पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातच्या जुनागढ इथं विविध विकास प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

Posted On: 19 OCT 2022 10:30PM by PIB Mumbai

 

भारत माता की जय,

भारत माता की जय!

असं वाटतंय की तुमच्याकडे दिवाळी जरा लवकरच आली आहे. मग सणावारांचे दिवस असोत, पुढे धनत्रयोदशी असो, दिवाळी असो, नव्या वर्षाची सगळी तयारी असो, सर्व लोक आपापल्या कामात बुडून गेले आहेत. आणि इतका मोठा जनसमुदाय.. जिथे जिथे माझी नजर पोहोचते आहे, असं वाटतंय जशी आशीर्वादाची गंगाच वाहते आहे. जय गिरनारी! इतक्या मोठ्या संख्येनं संत महात्मा इथं आशीर्वाद द्यायला आले आहेत, यापेक्षा मोठा उत्साह काय असू शकतो? ही तर सिंहांचीही भूमी आहे आणि नरसिंहाचीही भूमी आहे. आणि विशेष म्हणजे, ज्या माता भगिनी मोठ्या संख्येनं इथे आशीर्वाद द्यायला आल्या आहेत, त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.

 

बंधू-भगिनींनो,

आज जुनागढ, गिर सोमनाथ, पोरबंदर, लोक तर आकडे देखील मोजू शकत नाहीत, इतका मोठा विकास, चार हजार कोटीं पेक्षाही अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण किंवा शिलान्यास आज झाला आहे. एक काळ असा होता की संपूर्ण गुजरातचा 12 महिन्यांचा एकूण अर्थसंकल्प जितका होता, त्याच्यापेक्षा जास्त लोकार्पण आणि पायाभरणीचे कार्यक्रम आज मी एकाच दिवसात गुजरातच्या धरतीवर करतो आहे. हे आपल्या आशीर्वादाचं फळ आहे, आणि या विकास कामांचा उपयोग माझ्या मच्छिमार बंधू - भगिनींचे आयुष्य सुगम करण्यात होईल.  आपलं हे जुनागढ, मी तर नेहमीच म्हणतो की गुजरातच्या पर्यटन क्षेत्राची राजधानी बनण्याची क्षमता आणि ताकद आपल्या या जुनागढ, गिर - सोमनाथ, आपलं पोरबंदर या शहरांमध्ये आहे. या योजनांमुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. विकासाकामांचा असा धडाका, विकासाच्या अनेक पैलूंसाठी आपणा सर्वांना दिवाळी भेट म्हणून हा प्रसंग साजरा करण्यासाठी मी आपले खूप खूप अभिनंदन करतो, शुभकामना देतो.

 

बंधू - भगिनींनो,

आज माझी छाती अभिमानाने फुलून येते, कारण आपल्यामुळे, आपल्या आशीर्वादामुळे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, की गुजरात सोडून गेल्यावर आमच्या चमूनी ज्या प्रकारे गुजरातला सांभाळलं आहे, भूपेंद्र भाई आणि त्यांचा चमू ज्याप्रकारे गुजरातमध्ये वेगाने विकासाची कामं करत आहे, यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो, आज गुजरातचा विकास सर्वच क्षेत्रात अतिशय वेगाने होत आहे.

 

मात्र बंधू - भगिनींनो,

जेव्हा आपण जुने दिवस आठवतो, इथे अनेक वयोवृद्ध लोक बसले आहेत, त्यांना माहित आहे, की आपण कशा परिस्थितीत दिवस काढले आहेत, 10 वर्षांपैकी 7 वर्ष दुष्काळ असायचा. पाण्याची वाट बघून थकून जायचो, एकीकडे निसर्गाचा कोप, तर दुसरीकडे या माझ्या घेघुर समुद्राचं खारं पाणी आत यायचं, जमिनीत काहीच पिकत नसे, अशी आपल्या जमिनीची अवस्था झाली होती. काठीयावाड रिकामं होत असे, खेड्याखेड्यातून लोक घर सोडून सूरतला जात असत, कुणी हिंदुस्थानच्या दुसऱ्या कोपऱ्यात जात असत, दोन वेळची भाकरी कमवायला धावपळ करावी लागत असे. मात्र आपण सर्वांनी जी मेहनत आणि समर्पणाच्या भावनेतून जी मेहनत केली नं, तर निसर्गाने सुद्धा आशीर्वाद दिला आहे. याचा अभिमान बाळगा बंधूनो, 2001 नंतर ईश्वराची कृपा बघा, 20 वर्षांहून जास्त काळ झाला आहे, एकाही वर्षी दुष्काळ पडला नाही. याला आशीर्वाद नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, एकीकडे आपले आशीर्वाद, दुसरीकडे निसर्गाचे आशीर्वाद आणि त्यामुळे विकासाची भेट घेऊन जीवन जगण्यात अधिकच आनंद मिळतो. एक काळ होता, नर्मदा मातेचं दर्शन करायला लोक विशेष बस करून जात असत, पुण्या कमवायला, काळ बदलला, मेहनतीचं गोड फळ म्हणून नर्मदा माता आज सौराष्ट्रच्या खेड्यापाड्यात स्वतः आशीर्वाद द्यायला येत आहे. पाणी पोहोचू लागलं आहे, रस्ते सुधारू लागले आहेत, फळं - भाज्या पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं आयुष्य बदलून गेलं आहे, बंधुंनो.

