पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगण राज्यांचा दौरा करणार


पंतप्रधानांच्या हस्ते 25,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी

बंगळुरू इथल्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-2 चे पंतप्रधान करणार उद्‌घाटन; तसेच चेन्नई-म्हैसूर वंदे भारत एक्सप्रेसला दाखवणार हिरवा झेंडा

बंगळुरू इथे नादप्रभू केम्पेगौड़ा यांच्या 108 फुट उंच कांस्य पुतळ्याचेही पंतप्रधानांच्या हस्ते होणार अनावरण

ओएनजीसीच्या विशाखापट्टणम इथल्या यू फील्ड खोल समुद्रातील ब्लॉक प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण; तसेच गेलच्या श्रीकाकुलम अंगुल नैसर्गिक वायू पाईपलाईन प्रकल्पाची करणार पायाभरणी

विशाखापट्टणम इथे, रायपूर-विशाखापट्टणम या सहा पदरी ग्रीनफील्ड आर्थिक मार्गिकेच्या एपी विभागाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी; तसेच, विशाखापट्टणम रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाचीही त्यांच्या हस्ते पायाभरणी

रामगुंडम इथे पंतप्रधानांच्या हस्ते खतनिर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण- त्याची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार

दिंडीगुल इथे, गांधीग्राम ग्रामीण संस्थेच्या 36 व्या दीक्षांत समारंभातही पंतप्रधान करणार मार्गदर्शन

Posted On: 09 NOV 2022 7:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी, येत्या 11 आणि 12 नोव्हेंबर 2022 रोजी, कर्नाटक, तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि तेलंगण या चार राज्यांचा दौरा करणार आहेत. 11 ऑगस्ट रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमाराला, पंतप्रधान संतकवी कनक दास यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतील. आणि बंगळुरू विधानभेच्या परिसरात असलेल्या महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्यालाही अभिवादन करतील.

बंगळुरू इथे, सुमारे सव्वा सहा वाजता पंतप्रधान, केसीआर रेल्वे स्थानकावरुन वंदे भारत एक्सप्रेस आणि भारत गौरव कृषी दर्शन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. सुमारे साडे अकरा वाजता, पंतप्रधान केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या टर्मिनल-2 चे उद्घाटन करतील. त्यानंतर सुमारे 12 वाजता, पंतप्रधान नादप्रभू केंपेगौडा यांच्या 108 फूट उंच अशा कांस्य पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर, साडेबारा वाजता बंगळुरू इथे होणाऱ्या सभेत ते मार्गदर्शन करतील. साडेतीनच्या सुमाराला, पंतप्रधान तामिळनाडूचया दिंडीगुल इथे, गांधीग्राम ग्रामीण संस्थेच्या 36 व्या दीक्षांत समारंभात सहभागी होतील.

12 नोव्हेंबर रोजी, सकाळी साडे दहा वाजता, पंतप्रधान आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे अनेक प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी करतील. दुपारी साडेतीन वाजता पंतप्रधान तेलंगणातील रामगुंडम येथील RFCL प्रकल्पाला भेट देतील. त्यानंतर, दुपारी सव्वाचार वाजता, पंतप्रधान रामगुंडम येथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये पंतप्रधानांचे कार्यक्रम

पंतप्रधानांच्या हस्ते, सुमारे 5000 कोटी रुपये खर्चातून बांधलेल्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 चे उद्घाटन होणार आहे. हे टर्मिनल विमानतळाची प्रवासी क्षमता दुपटीने वाढवेल ज्यामुळे सध्या असलेली सुमारे 2.5 कोटी प्रवाशांची क्षमता वार्षिक पांच ते सहा कोटींपर्यंत वाढू शकेल.

टर्मिनल टू ची रचना, बंगळुरू या उद्यान शहराला समर्पित अशी करण्यात आली असून त्यामुळे प्रवाशांना प्रत्यक्ष उद्यानात फिरल्यासारखा अनुभव येणार आहे. प्रवासी, 10,000 पेक्षा अधिक चौरस मीटर लांबवरच्या हरित भिंतींच्या बाजूने,झुलता बगीचा आणि बाह्य उद्याने यांच्या आजूबाजूने चालत जाऊ शकतील. या विमानतळासाठी, संपूर्ण परिसरात अक्षय उर्जेचा वापर केला जात असून, शाश्वत विकासाचा हा मापदंड आधीच 100 टक्के पूर्ण केला आहे.

टर्मिनल-2 ची रचना, शाश्वत विकासाची तत्वे लक्षात घेऊन  त्यानुसार करण्यात आली आहे. शाश्वततेच्या उपक्रमांवर आधारित, टर्मिनल 2 हे कार्यान्वयन सुरू होण्यापूर्वी यूएस GBC (ग्रीन बिल्डिंग कौन्सिल) द्वारे प्री-सर्टिफाइड प्लॅटिनम रेटिंग असलेले जगातील सर्वात मोठे टर्मिनल असेल. 'नौरासा' या संकल्पनेअंतर्गत येणाऱ्या सर्व कलाकृतींना यात समाविष्ट करण्यात आले आहे. या कलाकृती कर्नाटकचा वारसा आणि संस्कृती तसेच व्यापक भारतीय लोकभावना प्रतिबिंबित करतात.

एकंदरीत पाहता, टर्मिनल 2 ची रचना आणि स्थापत्यशास्त्र, चार मार्गदर्शक तत्त्वांनी प्रभावित झाले आहे: बागेतील टर्मिनल, शाश्वतता, तंत्रज्ञान आणि कला आणि संस्कृती. T-2 एक टर्मिनल हे अत्याधुनिक टर्मिनल असले तरी त्याची मुळे, संस्कृतीच्या पायाशी रुजलेली असून प्रवाशांना एक संस्मरणीय अनुभव देणारी ठरणार आहेत. चेन्नई-मैसुरू वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान बंगळुरू मधील क्रांतिवीर सांगोली रायण्णा (केएसआर) रेल्वे स्थानकावरून हिरवा  झेंडा  दाखवतील.  देशातील ही पाचवी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी  असेल आणि दक्षिण भारतातील अशी पहिली रेल्वे  असेल. यामुळे चेन्नईचे औद्योगिक केंद्र आणि बंगळुरूचे टेक आणि स्टार्टअप हब आणि प्रसिद्ध पर्यटन शहर मैसूर दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढेल.

पंतप्रधान बंगळुरू केएसआर   रेल्वे स्थानकावरून भारत गौरव काशी यात्रा रेल्वेगाडीला देखील.  हिरवा झेंडा दाखवतील. भारत गौरव योजनेंतर्गत ही गाडी चालवणारे कर्नाटक हे पहिले राज्य आहे, जिथे  कर्नाटकमधील यात्रेकरूंना काशीला पाठवण्यासाठी कर्नाटक सरकार आणि रेल्वे मंत्रालय एकत्र काम करत आहेत.  काशी, अयोध्या आणि प्रयागराजला भेट देण्यासाठी जाणाऱ्या  यात्रेकरूंना आरामदायी वास्तव्य  आणि मार्गदर्शन पुरवले जाईल.

पंतप्रधान श्री नादप्रभू केम्पेगौडा यांच्या 108 मीटर लांबीच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करतील. बंगळुरुच्या विकासात या शहराचे संस्थापक नादप्रभू केम्पेगौडा यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा पुतळा उभारण्यात येत आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी फेम राम व्ही सुतार यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा पुतळा बनवण्यासाठी  98 टन पितळ  आणि 120 टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान

पंतप्रधान  10,500 कोटी रुपये मूल्याच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील. सहा पदरी ग्रीनफिल्ड रायपूर-विशाखापट्टणम आर्थिक कॉरिडॉरच्या आंध्र प्रदेशमधील खंडाची ते पायाभरणी करतील. 3750 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून हे कॉरिडॉर बांधले जाणार आहे. हा आर्थिक कॉरिडॉर छत्तीसगड आणि ओदिशाचे औद्योगिक नोड्स ते विशाखापट्टणम बंदर आणि चेन्नई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग दरम्यान जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. यामुळे आंध्र प्रदेश आणि ओदिशातील आदिवासी आणि मागास भागांशी संपर्क सुधारेल. विशाखापट्टणममधील कॉन्व्हेंट जंक्शन ते शीला नगर जंक्शनपर्यंत समर्पित बंदर रस्त्याची  पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होईल.  यामुळे स्थानिक आणि बंदराकडे जाणारी माल वाहतूक वेगळी होऊन विशाखापट्टणम शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल.  श्रीकाकुलम-गजपती कॉरिडॉरचा एक भाग म्हणून 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधलेला राष्ट्रीय महामार्ग -26A च्या नरसन्नापेटा ते पथपटनम खंडाचे  देखील ते लोकार्पण करतील. या प्रकल्पामुळे या भागात  चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल.

आंध्र प्रदेशात 2900  कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित केलेला ओएनजीसीचा यू-फील्ड ऑनशोर डीप वॉटर ब्लॉक प्रकल्प पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील, दररोज सुमारे 3 दशलक्ष मेट्रिक मानक घनमीटर (MMSCMD) गॅस निर्मिती क्षमता असलेला प्रकल्पातील हा सर्वात खोलवरील वायूचा शोध आहे. गेलच्या सुमारे 6.65 दशलक्ष मेट्रिक मानक घनमीटर  क्षमतेच्या श्रीकाकुलम अंगुल नैसर्गिक वायू  पाइपलाइन प्रकल्पाची ते पायाभरणी करतील. एकूण 2650 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून ही 745 किमी लांबीची पाइपलाइन  बांधली जाणार आहे. नॅचरल गॅस ग्रिड (NGG) चा एक भाग असल्याने, ही पाइपलाइन आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या विविध जिल्ह्यांमधील  घरे, उद्योग, व्यावसायिक युनिट्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रांना नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्यासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करेल. ही पाइपलाइन आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम आणि विजयनगरम जिल्ह्यांतील सिटी गॅस वितरण नेटवर्कला नैसर्गिक वायूचा पुरवठा करेल.

पंतप्रधान विशाखापट्टणम रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी करतील, यासाठी सुमारे 450 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. पुनर्विकसित स्थानकात दररोज सुमारे 75,000 प्रवाशांची वर्दळ असेल  आणि आधुनिक सुविधांमुळे प्रवाशांना उत्तम अनुभव मिळेल. विशाखापट्टणम मासेमारी बंदराच्या आधुनिकीकरण आणि अद्ययावतीकरणाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे रु. 150 कोटी रुपये आहे. मासेमारी बंदर, त्याच्या सुधारणा आणि आधुनिकीकरणानंतर मासेमारी बंदराची हाताळणी क्षमता 150 टन प्रतिदिन वरून वाढून सुमारे 300 टन प्रतिदिन होईल. या सोबतच हे बंदर सुरक्षित लँडिंग आणि बर्थिंग प्रदान करेल आणि इतर आधुनिक पायाभूत सुविधांमुळे जेट्टीमधील फेऱ्यांचा वेळ कमी होईल, त्यामुळे अपव्यय कमी होईल आणि  पैशाचा पुरेपूर मोबदला मिळण्यास मदत होईल.

तेलंगणातील रामगुंडम येथे पंतप्रधान

पंतप्रधान रामगुंडममध्ये 9500 कोटी. रु. पेक्षा जास्त किमतीच्या अनेक प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील. ते रामगुंडम येथील खताचा कारखाना राष्ट्राला समर्पित करतील. रामगुंडम प्रकल्पाची पायाभरणीही 7 ऑगस्ट 2016 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली होती. खत संयंत्राच्या पुनरुज्जीवनामागील प्रेरक शक्ती म्हणजे युरिया उत्पादनात स्वयंपूर्णता प्राप्त करणे हे पंतप्रधानांचे स्वप्न हीच आहे. रामगुंडम प्लांट दरवर्षी 12.7 लाख मेट्रिक टन देशी कडुनिंब कोटेड युरिया उत्पादन करेल.

हा प्रकल्प रामगुंडम फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड (RFCL) च्या अंतर्गत स्थापन करण्यात आला आहे जी नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL), इंजिनियर्स इंडिया लिमिटेड (EIL) आणि फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (FCIL) यांची संयुक्त उपक्रम कंपनी आहे. आरएफसीएलला नवीन अमोनिया-युरिया प्लांट उभारण्याची जबाबदारी रु. 6300 कोटी पेक्षा जास्त गुंतवणुकीसह सोपवण्यात आली होती. RFCL प्लांटला जगदीशपूर-फुलपूर-हल्दिया पाइपलाइनद्वारे गॅस पुरवला जाईल.

हे संयंत्र तेलंगणा तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरेसा आणि वेळेवर पुरवठा सुनिश्चित करेल. हा प्लांट केवळ खताची उपलब्धता सुधारणार नाही तर रस्ते, रेल्वे, सहायक उद्योग इत्यादी पायाभूत सुविधांच्या विकासासह या प्रदेशातील एकूण आर्थिक विकासाला चालना देईल. याशिवाय, विविध वस्तूंच्या पुरवठ्यासाठी सुक्ष्म,लघु आणि मध्यम विक्रेत्यांच्या विकासाचा या प्रदेशाला फायदा होईल. आरएफसीएलचा ‘भारत युरिया’ केवळ आयात कमी करून नव्हे तर खते आणि विस्तार सेवांचा वेळेवर पुरवठा करून स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत अर्थव्यवस्थेला जबरदस्त चालना देईल.

पंतप्रधान भद्राचलम रोड-सत्तुपल्ली रेल्वे लाईन राष्ट्राला समर्पित करतील, जी सुमारे 1000 कोटी रुपये खर्चून बांधली गेली आहे. याशिवाय ते सुमारे 2200 कोटी रुपयांच्या विविध रस्ते प्रकल्पांची पायाभरणीही करणार आहेत. यामध्ये NH-765DG चा मेडक-सिद्धीपेट-एलकातुर्थी विभाग; NH-161BB चा बोधन-बासर-भैंसा विभाग; NH-353C च्या सिरोंचा ते महादेवपूर विभाग यांचा समावेश आहे.

गांधीग्राम, तामिळनाडू येथे पंतप्रधान

गांधीग्राम ग्रामीण संस्थेच्या 36 व्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान संबोधित करतील. दीक्षांत समारंभात 2018-19 आणि 2019-20 बॅचच्या 2300 हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

 

S.Patil/Radhika/Sushama/Shraddha/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 


(Release ID: 1874809) Visitor Counter : 277