पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मध्य प्रदेशातील 'प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण'च्या 4.5 लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या ‘गृह प्रवेश’ कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 22 OCT 2022 11:36PM by PIB Mumbai

 

नमस्कार,

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान जी, राज्य सरकारचे मंत्री, आमदार, पंचायत सदस्य, इतर सर्व मान्यवर आणि मध्य प्रदेशातील माझ्या सर्व बंधु -भगिनींनो,

सर्वप्रथम, तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या आणि दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. धनत्रयोदशी आणि दीपावलीचा हा सण असा असतो, जेव्हा आपण नवीन सुरुवात करतो. घरात नवनवीन रंगरंगोटी करतो, नवीन भांडी आणतो, काही ना काही नवीन करतो, नवे  संकल्पही करतो. एक नवीन सुरुवात करून, आपण जीवनात नाविन्यता भरतो, आनंद आणि समृद्धीचे नवीन दरवाजे खुले होतात. आज मध्य प्रदेशातील 4.5 लाख गरीब भगिनी आणि बांधवांसाठी एक नवीन आयुष्य सुरू होत आहे. आज हे सर्व मित्र त्यांच्या नवीन आणि पक्क्या घरात गृह प्रवेश करत आहेत. एक काळ असा होता, जेव्हा धनत्रयोदशीला केवळ  तेच लोक मोटार आणि घरासारखी मोठी आणि महागडी मालमत्ता खरेदी करू शकत होते, ज्यांच्याकडे संसाधने, पैसा होता, त्यांच्यासाठीच  धनत्रयोदशी असायची. पण आज बघा, धनत्रयोदशीला देशातील गरीबही गृह प्रवेश करत आहेत. आज मी मध्य प्रदेशातील लाखो भगिनींचे विशेष अभिनंदन करतो, ज्या आज आपल्या घराच्या मालकीण झाल्या आहेत आणि उभारण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या घरांनी तुम्हाला लखपती केले आहे.

 

बंधु आणि भगिनींनो,

माझ्यासमोर बसलेल्या अनंत आकांक्षा बाळगलेल्या असंख्य लोकांना मी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाहू शकत आहे. पूर्वी या आकांक्षा, ही स्वप्ने समोर आली नाहीत कारण घर नसल्यामुळे या भावना दडपून, लपून, कोमेजून जात होत्या. मला विश्वास आहे की, आता या मित्रांना ही नवी घरे मिळाली आहेत, तर  त्यांना त्यांची स्वप्ने  साकार करण्यासाठी नवी ताकदही मिळाली आहे. त्यामुळे हा दिवस केवळ घरात प्रवेश करण्याचा नाही तर, घरात आनंद, नवे संकल्प, नवी स्वप्ने, नवा उत्साह, नवे भाग्य यांचा प्रवेश करण्याचाही आहे. हे आपल्या सरकारचे भाग्य आहे की, गेल्या 8 वर्षांत सरकार पीएम आवास योजनेंतर्गत 3.5 कोटी गरीब कुटुंबांचे जीवनातील सर्वात मोठे स्वप्न पूर्ण करू शकले आणि असे नाही की, आम्ही अशीच घरे बांधून दिली, चार भिंती बांधून दिल्या. आपले सरकार गरिबांसाठी समर्पित आहे, गरीबांचे आहे, त्यामुळे ते गरिबांच्या इच्छा, त्यांचे मन, त्यांच्या गरजा सगळ्यांपेक्षा जास्त समजून घेते. आपले सरकार जे घर देते, त्यासोबत इतर सुविधाही येतात. शौचालय असो, वीज असो, पाणी असो, गॅस असो, सरकारच्या विविध योजना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या  कोट्यवधी घरांना परिपूर्ण बनवतात.