आज जुनागढमध्ये, मला आताच आपले राज्यपाल महोदय आचार्य देवव्रत जी सांगत होते, की साहेब, जुनागढच्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती चांगल्या प्रकारे आत्मसात केली आहे, आणि संपूर्ण शक्तीनिशी या कामात लागले आहेत. आणि बंधू - भगिनींनो, जुनागढचा केसर आंबा भारतातच नाही, तर जगात या आंब्याची गोडी पोहोचली आहे, बंधुंनो. आपल्या भारताला इतका मोठा समुद्रकिनारा लाभला आहे, आणि त्यात गुजरातकडे तर याचा खूप मोठा भाग आहे, मात्र भूतकाळात हा समुद्रच आपल्याला एक ओझे वाटायचा. हे मिठाचं क्षेत्र, खारी हवा आपल्याला विषासमान वाटत होती. काळ बघा मित्रांनो, जो समुद्र आपल्याला संकट वाटत होता, तोच समुद्र आज आपल्याला आपल्या मेहनतीचे फळ देतो आहे. ज्या कच्छच्या वाळवंटातले धुळीचे कण आपल्यासाठी समस्या घेऊन फिरत होते, तोच कच्छ आज गुजरातच्या विकासाचा पाया झाला आहे, असं इथे होत आहे. विपरीत नैसर्गिक परिस्थितीत देखील गुजरातने याचा सामना केला आहे आणि प्रगीतीची नवी शिखरं गाठली आहेत, बंधुंनो. 20 - 25 वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा ही परिस्थिती बदलायचा संकल्प केला होता, विडा उचलला होता, एक एक क्षण वेचला होता, आणि आज जो 20-25 वर्षांचा तरुण असेल, त्याला समजणार नाही, की पूर्वीचे दिवस कसे होते, ते कल्पना देखील करू शकणार नाहीत, असे चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न केला आहे बंधूनो.

आपल्या मच्छिमार बंधू - भगिनींच्या विकासासाठी गुजरातमध्ये सागर ग्रामीण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत आपल्या मच्छिमार बंधूंची सुरक्षा, त्यांच्या सुविधा, आपल्या मच्छिमार बंधू - भगिनींना उद्योग धंदा करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभ्या करण्यावर आम्ही भर दिला आहे. आणि याचा परिणाम असा झाला की 20 वर्षांत गुजराती लोकांचा जगात मासळी निर्यातीचा व्यवसाय 7 पट वाढला आहे. बंधू - भगिनींनो जेव्हा आपली मासळी इतक्या मोठ्या प्रमाणात निर्यात होते आहे, आणि जगात पोहोचत आहे, तर मला एक जुनी घटना आठवली. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा जपानचं शिष्टमंडळ आलं होतं, तर मी गुजरातच्या विकासाचा एक व्हिडिओ बनवून त्यांना दाखवत होतो, आणि जपानी भाषेत त्याची माहिती दिली जात होती. आणि ते लोक देखील मनापासून सर्व गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, तेवढ्यात ते जपानी लोक म्हणाले, साहेब हे जरा बंद करा, मी म्हटलं काय झालं, हा व्हिडीओ मी समजावून सांगतो आहे. आणि तुम्ही म्हणताय की ताबडतोब बंद करा, मला हे समजलं नाही, मी म्हटलं बंद का करू. तर ते म्हणाले, साहेब तुम्ही हा जो समुद्र किनारा दाखवला आहे, आणि मच्छिमार दाखवायला लागलात, आणि ते जे सुरमई मासे दिसत आहेत न, त्यामुळे माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे, आता मी बसू शकत नाही, आता मला जाऊ द्या, इतकी आपली कीर्ती आहे की सुरमई माश्याचं नाव ऐकलं आणि तोंडाला पाणी सुटलं. आज सुरमई नावाचे मासे जपानच्या बाजारात गुजरातच्या नावाने ओळखले जातात, बंधुंनो. गुजरातच्या सुरमई माशाची शेकडो कोटी रुपयांची निर्यात दर वर्षी होत आहे आणि आता तर वलसाडमध्ये सी - फूड पार्क आहे, तिथून देखील निर्यात होते. मत्स्योत्पादन क्षेत्रात देखील आपण नवनवी शक्ती प्राप्त करत आहोत.

 

बंधू - भगिनींनो,

गेल्या 8 वर्षांत डबल इंजिनच्या सरकारचा डबल लाभ गुजरातच्या समुद्र किनाऱ्याला मिळाला आहे. मासे असोत, सी फूड असो, त्याचा व्यापार वाढतो आहे, पूर्वी आपल्याकडे खोल चॅनल लागायचे, आपल्या मच्छिमार बंधूंना उथळ चॅनलमुळे त्रास व्हायचा. मासे पकडले असतील आणि ते समुद्र किनाऱ्यावर आणायचे असतील तर खूप त्रास व्हायचा, आता जेव्हा गुजरातमध्ये मच्छिमारी बंदर बनविण्याची मोहीम सुरु केली आहे, तर आम्ही आपल्या सागरावर अवलंबून असलेल्या या लोकांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. दोन दशकांत किती मोठे मासेमारी बंदर विकसित केले गेले आणि जे जुने होते, त्यांचं देखील अद्ययावतीकरण केलं गेलं. डबल इंजिन सरकार बनल्यानंतर या कार्याला दुप्पट वेग आला. आजही 3 मासेमारी बंदर विकास कामाची पायाभरणी होत आहे, बंधुंनो. तुम्ही कल्पना करू शकता की आपल्या क्षेत्रात कशी आर्थिक तेजी येणार आहे. त्यांच्या (मच्छिमारांच्या) आयुष्यात किती मोठा बदल होणार आहे. मासेमारी बंदरातून मासळीची वाहतूक सोपी होईल आणि निर्यात देखील अधिक वेगवान होईल. या सोबतच आता आम्ही ड्रोन विषयक धोरण घेऊन आलो आहोत. आता तर ड्रोन 20-20 किलो, 25-25 किलो, 50 किलो माल उचलून घेऊन जातात, आणि त्यामुळे जिथे समुद्र नाही, असे जे भाग आहेत, या ड्रोनद्वारे मासळी पोहोचावी आणि ताजा माल पोहोचावा यासाठी संधी निर्माण केल्या जात आहेत. विकासाचे फायदे किती असतात, त्याचं हे उदाहरण आहे, बंधुंनो.

 

बंधू - भगिनींनो,

डबल इंजिनचे सरकार, माझे शेतकरी बंधू, आपली खेडी, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन काम करते, आमच्या सरकारने पीएम शेतकरी सन्मान निधी, तुम्ही बघितलं, आता दोन दिवसांपूर्वीच दिल्लीहून मी दोन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले, आणि शेतात बसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर लगेच 2 हजार रुपये मिळाले आणि ते खात्यात जमा झाले आहेत. आणि आतापर्यंत जितके रुपये दिले आहेत नं, त्यातून एकूण 2 लाख 16 हजार कोटी रुपये, जवळजवळ सव्वा दोन लाख कोटी रुपये हे माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत, बंधुंनो.

 

बंधु भगिनींनो,

याचा लाभ माझ्या गुजरातच्या शेतकर्यांनाही मिळाला आहे, त्यांच्या बँक खात्यांमध्येही हजारो कोटी रुपये जमा झाले असून त्यापैकी मोठा लाभ लहान शेतकर्यांना मिळाला आहे, ज्यांच्या जवळ केवळ एक किंवा दोन एकर जमीन आहे, सिंचनासाठी पाणी शोधावे लागते, जे केवळ पावसावर भरोसा ठेवून जगत आहेत, त्यांच्यासाठी तर हे पैसे खूपच उपयोगी सिद्ध होतील. पशुपालक असोत, शेतकरी असोत, सागर खेडूचे माझे मच्छीमार असोत, आमच्या सरकारने प्रथम त्यांना किसान क्रेडिट कार्ड म्हणजे केसीसीच्या सुविधेशी जोडून घेतले. सुरूवातीला हे केवळ शेतकर्यांसाठी होते. आम्ही त्याचा विस्तार करून पशुपालकांना याचा लाभ दिला आणि मच्छीमारांनाही यात सामील करून घेतले आहे आणि या केसीसीमुळेच बँकेकडून कर्ज घेताना माझे मच्छीमार आणि माझ्या पशुपालकांसाठी रस्ता अगदी सहजसोपा झाला आहे. याचा लाभ साडेतीन कोटीहूनही अधिक लोक घेत आहेत. बंधुभगिनींनो आणि खूपच कमी व्याजदराने हे पैसे मिळत आहेत. त्यांना आता सावकारांच्या दारी जावे लागत नाही, कर्जाच्या बोज्याखाली राहावे  लागत नाही आणि आपल्या व्यवसायाच्या विकासासाठी ते या पैशांचा खर्या अर्थाने उपयोग करू शकतात. बोटीपासून ते जीवरक्षक जॅकेटपर्यंत, डिझेल असो, कामगारांची देणी असोत, तेल असो, माझ्या बंधुंनो, या सर्वासाठी हा खर्च त्यांना खूप मोठी शक्ती देतो. आणि जे लोक वेळेवर पैसे परत करतात, निश्चित केलेल्या दिवशी पैसे परत करतात, त्यांच्यासाठी तर व्याज शून्य होते. शून्य टक्के व्याज दर लागतो.  यापेक्षा आणखी कोणता मोठा लाभ असेल बंधुंनो. या किसान क्रेडिट कार्डने माझ्या पशुपालकांचे आयुष्य आणखीच सुसह्य बनवले आहे. गेल्या दोन दशकांमध्ये गुजरातेत बंदरांचा ज्या प्रकारे विकास झाला आहे, त्यामुळेसुद्धा गुजरातच्या विकासाला एक प्रकारे समृद्धीच्या प्रवेशद्वाराशी जोडून ठेवले आहे, नव्या क्षमतांशी जोडले आहे.

सागरमाला योजनेच्या अंतर्गत देशातील संपूर्ण सागरकिनार्यावर पायाभूत सुविधांना मजबूत करणे असो, केवळ बंदरांचा विकासच नव्हे, नुसता पोर्ट्सचा विकास नाही तर बंदरप्रणित विकासाचे कार्यही आम्ही केले आहे. आणि आज आपण पहात आहात की गुजरातमध्ये सागर किनार्यावर सागरमालाच्या केवढ्या विशाल अभियानाला आम्ही प्रारंभ करत आहोत. सागरी महामार्ग, ज्याच्यामुळे  जुनागढच्या व्यतिरिक्त, पोरबंदर, जामनगर, देवभूमी, द्वारका, मोरबीपर्यंत म्हणजे मध्य गुजरातपासून ते दक्षिण गुजरातपर्यंत आम्ही या अभियानाचा विस्तार केला आहे बंधुंनो. याचा अर्थ हा आहे की गुजरातची पूर्ण किनारपट्टी आणि तिची संपर्कव्यवस्था अतिशय मजबूत होणार आहे.

