अर्थ मंत्रालय

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बंगळूरू इथे दुसऱ्या वित्त आणि सेंट्रल बँक डेप्युटीज (एफसीबीडी) यांच्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले

Posted On: 22 FEB 2023 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2023

दुसरी G20 वित्त आणि सेन्ट्रल बँक डेप्युटीजची (एफसीबीडी) बैठक आज नवी दिल्ली इथे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंग ठाकूर यांच्या उद्घाटनपर भाषणाने सुरू झाली.

भारताच्या G20 च्या अध्यक्षतेखालील पहिली G20 वित्त मंत्री आणि सेन्ट्रल बँक गव्हर्नर (एफएमसीबीजी) यांची बैठक 24-25 फेब्रुवारी 2023 दरम्यान कर्नाटकमध्ये बंगळूरू इथे होणार आहे. G20 एफएमसीबीजी बैठकीच्या आधी, अजय सेठ आणि आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर डॉ. मायकल डी. पात्रा यांच्या सह-अध्यक्षतेखाली दुसरी G20 वित्त आणि सेन्ट्रल बँक डेप्युटीज (एफसीबीडी) यांची बैठक, आयोजित करण्यात आली आहे.

आपल्या उद्घाटनपर भाषणात मंत्री म्हणाले की फायनान्स ट्रॅक हा G20 प्रक्रियेचा गाभा आहे आणि जागतिक आर्थिक चर्चा आणि धोरण समन्वयासाठी तो एक प्रभावी मंच प्रदान करतो. जागतिक आर्थिक दृष्टीकोन आणि जोखीम, विकासात्मक अर्थसहाय्य आणि जागतिक आर्थिक सुरक्षा जाळ्यासह आंतरराष्ट्रीय आर्थिक संरचना, आर्थिक समावेशन आणि वित्तीय क्षेत्रातील इतर समस्या, पायाभूत सुविधा विकास आणि अर्थपुरवठा, शाश्वत अर्थपुरवठा, जागितक आरोग्य विषयक अर्थपुरवठा आणि आंतरराष्ट्रीय  कर आकारणी, हे फायनान्स ट्रॅकमधील मुख्य कार्यप्रवाह आहेत.

नोव्हेंबर 2022 मध्ये, जेव्हा भारताचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांच्याकडून G20 अध्यक्षपदाचा बॅटन स्वीकारला, तेव्हा देशासाठी हा अभिमानाचा क्षण होता, आणि G20 च्या माध्यमातून मतभेद दूर करण्याची आणि जागतिक महत्त्वाच्या बाबींवर सहमती निर्माण करण्याची जबाबदारी देखील होती.

आपल्या उद्घाटनपर भाषणात, ठाकूर यांनी भारताच्या G20 अध्यक्षपदाचे महत्त्व आणि ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या संकल्पनेला अनुसरून, आपण एका (सामायिक) पृथ्वी ग्रहाची हानी भरून काढणे, एका कुटुंबात सुसंवाद निर्माण करणे आणि आपल्या एका भविष्यासाठी आशा निर्माण करणे, यावर लक्ष केंद्रित करण्यावर भर द्यायला हवा, असे सांगितले. जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांना भारत किती महत्त्व देतो हे या संकल्पनेमधून प्रतिबिंबित होते, असे ते म्हणाले.

जागतिक अर्थव्यवस्थेला कोविड-19 महामारी, अन्न आणि ऊर्जा असुरक्षितता, व्यापक चलनवाढ, वाढत्या कर्जाचा बोजा, वाढते हवामान बदल आणि भू-राजकीय तणाव यांच्या प्रदीर्घ परिणामांचा सामना करावा लागत आहे. या सर्व संकटांचा परिणाम जगाच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांची प्रगती रोखू शकतो, असे ते म्हणाले.

उद्दिष्टांवर केंद्रित संवाद आणि विचार-विनिमय या द्वारे, या जागतिक आव्हानांवर  व्यावहारिक उपाय शोधण्यामध्ये G20 महत्वाचे योगदान देऊ शकते, आणि भारतीय अध्यक्षता, याला पाठबळ देण्याचा सक्रीय प्रयत्न करणार असल्याचे ठाकूर म्हणाले.

ठाकूर यांनी असेही नमूद केले की हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 2023 मधील G20 फायनान्स ट्रॅक चर्चेमध्ये 21 व्या शतकातील सामायिक जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुपक्षीय विकास बँकांना (MDBs) मजबूत करणे, 'उद्याच्या शहरांना' वित्तपुरवठा करणे, आर्थिक समावेशन आणि उत्पादकता वाढीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा लाभ घेणे, आणि आंतरराष्ट्रीय कर आकारणीचे उद्दिष्ट पुढे आणणे, या आणि अन्य मुद्द्यांचा समावेष असेल. G20 मधील विविध कार्यप्रवाहांनी या प्रमुख मुद्यांवर आधीच काम सुरू केले आहे.

डेप्युटीजची बैठक 24 आणि 25 फेब्रुवारी 2023 रोजी G20 अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर यांच्या बैठकीत जाहीर झालेल्या निवेदनाला अंतिम रूप देण्यासाठी समर्पित आहे.

या निवेदनामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला प्रभावित करणार्‍या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांवर, G20 च्या सामूहिक दृष्टिकोनाला मूर्त रूप दिले जाईल, आणि मोठ्या आंतरराष्ट्रीय समुदायाला, प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांचा अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नरशी थेट जोडेल. यामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला ही खात्री देण्याची क्षमता आहे, की प्रमुख जागतिक समस्यांच्या समन्वित उपायांवर G20 देशांमधील एकमत, जागतिक अर्थव्यवस्थेला सध्याच्या मंदीतून सावरायला आणि विकास  आणि समृद्धीसाठी नवीन संधी निर्माण करायला मदत करेल.

हा विश्वास कायम ठेवण्याची जबाबदारी धोरणकर्त्यांची आहे. G20 ने आपल्या स्थापनेपासून,  संकटकाळात एकमत घडवून आणण्याचे कौशल्य वारंवार सिद्ध केले आहे. आगामी महत्त्वपूर्ण जोखमींचा अंदाज, प्रतिबंध आणि तयारी करण्याच्या आपल्या क्षमतेमध्येच यश दडले आहे, यावर भारतीय अध्यक्षपदाचा असा विश्वास आहे. यासाठी सर्वसमावेशक आणि नव्या बहुपक्षीयतेची आवश्यकता आहे.  

आपल्या भाषणाचा समारोप करताना, ठाकूर यांनी बहुपक्षीयतेच्या भावनेची आकांक्षा बाळगण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी असेही नमूद केले की वादग्रस्त मुद्दे आहेत, आणि त्याचा सामना करण्यासाठी सदस्य देशांनी आपल्या देशांतर्गत आकांक्षा संतुलित राखणे आवश्यक आहे. या विधायक आणि फलदायी चर्चेद्वारे आपल्याला एकत्रितपणे अपेक्षित परिणाम साधता येईल, असे मंत्री म्हणाले.

 

S.Patil/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1901429) Visitor Counter : 133