पंतप्रधान कार्यालय

'श्रमिकांचे हित श्रमिकांना समर्पित' कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी


हुकुमचंद गिरणी कामगारांच्या थकीत धनादेशांचे वाटप

खरगोन जिल्ह्यात 60 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची केली पायाभरणी

"मला श्रामिकांच्या आशीर्वादांचा आणि प्रेमाचा प्रभाव माहीत आहे"

गरीब आणि वंचितांची प्रतिष्ठा आणि आदर ही आमची प्राथमिकता. समृद्ध भारतात योगदान देण्यास सक्षम असलेले सशक्त श्रमिक हे आमचे ध्येय"

"स्वच्छता आणि खाद्यपदार्थ यासारख्या क्षेत्रात इंदूर आघाडीवर"

"नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकार कार्यरत"

'मोदींची हमी' वाहनाचा पुरेपूर लाभ घ्यावा, अशी मध्य प्रदेशच्या जनतेला माझी विनंती.

Posted On: 25 DEC 2023 12:51PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'श्रमिकांचे हित श्रमिकांना समर्पित' या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांनी हुकुमचंद गिरणी कामगारांच्या थकबाकीशी संबंधित सुमारे 224 कोटी रुपयांचा धनादेश प्राधिकृत अधिकारी आणि हुकुमचंद गिरणी कामगार संघटना, इंदूरच्या प्रमुखांकडे सुपूर्द केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हुकुमचंद गिरणी कामगारांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यात आला. खरगोन जिल्ह्यात 60 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली

आजचा कार्यक्रम हा श्रमिक बंधू-भगिनींच्या अनेक वर्षांच्या तपश्चर्येचा, स्वप्नांचा आणि संकल्पांचा परिणाम आहे असे उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले.

अटलजींच्या जयंतीदिनी हा कार्यक्रम होत असल्याबद्दल आणि नवीन सरकारच्या स्थापनेनंतर मध्य प्रदेशातील त्यांचा पहिला कार्यक्रम गरीब आणि वंचित कामगारांना समर्पित आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मध्य प्रदेशातील नव्याने निवडून आलेल्या दुहेरी इंजिन सरकारला श्रमिक आपले आशीर्वाद देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "श्रमिकांच्या आशीर्वादांचा आणि प्रेमाचा प्रभाव मला चांगल्याप्रकारे माहीत आहे", असे पंतप्रधान म्हणाले, राज्यातील नवीन सरकार येत्या काही वर्षांत असे अनेक पराक्रम साध्य करेल याची खात्री आहे असे तै म्हणाले.  आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनाने इंदूरमधील कामगारांचा उत्साह अधिक वाढल्याचे नमूद करत पंतप्रधानांनी अटलजींचे मध्य प्रदेशाशी असलेले संबंध अधोरेखित केले आणि त्यांची जयंती सुशासन दिन म्हणूनही साजरी केली जाते असे सांगितले. कामगारांना 224 कोटी रुपयांच्या हस्तांतरणामुळे एक सोनेरी भविष्य त्यांची वाट पाहत आहे आणि आजची तारीख कामगारांसाठी न्यायाची तारीख म्हणून लक्षात ठेवली जाईल, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी श्रमिकांच्या संयम आणि कठोर परिश्रमाची प्रशंसा केली.

गरीब, युवक, महिला आणि शेतकरी या त्यांच्या चार 'जातींचा' संदर्भ देत पंतप्रधान मोदी यांनी समाजातील गरीब घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने उचललेल्या पावलांचे कौतुक केले. गरीब आणि वंचितांची प्रतिष्ठा आणि आदर ही आमची प्राथमिकता आहे. समृद्ध भारतात योगदान देण्यास सक्षम असलेले सशक्त श्रमिक हे आमचे ध्येय आहे ", असे मोदी म्हणाले.

यावेळी पंतप्रधानांनी इंदूर शहर स्वच्छता आणि खाद्य संस्कृती आणि परंपरेत आघाडीवर असल्याचा आवर्जून उल्लेख केला. इंदूरच्या औद्योगिक परिसंस्थेच्या जडणघडणीत वस्त्रोद्योग क्षेत्रानं बजावलेल्या भूमिकेवरही त्यांनी प्रकाश टाकला, महाराज तुकोजी राव कापड बाजार आणि होळकरांनी इंदूरमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या सूतगिरणीचं महत्व त्यांनी अधोरेखीत केलं, तसंच मालवा कापसाच्या लोकप्रियतेचाही उल्लेख केला. हा इंदूरच्या वस्त्रोद्योग क्षेत्राचा सुवर्णकाळ होता असं ते म्हणाले. मात्र या आधीच्या सरकारांनी या वैभवाकडे दुर्लक्ष केल्याचं म्हणत त्यांनी त्याबद्दल खंत व्यक्त केली. मात्र आता आपलं डबल इंजिन सरकार इंदूरला त्याचं जुनं वैभव परत मिळवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मध्यप्रदेशात उभारल्या जात असलेल्या आणि रोजगार निर्मिती तसंच आर्थिक विस्ताराला गती देणाऱ्या नव्या प्रकल्पांची माहिती दिली. यादृष्टीनं भोपाळ ते इंदूर दरम्यान गुंतवणूक कॉरिडोअर, इंदूर पीथमपूर आर्थिक कॉरिडोअर आणि बहुआयामी लॉजिस्टिक्स पार्क, विक्रम उद्योगपुरीमध्ये वैद्यकीय उपकरण पार्क उभारला जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