 

बंधु भगिनींनो,

गेल्या 8 वर्षांमध्ये, सरकारने आमच्या माताभगिनींसाठी जे कार्य केले आहे, एकानंतर एक जी पावले उचलली आहेत, त्यांच्यामुळेच माझ्या माताभगिनी सन्मानपूर्वक जीवन जगू शकतील, अशी व्यवस्था केली आहे, आणि ज्याचा लाभ माझ्या गुजरातच्या लाखो माताभगिनींना मिळाला आहे, आणि म्हणून तर हे गुजरात राज्य माझ्यासाठी एक शक्तीची कवचकुंडले बनली आहेत, शक्ती कवच, या माता-भगिनींचा मी कायमचा ऋणी आहे. देशासाठी अनेक मोठमोठे विशाल अभियान राबवण्यात आले, ज्यांचा थेट लाभ माझ्या या माता-भगिनींना मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या  अंतर्गत कोट्यवधी शौचालये बनवण्यात आली आणि शौचालयासाठी आपल्याकडे जाजरू शब्द वापरला  जातो. तर  आमच्याकडे उत्तर भारताच्या महिला म्हणतात शौचालय तर आमच्यासाठी गर्वाने सांगण्यासारखी, आमच्या सन्मानाची व्यवस्था आहे. कोट्यवधी शौचालये बांधून आमच्या बहिणींची अनेक अडचणींतून आम्ही सुटका केली आहे. आणि ज्यामुळे त्यांच्या आरोग्यातही लक्षणीय सुधारणा झाली आहे. आम्ही उज्वला गॅस पुरवण्याची व्यवस्था उभारली, आणि मी भूपेंद्रभाईंचेही अभिनंदन करतो. त्यांच्या सरकारने या दिवाळीला सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन दोन गॅस सिलिंडर विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे आमच्या गरीबांच्या घरांमध्येही दिवाळी साजरी केली जाईल.

 

बंधु भगिनींनो,

सर्वांच्या घरात पाणी पोहचावे, नळाद्वारे पाणी पुरवले जावे, असा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला माहीत आहे की एक काळ होता, मुख्यमंत्र्यांना आमदार निवेदने देत असत. मी पूर्वीच्या सरकारांसंबंधी सांगत आहे. आणि आमदारांची मागणी अशी असे की, आमच्या पाच गावांमध्ये हातपंप बसवून द्यावा. आणि जो मुख्यमंत्री हातपंपांची मागणी मंजूर करत असे, त्याचा ढोलताशांच्या गजरात स्वागत समारंभ होत असे. तो एक काळ असा होता की हातपंपांसाठी सारे जण प्रतीक्षा करत असत. आता आपला हा पुत्र घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवत आहे बंधुंनो.  शुद्ध पाणी मिळू लागल्याने आजाराचे प्रमाण कमी होत असते, मुलांमधील आजारांचे प्रमाण कमी होत आहे आणि माता भगिनींच्या अडचणीही दूर होतात. प्रसुतीच्या दरम्यान माझ्या माताभगिनींच्या शरीरातील पोषक मूलद्रव्ये कमी होऊ नयेत, आईच्या गर्भात जे बाळ आहे, त्याच्या विकासात कुठेही कमतरता असू नये, बाळ अपंग पैदा होऊ नये, दिव्यांग पैदा होऊ नये, अर्धविकसित  शरीर घेऊन ते येऊ नये, त्याच्यासाठी त्याच्या आईच्या आरोग्याची चिंता करण्यासाठी ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना-मातृवंदना योजना आणली गेली आहे. आरोग्यसंपन्न बाळाचा जन्म व्हावा, आईचे आरोग्यही सुदृढ रहावे आणि सुदृढ मूल असेल तर भारताचे भविष्यही उज्वल होत असते  बंधुंनो. आमच्या सरकारने पीएम आवास योजनेच्या अंतर्गत जी घरे दिली आहेत, त्या घरांमध्येही , माझा आग्रह असा आहे की, अगदी गुजरातेत मी जेव्हा होतो, तेव्हापासूनच माझा असा आग्रह होता की जी काही सरकारतर्फे मी  व्यवस्था करेल, ती बहिणींच्या नावानेच करेन. भूकंपानंतर जी घरे दिली, ती बहिणींच्या नावेच दिली. कारण आमच्या माता भगिनींची स्थिती कशी होती, हे आम्हाला माहीत आहे. शेती असेल तर पुरूषांच्या नावावर, दुकान असेल तर ते पुरूषांच्या नावावर, घर पुरूषांच्या नावावर, गाडी ही पुरूषांच्या नावावर आणि पती नसेल तर मुलाच्या नावावर. आमच्या माताभगिनींच्या नावावर काही नसायचे. आणि संकट आले तर जाणार तर कुठे, हा प्रश्न होता.  आपल्या या पुत्राने आता जे काही सरकारी घर मिळेल, व्यवस्था मिळेल ती माझ्या माताभगिनींच्या नावावरच मिळेल, असा निश्चय केला.

