माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत  20 ते 24 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज् ) आयोजित करणार


इनपुट म्हणून वेव्हज्  आणि आउटपुट म्हणून इफ्फी   भारतात सर्जनशीलता आणि प्रतिभेचे प्रमुख केंद्र स्थापन करेल: अश्विनी वैष्णव

रोजगार निर्मितीवर सरकारचा भर असून उच्च दर्जाच्या आशय सामग्रीला प्रोत्साहन देणारी परिसंस्था  तयार करण्यासाठी रचनात्मक आणि प्रक्रियात्मक प्रयत्न केले जात आहेत

Posted On: 13 JUL 2024 5:19PM by PIB Mumbai

 

भारत 20 ते 24 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात जगभरातील माध्यम आणि मनोरंजन उद्योगासाठी महत्वपूर्ण अशा जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे  आयोजन करणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली .  आज नवी दिल्ली येथे एका पूर्वावलोकन कार्यक्रमात वैष्णव यांनी ही घोषणा केली, यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री  प्रमोद सावंत आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना  अश्विनी वैष्णव म्हणाले की, “माध्यम आणि मनोरंजन विश्वात  रचनात्मक बदल होत आहेत आणि त्यात तंत्रज्ञानाचा प्रचंड प्रमाणात अंतर्भाव झाला आहे. यामुळे, एकीकडे, अनेक संधी खुल्या झाल्या आहेत, तर  दुसरीकडे, काही सहभागींमध्ये चिंतेचे कारण देखील आहे जे या बदलाची गती कायम राखू  शकले नाहीत. या रचनात्मक बदलांचा  सर्वोत्कृष्ट  उपयोग करून घेण्याची सार्वजनिक धोरणाची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला अनुरूप  आहे. ते पुढे म्हणाले की, या बदलाचा सामना करण्यासाठी सरकार माध्यम आणि मनोरंजनाच्या संपूर्ण परिसंस्थेला साहाय्य  करण्यासाठी वचनबद्ध आहे.

ही  उद्दिष्टे साध्य करण्याच्या संधी  आणि अंतर्निहित प्रयत्नांबाबत  बोलताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, सरकार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात रोजगार निर्माण करण्यावर आणि प्रतिभावंतांची संख्या  वाढवण्यावर भर देत आहे. रचनात्मक आणि प्रक्रियात्मक प्रयत्नांद्वारे याची अंमलबजावणी केली  जाईल. हे प्रयत्न  देशात उच्च दर्जाच्या आशय सामग्रीला प्रोत्साहन देणाऱ्या , बौद्धिक संपदा  अधिकारांची निर्मिती आणि संरक्षण करणाऱ्या परिसंस्थेची निर्मिती सुनिश्चित करतील आणि जगभरात भारताला आशय निर्मिती केंद्र म्हणून नैसर्गिक पसंती मिळवून देईल.

ते पुढे म्हणाले की या उपक्रमासाठी माध्यम आणि मनोरंजन  उद्योग, वित्तीय क्षेत्र आणि तंत्रज्ञानाच्या जगामध्ये  समन्वयित प्रयत्नांची गरज आहे. यासाठी सुयोग्य धोरणात्मक उपक्रमांची आवश्यकता असून  पुढील काही महिन्यांत सरकार आणि उद्योग त्या उद्दिष्टासाठी एकत्रित प्रयत्न करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

वेव्हज्  आणि इफ्फी  एकाच वर्णपटाचे वेगवेगळे भाग बनतील आणि वेव्हज् परिषद  इनपुटचे प्रतिनिधित्व करते, तर भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी ) आउटपुट आहे. ते पुढे म्हणाले की इनपुट आणि आउटपुटच्या एकत्रीकरणाने  गोव्याला सर्जनशीलता आणि प्रतिभेचे प्रमुख केंद्र म्हणून स्थापित केले जाईल आणि नवोन्मेष आणि कलात्मक अभिव्यक्तीसाठी एक प्रकाशस्तंभ म्हणून त्याचे स्थान मजबूत होईल. इफ्फी सोबतच वेव्हज् 2024 चे आयोजन केल्याबद्दल त्यांनी  गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी  इतर मान्यवरांसह WAVES 2024 (https://wavesindia.org/) च्या संकेतस्थळाचे उद्घाटन केले तसेच शिखर परिषदेच्या माहितीपुस्तिकेचे  प्रकाशन केले. वेव्हज् 2024 हा कार्यक्रम माध्यम आणि मनोरंजन उद्योगातील जागतिक नेत्यांना भारतात आणण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला सत्यात साकार करेल, असे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन म्हणाले. ही शिखर परिषद या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाला प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ तयार करेल, असेही त्यांनी सांगितले.

 

जागतिक दर्जाची माध्यम आणि मनोरंजन उद्योगातील शिखर परिषद आयोजित करणे हे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे : भारताची आर्थिक वाढ होत असताना भारताचे कौशल्य प्रभुत्व वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.  सृजनशीलता, नवोन्मेष आणि प्रभाव या क्षेत्रात ही शिखर परिषद नवीन उदाहरणे स्थापित करेल अशी अपेक्षा आहे.”, असे सचिव संजय जाजू यांनी सांगितले.  नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण, आपल्या उद्योगाची जागतिक स्पर्धात्मकता वाढवणे, उद्योग सहयोग मजबूत करणे, गुंतवणूक आकर्षित करणे, कौशल्य विकासाला चालना देणे, आशय निर्मितीच्या विविधतेला प्रोत्साहन देणे आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे ही उद्दिष्टे या शिखर परिषदेत निश्चित केली जातील, असेही त्यांनी सांगितले.

सचिवांनी शिखर परिषदेच्या संधींबद्दल माहिती दिली आणि सांगितले की आशय निर्मिती तसेच नवोन्मेष, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, संगीत तसेच बौद्धिक संपदा (IP) निर्मिती त्याचे मुख्य केंद्र बनतील.

विकसित होत असलेल्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या परिवेशामध्ये संवाद, व्यापार सहयोग आणि नवोन्मेष वृद्धीसाठी एक प्रमुख मंच बनणे हे वेव्हज् चे उद्दिष्ट आहे. माध्यम आणि मनोरंजन उद्योगातील धुरिणांना, हितसंबंधीना आणि नवोन्मेषकांना संधी शोधण्यासाठी, आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, भारताकडे व्यापार आकर्षित करण्यासाठी आणि क्षेत्राचे भविष्य घडवण्यासाठी या शिखर परिषदेत आमंत्रित केले जाईल.

चैतन्यपूर्ण माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या परिवेशामध्ये भारताला एक अतुलनीय जागतिक प्रभाव केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून, जगभरातील सर्जनशीलता, नाविन्य आणि प्रभावाचे नवीन मानके स्थापित करणे हे वेव्हज् चे उद्दिष्ट आहे. वेव्हज् च्या अतिशय महत्त्वाच्या व्यासपीठाद्वारे जागतिक माध्यम आणि मनोरंजन उद्योगातील अग्रणींना विशेष गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देऊन सक्षम बनवणे हीच मोहीम आहे.

या कार्यक्रमाला ट्रायचे अध्यक्ष अनिलकुमार लोहाटी आणि गोवा विभागाचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल उपस्थित होते. विविध परदेशी उपक्रमांचे राजदूत आणि राजनैतिक प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.

या उद्घाटन पूर्व कार्यक्रमात वेव्हज् चे बोधचिन्ह, संकेतस्थळ आणि माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची गोलमेज बैठक झाली. या गोलमेज परिषदेमध्ये ब्रॉडकास्टिंग, AVGC, डिजिटल मीडिया इत्यादी क्षेत्रांचा समावेश असलेल्या आघाडीच्या माध्यम संस्थांमधील 80 शीर्ष व्यवस्थापकांद्वारे प्रतिनिधित्व करणाऱ्या जवळपास 60 संस्था, संघटना, उद्योग संस्था सहभागी झाल्या होत्या.

20 ते 24 नोव्हेंबर 2024 या कालावधीत भारतातील गोव्यात वेव्हज् 2024 चे आयोजन केले जाणार आहे. हा कार्यक्रम माध्यम आणि मनोरंजन उद्योग दिनदर्शिकेतील एक महत्त्वाची घटना असेल.

***

S.Patil/S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2033014) Visitor Counter : 91