पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबादच्या आसरवा इथे 2900 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण
“एकता दिनी हे प्रकल्प समर्पित करणे विशेष समाधान देणारे” -पंतप्रधान
“दुहेरी इंजिनच्या सरकारमुळे विकासाची ‘गती’आणि ‘शक्ती’ दोन्ही वाढत आहे.”
“देशभरातील रेल्वे स्थानकांच्या स्थितीमध्ये झालेली सुधारणा आज ठळकपणे दिसत आहे”
“एकेकाळी केवळ उच्चभ्रू आणि श्रीमंत लोकांनाच उपलब्ध असलेले वातावरण आणि सुविधा आता गरीब आणि मध्यम वर्गीयांना देखील मिळत आहेत”
“विकासाचा असमतोल,हे आपल्या देशापुढील एक मोठे आव्हान; आमचे सरकार त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहे”
Posted On:
31 OCT 2022 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादच्या आसरवा इथे, 2900 कोटी रुपये खर्चून तयार झालेल्या दोन रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण केले.
गुजरातच्या विकासासाठी आणि इथल्या दळणवळण व्यवस्थेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. इथे ब्रॉडगेज रेल्वे नसल्यामुळे ज्या लाखो लोकांना इथे प्रवास करतांना त्रास होत होता, त्यांची आता सोय झाली आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले.
अनेक दशके वाट बघितल्यानंतर ह्या मार्गाचे लोकार्पण करण्याची संधी मिळणे हे अतिशय आनंददायक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ह्या सगळ्या मार्गाचे नूतनीकरण झाले असून हिंमतनगर मार्गे आसरवा ते उदयपूर दरम्यान ब्रॉड गेज रेल्वेमार्ग विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे, आता गुजरातमधला हा भाग सुद्धा शेजारच्या राजस्थानशी तसेच संपूर्ण देशाशी जोडला जाणार आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. लुनीधर-जेताल्सर दरम्यान गेज रूपांतरणाचे काम झाल्यामुळेही, रेल्वे दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ होईल, तसेच, या भागातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या आता देशांत कुठल्याही भागात जाऊ शकतील, असे मोदी यांनी सांगितले.
“जेव्हा मीटर गेज रेल्वेमार्ग ब्रॉडगेज मध्ये रूपांतरित केला जातो, त्यावेळी, त्यातून अनेक संधी निर्माण होतात” असे पंतप्रधान म्हणाले. आसरवा ते उदयपूर दरम्यानच्या 300 किमी लांबीच्या रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रूपांतरण झाल्यामुळे गुजरात आणि राजस्थानमधील आदिवासी भाग दिल्ली आणि उत्तर भारताशी जोडले जातील, असेही ते म्हणाले. हा रेल्वेमार्ग ब्रॉड गेज झाल्यामुळे, अहमदाबाद आणि दिल्ली या प्रवासासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. आता कच्छमधील पर्यटनस्थळे आणि उदयपूर मधील पर्यटन स्थळेही एकमेकांशी जोडली गेली आहेत. यामुळे, कच्छ, उदयपूर, चित्तोडगढ अणि नाथवाडा अशा पर्यटन स्थळांना चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. या प्रदेशातील, व्यापारीही दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद अशा औद्योगिक शहरांशी थेट जोडले जातील, असे त्यांनी नमूद केले. “विशेषतः हिंमतनगरमधील टाईल उद्योगाला विशेष मदत होईल” असे ते म्हणाले.
