माहिती आणि प्रसारण मंत्रालय
नागरिक केंद्रित संवाद -सुशासनाचे एक साधन यावरील एक दिवसीय चिंतन शिबिराचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
सरकारी संवादामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि नवनवीन पद्धती शोधण्यावर भर द्या : अनुराग ठाकूर
Posted On:
17 MAY 2023 4:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 मे 2023
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अधिकारी, त्यांच्या प्रसार माध्यम संस्था आणि भारतीय माहिती सेवेच्या अधिकाऱ्यांना लोकांसोबत संवाद साधण्यासाठी नवनवीन पद्धती शोधण्याचे आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले.ठाकूर यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे नागरिक केंद्रित संवाद सुशासनाचे एक साधन या विषयांवरच्या एक दिवसीय चिंतन शिबिराचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते.
माध्यमांचे परिदृष्य झपाट्याने बदलत असून त्या प्रमाणात लोकांचा माहिती ग्रहण करण्याचा मार्ग देखील बदलत आहे, असे त्यांनी देशभरातील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या आपल्या श्रोत्यांना सावध करताना सांगितले. आणि त्यासाठी 21 व्या शतकातील गरजा पूर्ण करण्यासाठी त्यानुसार माहिती प्रसाराच्या आपल्या पद्धती स्वीकारण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
भारतीय माहिती सेवा हा सरकारचा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि या चिंतन शिबिरामुळे अधिकार्यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील कामात सहकार्य करण्याची, आत्मपरीक्षण करण्याची आणि योग्य वेळेत सुधारणा करण्याची अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे.
त्यांनी अधिकाऱ्यांना संसाधनांचा उत्तम विनियोग, समन्वित प्रयत्न, माहितीची देवाणघेवाण आणि एक संघ म्हणून काम करून उच्च परिणामकारकता साध्य करण्याच्या दृष्टीने कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी स्वतःसाठी एक कालमर्यादा निश्चित करावी आणि मंत्रालयाचे प्राधान्यक्रम तसेच मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या सेवा आणि या अधिकाऱ्यांच्या आपापल्या विभागांचे प्राधान्यक्रम तसेच सेवा यांचा सतत आढावा घेऊन सुधारणा करत राहावे अशा सूचना केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या. कर्मयोगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे उदाहरण समोर ठेवत, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना वेळोवेळी आत्मपरीक्षण करत राहून देशासाठी सर्वोत्तम सेवा देण्यास आपण सक्षम आहोत का याची तपासणी करण्यास सांगितले.
संवाद विषयक ध्येयाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या प्राधान्यक्रमाचा स्पष्टपणे उल्लेख करुन केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकार वंचितांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे आणि सर्व अधिकाऱ्यांनी देखील अंत्योदय मंत्राच्या मागर्दर्शनाखाली काम केले पाहिजे.भारतातील खूप मोठा भाग अजूनही माध्यमांच्या संपर्कात आलेला नाही आणि अशा भागांमध्ये दूरचित्रवाणी तसेच वर्तमानपत्रांच्या सोयीदेखील उपलब्ध नाहीत याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. समाजाच्या त्या भागांमध्ये पोहोचणे ही त्या विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे असे मत केंद्रीय मंत्र्यांनी मांडले.
केंद्रीय मंत्र्यांच्या भाषणापूर्वी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांनी पाच सत्रांमध्ये विभागलेल्या या शिबिराची मूलभूत संकल्पना सर्वांसमोर मांडली. ते म्हणाले की या शिबिरात चर्चेला घेतले जाणारे सर्व विषय प्रसंगोचित आहेत आणि गटांमध्ये विभागलेले अधिकारी दिवसभरात या विषयांवर विचारमंथन करतील आणि शेवटी त्यांच्या कल्पना मांडतील. चर्चेसाठी घेण्यात येणारे पाच विषय पुढीलप्रमाणे आहेत:
- लोकसहभाग -नागरिकांशी सहभागात्मक संवाद
- अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारी संवाद व्यवस्थेत उदयोन्मुख तंत्रज्ञानांचा वापर
- चुकीची माहिती पसरण्याला अटकाव करण्यासाठी त्वरित प्रतिसाद यंत्रणेचे संस्थात्मकीकरण
- प्रादेशिक संपर्काच्या माध्यमातून लक्ष्यित पोहोच
- सरकारी सेवांच्या प्रसारणाचे सशक्तीकरण
सरकारी संवादाशी संबंधित समस्यांवर चर्चा घडवणे आणि त्यावरील मार्गदर्शनासाठी कृती आराखडा तसेच दिशानिर्देश तयार करणे या उद्देशाने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय माध्यम केंद्राने हे एक दिवसीय शिबीर आयोजित केले आहे.
S.Kane/Bhakti/Sanjana/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1924792)
Visitor Counter : 155
Read this release in:
Khasi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam