पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त केवडिया येथे आयोजित सोहळ्यात पंतप्रधान सहभागी


"कर्तव्य आणि जबाबदारीच्या भावनेने मला येथे आणले आहे, परंतु माझे हृदय मोरबी दुर्घटनेतील पीडितांच्या जवळ आहे"

"अवघा देश सरदार पटेलांच्या दृढ निश्चयापासून प्रेरणा घेतो आहे"

"सरदार पटेलांची जयंती आणि एकता दिवस या आमच्यासाठी केवळ दिनदर्शिकेवरच्या तारखा नाहीत तर ते भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्याचे भव्य उत्सव आहेत"

"गुलामगिरीची मानसिकता, स्वार्थ, अनुनयाचे धोरण, घराणेशाही, लोभ आणि भ्रष्टाचार हे घटक देशाचे विभाजन करू शकतात आणि देशाला कमकुवत करू शकतात"

“आपल्याला एकतेच्या अमृताने विभाजनाच्या विषाचा नायनाट करायचा आहे”

सरकारी योजना कोणताही भेदभाव न करता भारतीय समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत आहेत.

"पायाभूत सुविधांमधील अंतर जितके कमी तितकी एकता अधिक सक्षम"

"देशाच्या एकतेसाठी आपल्या हक्कांचे बलिदान देणाऱ्या राजघराण्यांच्या बलिदानाला समर्पित संग्रहालय एकता नगरमध्ये बांधले जाईल"

Posted On: 31 OCT 2022 2:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली आणि राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले.

आपल्या भाषणाच्या सुरूवातीला पंतप्रधानांनी मोरबी येथील पीडितांप्रति तीव्र दुःख व्यक्त केले. आपण केवडियात असलो तरी आपले मन मात्र मोरबी येथील अपघातातील पीडितांकडे आहे, असे ते म्हणाले. एकीकडे आपले अंत:करण दुःखाने भारले आहे, तर दुसरीकडे कर्म आणि कर्तव्याचा मार्ग आहे. या कर्तव्य आणि जबाबदारीच्या भावनेतूनच आपण राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. मोरबी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांप्रती पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आणि सरकार पीडितांच्या कुटुंबियांच्या सोबत असल्याची ग्वाही दिली. राज्य सरकार बचाव कार्यात गुंतले असून केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करत आहे. बचाव कार्यासाठी लष्कर आणि हवाई दलाच्या तुकड्यांबरोबरच एनडीआरएफची पथकेही तैनात करण्यात आली आहेत. तसेच जखमींवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांनाही मदत पुरवली जात असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. बचाव कार्यावर जातीने लक्ष ठेवण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री मोरबीला पोहोचले असून या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. बचाव कार्यात कोणतीही कमतरता राहणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधानांनी जनतेला दिली. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, या कार्यक्रमातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

या वर्षी आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीची 75 वर्षे पूर्ण केली आणि नवीन संकल्पांसह पुढे जात आहोत, असे सांगत पंतप्रधानांनी 2022 सालच्या एकता दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. कुटुंब असो, समाज असो किंवा राष्ट्र असो, प्रत्येक आघाडीवर एकता आवश्यक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ही भावना देशभरात ठिकठिकाणी आयोजित 75,000 ‘एकता रन’ उपक्रमाच्या माध्यमातून सर्वत्र दिसून येते आहे, असेही ते म्हणाले. अवघा देश सरदार पटेलांच्या दृढ निश्चयापासून प्रेरणा घेतो आहे. प्रत्येक नागरिक देशाच्या एकतेसाठी तसेच ‘पंच प्रण’ निभावण्यासाठी शपथ घेतो आहे, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांनी आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले नसते तर काय परिस्थिती उद्भवली असती, याची कल्पना करणे कठीण आहे, असे पंतप्रधान म्हणाले. 550 पेक्षा जास्त संस्थानांचे एकत्रीकरण झाले नसते तर काय झाले असते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्या संस्थानांनी भारत मातेप्रती त्याग आणि श्रद्धेची भावना बाळगली नसती तर काय झाले असते, असे पंतप्रधानांनी विचारले. हे अशक्यप्राय वाटणारे काम सरदार पटेलांनी पूर्ण केले आहे, असेही ते म्हणाले. सरदार पटेल यांची जयंती आणि एकता दिवस या आपल्यासाठी दिनदर्शिकेवरच्या निव्वळ तारखा नाहीत, तर ते भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्याचे भव्य उत्सव आहेत. भारतासाठी एकता ही कधीच सक्ती नव्हती तर ते नेहमीच आपल्या देशाचे वैशिष्ट्य होते. ही एकता हेच आपले वेगळेपण आहे, असे पंतप्रधानांनी आग्रहाने सांगितले. मोरबी येथे काल घडलेल्या दुर्घटनेसारख्या कठीण प्रसंगांत संपूर्ण देश एक होऊन पुढे येतो आणि देशाच्या प्रत्येक भागातून लोक प्रार्थना करतात आणि मदत करतात. साथीच्या काळात, औषध, शिधा आणि लस या बाबतीत नागरिकांच्या सहकार्यातून, 'ताली-थाली' च्या भावनिक एकात्मतेतून ही एकता दिसून आली, असे ते म्हणाले. खेळांमधले यश साजरे करताना, उत्सव साजरे करताना तसेच आपल्या सीमांना धोका उद्भवतो आणि आपले सैनिक त्यांचे रक्षण करतात, तेव्हा जनमानसात अशाच भावना दिसून येतात. या सर्व बाबी भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.  आपली ही एकता, आपल्यावर आक्रमण करणाऱ्यांना शतकानुशतके काट्यासारखी सलत होती आणि त्यांनी विभाजन करून त्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या मनातील एकतेच्या अमृताने त्यांचा बेत हाणून पाडला. भारताच्या विकासाचा आणि प्रगतीचा मत्सर करणाऱ्या शक्ती अजूनही सक्रिय आहेत आणि जात, प्रदेश, भाषा तसेच इतिहासाच्या आधारे विभाजनाला खतपाणी घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे आपण सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे, असे पंतप्रधानांनी सांगितले. गुलामगिरीची मानसिकता, स्वार्थ, अनुनयाचे धोरण, घराणेशाही, लोभ आणि भ्रष्टाचार हे घटक देशाचे विभाजन करू शकतात आणि देशाला कमकुवत करू शकतात, त्यामुळे त्याबाबत सतर्क राहिले पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्याला एकतेच्या अमृताने विभाजनाच्या विषाचा नायनाट करायचा आहे, असेही त्यांनी सांगितले.

