पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

संसदेच्या अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मार्गदर्शन आणि निर्मला सीतारामन यांच्याकडून मांडला जाणारा अंतरिम अर्थसंकल्प हे नारी शक्तीच्या उत्सवाचे प्रतीक ”

विधायक टीका स्वागतार्ह,मात्र व्यत्यय आणणारे वर्तन कधीही स्मरणात राहणार नाही "

आपण आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करूया, आपल्या विचारांनी सभागृह समृद्ध करूया आणि राष्ट्राला उत्साह आणि आशावाद देऊया"

सामान्यतः निवडणुकीची वेळ जवळ आली असताना पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जात नाही, आम्हीही त्याच परंपरेचे पालन करू आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प तुमच्यासमोर मांडू"

Posted On: 31 JAN 2024 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांसमोर निवेदन केले.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी संसदेच्या नवीन इमारतीत झालेल्या पहिल्या अधिवेशनाचे स्मरण केले आणि या पहिल्या अधिवेशनात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांवर प्रकाश टाकला. महिला सक्षमीकरणाचा नारीशक्ती वंदन कायदा संमत होणे हा आपल्या देशासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे.” असे मोदी म्हणाले. 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा संदर्भ देत त्यांनी, नारी शक्तीचे सामर्थ्य, शौर्य आणि दृढनिर्धार  याची अनुभूती देशाने घेतली आहे असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाचे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्याचे महिला सक्षमीकरणाचा उत्सव असे वर्णन केले.

गेल्या दशकाचा विचार करताना, पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या प्रत्येक सदस्याचे योगदान अधोरेखित केले.
मात्र लोकशाही मूल्यांपासून भरकटलेल्या आणि गदारोळ करणाऱ्या  आणि व्यत्यय आणणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन त्यांनी केले. "लोकशाहीमध्ये टीका आणि विरोध आवश्यक आहे, परंतु ज्यांनी सदनाला विधायक विचारांनी समृद्ध केले आहे ,हे खूप मोठ्या वर्गाच्या स्मरणात राहाते,  ज्यांनी केवळ  व्यत्यय निर्माण केला ते कोणाच्याही आठवणीत राहात नाही",असे पंतप्रधान म्हणाले.

आगामी काळातही "येथे बोलला जाणारा प्रत्येक शब्द  इतिहासातली नोंद म्हणून प्रतिध्वनीत होईल" असे प्रतिपादन करत, पंतप्रधान मोदी यांनी संसदीय चर्चेच्या चिरस्थायी प्रभावावर भर दिला. "विधायक  टीका स्वागतार्ह आहे  मात्र व्यत्यय आणणारे वर्तन कोणीही स्मरणात ठेवणार  नाही" असे सांगत  त्यांनी सदस्यांना सकारात्मक योगदान देण्याचे आवाहन केले. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना,  सर्व सन्माननीय सदस्यांनी  सकारात्मक छाप सोडण्यासाठी संधीचे सोने करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.त्यांनी सदस्यांना  राष्ट्रीय हितांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले आणि ते म्हणाले की,"आपण आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करूया, आपल्या विचारांनी सभागृह समृद्ध करूया आणि राष्ट्राला उत्साह आणि आशावाद देऊ या."

आगामी अर्थसंकल्पाबाबत पंतप्रधान म्हणाले, “सामान्यत: जेव्हा निवडणुकीची वेळ जवळ असते तेव्हा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जात नाही, आम्हीही त्याच परंपरेचे पालन करू आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पूर्ण अर्थसंकल्प तुमच्यासमोर मांडू.यावेळी देशाच्या अर्थमंत्री निर्मला जी काही मार्गदर्शक मुद्द्यांसह आपला अर्थसंकल्प उद्या आपल्या सर्वांसमोर मांडणार आहेत.

"जनतेच्या आशीर्वादाने भारताचा सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाचा प्रवास सुरूच राहील.",असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

 

* * *

NM/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2000942) Visitor Counter : 83