 

मित्रांनो,

तुमच्याशी बोलत असताना मला पूर्वीची  परिस्थितीही आठवत आहे, याआधी गरिबांसाठी घर घोषित  केले जात असेल तर त्या घरासाठी वेगळे शौचालय बांधावे लागत असे. वीज, पाणी, गॅस जोडणीसाठी विविध शासकीय कार्यालयांच्या अनेक फेऱ्या माराव्या लागत होत्या. पूर्वीच्या सरकारांमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गरिबांना अनेक कार्यालयांमध्ये लाच द्यावी लागत होती. इतकेच नाही तर पूर्वी गरिबांच्या नावावर घरे घोषित केली जायचीमग सरकार सांगायचे की अशा प्रकारचेच घर बांधणार. अशी हुकूमशाही चालायची. सरकार एकच नकाशा द्यायची, इथूनच सामान घ्यायचे, तेच सामान घ्यायचे. ज्याला त्या घरात राहायचे आहे, अरे त्याला काही आवडी-निवडी असतात, त्याला स्वतःच्या सामाजिक परंपरा आहेत, स्वतःची अशी जीवनशैली आहे. यासंदर्भात काही चौकशीच कधी व्हायची नाही. हेच कारण आहे की पूर्वी जी मोजकी घरे बांधली जायची त्या अनेक घरांमध्ये  गृहप्रवेश कधीच शक्य होत नसे. पण हे स्वातंत्र्य आपण घराच्या मालकिणीला, घराच्या मालकाला दिले आहे, म्हणूनच आज पंतप्रधान आवास योजना मोठ्या सामाजिक-आर्थिक बदलाचे माध्यम बनत आहे.

 

बंधु आणि भगिनींनो,

अनेकदा आपण पाहतो की, एक पिढी आपली कमावलेली संपत्ती पुढच्या पिढीकडे सोपवते. आपल्या इथे आधीच्या सरकारांच्या चुकीच्या धोरणांमुळे लोकांना हतबलतेमुळे  बेघर असणे पुढच्या पिढीपर्यंत सोपवावे लागत होते आणि जी मुले  पिढ्यापिढ्यांपासून असलेले हे दुष्टचक्र भेदत असत, त्याचे खूप कौतुक होत असे, आणि गौरव होत असे. माझे भाग्य आहे की देशाचा सेवक म्हणून, देशाच्या कोट्यवधी  मातांचा मुलगा या नात्याने मला माझ्या कोट्यावधी गरीब कुटुंबांना या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याची संधी मिळाली आहे. आमचे  सरकार प्रत्येक गरीबाला पक्के घर देण्यासाठी अहोरात्र झटत आहे. त्यामुळेच आज इतक्या मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात आहेत. मध्य प्रदेशातही पीएम आवास योजनेअंतर्गत सुमारे 30 लाख घरे बांधण्यात आली आहेत. सध्या 9-10 लाख घरांचे बांधकाम सुरू आहे.

 

मित्रांनो,

लाखोंच्या संख्येत तयार होत असलेली ही घरे देशाच्या कानाकोपऱ्यात रोजगाराच्या संधीही निर्माण करत आहेत. आज सकाळी रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात होतो. तेव्हा मी विशेष करून सांगितले की मी संध्याकाळी एका गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला जाणार आहे आणि यासोबतच रोजगार कसा जोडला गेला आहे, हे मी पूर्णपणे सांगणार आहे.

 

मित्रांनो,

तुम्हालाही  माहित आहे की जेव्हा घरे बांधली जातात तेव्हा बांधकामाशी संबंधित साहित्य जसे की विटा, सिमेंट, वाळू, खडी, पोलाद, रंगरंगोटी, वीज जोडणीचे सामान, शौचालयातील आसन, नळाचा पाईप या सर्व गोष्टींची मागणी वाढते. जेव्हा ही मागणी वाढते, तेव्हा हे साहित्य बनवणारे कारखाने अधिक लोक कामावर  ठेवतात, अधिक वाहतूकदार लागतात, त्यांनाही ते कामावर ठेवतात. ज्या दुकानांमध्ये हा माल विकला जातो त्या दुकानातील   लोकांनाही रोजगार  मिळतो आणि हे सतना पेक्षा चांगले कोणाला  समजू शकेल? चुनखडी, सिमेंटसाठीही सतना ओळखले जाते. घरे बांधली की सतनाच्या सिमेंटची मागणीही वाढते. घरांचे  बांधकाम  करणारे कामगार, गवंडी, सुतार, प्लंबर, रंगारी , लाकडी वस्तू  बनवणाऱ्यांना देखील भरपूर काम मिळते. मला सांगण्यात आले आहे की, मध्य प्रदेशातच 50 हजारांहून अधिक गवंडी प्रशिक्षित आहेत. यापैकी आमच्या 9-10 हजार माता-भगिनी आहेत, त्यांना लोक रानीमिस्त्री  (महिला गवंडी) असेही म्हणतात. म्हणजेच आपल्या भगिनींना एका नव्या कलेशी, रोजगाराच्या नव्या संधीशी जोडण्याचे किती मोठे काम प्रधानमंत्री  आवास योजनेच्या माध्यमातून होत आहे. अन्यथा, बांधकाम क्षेत्रात भगिनींना केवळ अनस्किल्ड लेबर  म्हणजेच अकुशल कामगार समजले जायचे. मध्य प्रदेशातच ही घरे बनवण्यासाठी आतापर्यंत 22 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. आता तुम्हीही विचार करा की 22 हजार कोटी गेले कुठे? घर बांधले, पण ज्या पैशातून घर बांधले ते मध्य प्रदेशात विविध कामांसाठी गेले, लोकांच्या घरांमध्ये गेले, दुकानदारांना मिळावेत, कारखानदारांना मिळावेत जेणेकरून लोकांचे उत्पन्न वाढेल. याचा अर्थ असा आहे की, ही घरे सर्वांची  प्रगती घडवून आणत आहेत. ज्यांना घर मिळते त्यांचीही प्रगती होते आणि ज्या गावात घरे बांधली जातात ते गावकरीही प्रगती करतात.

 

बंधू आणि भगिनींनो,

पूर्वीच्या सरकारांमध्ये आणि आमच्या सरकारमध्ये एक मोठा फरक आहे. पूर्वीच्या सरकारांनी गरीबांना तळमळत ठेवले, त्यांना त्यांच्या कार्यालयाला वारंवार चकरा मारायला भाग पाडले. प्रत्येक योजनेचा लाभ गरीबांना मिळावा, यासाठी आमचे सरकार स्वत: गरीबांपर्यंत पोहोचत आहे, यासाठी मोहीम राबवत आहे. आज आपण संपृक्ततेबद्दल बोलत आहोत, म्हणजेच लोककल्याणाच्या प्रत्येक योजनेचा लाभ शंभर टक्के लाभार्थ्यांपर्यंत कसा पोहोचवायचा? घराणेशाही नाही, कोणी तुझा किंवा माझा नाही, याला द्यायचे आहे, त्याला द्यायचे नाही, असे काहीही नाही. ज्यांचा हक्क आहे त्या सर्वाना द्यायचे आहे. सगळ्यांना पक्की घरे लवकर मिळावीत. गॅस असो, वीज जोडणी असो, पाण्याचे कनेक्शन असो, आयुष्मान भारत अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार असोत, प्रत्येकाला ते जलद गतीने मिळायला हवेत. प्रत्येकाला चांगले रस्ते, चांगल्या शाळा, महाविद्यालये, चांगली रुग्णालये मिळायला हवीत. गावा-गावात ऑप्टिकल फायबर वेगाने पोहोचावे. यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करत आहोत. शेवटी, आपल्याला ही घाई का आहे, आपण यासाठी इतके अधीर का आहोत? यामागे भूतकाळातील एक मोठा धडा आहे. अशा प्रत्येक मूलभूत सोयींकरिता गेली अनेक दशके झुलवत ठेवले होते. देशातील खूप मोठी लोकसंख्या या मूलभूत सुविधांसाठी झगडत होती. त्यांना इतर गोष्टींचा विचार करायलाही वेळ नव्हता. त्यामुळे गरीबी हटावचे प्रत्येक आश्वासन, प्रत्येक दावे हे फक्त राजकारणचे डावपेच असायचे. याचा कोणालाही लाभ झाला नाही. सेनापतीने  कितीही मनोबल वाढवले, मात्र सैनिकांकडे लढण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा नसतील तर युद्ध जिंकणे अशक्यच असते. म्हणूनच आम्ही गरीबीतून बाहेर पडण्यासाठी, गरीबीवर मात करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाला त्या मूलभूत सुविधांशी झपाट्याने जोडण्याचा निर्णय घेतला. आता या सुविधांनी सुसज्ज होऊन आपली गरिबी झपाट्याने कमी करण्याचे प्रयत्न गरीबांकडून सुरू आहेत. आणि मला तुम्हाला हे सांगायचे आहे कि जे घर तुम्हाला दिले आहे ना? हे फक्त राहण्याची, खाण्याची, पिण्याची, झोपण्याची जागा नाही. मी तर म्हणतो कि तुमचे घर एक अभेद्य किल्ला आहे, असा किल्ला, जो गरीबीला येऊ देणार नाही, उरली-सुरली गरीबीही दूर करेल, असा किल्ला म्हणजे तुमचे घर आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