आज माझ्या बहिणींना जी घरे मिळाली आहेत, त्या माझ्या माताभगिनी आता लक्षाधीशांच्या यादीत आल्या आहेत,बंधुंनो. आज आमचे सरकार गावागावात, महिला उद्योजकतेचा, स्वयं सहाय्यता गटांच्या माध्यमातून, सखी मंडळांच्या माध्यमातून व्यापक विस्तार करत आहेत.  देशभरात 8 कोटीहूनही अधिक भगिनी स्वयंस्वहाय्यता गटांचा, ज्याला आपल्या गुजरातेत सखी मंडळांच्या नावाने ओळखले जाते, लाखो भगिनी गुजरातेतही त्यांचा लाभ घेत आहेत. मुद्रा योजना बँकेतून भगिनींना कोणत्याही हमीशिवाय कर्ज मिळते आणि हे कर्ज सर्वांसाठी होते. माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे की, तरीही 70 टक्के कर्ज घेणार्या माझ्या भगिनी आहेत आणि ज्या लहानमोठा व्यवसाय करत आहेत आणि इतर दोन तीन महिलांनाही रोजगार देत आहेत.

 

बंधु भगिनींनो,

आज माझ्या कितीतरी युवा मित्रांचे येणारा भविष्यकाळ किती उज्वल असेल, त्यांना मी जेव्हा समोर पहातो, तेव्हा माझा विश्वास वाढतो आणि त्यांच्यात आशेचा संचार होतो. गुजरातच्या जलद विकासासंदर्भात आता माझ्या गुजरातचे तरूण आश्वस्त झाले आहेत. मी 8 वर्षांमध्ये गुजरातसह पूर्ण देशभरात आमच्या युवकांचे सामर्थ्य वाढेल, यासाठी अनेक पावले उचलली आहेत. शिक्षणापासून ते रोजगार, रोजगाराच्याही पुढे जाऊन स्वयंरोजगार, यासाठी अनेक संधी त्यांच्यासाठी उपलब्ध होवोत, यासाठी आम्ही विचार केला आहे. आता मी गांधीनगरमध्ये संरक्षण प्रदर्शनाचे-संरक्षणासाठी असलेल्या साधनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करून आलो आहे. आता गुजरात सर्वोच्च स्थानावर राहील, असे सामर्थ्य आले आहे आणि माझ्या तरूण लोकांसाठी संधी घेऊन आले आहे. गेल्या 8 वर्षांत देशभरात शेकडो नवीन विद्यापीठे स्थापन केली, हजारो महाविद्यालये सुरू केली, आमच्या गुजरातेत तर नवनवीन शिक्षण संस्था स्थापन करण्याचे कार्य कायम सुरू आहे आणि त्यात उच्च  शिक्षण घेणारे विद्यार्थी तेजस्वी होऊन कुटुंबाचे , गावाचे, राज्याचे आणि माझ्या देशाचे  नाव उजळवून टाकतील, हे आज आमचे सद्भाग्य आहे. पूर्वी गुजरातच्या आमच्या तरूणांना शिकायचे असेल तर राज्याच्या बाहेर जावे लागत असे. आज 20 वर्षांत जी काही तपश्चर्या केली आहे, एकापेक्षा एक शानदार विद्यापीठे आणि महाविद्यालयांचा विस्तार केला  आहे. आणि आता तर नवीन शिक्षण धोरण, राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू झाली आहे. याच्या अंतर्गत, वैद्यकीय, अभियांत्रिकी येते. आमच्याकडे गावांमध्ये तर इंग्रजी शाळा नसतात. आणि आठवी आणि दहावीला इंग्रजी शिकला नाही तर तो अभियांत्रिकी शिकू शकत नाही, वैद्यकीयला जाऊ शकत नाही आणि डॉक्टरही बनू शकत नाही, का? गरीब आईबापांच्या मुलांना डॉक्टर होण्याचा हक्क आहे की नाही? पण त्याच्यासाठी ही पाटी लावली आहे की इंग्रजी येत असेल तरच तो डॉक्टर, इंजिनियर होईल. आम्ही यावर अंतिम निर्णय घेतला की मातृभाषेतून शिकून डॉक्टर होण्याची इच्छा असेल तर होऊ शकेल. मातृभाषेतून शिकून अभियांत्रिकी पदवीधर होऊ शकेल. ही गुलामीची मानसिकता निघून गेली पाहिजे. त्यामुळे मध्यम वर्ग असेल, गरीब असेल, इंग्रजी येत नसेल तरीही त्यांच्या विकासाचा प्रवास रोखला जाणार नाही. कारण क्षमता  तर त्यांच्यातही असते. त्यांच्यामुळेच आज जगात आमचा बोलबाला आहे. डिजिटल इंडियाची चर्चा होत आहे, गावागावात डिजिटल इंडियाचा लाभ आमच्या युवकांना मिळत आहे. 5 ते 6 लाख सामान्य सेवा केंद्र (कॉमन सर्व्हिस सेंटर) देशात स्थापन करण्यात आले आहेत आणि तेथे आपापल्या गावांमध्ये बसून लोक सेवा देत आहेत. इंटरनेट स्वस्त झाल्यामुळे गावागावात गरीबांच्या घरीही जगातील सर्वश्रेष्ठ पुस्तके वाचण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