त्याचप्रमाणे लुनीधर-जेतलसर रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्याने, धसा-जेतलसर विभाग आता पूर्णपणे ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झाला आहे. हा रेल्वे मार्ग बोताड,अमरेली आणि राजकोट जिल्ह्यातून जातो ज्यांना आतापर्यंत मर्यादित रेल्वे दळणवळण सुविधा होती. हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यामुळे भावनगर आणि अमरेली भागातील लोकांना आता सोमनाथ आणि पोरबंदरला थेट रेल्वे वाहतूकीचा लाभ मिळेल, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
या मार्गामुळे भावनगर-वेरावल दरम्यानचे अंतर सुमारे 470 किलोमीटरवरून 290 किलोमीटरपर्यंत कमी होईल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ बारा तासांवरून केवळ साडेसहा तासांवर येईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, भावनगर-पोरबंदरमधील अंतर सुमारे 200 किलोमीटर आणि भावनगर-राजकोटमधील अंतर सुमारे 30 किलोमीटरने कमी झाले आहे, असे ते म्हणाले. ब्रॉडगेज मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमुळे गुजरातच्या औद्योगिक विकासालाही गती मिळेल आणि पर्यटनालाही सुलभता येईल आणि एकमेकांपासून तुटलेले भाग जोडले जातील, “ या प्रकल्पाचे आज एकता दिनी लोकार्पण करतांना मला विशेष आनंद होत आहे” असे पंतप्रधान म्हणाले.
“जेव्हा दुहेरी इंजिनचे सरकार काम करते, तेव्हा त्याचा परिणाम दुहेरीच नाही तर अनेक पटींनी होतो. येथे एक आणि एक मिळून 2 नसून 11 ची शक्ती गृहीत धरा.”यावर, पंतप्रधानांनी भर दिला. गुजरातमध्ये दुहेरी इंजिनच्या सरकारमुळे, सरकारची गती तर वाढलीच आहे, तशीच शक्तीही वाढली आहे.” असे त्यांनी म्हटले.
2009 ते 2014 या कालावधीत 125 किलोमीटरपेक्षा कमी रेल्वेमार्ग दुप्पट करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले, तर 2014 ते 2022 या कालावधीत साडेपाचशे किलोमीटरहून अधिक रेल्वेमार्ग दुप्पट करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, 2009 ते 2014 दरम्यान गुजरातमध्ये केवळ 60 किमी रेल्वेट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात आले. तर 2014 ते 2022 दरम्यान, 1700 किमीपेक्षा जास्त ट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात आले, अशी माहिती त्यांनी दिली.
रेल्वेमार्गाचे प्रमाण आणि गती सुधारण्यासोबतच गुणवत्ता, सुविधा, सुरक्षितता आणि स्वच्छता व्यवस्था यामध्ये सुधारणा होत आहे, असे मोदी म्हणाले. देशभरातील रेल्वे स्थानकांच्या स्थितीत झालेल्या सुधारणांचाही त्यांनी उल्लेख केला.
“आधी काही विशिष्ट लोकांना उपलब्ध असायचे, असे चांगले वातावरण आणि सुविधा आता गरीब आणि मध्यमवर्गीयांना उपलब्ध होत आहे,” असे सांगून ते म्हणाले, “गांधीनगर स्थानक, अहमदाबाद, सुरत, उधना, साबरमती, सोमनाथ आणि न्यू भुज येथील रेल्वे स्थानकांचा दर्जा उंचावण्यात येत आहे. ” दुहेरी इंजिन असलेल्या सरकारमुळेच हे यश मिळू शकले आहे, त्याकडे लक्ष वेधून पंतप्रधानांनी गांधीनगर ते मुंबई दरम्यान सुरू झालेल्या नवीन वंदे भारत एक्सप्रेस सेवेचे उदाहरण दिले. पश्चिम रेल्वेच्या विकासाला नवे परिमाण देण्यासाठी 12 गतिशक्ती कार्गो टर्मिनलचीही योजना आखण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. “पहिले गति शक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनल वडोदरा मंडलमध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे. लवकरच उर्वरित टर्मिनल देखील त्यांच्या सेवा देण्यासाठी तयार होतील,” असे ते पुढे म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "स्वातंत्र्य मिळून इतकी दशके झाल्यानंतरही श्रीमंत-गरीब यांच्यातील तफावत, गाव आणि शहर यांच्यातील दरी आणि असंतुलित विकास हे देशासमोरील मोठे आव्हान आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. 'सबका विकास' या धोरणामुळे मध्यमवर्गीयांना पायाभूत सुविधा आणि इतर सुविधा पुरवण्यावर भर दिला जातो आणि गरिबांना गरिबीशी लढण्याचे साधन देते. "गरिबांसाठी पक्की घरे, शौचालये, वीज, पाणी, गॅस, मोफत उपचार आणि विमा सुविधा ही आजच्या सुशासनाची वैशिष्ट्ये आहेत", असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी देशातील कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला असल्याचे नमूद करून, आता अनियोजित बांधकामांच्या जागी, रेल्वे, मेट्रो आणि बस यासारख्या सुविधांना जोडण्याचा समन्वित दृष्टीकोन आहे. मार्ग आणि वाहतूक साधनांचा समन्वय साधण्याचे उद्दिष्टाने काम सुरू आहे, असे ते म्हणाले. गुजरातचे औद्योगिक स्वरूप अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, ज्यावेळी गुजरातची बंदरे सक्षम होतील, त्यावेळी त्याचा थेट परिणाम संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. "गेल्या 8 वर्षात, गुजरातच्या बंदरांची क्षमता जवळपास दुप्पट झाली आहे," असे सांगून ते म्हणाले, विकास प्रक्रिया निरंतर सुरू राहिली पाहिजे, आणि सांगितले की, “विकसित भारतासाठी, विकसित गुजरात बनवणे हे आमचे ध्येय आहे.”
भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि भारताच्या पहिल्या गृहमंत्र्यांनी केलेल्या महान कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असल्याचे सांगितले. . राजस्थान सरकारने काही गुजराती वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध कलेल्या काही जाहिरातींमध्ये सरदार पटेल यांचे नाव आणि छायाचित्र नसल्याबद्दल पंतप्रधानांनी टीका केली. " गुजरातच्या भूमीवर सरदार पटेलांचा असा अपमान कदापि सहन केला जाणार नाही," असे मोदी म्हणाले. सरदार पटेलांप्रमाणेच रेल्वे भारताला जोडणारी आहे; आणि ही प्रक्रिया सातत्याने ,वेगाने आणि पुढच्या दिशेने जाणारी असणार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी शेवटी सांगितले.
या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश, खासदार आणि राज्याचे मंत्री उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादच्या (असरवा) येथे 2900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे दोन रेल्वे प्रकल्प आज देशाला समर्पित केले. यामध्ये अहमदाबाद (असरवा)-हिम्मतनगर-उदयपूर मार्गिकेचे गेज रूपांतरण करण्यात आले आणि लुनिधर-जेतलसर गेज रूपांतरित मार्गिकेचा समावेश आहे. भावनगर-जेतलसर आणि असरवा -उदयपूर दरम्यानच्या नवीन गाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडाही दाखवला.
देशभरात ‘युनि-गेज रेल्वे’ व्यवस्था असण्याच्या दृष्टीकोनातून, रेल्वे सध्याच्या ब्रॉडगेज नसलेल्या रेल्वे मार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करत आहे. पंतप्रधानांनी समर्पित केलेले प्रकल्प या दिशेने आणखी एक पाऊल आहे. अहमदाबाद (असरवा )-हिम्मतनगर-उदयपूर गेज रूपांतरित लाईन सुमारे 300 किलोमीटर लांबीची आहे.
या गेज रूपांतरणामुळे संपर्क व्यवस्था सुधारेल आणि या प्रदेशातील पर्यटक, व्यापारी, उत्पादकांना आणि उद्योगांसाठी फायदेशीर ठरेल. तसेच यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि या क्षेत्राच्या सामाजिक आर्थिक विकासाला मदत होईल. 58 किलोमीटर लांबीची लुनिधर-जेतलसर गेज रूपांतरित मार्गिका पिपावाव बंदर आणि भावनगरसाठी वेरावळ आणि पोरबंदरहून जवळचा मार्ग प्रदान करेल. या प्रकल्पामुळे विभागातील मालवाहतूक क्षमता वाढण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे गर्दी असलेल्या कनालूस - राजकोट – विरामगाम मार्गावरील गर्दी कमी होईल. तसेच यामुळे आता गीर अभयारण्य, सोमनाथ मंदिर, दीव आणि गिरनार पर्वत यांच्या दरम्यान सलगपणे संपर्क व्यवस्था प्रस्थापित करणे सुकर होईल, त्यामुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळेल.
* * *
S.Kane/Radhika/Suvarna/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1872493)
Visitor Counter : 223
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam