पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान येत्या 10 फेब्रुवारी रोजी उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्राचा दौरा करणार


महाराष्ट्रात धार्मिक पर्यटन वाहतुकीला चालना देणाऱ्या दोन वंदे भारत गाड्यांना पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार

मुंबईत वाहतूक कोंडी कमी करणाऱ्या सांताक्रूझ चेंबुर लिंक रोड आणि कुरार बोगद्याचेही पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

मुंबईतील अल्जामिया-तुस-सैफीयाच्या नव्या परिसराचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

Posted On: 08 FEB 2023 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी  2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 10 फेब्रुवारीला, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी दहा वाजता, पंतप्रधान लखनौला जातील, तिथे  त्यांच्या हस्ते , उत्तर प्रदेश जागतिक  गुंतवणूकदार परिषद 2023 चे उद्‌घाटन होईल. सुमारे, पावणेतीन वाजता, पंतप्रधान मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दोन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. तसेच, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगद्याचे लोकार्पण देखील पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्यानंतर सुमारे साडे चार वाजता पंतप्रधान मुंबईतच अल्जामिया-तुस-सैफीयाच्या नव्या परिसराचेही उद्‌घाटन करतील.

पंतप्रधान लखनौत

पंतप्रधान उत्तरप्रदेश जागतिक गुंतवणूकदायर परिषद 2023 चे उद्घाटन करतील. त्याशिवाय, जागतिक व्यापार शोचे उद्घाटन करतील आणि इन्व्हेस्ट युपी 2.0 ची ही सुरुवात करतील.

उत्तर प्रदेश जागतिक गुंतवणूकदार परिषद 2023 येत्या 10-12 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होईल. ही उत्तरप्रदेश सरकारची पथदर्शी गुंतवणूकदार परिषद  आहे. या परिषदेत, धोरणकर्ते, उद्योगक्षेत्रातील नेते, अध्ययन क्षेत्रातील तज्ञ, विचारवंत आणि जगभरातील विविध नेते या सगळ्यांना एकत्र येण्यास एक व्यासपीठ मिळेल. ज्यातून, सर्वांना एकत्रितपणे उद्योग संधी निर्माण होतील, आणि भागीदारीही विकसित करता येईल.

इन्व्हेस्टर युपी 2.0 ही उत्तर प्रदेशातील एक सर्वसमावेशक, गुंतवणूकदार केंद्री आणि सेवाभिमुख गुंतवणूक व्यवस्था आहे जी गुंतवणूकदारांना संबंधित, चांगल्या प्रकारे परिभाषित, प्रमाणित सेवा देण्याचा प्रयत्न करते.

पंतप्रधान मुंबईत

मुंबई-सोलापूर वंदे भारत गाडी आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत गाडी या दोन वंदे भारत गाड्यांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई इथून पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. नव्या भारतात, उत्तम, प्रभावी आणि प्रवासी स्नेही अशा वाहतूक विषयक पायाभूत सुविधा उभारण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाची पूर्तता करण्याच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल आहे.

मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन ही देशातील नववी वंदे भारत रेल्वे गाडी ठरणार आहे. ही नवी जागतिक दर्जाची रेल्वेगाडी  मुंबई आणि सोलापूर दरम्यानची संपर्क व्यवस्था सुधारण्यास मदत करेल. तसेच, सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर आणि पुण्याजवळ आळंदी अशा सर्व तीर्थस्थळांना जोडणारी ठरणार आहे.

तर, मुंबई-साईनगर शिर्डी ही देशातली दहावी वंदे भारत गाडी  असेल. ही गाडी महाराष्ट्रातील, नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डी आणि शनि शिंगणापूर अशा तीर्थस्थळांना जोडणार आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहनांची वाहतूक अधिकाधिक सुरळीत व्हावी, यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार बोगद्याचे लोकार्पण होईल. कुर्ला ते वाकोला  आणि वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमटीएनएल जंक्शनपासून  ते कुर्ल्यातील एलबीएस उड्डाणपूल या  नव्याने बांधण्यात आलेल्या उन्नत कॉरिडॉरमुळे, शहरातील अत्यंत गरजेची अशी पूर्व-पश्चिम वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मोठी मदत होईल.

हे रस्ते पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गाला जोडतील ज्यामुळे, पूर्व आणि पश्चिम उपनगरे सक्षमपणे जोडली जातील. कुरार बोगदा पश्चिम  द्रुतगती मार्गावरील  वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि पश्चिम  द्रुतगती मार्गाच्या मालाड आणि कुरार बाजूंना जोडण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.यामुळे लोकांना मोठी रहदारी असतांनाही सहजपणे रस्ता ओलांडता येईल.

मुंबईत मरोळ इथं अल्जामिया-तुस-सैफीया (द सैफी अकादमी) च्या नवीन परिसराचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होईल. अल्जामिया-तुस-सैफिया ही दाऊदी बोहरा समुदायाची प्रमुख शैक्षणिक संस्था आहे. आदरणीय सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था समाजाच्या शैक्षणिक परंपरा आणि साहित्यविषयक संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहे.

 

 

 

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1897454) Visitor Counter : 242