पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

होरायझन 2047 : भारत-फ्रान्स धोरणात्मक भागिदारीचा 25 वा वर्धापनदिन, भारत-फ्रान्स संबंधांची शताब्दीच्या दिशेने वाटचाल

Posted On: 13 JUL 2023 11:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 ऑगस्ट 2023

 

भारत आणि फ्रान्स, हिंद-प्रशांत क्षेत्रात पूर्वापार, धोरणात्मक सामरीक भागिदार आहेत. 1947 मध्ये दोन्ही देशांत राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यापासून आणि 1998 मध्ये भागिदारी धोरणात्मक स्तरापर्यंत वर पोहोचल्यानंतर, आपल्या दोन्ही देशांनी परस्पर विश्वासाचा उच्च स्तर आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेत विहीत केलेल्या तत्वांप्रति सामायिक वचनबद्धता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांत अंतर्भूत सामायिक मुल्यांच्या आधारावर, सातत्याने एकत्र काम केले आहे.

भारत-फ्रान्स भागिदारीचा 25 वा वर्धापन दिन साजरा करण्याचा एक भाग म्हणून, 2047 पर्यंतच्या द्विपक्षीय संबंधांची दिशा ठरवण्यासाठी, दोन्ही देशांनी एक कृतीआराखडा स्वीकारण्यासाठी सहमती दर्शवली आहे.  भारताच्या स्वातंत्र्याची शताब्दी, दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांची शताब्दी आणि धोरणात्मक भागीदारीची 50 वर्षे असे तिनही योग एकत्र येत असल्यामुळे, 2047 हे वर्ष हे तिन्ही योग एकत्र साजरे करण्यासाठी एक विशेष वर्ष आहे.

आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थैर्य कायम  राखण्यासाठी एकत्र काम करण्याचा, भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांचा मानस आहे. हिंद-प्रशांत आणि त्याही पलीकडे इतर क्षेत्रात, नियमावर-आधारीत कामकाजाच्या वचनबद्धतेचा दोन्ही देश आग्रह धरतात. दोन्ही देशांनी आपापलं सार्वभौमत्व आणि धोरणात्मक हितांशी सुसंगत भागिदारीच्या चौकटीत बरोबरीच्या भावनेने काम करण्याचे मान्य केले आहे, जसे ते 1998 पासून करत आले आहेत. ही धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आणि स्वातंत्र्य, समानता, लोकशाही आणि कायद्याचे राज्य या सार्वत्रिक मूल्यांच्या अनुषंगाने, भारत आणि फ्रान्सने भविष्यातील क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यांनी आपले सार्वभौमत्व आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा आणि त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. यात, भारत आणि युरोपिय संघामधील वाढत्या सहकार्याच्या माध्यमाचाही समावेश आहे.

I- सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी भागिदारी

1) एकत्र मिळून सार्वभौमत्व संरक्षणाच्या क्षमता निर्माण करणे

1.1 स्वावलंबी (आत्मनिर्भर) संरक्षण उद्योग आणि त्यासाठी तांत्रिक आधार विकसित करण्यात, फ्रान्स भारताच्या प्रमुख भागिदारांपैकी एक आहे. भारत आणि फ्रान्स इतर (तृतीय) देशांच्या फायद्यासाठी, प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाच्या सह-विकास आणि सह-उत्पादनात सहकार्य करण्यास वचनबद्ध आहेत. 

1.2 पाच दशकांहून अधिक काळ सुरु असलेल्या लष्करी हवाई उड्डाण क्षेत्रातील (वायू दल) आपापसातील उत्कृष्ट सहकार्याच्या अनुषंगाने, भारत आणि फ्रान्सने, भारताने मागणी केलेल्या 36 राफेल लढाऊ विमानांच्या वेळेवर झालेल्या मागणी पूर्ततेचे स्वागत केले आहे. भविष्यात, भारत आणि फ्रान्स, लढाऊ जेट इंजिनांच्या विकासाला संयुक्तपणे पाठिंबा देऊन, प्रगत वैमानिक तंत्रज्ञानामध्ये आपापसातील समृद्ध संरक्षण सहकार्य वाढवतील. दोन्ही देश, फ्रान्सच्या 'सॅफ्रान हेलिकॉप्टर इंजिन" द्वारे "इंडियन मल्टी-रोल हेलिकॉप्टर (IMRH)' प्रकल्पा अंतर्गत हेवी-लिफ्ट हेलिकॉप्टरच्या मोटरीकरणासाठी परस्परांना औद्योगिक सहकार्य करतील. IMRH कार्यक्रम राबवताना, इंजिन विकासासाठी, भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि फ्रान्सच्या 'सॅफ्रान हेलिकॉप्टर इंजिन यांच्यात भागधारक कराराला अंतिम रूप देण्यात आले आहे. भारत आणि फ्रान्सला तंत्रज्ञान हस्तांतरणाचा यशस्वी अनुभव आहे. या आधारावर, भारत आणि फ्रान्स यांच्यात, संयुक्त विकास आणि महत्त्वपूर्ण घटक तसेच तंत्रज्ञान निर्मिती ब्लॉक्सच्या देवाणघेवाणीबाबत विश्वासाची भावना आधीपासूनच आहे. नवीन व्यवसाय योजना देखील त्यांच्याशी सुसंगत आहेत.

1.3 भारत आणि फ्रान्सने मेक इन इंडिया उपक्रमा अंतर्गत, पहिल्या स्कॉर्पीन पाणबुडी निर्मिती कार्यक्रमाचे (पी75 - कलवरी) यश आणि दोन्ही देशांच्या कंपन्यांमधील नौदल कौशल्याच्या आदानप्रदानाचे कौतुक केले आहे.  भारत आणि फ्रान्सने, भारतीय पाणबुडीचा ताफा आणि त्याची क्षमता विकसित करण्यासाठी आणखी काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याची तयारीही दर्शवली आहे.

1.4 परस्पर विश्वासावर आधारीत या संरक्षण औद्योगिक भागीदारीच्या इतर उदाहरणांमध्ये, सॅफ्रान हेलीकॉप्टर इंजन आणि एच ए एल यांच्यात शक्ती इंजिनसाठी फोर्जिंग (उर्जेच्या सहाय्याने धातुचा आकार बदलणे) आणि कास्टिंग (उर्जेच्या सहाय्याने धातू वितळणे) तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाचा करार समाविष्ट आहे. हे सुध्दा, तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानाचे आणि मेक इन इंडियाला पाठबळ देण्यासाठी असलेल्या फ्रेंच वचनबद्धतेचे निदर्शक आहे.

1.5 दुसरे उदाहरण म्हणजे, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स लिमिटेड (GRSE) आणि युरोपिय नौदल संरक्षण उद्योगातील अग्रणी उद्योग, नेव्हल ग्रुप फ्रान्स यांच्यात, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय नौदलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जहाज निर्मितीच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी झालेला सामंजस्य करार!

1.6 याच उद्देशाने दोन्ही देश, संरक्षण औद्योगिक क्षेत्रातील सहकार्याचा आराखडा स्वीकारण्याच्या दिशेने देखील काम करत आहेत.

1.7 दोन्ही देशांमधील संरक्षण औद्योगिक सहकार्यामध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन, पॅरिसमधील आपल्या दूतावासात भारत, डी आर डी ओ या भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे तांत्रिक कार्यालय स्थापन करत आहे.

2) हिंद-प्रशांत क्षेत्राला स्थिर आणि शाश्वत विकासाचा प्रदेश बनवण्यासाठी ठोस उपाय प्रदान करणे

2.1 भारत आणि फ्रान्स हे दोन हिंद-प्रशांत क्षेत्रीय देश, या महत्त्वाच्या प्रदेशात एक सामायिक स्वप्न साकार करण्याच्या दिशेने काम करत आहेत. 2018 मध्ये स्वीकारलेल्या "हिंद महासागर क्षेत्रामध्ये भारत-फ्रेंच सहकार्यासाठी संयुक्त धोरणात्मक दृष्टिकोन" या उपक्रमा अंतर्गत सुरू करण्यात आलेले सहकार्य मजबूत करण्याचा निर्णय, भारत आणि फ्रान्सने घेतला आहे. यासाठी त्यांनी नव्या हिंद-प्रशांत कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. दोन्ही देश, त्यांच्या स्वत:च्या आर्थिक सुरक्षेच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी संयुक्त विकास उपक्रमांसह काम करण्याकरता , समुद्र-अंतराळ-हवामान, यासारख्या जागतिक सामायिक क्षेत्रांमध्ये समान स्वातंत्र्य प्रदान करण्यासाठी, संपत्ती निर्मितीसाठी भागीदाऱ्या प्रस्थापित करण्याकरता, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जागतिक कारभारात नेतृत्व करण्यासाठी, हिंद-प्रशांत क्षेत्राला व्यतिरिक्त क्षेत्रातील लोकांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करून सर्व प्रदेशांमध्ये एक संतुलित शाश्वत व्यवस्था निर्माण करण्यासाठी, वचनबद्ध आहेत. दोन्ही देशांनी प्रशांत क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रीत करून आणि न्यू कॅलेडोनिया तसेच फ्रेंच पॉलिनेशिया या फ्रेंच प्रदेशांच्या सखोल सहभागासह आपापसातील सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.  हिंद महासागर आणि प्रशांत महासागरातील फ्रेंच परदेशी प्रदेश, दोन्ही देशांमध्ये असलेल्या हिंद-प्रशांत भागीदारीत महत्त्वाची भूमिका बजावतील.

2.2 या प्रदेशातील समविचारी भागिदारांसोबत त्रिपक्षीय सहकार्य हा हिंद-प्रशांत क्षेत्रातील सहकार्याचा महत्त्वाचा आधारस्तंभ असेल. या संदर्भात, 4 फेब्रुवारी 2023 रोजी, विशेषत: दोन्ही देशांचा सामरीक भागीदार संयुक्त अरब अमिराती सह, मंत्रिस्तरीय चर्चा झाली. याव्यतिरिक्त, सप्टेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाशीही या संदर्भात विचारविनिमय करण्यात आला होता.

भारत आणि फ्रान्स, त्रिकोणी (त्रिपक्षीय) विकास सहकार्याच्या अनोख्या अशा प्रारुपा द्वारे, 'इंडो-पॅसिफिक ट्रायंग्युलर कोऑपरेशन (IPTDC) फंड' हा हिंद-प्रशांत त्रिपक्षीय सहकार्य निधी स्थापन करण्यासाठी काम करतील. हा निधी, हिंद-प्रशांत क्षेत्रातील विकसनशील देशांमध्ये हवामानबदल विषयक शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नवनवीन संशोधनांना पाठबळ पुरवेल. या प्रदेशात विकसित होत असलेल्या हरीत तंत्रज्ञानाचा सुलभ विस्तार करणे, हे देखील आय पी टी डी सी चे उद्दिष्ट आहे. आय पी टी डी सी निधीच्या आधारावर कुठले प्रकल्प उभारायचे, हे  दोन्ही देश संयुक्तपणे ठरवतील. हिंद-प्रशांत क्षेत्रातील नवप्रवर्तकांना (नवं उद्योग) पारदर्शक पर्यायी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरु शकेल. शिवाय, 2021 मध्ये सुरू करण्यात आलेल्या युरोपिय समुदाय भागिदारीचा, भारत एक प्रमुख आधारस्तंभ असेल यात शंका नाही.

3) अंतराळ हा विषय आपल्या द्विपक्षीय धोरणात्मक संबंधांच्या केंद्रस्थानी ठेवणे

3.1 अंतराळ प्रवेशाच्या संधींची उपलब्धता आणि अंतराळ तंत्रज्ञान तसेच अंतराळ विदा, यांच्या क्षमतांचा वापर करून सेवा आणि अनुप्रयोगांचा (अॅप्लिकेशन्स) विकास, हा आपल्या समाजाच्या नवकल्पना, वैज्ञानिक विकास आणि आर्थिक वाढीच्या केंद्रस्थानी आहे, हा मुख्य गाभा आहे. भारत आणि फ्रान्सने परस्पर हिताच्या कार्यक्रमांना बळ देऊन अंतराळाशी संबंधित सर्व क्षेत्रात आपले सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

3.2.1 वैज्ञानिक आणि व्यावसायिक भागिदारी: सी एन ई एस ही फ्रेंच अंतराळ संस्था आणि इस्रो ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था, हवामानबदल आणि पर्यावरण या दोन मुख्य संरचनात्मक मुद्द्यांच्या आधारावर आपली भागिदारी मजबूत करतील. तृष्णा (TRISHNA) मोहिमेचा विकास आणि जल साधनसंपत्ती व्यवस्थापन, महासागर साधनसंपत्ती आणि हवेच्या गुणवत्तेचे संवर्धन, मंगळ-शुक्र या ग्रहांबाबत अंतराळ संशोधन, महासागरांचे अवलोकन आणि गस्त, तसेच भारताच्या गगनयान कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रक्षेपक तसेच मानवयुक्त याने, या सर्व विषयांवर अंतराळ हवामान वेधशाळेत (SCO) सुरु असलेले उपक्रम, यांचाही या भागिदारीत  समावेश आहे. भारताचा न्यू स्पेस इंडिया लिमिटेड हा सार्वजनिक उपक्रम आणि एरियन स्पेस ही फ्रेंच कंपनी देखील, अंतराळ प्रक्षेपणाच्या व्यावसायिक सेवांच्या कार्यान्वयनात सहयोग करण्याची योजना, आखत आहेत.

3.2.2 अंतराळविहाराची क्षमता: भारत आणि फ्रान्स, त्यांच्या अंतराळ उद्योगांच्या परस्पर भागिदारीच्या माध्यमातून, अंतराळातील स्वयंभू (स्वबळावर स्वतंत्रपणे) प्रवेश आणि अंतराळ सुलभता वाढवण्याबरोबरच भविष्यकालीन तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये आपले सहकार्य वाढवण्यासाठी काम करतील.

3.2.3 भारत आणि फ्रान्स, अलिकडेच सुरु झालेला द्विपक्षीय सामरिक अंतराळ संवाद पुढेही सुरू ठेवतील.

4) नागरिकांचे दहशतवादाच्या धोक्यांपासून अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी, दहशतवादाविरुद्धचा लढा नवनव्या धोक्यांच्या अनुषंगाने लढणे.

4.1 भारत आणि फ्रान्सने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत नेहमीच एकमेकांसोबत काम केले आहे. दोन्ही देश, नवनव्या धोक्यांचा सामना करण्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवतील. यामध्ये परिचालनात्मक (ऑपरेशनल) सहकार्य, बहुपक्षीय कारवाई, ऑनलाइन माध्यमातून सक्रीय असलेल्या कट्टरतावाद्यांचा सामना करणे, दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थसहाय्याचा  मुकाबला, विशेषत: दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणे, आणि ऑनलाइन अवतरणारा दहशतवादी आणि हिंसक अतिरेकी मजकुर, 'ख्राईस्टचर्च कॉल टू अॅक्शन' च्या माध्यमातून नष्ट करणे, या बाबींचा समावेश आहे.

4.2 भारत आणि फ्रान्स यांची अंतर्गत सुरक्षा, मानवी तस्करी, आर्थिक गुन्हे आणि पर्यावरणीय गुन्ह्यांसह आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी विरुद्धच्या लढ्यात, भारत-फ्रान्स आपले सहकार्य वाढवत आहेत. भारत आणि फ्रान्स यांच्यात दहशतवादविरोधी क्षेत्रातील सहकार्यासाठी, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) आणि फ्रान्सचे Groupe de Intervention de la Gendarmerie Nationale (GIGN) यांच्यात नियमित सहकार्य राखण्याचे, दोन्ही देशांनी एका उद्देश पत्रिका निवेदनाद्वारे स्वागत केले आहे.

4.3 दोन्ही देशांच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणांद्वारे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, हे अंतर्गत सुरक्षेतील सहकार्याचे महत्त्वाचे क्षेत्र आहे.

5) नव्याने स्थापित आणि परिणामकारक बहुपक्षीयतेला (बहुराष्ट्रीयवादाला) प्रोत्साहन देणे

5.1 भारत आणि फ्रान्सने, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची मूलभूत तत्त्वे, विशेषत: संयुक्त राष्ट्रांच्या सनदेमध्ये (आचारसंहिता) समाविष्ट केलेल्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करण्याचे प्रयत्न हाणून पाडले आहेत. याव्यतिरिक्त दोन्ही देश, नवीन समकालीन वस्तुस्थिती नि:पक्ष पणे मांडता येईल अशा पद्धतीने जागतिक कारभारात सुधारणा घडवून आणण्याकरता वचनबद्ध आहेत.

5.2 सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वाच्या दोन्ही गटवारीतील सदस्यसंख्या वाढवण्यासाठी, भारत, आणि फ्रान्स नियमांमधील सुधारणांना प्रोत्साहन देत आहेत. नवीन स्थायी सदस्य म्हणून जगातील इतर देशांना सुरक्षा परिषदेत समावेश करवून घेण्यासाठी, दोन्ही देश G-4 देशांच्या पाठींब्याची पात्रता ग्राह्य धरण्याचा आग्रह धरतील. त्यामुळे स्थायी सदस्य बनण्यासाठी भारतालाही पाठिंबा मिळेल. स्थायी सदस्यांच्या मुद्द्यासह आफ्रिका खंडालाही सुरक्षा परिषदेच्या स्थायी-अस्थायी अशी दोन्ही गटात योग्य प्रतिनिधित्व द्यायला समर्थन मिळवण्यासाठी आणि सामुहीक अत्याचाराच्या बाबतीत व्हेटोचा म्हणजेच विशेषाधिकाराचा वापर रोखण्यासाठी, वाटाघाटीचे प्रयत्न सुरू राहतील.

5.3 विकास आणि पर्यावरणाच्या बाजूने भरभक्कम कार्यवाही करण्यासाठी, नवीन जागतिक आर्थिक करारासाठी झालेल्या शिखर परिषदेनंतर, जगापुढे आलेल्या पॅरीस अजेंड्याला (पॅरीस कराराला), भारत आणि फ्रान्स यांचा पाठिंबा आहे.

6) विज्ञान, तंत्रज्ञानातील नवोन्मेष आणि शैक्षणिक सहकार्य या बाबी म्हणजे दोन्ही देशांमधील विकास आणि स्वावलंबित्वाचे प्रतिक बनवण्याच्या कार्यात, दोन्ही देशांनी एकत्रित प्रयत्न करणे 

6.1 भारत आणि फ्रान्स आपापल्या देशांमधील क्षेत्रात, नवंउद्योग (स्टार्टअप्स) आणि नवोन्मेषी परिसंस्थांचे केंद्रबिंदू आहेत, नववीन कल्पनांचे उद्गाते, प्रोत्साहनकर्ते आणि पोषणकर्ते म्हणून काम करतात, करत राहतील. 21 व्या शतकातील समस्या सोडवण्यात तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका मान्य करुन, दोन्ही देश, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी विद्यमान भागिदारी मजबूत करण्याकरता आणि स्वावलंबित्व मजबूत करण्याकरता, एकमेकांना गाढे सहकार्य करण्यासाठी सहमत आहेत.

6.1.1 वैज्ञानिक सहकार्य: भारत आणि फ्रान्सने विज्ञान क्षेत्रात आपली धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याची गरज ओळखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती वेळोवेळी, सर्वसाधारण आणि प्राधान्यक्रमाने राबवण्यासाठीच्या संकल्पनांच्या प्रकल्पांबाबत, फ्रेंच राष्ट्रीय संशोधन संस्था-ANR ची सज्जता  वाढवण्याचे आवाहन करते. (उदाहरणार्थ, अंतराळ, डिजिटलीकरण, ऊर्जा, लष्करी रणनीती, पर्यावरण, शहर सुधारणा, आरोग्य यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये, ANR महत्त्वाची भूमिका बजावते.) याचबरोबर, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांना लक्षणीयरीत्या मजबूत करून, विशेषत: इंडो-फ्रेंच सेंटर फॉर द ऑन प्रमोशन ऑफ अॅडव्हान्स रिसर्च (CEFIPRA) वर आणि दोन्ही देशांनी आदानप्रदान केलेल्या साधनसंपत्तीवर देखील, आपापसातील  चर्चा आणि सल्लामसलतीच्या माध्यमातून, या समितीचे भक्कम नियंत्रण असेल.

6.1.2 महत्वपूर्ण तंत्रज्ञान: 2019 मध्ये स्वीकारलेल्या सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञानावरील इंडो-फ्रेंच ब्लूप्रिंटच्या आधारावर, भारत आणि फ्रान्स प्रगत डिजिटल तंत्रज्ञानामध्ये महत्त्वाकांक्षी द्विपक्षीय सहकार्याचा पाठपुरावा करत आहेत. यामध्ये विशेषत: सुपर कॉम्प्युटर्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम टेक्नॉलॉजीज, तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरील ग्लोबल पार्टनरशिप पॉलिसीचा- GPIA चा अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीची जागतिक भागिदारी धोरणाचा  समावेश आहे. दोन्ही देश, डिजिटल तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकास, नवोन्मेष, आणि औद्योगिक अनुप्रयोगांमध्ये आपापसातील सहकार्य मजबूत करतील. या व्यतिरिक्त, हवामान बदल आणि आरोग्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी या तंत्रज्ञानाच्या सक्रीय वापरावर लक्ष केंद्रीत केले जाईल.

6.1.3 - आरोग्य सहकार्य:-  भारत आणि फ्रान्स आरोग्य आणि वैद्यक क्षेत्रात एकमेकांमध्‍ये  सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी सहमत झाले आहेत. याची  पहिली पायरी म्हणून, त्यांनी आरोग्य आणि औषधोपचार  क्षेत्रातील सहकार्याच्या निवेदनावर   स्वाक्षरी केली आहे. डिजिटल आरोग्य, आरोग्‍य दक्षता  यासाठी एआय म्हणजे कृत्रिम प्रज्ञेचा वापर करणे, वैद्यकीय कच-याची विल्हेवाट, त्यावर प्रक्रिया करण्‍याचे  तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, यासाठी एक विशिष्‍ट  आरोग्य दृष्टीकोन समोर ठेवून  नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्याचा आधार प्रदान करते. प्रतिजैविक प्रतिकार, वैद्यकीय डॉक्टरांची देवाणघेवाण आणि त्यांना प्रशिक्षण देणे,  भारत आणि फ्रान्स आरोग्य आपत्कालीन परिस्थिती प्रतिबंध, सज्जता आणि प्रतिसाद यावरही उभय देश  सहकार्य करतील. दोन्ही देश डिजिटल आरोग्य  तंत्रज्ञानासोबतच औषध निर्माण शास्त्र क्षेत्र, मनुष्‍य बळ विकास  आणि कौशल्य क्षेत्रातही आपले सहकार्य मजबूत करतील.

6.1.4 – ‘इंडो-फ्रेंच कॅम्पस फॉर हेल्थ’ :-  इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी आरोग्यावरील ‘इंडो-फ्रेंच कॅम्पस’या उपक्रमाने  2022 मध्ये केलेल्या  प्रगतीचे भारत आणि फ्रान्सने स्वागत केले.हा उपक्रम  इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील  देशांसाठी मुक्त आहे.  फ्रान्स आणि  फ्रान्सचा प्रांत असलेला रेयूनियों या बेटावरील अनेक विद्यापीठे एकत्रितपणे भारतीय संस्थांबरोबर भागीदारी करू शकतात. आमच्यासाठी  हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प  आहे. या इंडो-पॅसिफिक रणनीतीच्या  केंद्रस्थानी युवा, संशोधन कार्य आहे. तसेच यामध्‍ये युवकांची जडणघडण होणार आहे. हा प्रकल्प आरोग्य क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी एक महत्वाचे साधन आणि प्रादेशिक स्तरावर विद्यापीठे आणि संशोधनासाठी आकर्षणाचा केंद्र  बनला पाहिजे. असा विचार यामागे आहे. या  कार्यक्रमांतर्गत, आरोग्य क्षेत्रात ‘ड्युअल मास्टर डिग्री प्रोग्राम’ म्हणजे व्दिपदवी घेण्‍यासाठी कार्यकम तयार करण्यासाठी चार प्रकल्पांना सहाय्य केले जात आहे.  यामध्‍ये सॉर्बोन विद्यापीठ-आयआयटी दिल्ली यांनी या  कार्यक्रमात आधीच सहयोगी संशोधन प्रकल्प सुरू केले आहेत. विशेषत: कर्करोगावर  अभ्यास- संशोधन,  न्यूरोसायन्स  म्हणजेच मज्जातंतू विज्ञान,  जैवतंत्रज्ञान आणि जैव वैद्यकीय अभियांत्रिकी यांच्यामध्‍ये संशोधन सुरू केले आहे; आणखी काही विषयांवरही कार्य  सुरू होईल.

इन्स्टिट्यूट पाश्चर आणि इंडियन कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) यांच्यामध्‍ये  जानेवारी 2022 मध्ये स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारातही आता  चांगली प्रगती दिसून आली आहे.  उभय  बाजूने  हैदराबादमध्ये पाश्चर केंद्र स्थापन करण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे.

6.1.5 - सायबर सहकार्य:-  भारत आणि फ्रान्सने द्विपक्षीय संबंधांमध्ये सायबरस्पेसच्या वाढत्या धोरणात्मक महत्त्वाची पुष्टी केली आणि सायबर सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी द्विपक्षीय सायबर संवादाची भूमिका अधोरेखित केली. पहिल्या आणि तिसऱ्या समित्यांमध्ये प्रगतिपथावर असलेल्या यूएन सायबर प्रक्रियेबद्दल दोन्ही देशांनी एकमेकांच्या विचारांची प्रशंसा केली आणि परस्पर हितसंबंधांच्या बाबींवर एकत्र काम करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे स्पष्‍ट केले.  दोन्ही देशांनी सध्याची  पहिली  समिती 2021-2025  ‘ओपन-एंडेड वर्किंग ग्रुप’च्या चर्चेला पाठिंबा देण्यासाठी संयुक्तपणे काम करण्यासाठी  सहमती दर्शवली.  ज्यामध्ये आयसीटीच्या वापरामध्ये जबाबदार कार्यपद्धती तयार करण्‍यासाठी कृती कार्यक्रमाच्या संभाव्य स्थापनेचा समावेश आहे. दोन्ही देशांनी सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, प्रतिकार करणे, गुन्हे कमी कसे होतील हे पाहणे, तपास करणे आणि खटला चालवणे यासाठी प्रभावी आणि कार्यक्षम आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आराखड्याखाली गुन्हेगारी हेतूंसाठी आयसीटीचा वापर रोखण्यासाठी एक व्यापक आंतरराष्ट्रीय करार तयार करण्यासाठी एकमेकांनी  एकत्रित  काम करण्याचे मान्य केले. सायबर गुन्ह्यांमध्‍ये पीडितांना जलद न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे.  सायबर स्पेसमध्ये उत्पन्न होत असलेल्या नवनवीन  सायबर धोक्यांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सायबर क्षेत्रामध्‍ये पायाभूत सुविधांची लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी आणि सायबर सज्जता वाढवण्यासाठी भारताने क्षमता निर्माण करण्याच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला. दोन्ही देशांनी सर्वोत्कृष्ट पद्धती, माहितीची देवाणघेवाण, राष्ट्रीय सायबर सुरक्षा रणनीती आणि सायबर धोक्याच्या क्षेत्रांमध्‍ये होत घडामोडींवर लक्ष ठेवण्‍यास सहमती दर्शवली.

6.1.6 - डिजिटल नियमन:-  भारत आणि फ्रान्स -  हे  उभय देश , फ्रेंच संस्था जसे की, सीएनआयएल, फ्रेंच डेटा संरक्षण प्राधिकरण आणि संबंधित भारतीय समकक्ष यांच्यातील संवादाला प्रोत्साहन देतात. युरोपियन स्तरावर, उभय देश डिजिटल नियमन आणि डेटा गोपनीयतेवर युरोपियन युनियनशी संयुक्त  चर्चेचे समर्थन करतात.  माहिती आणि लोकशाहीच्या दृष्‍टीने  भागीदारीच्या उद्दिष्टांचे उभय देश समर्थन करतात.

6.1.7-  डिजिटल तंत्रज्ञानावर सहकार्य: -  भारत आणि फ्रान्स डिजिटल तंत्रज्ञानातील वेगवान  प्रगती आणि परिवर्तन यांच्याविषयी जाणून आहेत.   डिजिटलायझेशनच्या त्यांच्या दृष्टिकोनांमध्ये त्यांच्या संबंधित सामर्थ्यांचा आणि तात्विक अभिसरणाचा उपयोग करण्यास सहमत आहेत. दोन्ही देश डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा, स्टार्ट अप, एआय, सुपरकॉम्प्युटिंग, 5 जी / 6 जी दूरसंचार आणि डिजिटल कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रात आपले सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध आहेत.

  • सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञानावरील ‘इंडो-फ्रेंच रोड मॅप’ च्या अनुषंगाने, भारत आणि फ्रान्स शांततापूर्ण, सुरक्षित आणि मुक्त सायबर स्पेसला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या सायबर-सुरक्षा एजन्सी आणि संबंधित परिसंस्थेबरोबर भागीदारी करण्‍यासाठी सहभागी  होईल,  या वचनबद्धतेची पुष्टी केली जात आहे.
  • नवोन्मेषी कल्पना, रोजगार निर्मिती आणि आर्थिक वृद्धीमध्ये स्टार्ट-अपची दूरगामी क्षमता ओळखून, दोन्ही देश आपापल्या स्टार्ट अप आणि उद्योजकीय नेटवर्कमधील वर्धित कनेक्टिव्हिटीद्वारे द्विपक्षीय सहकार्य सुलभ करण्यासाठी त्यांच्या सामायिक वचनबद्धतेवर भर देतात. 2022 मध्ये ‘विवाटेक’ मध्ये वर्षातील पहिला देश म्हणून भारताचा सहभाग आणि त्यानंतर यावर्षी लक्षणीय प्रमाणात सहभाग, डिजिटल युगातील भारताची अद्वितीय भूमिका आणि स्थान आणि डिजिटल डोमेनमधील जागतिक नेतृत्वासाठी भागीदार म्हणून त्याचे सखोल मूल्य प्रतिबिंबित करते.
  • डिजिटल शतकामध्‍ये  आपआपल्या देशांतील नागरिकांसाठी  उत्तम परिसंस्था निर्माण करणे, ती अधिक कार्यक्षम ठरावी, यासाठी   नागरिकांना सक्षम बनविणे तसेच   त्यांचा पूर्ण सहभाग सुनिश्चित करण्यासाठी,  सहयोग निर्माण करण्यासाठी भारत आणि फ्रान्स  वचनबद्ध आहेत. या भावनेने, गेल्या आठवड्यात, एनपीसीआय  इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड (एनआयपीएल) आणि फ्रान्सच्या ‘लिरा कलेक्ट’  यांनी फ्रान्स आणि युरोपमध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) लागू करण्यासाठी करार केला. पेमेंट यंत्रणा प्रत्यक्ष कार्यरत होण्‍याच्या दृष्‍टीने पूर्ण होत असून, हे कार्य आता  शेवटच्या टप्प्यात आहे आणि यूपीआय स्वीकारणारा   फ्रान्समधील पहिलाव्यापारी    म्हणून पॅरिसमधील आयफेल टॉवर असणार आहे.  सप्टेंबर 2023 पर्यंत येथे यूपीआय प्रत्यक्षात कार्यान्वित होईल.
  • मुक्त, मोफत, लोकशाही आणि सर्वसमावेशक डिजिटल अर्थव्यवस्था आणि डिजिटल समाजांच्या विकासासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (डीपीआय) दृष्टिकोनाच्या सामर्थ्यावर सामायिक विश्वास ठेवून, भारत आणि फ्रान्सने इन्फ्रास्ट्रक्चर्स (इंडिया फ्रान्स स्ट्रक्चर्स) द्वारे प्रगत बहु-भागधारक देवाणघेवाण केली आहे. आणि InFinity (India France Innovation in Information Technology) मंच निर्माण केला आहे.  या दोन डिजिटल परिसंस्थांच्या एकत्रित  येण्यामुळे झालेल्या प्रगतीचा आनंद साजरा करतो आणि डीपीआयमधील या संयुक्त प्रकल्पांचा अनेक क्षेत्रांवर दूरगामी परिणाम कसा होऊ शकतो हे आम्ही ओळखतो. डीपीआय दृष्टिकोन नागरिकांना सक्षम करण्यासाठी, आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनाला प्रेरणा देण्‍यासाठी,  सार्वजनिक सेवांच्या वितरणामध्‍ये  सुधारणा करण्यासाठी आणि सार्वभौम आणि शाश्वत डिजिटल तोडगे काढण्‍यासाठी,  बाजारपेठेतील स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तंत्रज्ञान वापरणे,  बाजार आणि प्रशासनाचा लाभ घेणे,   तसेच शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योगदानदेतो.  संयुक्त डीपीआयच्या  सहकार्यविषयक  प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारत आणि फ्रान्सने ‘मोबिलिटी’, वाणिज्य आणि संस्कृती या  क्षेत्रांमध्ये संभाव्य उच्च-प्रभाव क्षेत्रे ओळखून  , मंचावरील परस्परसंबंधाचे महत्त्वपूर्ण फायदे दर्शविण्यासाठी प्रारंभिक लक्ष्‍य- उद्दिष्‍ट क्षेत्र निश्चित केले   आहे. दोन्ही देश आपआपल्या  देशांमधील अशा सहकार्यांचे स्वागत करतात आणि इंडो-पॅसिफिक, आफ्रिका आणि त्यापलीकडे इतर देशांमध्ये हा दृष्टिकोन घेऊन जाण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्यास वचनबद्ध आहेत.

दोन –  वसुंधरेसाठी भागीदारी

1) आपली हवामानबदल विषयक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ऊर्जा सुरक्षा मजबूत करणे

1.1     भारताचे शहरीकरण आणि औद्योगिकीकरण, ऊर्जा सुरक्षा वाढवणे आणि एसडीजी 7 आणि पॅरिस हवामान कराराची उद्दिष्टे साध्य करणे, या तिहेरी उद्दिष्टांसह भारत आणि फ्रान्स कार्बन उर्त्सजन कमी करण्‍यासाठी आवश्‍यक त्या   अर्थव्यवस्थेच्या दिशेने संक्रमणासाठी मोठ्या प्रमाणावर सहकार्य करत आहेत. पॅरिस कराराची दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ऊर्जा मिश्रणात स्वच्छ स्त्रोतांचा हिस्सा वाढवणे आवश्यक आहे, हे भारत आणि फ्रान्सने ओळखले आहे. ऊर्जा सुरक्षेच्या मुद्द्यांवर एकाच वेळी लक्ष देण्याचे महत्त्व अधोरेखित करून या उद्दिष्टासाठी उभय  देश संयुक्तपणे काम करण्यास वचनबद्ध आहेत. भारत आणि फ्रान्सचा असा विश्वास आहे की,  हवामान बदलाविरूद्धच्या लढ्यात शाश्वत उपाययोजनांमध्ये अणुऊर्जेचा वापराचा समावेश आहे.

1.2     हवामान बदलाविरुद्ध आणि इंडो-पॅसिफिकमधील पर्यावरणाच्या रक्षणासाठी लढा:-  भारत आणि फ्रान्स बहुपक्षीय आणि त्रयस्थ देश  उपक्रमांद्वारे या क्षेत्रातील देशांना शाश्वत विकासाचे  उपाय  देवू करतील, ज्यामध्‍ये  इंडो-पॅसिफिक पार्क भागीदारी, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि सागरी आणि भुपृष्टीय जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी इंडो-पॅसिफिक महासागर पुढाकार (आयपीओआय) इंडो-पॅसिफिक प्रदेशातील संबंधितांना शाश्वत विकासाच्या बाजूने एकत्रित करण्याच्या उद्देशाने त्यांच्या विकास बँकांमधील संवादाचे ते स्वागत करतात (एसयूएफआयपी उपक्रम - इंडो-पॅसिफिकमधील शाश्वत वित्त पुरवठा). भारत आणि फ्रान्स नील अर्थशास्त्र, प्रादेशिक लवचिकता आणि हवामान वित्तसंबंधित मुद्द्यांवर संवाद आणि सहकार्याला प्रोत्साहन देतील. भारत आणि फ्रान्स त्यांच्या नागरी सुरक्षा संस्थांमधील दुवे मजबूत करून आणि विशेषत: आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडीतील त्यांचे ज्ञान, कौशल्य आणि बीज भांडवल - वित्तपुरवठा सामायिक करून नैसर्गिक आपत्ती  आणि हवामान बदल संबंधित आपत्तींचा अंदाज आणि प्रतिसाद देण्यासाठी त्यांचे सहकार्य विकसित करतील.

1.3     इलेक्ट्रोन्युक्लियर:-  जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाशी  (जेएनपीपी) संबंधित चर्चेदरम्यान झालेल्या प्रगतीचे दोन्ही बाजूंनी स्वागत केले. त्यांनी ईपीआर अणुभट्ट्यांसह प्रकल्पांमध्ये तैनातीसाठी भारतातील बांधकाम क्षेत्रातील  अणु अभियंते आणि तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्याच्या ईडीएफच्या प्रस्तावाचे स्वागत केले आणि या संदर्भात लवकरात लवकर करार करण्‍यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘कुशल भारत’ उपक्रमाच्या अनुषंगाने, संबंधित फ्रेंच संस्था अणु क्षेत्रातील प्रशिक्षण बळकट करण्यासाठी आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप सुविधा देण्यासाठी भारतीय समकक्षांसोबत काम करतील. दोन्ही देशांनी कमी आणि मध्यम ‘पॉवर मॉड्युलर’ अणुभट्ट्या किंवा ‘स्मॉल मॉड्युलर’  अणुभट्ट्या (एसएमआर) आणि प्रगत ‘मॉड्यूलर’  अणुभट्ट्या (एएमआर) वर भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी  काम करण्यासही सहमती दर्शवली. हे  दोन्ही देश अणु तंत्रज्ञानाच्या विकासासाठी ‘ज्युल्स होरॉविट्झ रिसर्च रिअॅक्टर’  (जेएचआर) वर त्यांचे सहकार्य चालू ठेवतील आणि त्यांच्यातील देवाणघेवाण वाढवतील.

1.4      डेकार्बोनेटेड हायड्रोजन:-  हरित  हायड्रोजनवरील रोडमॅपचा अवलंब केल्यानंतर, भारत आणि फ्रान्स डेकार्बोनेटेड हायड्रोजन उत्पादन क्षमता आणि नियामक मानकांमध्ये नवकल्पना करण्यासाठी  सहकार्य विकसित करत आहेत. दोन्ही देश ‘ऑपरेशनल सोल्यूशन्स’  अंमलात आणण्यासाठी उभय देशांतील कंपन्यांमधील औद्योगिक भागीदारीला प्रोत्साहन देत आहेत.

1.5     भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश  अक्षय उर्जेच्या वाढीव विकासासाठी वचनबद्ध आहेत. विशेषतः, भारत आणि फ्रान्स त्यांच्या सौर कार्यक्रमांमध्ये तिस-या जगतातील  देशांनीही  सौर ऊर्जेवर भर द्यावा, यासाठी प्रयत्न करीत आहे. यामध्‍ये  ‘STAR-C’ कार्यक्रम आणि सेनेगलमध्ये सौर अकादमीच्या निर्मितीद्वारे समर्थन देण्यासाठी संयुक्त संशोधन आणि विकास कार्यक्रम राबवला जात आहे.  आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये घनिष्ठ सहकार्य आणि सहभागावर हे कार्य अवलंबून आहे.

1.6      भारत आणि फ्रान्स जलविद्युत क्षेत्रामध्‍ये आपले सहकार्य मजबूत करत आहेत आणि दोन्ही देशांमधील व्यावसायिक प्रकल्पांना पाठिंबा देत आहे.  विशेषत: विद्यमान  प्रकल्पांचे नूतनीकरण,प्रवाही नदीवरील विद्युत प्रकल्प   आणि उदंचन साठवण प्रकल्पांसाठी प्रोत्साहन देणे.

1.7     ऊर्जा कार्यक्षमता:-  भारतात आयोजित स्मार्ट सिटी कार्यक्रमांच्या यशावर आधारित ‘इंटेलिजेंट’ वीज नेटवर्क विकसित करण्यासाठी, वीजेचा वापर  कमी  करण्यासाठी, वीज काटकसरीने वापरली जावी आणि इमारती, शहरी, औद्योगिक आणि वाहतूक सुविधांची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना फ्रान्स समर्थन देतो. ऊर्जा डेटा संकलन आणि विश्लेषणातील कौशल्याची देवाणघेवाण करण्यासाठी दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली.

2) हवामान बदल, जैवविविधतेची हानी आणि प्रदूषण अशा  तिहेरी संकटांना संयुक्तपणे जाणून, त्यावर उपाय योजना करणे

2.1 हवामान बदल, पर्यावरणीय प्रदूषण आणि जैवविविधतेचे नुकसान अशा  तिहेरी आव्हानांची जाणीव ठेवून, भारत आणि फ्रान्स परस्परांमधील सहकार्य मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहेत. हवामान बदलाचे परिणाम देखील सार्वजनिक आरोग्यासाठी एक वास्तव धोका  निर्माण करणारे आहे, हे लक्षात घेवून,  भारत आणि फ्रान्स सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात वन हेल्थ’ - ‘एक आरोग्य’  या दृष्टिकोनातून ‘ पीआरईझेडओडीई’  उपक्रमात सहकार्याच्या शक्यता शोधून . द्विपक्षीय करार करण्‍यासाठी सहकार्य करत आहे. यामध्‍ये  साथीच्या रोगांना प्रतिबंध करणे, रूग्णालये आणि औषधनिर्माण क्षेत्रामधील सहकार्य  याचा समावेश आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये स्वीकारलेल्या नील अर्थशास्त्र आणि सागरी प्रशासन या  पथदर्शक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, मत्स्यपालन संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनामध्‍ये  सहयोग आणि सागरी संशोधन आणि तंत्रज्ञानावरील आयएफआरईएमईआर आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या एनआयओटी म्हणजेच राष्‍ट्रीय सागरी तंत्रज्ञान संस्‍था (NIOT/MoES) यांच्यातील करारामुळे सहकार्याची नवीन क्षेत्रे उघडतील. याविषयी जी- 20 समू‍हामध्‍ये 2025 च्या पूर्वीच  ‘महासागर’  या विषयावर  संवाद सुरू करण्यासाठी उभय देशांचे समर्थन असणार आहे.

2.2 हवामान बदल: भारत आणि फ्रान्स अनुक्रमे 2050 आणि 2070 पर्यंत शक्य तितक्या लवकर कार्बन तटस्थता प्राप्त करण्यासाठी त्यांच्या हवामान महत्वाकांक्षा सातत्याने वाढवण्यासाठी वचनबद्ध आहेत.

2.3 शाश्वत इमारती: भारत आणि फ्रान्स हवामान आणि जैवविविधता धोरणांच्या यशस्वीतेसोबतच लोकसंख्येच्या कल्याणासाठी आणि सुरक्षिततेत योगदान देण्यासाठी इमारतींच्या डीकार्बोनायझेशन आणि लवचिकतेचे महत्त्व जाणतात. यादृष्टीने, भारत आणि फ्रान्स महत्त्वाकांक्षी धोरणांची आणि नवीन दृष्टीकोनाची व्याख्या आणि अंमलबजावणीबाबत सहयोग करत आहेत, ज्याचा उद्देश नवीन इमारतींचे बांधकाम आणि विद्यमान इमारतींचे नूतनीकरण जवळपास शून्य उत्सर्जन कार्यक्षमतेसह भविष्यातील हवामानाशी जुळवून घेणे हा आहे. या संदर्भात, भारत आणि फ्रान्स अशा दृष्टीकोनाला चालना देत आहेत जो प्रामुख्याने काटकसर आणि बांधकामातील संसाधन कार्यक्षमता यावर आधारित आहे. हा दृष्टिकोन भारताने स्वीकारलेल्या मिशन LiFE किंवा पर्यावरण अनुकूल जीवनशैलीशी सुसंगत आहे आणि ऑक्टोबर 2022 मध्ये फ्रान्सद्वारे समर्थित आहे.

2.4 चक्राकार अर्थव्यवस्था आणि प्लास्टिक प्रदूषण: प्लास्टिक प्रदूषण समाप्त करण्यासाठी नवीन कायदेशीर बंधनकारक आंतरराष्ट्रीय उपकरणाच्या चालू वाटाघाटींमध्ये भारत आणि फ्रान्स सक्रियपणे सहभागी आहेत. एकल वापराच्या प्लास्टिक प्रदूषणाच्या निर्मूलनासाठी भारत-फ्रेंच वचनबद्धतेमध्ये नवीन देशांना सामील करण्यासाठी भारत आणि फ्रान्स काम करत आहेत.

2.5 जैवविविधतेचे नुकसान: भारत आणि फ्रान्सने कुनमिंग-मॉन्ट्रियल जागतिक जैवविविधता आराखड्याच्या (KMGBF) जागतिक स्वरूपातील ध्येय आणि उद्दिष्टांचे महत्त्व तसेच राष्ट्रीय परिस्थिती, प्राधान्यक्रम आणि क्षमतांनुसार त्यांची प्रभावी अंमलबजावणी जाणली आहे. भारत आणि फ्रान्स इंडो-पॅसिफिक पार्क्स पार्टनरशिप (I3P) ची अंमलबजावणी सुरू ठेवत आहेत. जैवविविधतेची हानी आणि महासागरातील परिसंस्थेचा ऱ्हास याला सुसंगत आणि सहकार्याने संबोधित करण्यासाठी राष्ट्रीय अधिकार क्षेत्राच्या (BBNJ) पलीकडील सागरी जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत वापरावरील कराराचे भारत आणि फ्रान्स स्वागत करतात.

3) भारतातील शहरी आणि पर्यावरणीय संक्रमण तसेच सामाजिक समावेशनाला पाठिंबा

3.1 शहरी स्थित्यंतर यशस्वीपणे साध्य करण्यासाठी फ्रान्सला आपल्या कौशल्य, त्याच्या कंपन्या आणि फ्रेंच विकास संस्थेद्वारे (AFD) आपला पसंतीचा भागीदार बनवण्याचा भारताचा मानस आहे.