सुरूवातीला मी असा निर्धार केला होता की रेल्वे स्थानकांवर जशी वायफाय सुविधा सुरू असते,तर युवकांनी तेथे सायंकाळी शिकण्यासाठी यावे. रेल्वे स्थानकांवरील सर्व फलाटांवर  विनामूल्य वायफाय सुविधा सुरू कराव्यात आणि मी पाहिले की तरूण तेथे मोबाईल घेऊन  वाचण्यासाठी येत, केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि जीपीएससीच्या परीक्षा देत आणि त्यात उत्तीर्ण होत असत. आज चांगल्यातले चांगल्या शिक्षणासाठी डिजिटल इंडियाची सेवा मिळत आहे. त्यांच्यामुळे गावांतही डिजिटल इंडियामुळे वाचन आणि शिक्षणाची सुविधा पुरवणे शक्य झाले आहे. डिजिटल इंडिया युवकांच्या प्रतिभेला फुलून येण्याची संधी मिळवून देत आहे. कुणाला काही तरी बनायचे असेल तर आज डिजिटल व्यवस्थेच्या सहाय्याने तो वाचू शकतो. त्याला उत्कृष्ट पेंटर बनायचे असेल, गायक बनायचे असेल, नृत्यकलेच्या क्षेत्रात पुढे जायचे असेल, सुतारकाम शिकायचे असेल तर तो ते करू शकतो. त्याला कोणतेही काम शिकायचे असेल तर तो आज घरी बसूनही शिकू शकतो.

बंधू -भगिनींनो,

यामुळे रोजगार वाढीच्या संधी निर्माण होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. युवावर्गाची क्षमता, ताकद या बाजारपेठेच्याही पुढे जावून अवघ्या जगाच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याची आहे. हा काळ फक्त मेड इन इंडियाचा आहे. विचार करा, भारतामध्ये मोबाइल बनविण्याची पहिल्यांदा दोन कारखाने  होती. आज 200 पेक्षा जास्त आहेत. ही संख्या अवघ्या आठ वर्षांमध्ये वाढली आहे. सध्या भारतामध्ये बनलेले 1 दशलक्ष मोबाइल फोन, संपूर्ण जगामध्ये पोहोचले आहेत. ही आपली ताकद आहे.

आज ज्या पद्धतीने पर्यटनाचा विकास होत आहे, त्याचे मूळ कारण आहे, आम्ही पायाभूत सुविधा बनविल्या. आपण विचार करावा, आपल्या माधवपूरची जत्रा, भगवान कृष्णाशी संबंधित घटना कशी आतंरराष्ट्रीय बनली, माधवपूरच्या जत्रेमध्ये पूर्वांचलचे मुख्यमंत्री आले आणि एक आठवडाभर सर्वानी खूप आनंद घेतला. हा आपला गिरनारचा रोपवे बनविण्यासाठी कितीतरी अडचणींचा सामना करावा लागला. त्या सर्व पार करून हा रोपवे झाला. आधी कशा प्रकारे सरकारे काम करीत असायचे. काम करण्यासाठी किती त्रास होत होता. तुम्हा लोकांनी मला तिकडे पाठवले म्हणून तुमच्या भागात येथे रोप-वे ही आला आणि आता मला कितीतरी लोक आपली छायाचित्रे पाठवतात. आमच्या 80 वर्षांच्या आजीची गिरनारला जावून माता अंबेसमोर नतमस्तक होण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली. तुम्ही हा रोप-वे आणल्यामुळे मी माझ्या आईची इच्छा पूर्ण करू शकलो, असे लोक मला कळवतात. आता तुम्हीच मला सांगा, की, त्या मातेचा आशीर्वाद तर मलाही मिळणारच आहे की नाही बंधूंनो?

 

बंधू - भगिनींनो,

दोन दशकाच्या आधी आम्ही एक स्थिती बदलण्याचा संकल्प केला होता. आज आशियातला सर्वात मोठा रोप-वे कोणता हे पाहिले तर त्यामध्ये गिरनारच्या रोपवेचा समावेश होतो. हा माझा जुनागढ जिल्हा आहे, जिथे कृषी उत्पादन चांगले व्हावे, मत्स्य उद्योग चांगला व्हावा असे मला वाटते. तरी आता आपले केशोद विमानतळ, जणू जीवंतझाले आहे. मी नुकतेच अधिका-यांना बोलावले होते. मी म्हणालो, खूप दिवस झाले केशोद विमानतळ मी पाहतोय. आपण तिथे काही नवीन करू शकतो का, याविषयी काही संशोधन करून पहा. हे विमानतळ थोडे मोठे बनवले तर इथला आंबा थेट विमानाने विक्रीसाठी पाठविणे शक्य होईल. इथली फळे बाहेर जातील, इथला भाजीपाला जाईल आणि जगभरातल्या पर्यटकांना गिरचे सिंह पाहण्यासाठी आणि सोमनाथदादांच्या चरणी मस्तक टेकवण्यासाठी, तसेच आपल्या गिरनारला पाहण्यासाठी यायचे असेल तर आपली हवाई धावपट्टी थोडी मोठी केली पाहिजे. अधिकारी म्हणाले, सर, आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही सगळी पाहणी, संशोधन करून आपल्याला सांगतो. मी म्हणालो, जरा लवकर संशोधन करा, मला जुनागढला जायचे आहे. बंधू- भगिनींनो, एक विचार आला ना, मग मात्र मी ते काम पूर्ण करण्याच्या मागेच लागतो. ते काम करण्यासाठी काही ना काही मार्ग काढूनच थांबायचं. आपण सर्वांनी मनाशी एक गोष्ट पक्की बांधून ठेवणे की, मला विकास करायचाच आहे. हिंदुस्तानातल्या मोठ-मोठ्या शहरांना जे काही मिळते, ते सर्व माझ्या जुनागढला मिळाले पाहिजे. आणि त्यासाठी मी काम करीत आहे. गिर-सोमनाथसहित या सर्व क्षेत्राविषयी असलेली श्रद्धा, आस्था, तपस्वींची भूमी, जैनाचार्यांनी केलेली तपस्या, यामुळे हा भाग ओळखला जातो. काही वर्षांपूर्वी मी सुद्धा गिरनार पायथ्याच्या परिसरामध्ये फेरफटका मारून यायचो. सर्व संतांच्यामध्ये वास्तव्य करण्याचे सुख मलाही मिळाले आहे. संत आणि सुरा ही जोडी, आपल्या मंदिरांसाठी, जैन लोकांसाठी, दत्तात्रेयाच्या उपासकांसाठी, इथे काय नाही? सर्व आहे.