जागतिक महामारीच्या काळात त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागू नये, यासाठी केंद्र सरकार गेल्या अनेक महिन्यांपासून 80 कोटीहून अधिक देशवासीयांना मोफत अन्नधान्य देत आहे. यासाठी केंद्र सरकारने पीएम गरीब कल्याण अन्न योजनेवर आतापर्यंत 3 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. आणि मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. ज्या  करदात्यांनी देशाची तिजोरी भरली, कर भरला, त्या करदात्याला जेव्हा आपला पैसा योग्य ठिकाणी खर्च होत आहे, असे वाटते, तेव्हा करदात्यालाही आनंद होतो, समाधान वाटते आणि अधिकाधिक कर भरत राहतो. आज देशातील कोट्यावधी करदात्यांना समाधान आहे की, कोरोनाच्या काळात कोट्यवधी लोकांच्या उदरभरणाची सोय करून ते किती मोठी सेवा करत आहेत. आज मी चार लाख घरे देत असताना प्रत्येक करदात्याच्या मनात विचार असेल की चला मी दिवाळी साजरी करतोय, पण माझा मध्य प्रदेशातील गरीब बांधवही चांगली दिवाळी साजरी करतोय, त्याला पक्के घर मिळत आहे. त्यांच्या मुलीचे जीवन सुखमय होईल. परंतु मित्रांनो, जेव्हा तोच करदाता त्याच्याकडून वसूल केलेल्या पैशातून मोफत खिरापत वाटली जात असल्याचे पाहतो, तेव्हा करदात्याला सर्वात जास्त दुःख होते. आज असे अनेक करदाते मला उघडपणे पत्र लिहित आहेत. मला आनंद आहे की, देशातील एक मोठा वर्ग या खिरापतवादाविरोधात कंबर कसत आहे.

 

मित्रांनो,

नागरिकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासोबतच गरीब, मध्यमवर्गीयांच्या पैशाची बचत करणे हेही आपल्या सरकारचे ध्येय आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 4 कोटी गरीब रुग्णांनी मोफत उपचार घेतले आहेत. त्यामुळे या सर्व कुटुंबांची  हजारो कोटी रुपयांची बचत झाली आहे, ज्याचा भार सरकारने उचलला आहे. कोरोनाच्या काळात, या गंभीर आजाराच्या आकस्मिक संकटामुळे गरीब, मध्यमवर्गीयांना खिशातून खर्च करावा लागू नये, कर्ज काढावे लागू नये, यासाठी मोफत लसीकरणावर शासनाकडून हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले. अगोदर कोरोना आला, मग जगात युध्दाला सुरुवात झाली, त्यामुळे आज परदेशातून महागड्या किंमतीत खते खरेदी करावी लागत आहेत. आज प्रत्येक गोणीमागे 2,000 रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेला युरिया आम्ही शेतकऱ्यांना फक्त 266 रुपयांमध्ये पुरवत आहोत. 2000 हजार रुपयांमध्ये गोणी घेऊन 300 रुपयांपेक्षा कमी किमतीत दिल्या जातात. शेतकर्‍यांवर बोजा पडू नये, म्हणून यावर्षी सरकार त्यामागे 2 लाख कोटींहून अधिक खर्च करत आहे. केंद्र सरकारची 'पीएम किसान सन्मान निधी योजना'ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. काही दिवसांपूर्वी देण्यात आलेला 16 हजार कोटींचा हप्ता प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यापर्यंत तत्काळ पोहोचला, हे तुम्ही पाहिलेच असेल. आत्तापर्यंत आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2 लाख कोटींहून अधिक रुपये जमा केले आहेत आणि ही मदत पेरणीच्या वेळी, ज्यावेळी त्यांना  खतांची, औषधांची गरज असते तेव्हा शेतकऱ्यांना मिळाली. शेतकऱ्यांनी पीक विकले तर पैसेही आता थेट बँक खात्यात येतात. मनरेगाचे पैसेही थेट बँक खात्यात जमा होतात. आपल्या गरोदर मातांना चांगल्या अन्नाची सर्वाधिक गरज असताना मातृ वंदना योजनेचे हजारो रुपये थेट त्यांच्यापर्यंत पोहोचतात.

 

बंधू आणि भगिनींनो,

आज जर सरकार हे सर्व करू शकत असेल तर त्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे सेवाभावतुम्हा सर्वांसाठी समर्पण आणि कोणी कितीही टीका केली तरी आम्ही समर्पणाने आणि तुमच्या आशीर्वादाने, गरीबांसाठी चांगले.काम करण्याच्या राजकीय इच्छाशक्तीने पुढे वाटचाल करत आहोत. त्यामुळेच आज तंत्रज्ञानाचा वापर एवढ्या व्यापक प्रमाणावर होत आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी, तरुणांनी जे काही नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे, त्याचा उपयोग सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी केला जात आहे. आता पहा, ड्रोनच्या सहाय्याने गावोगावी घरांचे सर्वेक्षण केले जात आहे. पूर्वी जे काम पटवारी करायचे, महसूल विभागाचे कर्मचारी करायचे, आता तेच काम तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ड्रोनमार्फत केले जात आहे. देशात प्रथमच स्वामीत्व योजनेंतर्गत गावातील घरांचे नकाशे तयार करून ग्रामस्थांना मालकीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. जेणेकरून सीमेचे वाद होऊ नयेत, कोणीही घराचा बेकायदेशीर ताबा मिळवू नये आणि गरज पडल्यास बँकांकडून कर्जही मिळवता येईल. तसेच शेतीमध्ये ड्रोनच्या वापरावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात असताना शेतकऱ्यांकरिता ड्रोन उपलब्ध केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी आम्ही शेतकऱ्यांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. देशभरात असलेली लाखो खतांची दुकाने प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रे म्हणून विकसित केली जात आहेत. आता या किसान केंद्रांवर शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळतील. भविष्यात या केंद्रांवर अनेक शेतीशी निगडीत उपकरणे आणि अगदी ड्रोन देखील भाड्याने उपलब्ध होतील. युरियाबाबतही मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. आता कोणत्या कंपनीचा युरिया घ्यायचा, कोणता घ्यायचा नाही, या अडचणीतून शेतकऱ्याची सुटका झाली आहे. आता प्रत्येक खत भारत नावाने मिळणार आहे. त्यावर किंमतही स्पष्ट लिहिलेली आहे. जे लिहिले आहे त्यापेक्षा जास्त पैसे शेतकऱ्याला देण्याची गरज नाही. मला खात्री आहे की अशा प्रयत्नांमुळे शेतकरी आणि गरीबांचे जीवन सुकर होईल. विकसित भारत घडवण्यासाठी आपण सर्वजण काम करू. पुन्हा एकदा मी सर्व लाभार्थ्यांचे तुमच्या स्वतःच्या पक्क्या घरांसाठी अभिनंदन करतो आणि तुम्ही किती आनंदी आहात याची मी कल्पना करू शकतो. स्वतःचे घर. तीन-तीन, चार-चार पिढ्या सरल्या असतील, ज्यांनी स्वतःच्या घरी कधी दिवाळी साजरी केली नसेल. आज जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांसोबत धनत्रयोदशी आणि दीपावली साजरी करत आहात, तेव्हा या दिव्याचा प्रकाश तुमच्या जीवनात नवीन प्रकाश घेऊन येईल, मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो आणि हे नवीन घर तुमच्या प्रगतीचे कारण बनावे, हीच माझी सदिच्छा. खूप खूप धन्यवाद.

***

S.Pophale/S.Chavan/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1870440) Visitor Counter : 345