3.2 एकात्मिक कचरा व्यवस्थापन: भारत आणि फ्रान्स एकात्मिक कचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून, कचरा संकलन आणि वाहतूक, कचऱ्यातून संपत्तीच्या उपायांच्या बळकटीकरणासह शहरांद्वारे द्रव आणि घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यासह चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देऊन शहरांना समर्थन देण्यासाठीच्या उपायांवर त्यांचे सहकार्य मजबूत करत आहेत. नवोन्मेष, एकात्मिकता आणि शाश्वतता यासाठी शहरी गुंतवणूक (CITIIS 2.0) कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपायांना चालना देईल. CITIIS 2.0 चे उद्दिष्ट राज्य स्तरावर हवामान प्रशासनाला प्रोत्साहन देणे आणि महानगरपालिका कार्यकर्त्यांची क्षमता बांधणी हे आहे.

3.3 वाहतूक आणि शहरी गतिशीलता: भारत आणि फ्रान्स रेल्वे क्षेत्रातील त्यांचे सहकार्य मजबूत करून आणि विशेषत: अहमदाबाद आणि सुरतमध्ये उभारलेल्या प्रकल्पांसारख्या शहरी भागात, गतिशीलतेच्या समस्या सोडवण्यासाठी नवीन उपाय शोधून, वाहतुकीवर संवाद वाढवत आहेत.

3.4 सामाजिक समावेशन: भारत आणि फ्रान्स अधिक समावेशक आणि पर्यावरणस्नेही विकासाला चालना देण्यासाठी आणि महिला आणि असुरक्षित लोकसंख्येच्या आर्थिक समावेशात योगदान देणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्राधान्य विकास क्षेत्रांच्या विकासाला चालना देण्यासाठी उत्सुक आहेत, जसे की भारतीय निधी (अन्नपूर्णा, इंडसइंड बँक, निओग्रोथ) द्वारे पाठबळ लाभलेले आणि प्रोपार्को समर्थित प्रकल्प.

4) शाश्वत वाढ आणि कमी कार्बन ऊर्जेकडे संक्रमण करण्याच्या दृष्टीकोनातून आपल्या दोन देशांमधील व्यापार मजबूत करणे आणि गुंतवणूक सुलभ करणे.

4.1 अधिक लवचिक मूल्य शृंखला विकसित करणे हे भारत आणि फ्रान्समधील एक समान उद्दिष्ट आहे ज्यासाठी ते या विषयावर योग्य परिस्थिती आणि धोरण विनिमय तयार करून सुविधा देतील.

4.2 व्यापार: भारतीय आणि फ्रेंच निर्यातदार आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या संबंधित बाजारपेठांमध्ये, विशेषत: द्विपक्षीय फास्ट ट्रॅक प्रक्रियेच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी शक्य तितक्या लवकर सोडवण्यासाठी भारत आणि फ्रान्स त्यांचे द्विपक्षीय संवादावर अधिक भर देत आहेत.

4.3 उभयपक्षी -गुंतवणूक: भारत आणि फ्रान्स हे विशेषत: भारतातील फ्रेंच गुंतवणूकदारांची उपस्थिती आणि फ्रान्समधील भारतीय गुंतवणूकदारांची उपस्थिती वाढवण्याच्या उद्देशाने भारतीय आणि फ्रेंच कंपन्यांना त्यांचे संबंध मजबूत करण्यासाठी आणि दोन्ही देशांमध्ये उपक्रम विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करतात. यासाठी, इन्व्हेस्ट इंडिया आणि बिझनेस फ्रान्सने फ्रान्स आणि भारतातील गुंतवणूकदारांना एकमेकांच्या अर्थव्यवस्थेत सुविधा देण्याकरिता सहकार्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे.

III - जनभागीदारी

1) विशेषत: तरुणांच्या फायद्यासाठी देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे

1.1 विद्यार्थी, पदवीधर, शैक्षणिक, संशोधक, व्यावसायिक आणि कुशल कामगार यांची गतिशीलता वाढविण्याच्या दिशेने आमची सामायिक वचनबद्धता साकार करण्यासाठी 2021 मध्ये अंमलात आलेला स्थलांतर आणि गतिशीलता वरील भागीदारी करार एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारत आणि फ्रान्स पर्यटकांच्या ओघाला चालना देऊन आणि खासगी क्षेत्र आणि व्यावसायिक समुदायासाठी व्हिसा जारी करण्याच्या सुविधेद्वारे लोकांचे परस्परांमधील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यास समर्थन देतात. भारत आणि फ्रान्स परस्पर आधारावर, अधिकृत पासपोर्ट धारकांसाठी कमी कालावधीच्या मुक्कामासाठी व्हिसा सूट देतील आणि 2026 मध्ये या सवलतीच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करतील. याव्यतिरिक्त, दोन्ही देशांमधील कौशल्य देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी ते पदविका आणि व्यावसायिक पात्रता यांच्या परस्पर मान्यतांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांवर संयुक्तपणे काम करतील.

1.2 दोन्ही देश व्यावसायिक आणि भाषा प्रशिक्षणामध्ये सहकार्य मजबूत करण्यासाठी उच्च शिक्षण संस्था, संशोधन केंद्रे आणि खासगी कंपन्या यांच्यातील भागीदारी विकसित करण्यास प्रोत्साहन देतील. ते भाषिक सहकार्यासाठी प्रयत्नांना पुनरुज्जीवित करतील, भारतीय शाळांमध्ये फ्रेंच भाषेच्या अध्यापनाच्या विकासास प्रोत्साहन देतील, भाषा शिक्षकांच्या देवाणघेवाणीला आणि प्रशिक्षणाला प्रोत्साहन देतील आणि विनिमय कार्यक्रमांसाठी व्हिसा सुविधेला समर्थन देतील. असे प्रयत्न एकमेकांच्या भाषा शिकवण्याला दिलेले महत्त्व अधोरेखित करतात आणि उभय देशात आदानप्रदानाला चालना देण्यासाठी भाषा महत्त्वाची भूमिका बजावतात.

1.3 विद्यार्थ्यांचे आदानप्रदान: भारत आणि फ्रान्स त्यांचे शैक्षणिक संबंध मजबूत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहेत. विशेषत: विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्राधान्य क्षेत्रांमधील संशोधकांच्या आदानप्रदानासाठी तसेच इंडो-फ्रेंच कॅम्पस ऑन हेल्थ फॉर द इंडो-पॅसिफिक मॉडेल वरील संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रमांच्या विकासाला भारत आणि फ्रान्स प्रोत्साहन देतील. भारतीय माजी विद्यार्थ्यांचा समुदाय तयार करण्यासाठी, ज्या भारतीयांनी फ्रान्समध्ये किमान एका सेमिस्टरसाठी शिक्षण घेतले आहे त्यांच्यासाठी फ्रान्स पाच वर्षांच्या वैधतेचा शेंजेन व्हिसा जारी करेल, जर ते फ्रेंच विद्यापीठ प्रणालीद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठात पदव्युत्तर पदवी स्तरावर पोहोचले असतील आणि शेंगेन आवश्यकतांचे पालन पूर्णपणे स्वीकार्य असेल.

2025 पर्यंत 20,000 भारतीय विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याच्या आणि 2030 मध्ये ही महत्त्वाकांक्षा 30,000 पर्यंत वाढवण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षेला फ्रान्सने दुजोरा दिला. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, फ्रान्समधील अध्ययनासाठी फ्रान्स प्रोत्साहन देईल आणि भारतातील या प्रचारासाठी समर्पित कर्मचारी वाढवेल. फ्रेंच विद्यापीठे आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये "आंतरराष्ट्रीय वर्ग" देखील फ्रान्स तयार करेल, जिथे भारतीय विद्यार्थ्यांना फ्रेंच भाषा आणि शैक्षणिक विषयांचे प्रशिक्षण दिले जाईल. ते नंतर त्यांना फ्रेंच भाषेतील पदवीधर कार्यक्रमात सामील होण्याची परवानगी देईल. फ़्रेंच सरकार असे वर्ग सुरू करण्याचा प्रयोग करेल तर अशा वर्गांना भारत सरकार भारताच्या माध्यमिक शिक्षण प्रणालीमध्ये प्रोत्साहन देईल.