"एकता दिवसाच्या निमित्ताने, मी सरदार साहेबांनी सोपवलेल्या जबाबदारीचा पुनरुच्चार करू इच्छितो."असे प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले. राष्ट्राची एकात्मिकता बळकट करणे ही नागरिकांची जबाबदारी असून, देशातील प्रत्येक नागरिकाने जबाबदारीच्या भावनेने आपली कर्तव्ये पार पाडण्यासाठी स्वतःला सज्ज केले तरच हे घडणार आहे, असे ते म्हणाले. “या जबाबदारीच्या जाणिवेनेच, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सब का प्रयास, हे सत्य प्रत्यक्षात साकार होईल आणि भारत विकासाच्या मार्गावर अग्रेसर राहील,” असे पंतप्रधान म्हणाले.सरकारची धोरणे कोणताही भेदभाव न करता देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. अरुणाचल प्रदेशातील सियांगमधील लोकांना गुजरातेतील सुरत येथील लोकांप्रमाणेच अत्यंत सहजतेने विनामूल्य कोविडविरोधी लस उपलब्ध करून दिली जाते, हे उदाहरणे देत, पंतप्रधानांनी ही बाब अधोरेखित केली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान (AIIMS) सारख्या वैद्यकीय संस्था आता फक्त गोरखपूरमध्येच नाही तर बिलासपूर, दरभंगा, गुवाहाटी, राजकोट आणि देशाच्या इतर भागातही आढळत आहेत. केवळ तामिळनाडूतच नाही तर उत्तर प्रदेशातही संरक्षण कॉरिडॉरच्या विकासाचे काम जोरात सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जात असल्या तरी रांगेतील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारी योजनांचा लाभ भारताच्या प्रत्येक भागात पोहोचत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

आपल्या देशातील कोट्यवधी लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक दशके किती वाट पहावी लागली यावर प्रकाश टाकून पंतप्रधान म्हणाले, “पायाभूत सुविधांमधील अंतर जितके कमी असेल तितकी देशातील एकात्मता अधिक मजबूत होईल”.हर एक योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे हा आपला उद्देश असल्याचे सांगत की भारत परीपूर्णतेच्या तत्त्वावर कार्य करत आहे, असे त्यांनी नमूद केले. सर्वांसाठी घरे,सर्वांसाठी डिजिटल कनेक्टिव्हिटी, सर्वांसाठी स्वच्छ स्वयंपाक आणि सर्वांसाठी वीज यासारख्या योजनांची उदाहरणे त्यांनी यावेळी दिली.100% नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय समान सुविधांपुरते मर्यादित नाही तर एकत्रित उद्दिष्टे, एकत्रित विकास आणि एकत्रित प्रयत्नांच्या समान उद्दिष्टावर आपला भर आहे, असे पंतप्रधान म्हणाले. जीवनाच्या मूलभूत गरजा पुरविण्यात येत असल्याने देश आणि संविधानावरील सामान्य माणसाच्या विश्वासाचे ते माध्यम बनत आहेत, तसेच सामान्य माणसांचा देशावरील विश्वास वाढत आहे,यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.सरदार पटेल यांचा भारताविषयी दृष्टीकोन यावर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले, “प्रत्येक भारतीयाला समान संधी मिळतील आणि सर्वांमध्ये समानतेची भावना निर्माण होईल. आहे.आज देश हे त्यांचे स्वप्न साकारताना पाहत आहे.”

गेल्या 8 वर्षांत देशाने अनेक दशकांपासून उपेक्षित असलेल्या प्रत्येक घटकाला प्राधान्य दिल्याचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की, आदिवासींचा स्वाभिमान लक्षात घेऊन त्यासाठी 'आदिवासी गौरव दिन' साजरा करण्याची परंपरा देशाने सुरू केली आहे.यासंदर्भात पंतप्रधानांनी सांगितले की, देशातील अनेक राज्यांमध्ये आदिवासी वस्तूसंग्रहालये बांधली जात आहेत.मानगड धाम आणि जांबुघोडाचा इतिहास जाणून घेण्याचे आवाहनही यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना केले आणि परकीय आक्रमकांनी केलेल्या अनेक हत्याकांडांना तोंड देत आपण स्वातंत्र्य मिळविले असे पंतप्रधानांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, "तेव्हाच या स्वातंत्र्याचे मूल्य आणि एकतेचे मूल्य आपण समजून घेऊ शकू."

एकता नगर हे भारतातील आदर्श शहर म्हणून विकसित होत आहे, जे केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात अभूतपूर्व असेल,अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. लोकसहभागाच्या बळावर विकास करत लोकांची दिसून येत असलेली एकजूट या शहराला केवळ भव्यच नव्हे तर दैवी दृष्टिकोन देईल, असे ही त्यांनी अधोरेखित केले. "स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या' रूपात जगातील सर्वात मोठ्या पुतळा ही प्रेरणा आपण दर्शविली आहे", असे मोदी पुढे म्हणाले.

एकता नगरच्या विकासाच्या प्रारुपावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा लोक पर्यावरणपूरक प्रारुप, देशाला प्रकाश देणारे एलईडी असलेले वीज बचत प्रारुप, सौरऊर्जेवर चालणाऱ्या स्वच्छ वाहतूक व्यवस्थेचे प्रारुप आणि प्राणी आणि पक्ष्यांच्या विविध प्रजातींच्या संवर्धन करणारे प्रारुप याबद्दल जेव्हा लोक बोलतील तेव्हा या शहराचीच चर्चा होईल.येथील मियावाकी फॉरेस्ट आणि मेझ गार्डनचे उदघाटन करण्याची संधी काल मिळाली असल्याचे पंतप्रधानांनी स्मरण करून दिले. एकता मॉल, एकता नर्सरी, विविधतेतून एकता दाखवणारे जागतिक वन, एकता फेरी,आणि एकता रेल्वे स्थानक हे सर्व उपक्रम राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

स्वातंत्र्यानंतर देशाच्या एकात्मतेसाठी सरदार साहेबांनी बजावलेल्या भूमिका अधोरेखित केली.सरदार पटेल यांच्या प्रयत्नांमुळे देशाच्या एकात्मतेसाठी शतकानुशतके सत्तेवर असलेल्या राजघराण्यांनी कर्तव्यदक्षपणे आपल्या अधिकारांचा त्याग केला, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.स्वातंत्र्यानंतर अनेक दशके हे योगदान दुर्लक्षित राहिले आहे.आता एकता नगरमध्ये त्या राजघराण्यांच्या बलिदानाला वाहिलेले वस्तूसंग्रहालय बांधले जाणार आहे.यामुळे देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान करण्याची परंपरा नवीन पिढ्यांपर्यंत पोहोचेल”, असे सांगून पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.

 

पार्श्वभूमी

पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या मार्गदर्शनानुसार, सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय 2014 मध्ये घेण्यात आला.राष्ट्राची एकात्मिकता,अखंडता आणि सुरक्षा टिकवून ठेवण्यासाठी आणि बळकट समर्पणाला बळकटी देण्यासाठी 31ऑक्टोबर हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात पंतप्रधान सहभागी झाले होते. यावेळी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पाच राज्यांतील पोलिस दले,उत्तर विभाग (हरियाणा), पश्चिम विभाग (मध्य प्रदेश), दक्षिण विभाग (तेलंगणा), पूर्व विभाग (ओडिशा)उत्तर पूर्व विभाग (त्रिपुरा) यांच्यामधील प्रत्येकी एका तुकडीतील पोलीस या सोहळ्यात सहभागी झाले होते.या पोलिस दलातील तुकड्यांव्यतिरिक्त,राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील (2022) सहा विजयी पोलीस क्रीडा पदक विजेते देखील यावेळी होणाऱ्या परेडमध्ये सहभागी होतील.

 

 

* * *

S.Thakur/Madhuri/Sampada/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1872257) Visitor Counter : 299