आपल्या भाषणात पंतप्रधानांनी मध्य प्रदेशाचं नैसर्गिक सौंदर्य तिथल्या सांस्कृतिक वारशाचाही उल्लेख केला. इंदूरसह राज्यातील अनेक शहरं विकास प्रक्रिया आणि निसर्गात समतोल साधणारी सर्वोत्तम उदाहरणं म्हणून समोर आली असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी गोवर्धन या आशियातील सर्वात मोठ्या कार्यरत प्रकल्पाचं आणि इंदूरमध्ये आकार घेत असलेल्या ईव्ही चार्जिंग प्रकल्प या पायाभूत सुविधांच्या विकासकामांची उदाहरणं उपस्थितांसमोर मांडली. आज भूमिपूजन केलेल्या खरगोन जिल्ह्यातल्या ६० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे वीज बिलात ४ कोटी रुपयांची बचत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. या प्रकल्पासाठीचा निधी उभारण्याचा प्रयत्न म्हणून, हरित रोखे जारी करण्याच्या अभिनव उपाययोजनेचाही त्यांनी उल्लेख केला, अशा प्रयत्नांमुळे निसर्गाच्या रक्षणात लोकसहभाग सुनिश्चित व्हायला मदत होईल असं ते म्हणाले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारनं काम सुरु केलं असल्याचं ते म्हणाले. सरकारी योजनांचे लाभ तळागाळापर्यंत पोहचावेत, यासाठी मध्य प्रदेशच्या कानाकोपऱ्यात विकसित भारत संकल्प यात्रा नेली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणुक काळातल्या आचारसंहितेमुळे राज्यात या यात्रेला सुरुवात व्हायला उशीर झाला, तरीदेखील राज्यात ही यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत या यात्रेअंतर्गत 600 कार्यक्रमांचं आयोजन झालं असल्याचं, आणि त्यातून लाखो लोकांना त्याचा लाभ झाला असल्याचं त्यांनी नमूद केलं. 'मोदी की गॅरंटी' या वाहनाच्या माध्यमातून मध्य प्रदेशातल्या जनतेनं सरकारी योजनांचा लाभ घ्यावा अशी आवाहनवजा विनंतीही त्यांनी यावेळी केली.

कामगारांचे हसतमुख चेहरे आणि श्रमिकांच्या मेहनतीचा सुगंध सरकारला समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याची प्रेरणा देत राहील असं म्हणत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे देखील या कार्यक्रमाला आभासी पद्धतीने उपस्थित होते.

पार्श्वभूमी

इंदूरमधील हुकुमचंद मिल 1992 मध्ये बंद झाली होती आणि त्यानंतर अवसायनात गेली. तेव्हापासून हुकुमचंद मिलचे कामगार आपली थकबाकी परत मिळवण्यासाठी प्रदीर्घ कायदेशीर लढा देत आले आहेत. अलीकडेच मध्य प्रदेश सरकारनं या प्रकरणासंदर्भात सकारात्मक पुढाकार घेत, देय असलेली रक्कम आणि मागण्यांसदर्भात सर्वमान्य होईल अशा तोडग्यावर यशस्वी वाटाघाटी केल्या होत्या. या तोडग्याला न्यायालयं, कामगार संघटना तसंच गिरणी कामगारांसह सर्व भागधारकांचीही मान्यता मिळाली. या तोडग्याअंतर्गत मध्य प्रदेश सरकारनं सर्व थकबाकी आगाऊ स्वरुपात अदा करणे, गिरणीची जमीन ताब्यात घेणे आणि या जमीनीचा निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी विकास करणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे.

या कार्यक्रमादरम्यानं इंदूर महानगरपालिकेच्या वतीनं खरगोन जिल्ह्यातल्या सामराज आणि आशुखेडी या गावांमध्ये उभारल्या जाणाऱ्या 60 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचं भूमिपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या प्रकल्पांच्या उभारणीसाठी 308 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या नव्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीमुळे इंदूर महानगरपालिकेला वीज बिलांमध्ये दरमहा सुमारे चार कोटी रुपयांची बचत करणं शक्य होणार आहे. सौर प्रकल्पाच्या उभारणीसाठीचा निधी उभारण्याकरता इंदूर महानगरपालिकेनं 244 कोटी रुपयांचे हरित रोखे जारी केले होते. अशा पद्धतीनं हरित रोखे जारी करणारी ती देशातील पहिली नागरी स्वराज्य संस्थाही ठरली होती. इंदूर महानगरपालिकेच्या हरित रोख्यांना देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, आणि 29 राज्यांमधल्या नागरिकांनी, रोखे जारी करतानाच्या मूळ मूल्याच्या तीप्पट म्हणजेच सुमारे 720 कोटी रुपयांची गुंतवणूकही केली आहे.

***

NM/V.Ghode/T.Pawar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1990247) Visitor Counter : 96