पंतप्रधान कार्यालय
वंचितांना प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प : पंतप्रधान
अमृत काळातला हा पहिला अर्थसंकल्प विकसित भारताच्या आकांक्षा आणि निर्धार यांचा भक्कम पाया घालतो
पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान म्हणजेच पीएम विकास कोट्यवधी विश्वकर्मांच्या आयुष्यात परिवर्तन घडवेल
हा अर्थसंकल्प सहकारी संस्थांना ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाचा कणा बनवेल
आपल्याला डिजिटल पेमेंटच्या यशाची कृषी क्षेत्रात पुनरावृत्ती घडवावी लागेल
हा अर्थसंकल्प शाश्वत भविष्यासाठी हरित वृद्धी, हरित अर्थव्यवस्था, हरित पायाभूत सुविधा आणि हरित रोजगार यांचा अभूतपूर्व विस्तार करत आहे
पायाभूत सुविधांवर अभूतपूर्व अशा दहा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे भारताच्या विकासाला नवी उर्जा आणि वेग प्राप्त होईल
2047 साठीच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी मध्यम वर्ग एक मोठी शक्ती, आमचे सरकार नेहमीच मध्यम वर्गाच्या पाठीशी
Posted On:
01 FEB 2023 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2023
अमृत काळातला पहिला अर्थसंकल्प, विकसित भारताच्या आकांक्षा आणि निर्धार यांच्या पूर्ततेचा भक्कम पाया घालत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. वंचितांना प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प असून आकांक्षी समाज,गरीब आणि मध्यम वर्गांच्या स्वप्नांची पूर्तता करेल असे पंतप्रधान म्हणाले.
या ऐतिहासिक अर्थसंकल्पासाठी त्यांनी वित्त मंत्री आणि त्यांच्या चमूचे अभिनंदन केले. सुतार, लोहार, सोनार, कुंभार यासारखे पारंपरिक आणि इतर कारागीर राष्ट्राचे निर्माते असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या वर्गाची कठोर मेहनत आणि सृजनाला दाद देण्यासाठी देशाने प्रथमच यांच्यासाठी अनेक योजना आणल्याचे ते म्हणाले. त्यांच्यासाठी प्रशिक्षण, कर्ज आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात येत आहे. पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान म्हणजेच पीएम विकास कोट्यवधी विश्वकर्मांच्या आयुष्यात परिवर्तन घडवेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
गावापासून ते शहरापर्यंत, नोकरदार ते गृहिणी अशा सर्व महिलांसाठी सरकारने, जल जीवन अभियान, उज्वला योजना आणि पीएम आवास योजना यासारखी लक्षणीय पाऊले उचलल्याची माहिती देत यामुळे महिला कल्याणाला अधिक पुष्टी मिळेल असे पंतप्रधानांनी सांगितले. महिला बचत गट क्षेत्रात अपार क्षमता असून या क्षेत्राला आणखी बळकटी दिल्यास आश्चर्यकारक कामगिरी घडेल यावर त्यांनी भर दिला. नव्या अर्थसंकल्पात महिलांसाठी नवी बचत योजना आणत महिला बचत गटांना नवे परिमाण लाभल्याचे सांगून यामुळे महिला विशेषतः सर्वसामान्य कुटुंबातल्या गृहिणीना बळ मिळेल असे ते म्हणाले.
हा अर्थसंकल्प सहकारी संस्थाना ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाचा कणा बनवेल. सरकारने सहकार क्षेत्रात जगातली सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना केल्याचे ते म्हणाले. नव्या प्राथमिक सहकारी संस्था स्थापन करण्याच्या महत्वाकांक्षी योजनेची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यामुळे दुग्ध आणि मत्स्य उत्पादन क्षेत्राचा विस्तार होण्याबरोबरच कृषी, शेतकरी, पशु पालक, मच्छिमार यांना त्यांच्या उत्पादनासाठी उत्तम भाव मिळेल.
डिजिटल पेमेंटच्या यशाची कृषी क्षेत्रात पुनरावृत्ती घडवण्याच्या गरजेवर भर देत हा अर्थसंकल्प डिजिटल कृषी पायाभूत सुविधांसाठी मोठा आराखडा घेऊन आल्याचे पंतप्रधान म्हणाले.
जग सध्या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करत असून भारतात अनेक प्रकारची भरड धान्ये वेगवेगळ्या नावानी पिकवली जातात. जगभरातल्या घरांपर्यंत ही धान्ये पोहोचत असताना त्यांची विशेष ओळख असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या सुपरफूडला श्रीअन्न अशी नवी ओळख दिली गेली आहे. यातून देशातले छोटे आणि आदिवासी शेतकरी यांना आर्थिक पाठबळ मिळण्याबरोबरच देशातल्या नागरिकांना आरोग्य संपन्न जीवनही लाभेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हा अर्थसंकल्प शाश्वत भविष्यासाठी हरित वृद्धी, हरित अर्थव्यवस्था, हरित पायाभूत सुविधा आणि हरित रोजगार यांचा अभूतपूर्व विस्तार करत आहे. अर्थसंकल्पात तंत्रज्ञान आणि नव अर्थव्यवस्थेवर मोठा भर देण्यात आला आहे. आजचा आकांक्षी भारत रस्ते, रेल्वे, मेट्रो, बंदरे आणि जलमार्ग यासारख्या प्रत्येक क्षेत्रात आधुनिक सुविधा इच्छितो. 2014 च्या तुलनेत पायाभूत सुविधामधल्या गुंतवणुकीत 400 टक्क्यांहून जास्त वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांवर अभूतपूर्व अशा दहा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे भारताच्या विकासाला नवी उर्जा आणि वेग प्राप्त होईल यावर त्यांनी भर दिला. या गुंतवणूकीमुळे युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी प्राप्त होतील त्यातून मोठ्या लोकसंख्येला उत्पन्नाची नवी साधने मिळतील.
उद्योगांना पत सहाय्य आणि सुधारणा यासाठीच्या मोहिमेद्वारे व्यवसाय सुलभतेला अधिक चालना देण्यात येत असून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 2 लाख कोटी रुपयांची अतिरिक्त कर्ज हमीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रीझमटीव्ह अर्थात अनुमानित कराची मर्यादा वाढवल्याचा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना वृद्धीसाठी फायदा होईल. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मोठ्या कंपन्यांकडून वेळेवर पैसे मिळण्याच्या दृष्टीकोनातून नवी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
2047 साठीच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी मध्यम वर्गाची क्षमता त्यांनी अधोरेखित केली. मध्यम वर्गाच्या सबलीकरणासाठी सरकारने गेल्या काही वर्षात अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून त्यामुळे जीवन सुखकर होण्यासाठी मदत झाली आहे. कर दरातली कपात आणि प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगवान करण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आमचे सरकार मध्यम वर्गाच्या पाठीशी नेहमीच उभे असून या वर्गाला करविषयक मोठा दिलासा देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
* * *
M.Chopade/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1895486)
Visitor Counter : 225
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam