भारतीय निवडणूक आयोग

लोकसभा निवडणूकीच्या उद्या (20 मे 2024) होणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण.


व्याप्ती: लोकसभेच्या 49 जागा, 8.95 कोटी मतदार, 94 हजारांहून अधिक मतदान केंद्रे, 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश.

ओदिशामधील 35 विधानसभा मतदारसंघांसाठी देखील उद्या होणार मतदान.

Posted On: 19 MAY 2024 1:31PM by PIB Mumbai

 

लोकसभा निवडणुकीच्या उद्या पार पडणाऱ्या पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण करून भारतीय निवडणूक आयोग सज्ज झाला आहे.  या टप्प्यात 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.  या सोबतच, ओदिशा विधानसभेच्या 35 विधानसभा मतदारसंघांसाठीही मतदान होणार आहे.  मतदान सुलभ  आणि सुरक्षित वातावरणात संपन्न व्हावे यासाठी पुरेसे शामियाने, पिण्याचे पाणी, रॅम्प, स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधांसह मतदारांचे स्वागत करण्यासाठी मतदान केंद्रे सज्ज झाली आहेत.  संबंधित मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच राज्य यंत्रणांना हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलेल्या भागात उष्ण हवामानाचे व्यवस्थापन करण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदान यंत्रे आणि मतदान साहित्यासह निवडणूक कर्मचारी आणि अधिकारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत.

मतदारांनी अधिक संख्येने घराबाहेर पडून मतदान केंद्रांवर जावे तसेच जबाबदारीने आणि अभिमानाने मतदान करावे असे आवाहन निवडणूक आयोगाने नागरिकांना केले आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये आत्तापर्यंत मतदान केंद्रांवर सुमारे 66.95% मतदान झाले आहे.  सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये देशातील सुमारे 451 दशलक्ष लोकांनी  मतदान केले आहे.

पाचव्या टप्प्यात ज्या 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यांची नावे- बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल. यापूर्वीच्या निवडणुकीत शहरी मतदारांनी मतदानासाठी उदासीनता दाखवली होती अशा मुंबई, ठाणे, लखनौसारख्या शहरांमध्ये या टप्प्यात मतदान होणार आहे.  या शहरवासीयांनी मोठ्या  संख्येने घराबाहेर पडून  मतदान करावे  असे विशेष आवाहन निवडणूक आयोगाने नागरिकांना केले आहे.

सध्या सुरू असलेल्या निवडणुकांदरम्यानमतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने अनेक प्रसिद्ध व्यक्तींची मदत घेतली आहे.  त्यामुळे, जर तुम्हाला निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करणारा प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि भारतीय निवडणूक आयोगाचे नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकर यांचा दूरध्वनी  आला तर आश्चर्यचकित होऊ नका !

उर्वरित 3 टप्प्यातील मतदान 1 जूनपर्यंत होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.  सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच 379 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडले.

टप्पा - 5 संबंधी माहिती :

1. सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या 5 व्या टप्प्यासाठी  20 मे, 2024 रोजी 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 लोकसभा मतदारसंघांसाठी (सामान्य-39; एसटी-03; एससी-07) मतदान होणार आहे.  मतदान सकाळी 7 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6 वाजता संपेल.  (मतदान केंद्र बंद होण्याची वेळ लोकसभा मतदार संघानुसार वेगळी असू शकते).

2. ओडिशा विधानसभेच्या निवडणुका अंतर्गत ओदिशामधील 35 विधानसभा मतदारसंघासाठी (सामान्य-21; एसटी-08; एससी-06) देखील मतदान होणार आहे.

3.   94,732 मतदान केंद्रांवर   सुमारे  9.47 लाख मतदान अधिकारी  8.95 कोटीहून अधिक  मतदारांचे स्वागत करतील.

4.     सुमारे 8.95 कोटी मतदारांमध्ये 4.69  कोटी पुरुष; 4.26 कोटी महिला आणि 5409 तृतीयपंथी मतदारांचा समावेश 

5.     पाचव्या टप्प्याच्या मतदानात 85 वर्षांहून अधिक वयाचे 7.81 लाख मतदार, 100 वर्षांहून अधिक वयाचे 24,792 मतदार तर 7.03 लाख  दिव्यांग मतदार असून सुविधेसाठी त्यांना घरून मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. घरून मतदान करण्याच्या पर्यायी व्यवस्थेची याआधीच मोठ्या प्रमाणावर प्रशंसा होत असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

6. निवडणूक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना नेण्या-आणण्यासाठी 17 विशेष रेल्वेगाड्या आणि 508 हेलिकॉप्टर्सची सुविधा पुरवण्यात आली. 

7.     153 निरीक्षक (55  सामान्य निरीक्षक, 30 पोलीस निरीक्षक, 68 व्यय निरीक्षक ) मतदानाच्या काही दिवस आधीच त्यांच्या मतदारसंघात पोहोचले आहेत. सर्वोच्च दक्षता घेण्याच्या दृष्टीने ते बारीक नजर ठेवतील. याशिवाय, काही राज्यांमध्ये विशेष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

8.     मतदारांना कोणतेही आमिष देण्यात येऊ नये यासाठी एकूण 2000 भरारी पथके, 2105 अचल निरीक्षण पथके, व्हिडीओ चित्रणाच्या मदतीने नजर  ठेवणाऱ्या 881 तुकड्या, आणि ते पाहणाऱ्या 502 तुकड्या   कठोर आणि जलद कारवाई व्हावी या उद्देशाने 24 तास पाळत ठेवणार आहेत.

9.   मद्य, अंमली पदार्थ, रोख रक्कम आणि मोफत वस्तूंच्या कोणत्याही अवैध वाहतुकीवर कडक नजर ठेवण्यासाठी एकूण 216 आंतरराष्ट्रीय सीमा तपासणी नाके आणि  565  आंतरराज्यीय सीमा तपासणी नाके  कार्यरत  आहेत. सागरी आणि हवाई मार्गांवर कडक पाळत ठेवण्यात आली आहे

10.   वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींसह प्रत्येक मतदाराला विनासायास मतदान करता यावे  याची योग्य काळजी घेण्यासाठी पाणी, उन्हापासून आसरा, स्वच्छतागृहे, रॅम्प, स्वयंसेवक, व्हीलचेअर आणि वीज यासारख्या  किमान सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

11.   सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले आहे. या चिठ्ठ्या सोयीचे उपाय म्हणून तसेच आयोगाच्या वतीने येऊन मतदान करण्याचे निमंत्रण पत्र म्हणून काम करतात.

12.   मतदार पुढील  लिंकद्वारे त्यांच्या मतदान केंद्राचा तपशिल, आणि निवडणुकीची तारीख तपासून घेऊ शकतात

https://electoralsearch.eci.gov.in/

13.   आयोगाने मतदान केंद्रांवर ओळख पडताळणीसाठी मतदार छायाचित्र ओळखपत्रा (EPIC) व्यतिरिक्त 12 पर्यायी दस्तऐवजांना देखील मान्यता दिली आहे. मतदार यादीत मतदाराची नोंद असल्यास यापैकी कोणताही दस्तावेज दाखवून मतदान करता येईल. पर्यायी ओळख दस्तऐवजांसाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशाची लिंक:

https://www.eci.gov.in/eci-backend/public/api/download?  

14. पाचव्या टप्प्याच्या मतदानासाठी संसदीय मतदारसंघ निहाय मतदारांचे तपशिल 17 मे 2024 च्या प्रेस नोट क्र 89 नुसार प्रसिद्ध करण्यात आले होते.

15. लोकसभा 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांमधील मतदानाची समग्र माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे:

https://old.eci.gov.in/files/file/13579-13-pc-wise-voters-turn-out/

16. मतदार संख्येसाठीचे मतदान ॲप प्रत्येक टप्प्यासाठी एकूण अंदाजित मतदान प्रत्यक्ष प्रदर्शित करीत आहे. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की टप्पानिहाय/राज्यनिहाय/विधिमंडळ मतदारसंघ निहाय/संसदीय  मतदारसंघ निहाय अंदाजित मतदानाची समग्र माहिती मतदार संख्येसाठीच्या मतदान ॲपवर मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दर दोन तासांच्या अंतराने उपलब्ध असते आणि त्यानंतर ही माहिती मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या आगमनानंतर सातत्याने अद्ययावत केली जाते.

***

S.Kane/S.Mukhedkar/S.Naik/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021058) Visitor Counter : 248