1.4 आमच्या नागरी समाजांमधील शाश्वत देवाणघेवाण: भारत आणि फ्रान्स आमच्या नागरी समाज, विशेषतः फ्रान्स-इंडिया फाऊंडेशन आणि भारतातील अलायन्स फ्रॅन्सेसेस नेटवर्कसह भविष्यातील कार्यक्रमांच्या व्यक्तिमत्त्वांच्या आदानप्रदानाला सक्षम करणार्‍या संरचना आणि यंत्रणा मजबूत करत राहतील. भारतातील फ्रेंच स्वयंसेवकांची संख्या दुप्पट करण्यासाठी आणि 2025 पर्यंत फ्रान्समधील भारतीय स्वयंसेवकांची संख्या पाचपट करण्यासाठी "आंतरराष्ट्रीय एकता स्वयंसेवी आणि नागरी सेवा" योजनेद्वारे उभय देशात संभव असलेल्या युवा आदानप्रदानाला भारत आणि फ्रान्स प्रोत्साहन देतात.

2) आपल्या संस्कृतींमधील नियमित संवादाला प्रोत्साहन देणे

2.1 आमचे दोन्ही देश आता सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी मूलभूत कार्यक्रम सुरू करू इच्छितात आणि आमच्या सर्जनशील उद्योगांना समीप आणण्याच्या क्षमतेचा पूर्ण फायदा घेऊ इच्छितात:

2.2 संग्रहालये आणि वारसा क्षेत्रात सहकार्य: समृद्ध संस्कृती आणि इतिहासाने संपन्न राष्ट्रे म्हणून, भारत आणि फ्रान्स त्यांचा वारसा प्रदर्शित करण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांना तो हस्तांतरित करण्यासाठी त्यांचे संयुक्त कार्य अधिक वाढवतील. नॅशनल म्युझियम ऑफ इंडिया प्रकल्पासाठी लेटर ऑफ इंटेंट अर्थात स्वारस्य पत्रावर स्वाक्षरी केल्याबद्दल भारत आणि फ्रान्स कडून संतोष व्यक्त होत आहे. फ्रान्स भारताला मोठ्या सांस्कृतिक प्रकल्पांच्या विशेषत: ग्रँड लूवरच्या अनुभवाचा लाभ देऊ करेल. पुरातत्वीय पुरातन वास्तू, चित्रे, नाणकशास्त्र, सजावटीच्या कला इत्यादींचे प्रदर्शन, साठवण आणि प्रदर्शनासाठी तरतूद करण्यासाठी वारसा इमारतीचे रेट्रो-फिटिंग हे ग्रँड लूवरने  उदाहरण दिले आहे आणि हे राष्ट्रीय संग्रहालय प्रकल्पासाठी योग्य विषय अध्ययन असेल.

2.4 सिनेमा: युरोपमधील सर्वात मोठी चित्रपट बाजारपेठ असलेला फ्रान्स आणि जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्माता असलेला भारत, त्यांच्या निर्मितीच्या निर्यातीला, त्यांच्या दृकश्राव्य सह-निर्मिती करारांतर्गत सह-निर्मितीची सुविधा आणि चित्रीकरणासाठी त्यांच्या देशात आकृष्ट होण्याच्या प्रचाराला समर्थन देत आहेत.

2.5 कलात्मक आणि साहित्यिक सहकार्य: भारत आणि फ्रान्स आपल्या उभय देशांमधील व्यावसायिक आणि कलाकारांच्या आदानप्रदानाची वाढीव पातळी सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट सामायिक करतात. 3 मार्च 2023 रोजी उद्घाटन झालेल्या व्हिला स्वागतमच्या मॉडेलवर, वसतिस्थानांमध्ये दीर्घकालीन वास्तव्याला प्राधान्य देऊन, शाश्वत विकासाच्या तर्काच्या बाजूने केवळ घटना तर्कशास्त्राच्या पलीकडे जाण्याचा त्यांचा मानस आहे. भारतभर पसरलेल्या 16 विद्यमान वसतिस्थानांपैकी सर्वोत्तम फ्रेंच प्रतिभावान एकत्रित आणणारे व्हिला स्वागतम हे वसतिस्थानांचे एक नेटवर्क आहे. असे केल्याने, फ्रान्सला फ्रेंच कलाकार आणि लेखकांचा एक समुदाय तयार करण्याची इच्छा आहे जी भारताचा समृद्ध ठेवा आणि इतिहासातून शिकतील. भारत आणि फ्रान्स 2035 पर्यंत दोन्ही देशांमध्ये 300 व्हिला स्वागतम नामांकित मिळवण्यासाठी वचनबद्ध आहेत. भारताची ललित कला अकादमी (LKA) भारतीय कलाकारांना फ्रान्समधील उत्सवांमध्ये सहभागी होण्यासाठी मदत करत आहे आणि फ्रान्समधील लोकांमध्ये भारतीय कलात्मक परंपरांबद्दल व्यापक रूची निर्माण करण्याच्या दृष्टीने हे समर्थन सुरू ठेवेल.

2.6 भाषिक सहकार्य: विशेषत: अभ्यासक्रमात मदत करून आणि भारतीय खासगी आणि सरकारी शाळांमध्ये अध्यापन शैक्षणिक साहित्य तसेच वयोगटानुसार पाठ्यपुस्तकांची तरतूद करून भारत आणि फ्रान्स भारतातील अलायन्स फ्रॅंसीसेस नेटवर्क विकसित करण्यासाठी आणि फ्रेंच भाषा शिकवण्याच्या कार्यक्रमांच्या विकासास प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहेत. ते भारतात अलायन्स फ्रॅंसीसेस नेटवर्कमध्ये 50,000 विद्यार्थ्यांचे लक्ष्य गाठण्यासाठी वचनबद्ध आहेत. तसेच, भारतीय भाषा आणि प्राचीन भारतीय लिपींना फ्रान्समध्ये शालेय आणि उच्च शिक्षणात प्रोत्साहन दिले जाऊ शकते, ज्यासाठी भारतातील विशेष शैक्षणिक आणि भाषिक संस्थांचे सहकार्य घेतले जाऊ शकते.

2.7. फ्रान्सने भारताला ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल दे ला फ्रँकोफोनी या फ्रॅन्कोफोन देशांचे आणि प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्था आणि फ्रेंच संस्कृतीशी मजबूत संबंध असलेल्या संघटनांमध्ये सामील होण्याचा विचार करण्यास प्रोत्साहित केले. फ्रान्सच्या निमंत्रणाचे भारताने स्वागत केले आहे.

2.8. पॅरिसमध्ये 2024 ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांसाठी केंद्रस्थानी असणाऱ्या क्रीडा आणि निरोगी जीवनाच्या मूल्यांना भारत आणि फ्रान्स समर्थन देतात. यासाठी, उभय देश क्रीडा क्षेत्रातील सहकार्याच्या स्वारस्य पत्रावर स्वाक्षरी करण्याचे स्वागत करतात जे भारतीय खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षणात आणि भविष्यातील प्रमुख क्रीडा स्पर्धांच्या तयारीसाठी मदत करेल.

2.9. भारत आणि फ्रान्स मधील लोकांचे परस्पर संबंध वाढवण्यासाठी आणि विशेषतः वाणिज्य दूतावासाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि फ्रान्सच्या दक्षिणेकडील व्यावसायिक संबंध मजबूत करण्यासाठी, भारत मार्सेलमध्ये आपले वाणिज्य दूतावास उघडेल, फ्रान्सने हैदराबादमध्ये "ब्यूरो डी फ्रान्स" उघडले आहे.

या महत्त्वाकांक्षी आराखड्याद्वारे, भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी ही सहकार्याच्या नवीन क्षेत्रांमध्ये अधिक वैविध्यपूर्ण होईल आणि सामायिक हिताच्या विद्यमान कार्यक्रमांना देखील सखोल करेल.

 

* * *

Tupe/JPS/Thakur/Ashutosh/Suvarna/Vasanti/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1945815) Visitor Counter : 244