पंतप्रधान कार्यालय
हिंद-प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेत पंतप्रधानांचे समारोपाचे भाषण
Posted On:
22 MAY 2023 4:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2023
महामहिम,
तुमच्या विचारांबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या चर्चेतून पुढे आलेल्या कल्पनांचा आम्ही निश्चितपणे विचार करू. आपले काही सामायिक प्राधान्यक्रम आहेत आणि प्रशांत द्वीपसमूह देशांच्या गरजा आहेत. दोन्ही पैलू लक्षात घेऊन पुढे जाण्याचा आमचा या व्यासपीठावरचा प्रयत्न आहे. FIPIC मधील आपले सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी, मी काही घोषणा करू इच्छितो:
- प्रशांत क्षेत्रात आरोग्य सेवेला चालना देण्यासाठी, आम्ही फिजीमध्ये एक सुपर-स्पेशालिटी कार्डिओलॉजी रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हे रुग्णालय प्रशिक्षित कर्मचारी, आधुनिक सुविधा आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असेल आणि ते संपूर्ण प्रदेशासाठी जीवनरेखा म्हणून काम करेल. या हरितक्षेत्र महाप्रकल्पाचा संपूर्ण खर्च भारत सरकार उचलणार आहे.
- भारत सर्व 14 प्रशांत द्वीपसमूह देशांमध्ये डायलिसिस युनिट्स उभारण्यासाठी मदत करेल.
- सर्व 14 प्रशांत द्वीपसमूह देशांना सागरी रुग्णवाहिका पुरविल्या जातील.
- 2022 मध्ये, आम्ही फिजीमध्ये जयपूर फूट शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात 600 हून अधिक लोकांना कृत्रिम अवयव मोफत पुरवण्यात आले. मित्रांनो, ही भेट घेणाऱ्यांना जीवनदान मिळाल्यासारखे वाटते.प्रशांत द्वीपसमूह देशांसाठी, आम्ही यावर्षी पापुआ न्यू गिनी येथे जयपूर फूट शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 2024 पासून दरवर्षी अशी दोन शिबिरे प्रशांत द्वीपसमूह देशांमध्ये आयोजित केली जातील.
- भारतात जनऔषधी योजनेद्वारे, 1800 हून अधिक उच्च-गुणवत्तेची जेनेरिक औषधे लोकांना परवडणाऱ्या दरात पुरवली जात आहेत. उदाहरणार्थ, बाजारातील किमतींच्या तुलनेत मधुमेहविरोधी औषधे जनऔषधी केंद्रांवर 90% कमी दरात उपलब्ध आहेत. या केंद्रांवर इतर औषधे देखील बाजार किमतीच्या 60% ते 90% पर्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत, मी तुमच्या देशांमध्ये अशीच जनऔषधी केंद्रे आणण्याचा प्रस्ताव देतो.
- वैज्ञानिक अभ्यासातून असे आढळून आले आहे की, मधुमेहासारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्यासाठी योग अत्यंत प्रभावी ठरू शकतो. योगाच्या फायद्यांचा प्रचार करण्यासाठी आम्ही तुमच्या देशांमध्ये योग केंद्रे स्थापन करण्याचा प्रस्ताव देतो.
- पापुआ न्यू गिनी ( PNG) मधील माहिती आणि तंत्रज्ञानासाठीचे (IT) सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये सुधारणा केल्या जातील आणि ते"प्रादेशिक माहिती तंत्रज्ञान आणि सायबरसुरक्षा हब" मध्ये रूपांतरित केले जाईल.
- फिजीच्या नागरिकांसाठी 24x7 इमर्जन्सी हेल्पलाइन स्थापन केली जाईल आणि सर्व पॅसिफिक बेटांवरच्या (PIC) देशांमध्ये अशीच सुविधा उभारण्यात मदत करायला आम्हाला आनंद होईल.
- मी प्रत्येक पॅसिफिक बेटावरील देशात एसएमई क्षेत्राच्या विकासासाठी एक प्रकल्प जाहीर करतो. या योजनेअंतर्गत, यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाचा पुरवठा केला जाईल आणि या प्रकल्पांची क्षमता वाढविण्यासाठी क्षमता-निर्माण कार्यक्रम आयोजित केले जातील.
- पॅसिफिक बेटांवरील प्रत्येक देशातल्या मुख्यालयाला सौरऊर्जेवर चालणाऱ्या निवासस्थानांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रकल्पाला तुम्हा सर्वांचा चांगला प्रतिसाद लाभला. आता आम्ही सर्व एफआयपीआयसी (FIPIC) देशांमध्ये किमान एका सरकारी इमारतीचे सौरऊर्जेवर चालणाऱ्या इमारतीत रूपांतर करणार आहोत.
- पाणी टंचाईच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी, मी पॅसिफिक बेटावरील प्रत्येक देशाच्या लोकांसाठी पाण्याचे पृथक्करण करणारे संयंत्र प्रदान करण्याचे वचन देतो.
- क्षमता वाढीसाठी आमची दीर्घकालीन वचनबद्धता कायम ठेवत, मी आज पॅसिफिक बेट देशांसाठी "सागर अमृत शिष्यवृत्ती" योजना जाहीर करत आहे. या कार्यक्रमांतर्गत पुढील पाच वर्षांत 1000 आयटीइसी (ITEC) प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.
महोदय,
आज, मी येथे माझे बोलणे संपवत आहे. मला या मंचाबद्दल विशेष आत्मीयता आहे. हा मंच सीमेच्या बंधनांना आव्हान देतो आणि मानवी सहकार्याची अमर्याद क्षमता ओळखतो. आणि आज येथे उपस्थित राहिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले मनापासून आभार व्यक्त करतो.
मला आशा आहे की, पुढच्या वेळी आम्हाला भारतात तुमचे स्वागत करण्याची संधी मिळेल.
धन्यवाद!
* * *
S.Bedekar/S.Kane/V.Yadav/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1926337)
Visitor Counter : 138
Read this release in:
Manipuri
,
English
,
Gujarati
,
Kannada
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam