 मध्ये प्रतिदिन11.7 किमी असणारी राष्ट्रीय महामार्ग उभारणीची सरासरी गती आर्थिक वर्ष 2024 पर्यंत दररोज 34 किमी अशी 3 पटीने वाढली आहे.

आर्थिक सर्वेक्षणात नमूद केले आहे की दळणवळण कार्यक्षमतेत आणखी वाढ करण्यासाठी आर्थिक वर्ष 2024 पर्यंत एकूण सहा मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क (एम एम एल पी ) पुरस्कृत केले गेले  आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये समर्पित मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क्ससाठी (एम एम एल पी ) ₹2,505 कोटी उपलब्ध करण्यात आले आहेत.

रेल्वे पायाभूत सुविधा :

आर्थिक सर्वेक्षण 2023-24 नुसार, भारतीय रेल्वे हे 68,584 पेक्षा जास्त मार्ग किमी (31 मार्च 2024 पर्यंत) आणि 12.54 लाख कर्मचारी (1 एप्रिल 2024 पर्यंत) असे एकल व्यवस्थापनाखालील जगातील चौथ्या क्रमांकाचे जाळे आहे. सर्वेक्षणात असे नमूद करण्यात आले आहे की, नवीन रेल्वेमार्गांची बांधणी ,  गेज रूपांतरण आणि दुप्पट करणे यामधील लक्षणीय गुंतवणुकीसह रेल्वेवरील भांडवली खर्च गेल्या 5 वर्षांमध्ये 77 टक्क्यांनी वाढला आहे (आर्थिक वर्ष 2024 मध्ये ₹2.62 लाख कोटी).

सर्वेक्षणात असे नमूद करण्यात आले आहे की रेल्वेने आर्थिक वर्ष 24 मध्ये प्रवासी गाड्या आणि मालगाड्या या दोन्हीसाठी आतापर्यंतचे सर्वोच्च उत्पादन गाठले आहे.

आर्थिक सर्वेक्षण 2023-24 नुसार,  रेल्वेसाठी मुख्य भर असणाऱ्या क्षेत्रांमध्ये जलद क्षमता वाढ, रोलिंग स्टॉकचे आधुनिकीकरण आणि देखभाल, सेवांची गुणवत्ता सुधारणे आणि ऊर्जा कार्यक्षमता यांचा समावेश आहे.या अनुषंगाने, सर्वेक्षणात असे नमूद करण्यात आले आहे की समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर, द्रुतगती रेल्वे, वंदे भारत, अमृत भारत एक्स्प्रेस, आस्था विशेष गाड्या, यासारख्या आधुनिक प्रवासी सेवा, उच्च क्षमतेचा रोलिंग स्टॉक आणि शेवटच्या टोकापर्यंत रेल्वे नेणे यासारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे.  सर्वेक्षणामध्ये नमूद केलेल्या इतर धोरणांमध्ये डिझेलवरून इलेक्ट्रिक यंत्रणेत रूपांतर , ऊर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन आणि वनीकरण यांचा समावेश आहे.

 

NM/N.Mathure/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2035429) Visitor Counter : 120