 

बंधू - भगिनींनो,

संपूर्ण देशाला आकर्षित करण्याची ताकद, क्षमता माझ्या गिरच्या भूमीमध्ये आहे. म्हणूनच प्रत्येक हिंदुस्तानीला इथपर्यंत खेचून आणायाचे आहे. त्यांच्यासाठी व्यवस्था निर्माण करायची आहे आणि या व्यवस्थेच्या पूर्तीची इच्छा पूर्ण केली जाणार आहे, याचा मला विश्वास आहे. आमच्या गिरच्या सिंहांची गर्जना ऐकण्याची इच्छा संपूर्ण दुनियेला आहे. गिरच्या सिंहाची गर्जना ज्यावेळी ऐकू येते, त्यावेळी ती गुजरातची गर्जना बनून, सर्वांच्या कानावर पडते.

आज संपूर्ण जग मोठ्या अभिमानाने पाहत आहे की, 20 वर्षांमध्ये या माझ्या गिरच्या सिंहांची संख्या दुप्पट झाली आहे. या सिंहाची इतकी चांगल्या प्रकारे काळजी घेतली आहे, की कोणाही हिंदुस्तानीला त्याचा अभिमान वाटेल. बंधू -भगिनीनो, आपल्या केशोद विमानतळाचा जर विकास झाला तर हा सर्व भाग विकासाची नवीन उंची गाठणार आहे. रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. येथे हॉटेल, रेस्टॉरंट, टॅक्सी, ऑटो अशा असंख्य गोष्टी येतील आणि विकासाच्या संधी निर्माण होतील. सर्वांना माहिती आहे, गुजरातमधील सौराष्ट्र, कच्छ, काठियावाड ही भूमी देशभक्तांची भूमी आहे. राष्ट्र प्रथम मानून देशाला सर्वोच्च प्राधान्य देणारी ही भूमी आहे. आणि म्हणूनच एका गंभीर विषयावर बोलण्याची आज माझी इच्छा आहे. या भूमीच्या ताकदीविषयी मला खूप अभिमान आहे. इथल्या वीर सिंहाच्या गर्जना ऐकतच जे मोठे झाले आहेत, त्यांची कोणत्याही गोष्टीला सामना करण्याची ताकदही तितकीच मोठी असते आणि ज्यांची सामना करण्याची ताकद मोठी असते, त्यांच्यासमोर मनातल्या गोष्टी बोलण्यातही आनंद वाटत असतो.

 

बंधू -भगिनींनो,

आपणही थोडा विचार जरूर करावा. आपण जर एखादे मंगळयान, चंद्रयान अंतराळामध्ये सोडले आणि त्यामध्ये जर यश मिळाले तर ही गोष्ट त्या संशोधकांना, वैज्ञानिकांना आनंद देणारी असते की नाही? जरा आणखी थोडे जोरात बोला, आनंद मिळतो की नाही? अभिमान वाटतो की नाही? अनेकदा आपण म्हणतो का? अरे यामध्ये कोणी गुजराती वैज्ञानिक नव्हताच. यामध्ये तर ते दक्षिणवाले होते, तामिळनाडूवाले होते, केरळवाले होते, बंगलुरूवाले होते, याचा अर्थ त्या यशाविषयी आपला अभिमान थोडा कमी होणार असतो का? काम कोणतेही असो, हिंदुस्तानच्या कोणत्याही ठिकाणच्या माणसाने ते काम आपल्या देशासाठी केले असेल तर त्याचा अभिमान वाटला पाहिजे की नको? आपण जरा विचार करा, ऑलिंपिक स्पर्धा होत आहे आणि हरियाणाचा जवान तिथे जावून तिरंगा ध्वज फडकवत आहे आणि सुवर्ण पदक जिंकून येत आहे, तर मग तो हरियाणाचा पुत्र अथवा कन्या पाहिल्यावर तुम्हाला आनंद होणार की नाही? भारताचा सन्मान वाढविल्याबद्दल तुम्हाला त्या हरियाणाच्या क्रीडापटूविषयी अभिमान वाटणार की नाही?

 

बंधूंनो,

काशीमध्ये वास्तव्य करून जर कोणी संगीताची साधना केली आणि अवघ्या दुनियेमध्ये त्याच्या संगीताचे कौतुक, जयजयकार होत आहे. संगीतसाधना करणारा माणूस काशीचा आहे, तपस्या त्याने तिथे केली आहे, संपूर्ण जगामध्ये त्याला लोकप्रियता मिळत आहे, आपल्याला ज्यावेळी समजते तो भारतातला आहे, त्यावेळी आपल्याला त्याच्याविषयी अभिमान वाटणार आहे की नाही? आपल्या पश्चिम बंगालच्या भूमीमध्ये महान विव्दान होवून गेले. सर्वश्रेष्ठ साहित्यकृतींची निर्मिती या भूमीमध्ये झाली. तसेच क्रांतीकारांची भूमी आहे. त्यांच्याकडून असे उत्तम काम झाले तर आपल्यालाही आनंद होतो की नाही? आणि आपले दक्षिणकडचे चित्रपट आज दुनियेमध्ये गाजत आहेत. दक्षिण भारतातील भाषा भले आपल्याला येत नसतील, तरीही दक्षिण भारतात चित्रपट तयार करणा-याचा गाजावाजा होत आहे, तो कोट्यवधी रूपये नफा कमावतो, याविषयी आपल्याला अभिमान वाटतो की नाही? त्यांच्या चित्रपटावर संपूर्ण हिंदुस्तान नाचतोय की नाही? आपल्याला ती भाषा जरी समजत नसली तरी आपल्याला तो भारतीयाचा चित्रपट आहे, याचा आनंद होतो की नाही? हिंदुस्तानतल्या कोणत्याही स्थानची ती व्यक्ती असो, तो माणूस कोणत्याही जातीचा असो, कोणतीही भाषा बोलत असो, कोणत्याही प्रदेशात राहणारा असो, त्याने चांगले, कौतुकास्पद काम केले तर या देशातल्या सर्व लोकांना त्याचा अभिमान वाटेल. हो की नाही? तरीही विकृती कशी असते पहा. गेल्या दोन दशकांपासून विकृत मानसिकता असणारे लोक एका वेगळ्याच विचाराला पुढे आणत आहेत. गुजरातचे काही चांगले झाले, गुजरातचा व्यक्ती असेल आणि त्याचे चांगले नाव होत असेल, गुजरातच्या माणसांनी जर काही प्रगती केली असेल, गुजरात प्रगती करत असेल तर, त्याविषयी काही लोकांना पोटदुखी होत आहे. बंधूनो, गुजरातला अपमानित करण्यासाठी अयोग्य भाषेचा वापर काही राजकीय पक्ष करीत आहेत. गुजरातविषयी अपशब्द बोलल्याशिवाय, गुजरातींना शिव्या देण्याशिवाय, त्यांची राजकीय विचारधारा अपूर्ण राहते. बंधू- भगिनींनो, मग अशा लोकांसमोर गुजरातने डोळे मोठे करून ते संतापाने लाल करण्याची गरज आहे की नाही? परिश्रम गुजरातीने करावेत, तपस्या गुजरातींनी करावी, देशभरातल्या लोकांना रोजी-रोटी देण्याचं काम करणा-या या गुजरातला अशा पद्धतीने बदनाम केले जात आहे. बंधूंनो, आपण ही गोष्ट सहन करणार आहोत का? या जोश असलेल्या वीरांच्या भूमीवर मी आपल्या सर्वांना आवाहन करतो, आता गुजरातींचा अपमान म्हणजे गुजरातचा अपमान आहे. गुजरातची भूमी हे सहन करणार नाही. या देशामध्ये कोणाचाही अपमान करणे, चालणार नाही. असा कोणाचाच अपमान केला जावू नये. बंगालींचाही अपमान होवू नये, तमिळचाही अपमान केला जावू नये, केरळच्या बंधूचाही अपमान केला जावू नये. देशातला प्रत्येक नागरिक, त्याचा पुरूषार्थ, त्याचा पराक्रम, त्याची सिद्धी, अशा गोष्टी सर्वांसाठी अभिमानाची बाब असली पाहिजे. अशा गोष्टींना राजकारणाच्या परिघामध्ये बंदिस्त करण्याची संस्कृती संपुष्टात आली पाहिजे. एक भारत श्रेष्ठ भारताचे स्वप्न आपण उदध्वस्त होवू देणार नाही. सरदार साहेबांसारख्या लोकांनी जे परिश्रम केले आहेत, ते असे व्यर्थ जावू दिले जाणार नाहीत. निराशेचा प्रसार करणा-या लोकांपासून , आपल्या निराशांना गुजरातच्या मनावर थोपविणा-यांपासून, खोट्या गोष्टींचा प्रसार करणा-या लोकांपासून सावध होण्याची आवश्यकता आहे. बंधू -भगिनींनो, गुजरातची एकता हीच गुजरातची ताकद आहे. देशाच्या भल्यासाठी गुजरातने एकी ठेवून नेकीने काम करण्यात मागे हटायचे नाही.

आपण सर्वजणांनी एकता कायम ठेवली आहे, म्हणूनच अशा गुजरातला मी वंदन करतो, अशा गुजरातींना माझा नमस्कार आहे. सर्वांनी एकतेने विकासाच्या मार्गावर पुढची वाटचाल करायची, विकास करीत रहायचे आहे. आणि आज या विकासाच्या अनेक संधी आपल्या घराच्या व्दारापर्यंत आल्या आहेत, त्यांच्यासाठी मी आपल्याला अनेक-अनेक शुभेच्छा देतो. याचबरोबर दिवाळीचा सण येत आहे, आपल्या सर्वांना, दिवाळीच्या खूप-खूप शुभेच्छा. नवीन वर्षारंभाचा काळ येत आहे. नवीन संकल्पांच्या जोडीने पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा!

भारत माता की जय,

भारत माता की जय,

भारत माता की जय!!

बंधू -भगिनींनो, खूप-खूप धन्यवाद!

 

Jaydevi PS/S.Tupe/S.Thakur/R.Aghor/U.Kulkarni/S.Bedekar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1869980) Visitor Counter : 240