पंतप्रधान कार्यालय

गुजरातच्या गांधीनगर इथे डिफेन्स एक्स्पो 22 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

Posted On: 19 OCT 2022 11:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2022

 

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, देशाचे संरक्षणमंत्री श्री राजनाथ सिंहजी, गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भूपेन्द्र भाई पटेल, गुजरात सरकारचे मंत्री जगदीश भाई, मंत्रिमंडळातील इतर वरिष्ठ सदस्य, सीडीएस जनरल अनिल चौहान, हवाईदल प्रमुख वी.आर. चौधरी, नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरीकुमार, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, इतर सर्व मान्यवर, परदेशातून या कार्यक्रमासाठी आलेले सर्व मान्यवर महानुभाव, बंधू आणि भगिनींनो,

गुजरातच्या भूमीवर सशक्त, समर्थ आणि आत्मनिर्भर भारताच्या या महोत्सवात आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. देशाचा पंतप्रधान म्हणून आपल्या सर्वांचे स्वागत करणे जेवढे गौरवास्पद आहे, तेवढेच, या भूमीचा पुत्र म्हणून, आपल्या सर्वांचे स्वागत करणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. डिफेन्स एक्सपो-2022 चे हे आयोजन भारताचे असे चित्र जगासमोर आणत आहे, ज्याचा संकल्प आम्ही या अमृतकाळात केला आहे. या चित्रात राष्ट्राचा विकासही आहे. राज्यांचा सहभागही आहे. यात युवकांची शक्ती आहे, युवकांची स्वप्ने देखील आहेत. युवा संकल्पही आहे, युवा सामर्थ्यही आहे. यात जगासाठी आशाही आहे, तर मित्र देशांसाठी सहकार्याच्या अनेक संधी देखील आहेत.

मित्रांनो,

आपल्या देशात डिफेंस एक्सपो आधीही होत असत, मात्र, यावेळी होणारा हा डिफेंस एक्सपो अभूतपूर्व आहे. हे एका नव्या शुभारंभाचे प्रतीक आहे. हा देशातला असा पहिलाच डिफेंस एक्सपो आहे, ज्यात केवळ भारतीय कंपन्याच सहभागी झाल्या आहेत. यात केवळ मेड इन इंडिया संरक्षण उपकरणेच आहेत. पहिल्यांदाच, कोणत्या तरी डिफेंस एक्सपोमध्ये भारताच्या मातीत तयार झालेले, भारताच्या लोकांच्या घामातून तयार झालेली विविध उत्पादने आहेत. आपल्याच देशातील कंपन्या, आपले शास्त्रज्ञ, आपल्या युवकांचे सामर्थ्य, आज आपण लोहपुरुष सरदार पटेल यांच्या या भूमीतून आपल्या या सामर्थ्याचा परिचय आपण जगाला देत आहोत. यात, 1300 पेक्षा अधिक प्रदर्शनकर्ते आहेत, यात भारतीय उद्योग आहेत, भारतीय उद्योगाशी संबंधित काही संयुक्त प्रकल्प आहेत. एमएसएमई आणि 100 पेक्षा अधिक स्टार्टअप्स आहेत. एकप्रकारे, आपण सगळे इथे, देशबांधव आणि जगातील इतर सर्व लोकही आपल्या क्षमता आणि संधी, दोन्हीची झलक इथे बघत आहेत. या सर्व संधी प्रत्यक्षात साकार करण्यासाठी, पहिल्यांदाच 450 पेक्षा जास्त सामंजस्य करार आणि इतर करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत.  

मित्रांनो,

हे आयोजन आम्ही खूप आधी करणार होतो. गुजरातच्या लोकांना हे नक्कीच माहितीही आहे. काही कारणांमुळे आम्हाला वेळ बदलावी लागली, त्यामुळे थोडा उशीरही झाला. परदेशातून जे लोक आले होते, त्यांची जरा गैरसोयही झाली. मात्र, अता देशातील या सर्वात मोठ्या डिफेंस एक्सपोने एका नव्या भविष्याचा सशक्त प्रारंभ केला आहे. मला यांची कल्पना आहे, की यामुळे काही देशांची गैरसोय झाली.मात्र, मोठ्या संख्येने विविध देश एक सकारात्मक विचार घेऊन आमच्यासोबत आले आहेत.

मित्रांनो, 

मला अतिशय आनंद आहे, की भारत जेव्हा भविष्यातील या संधीना आकार देत आहे, अशावेळी भारताचे 53 आफ्रिकी मित्र देश, खांद्याला खांदा लावून आमच्यासोबत उभे आहेत. याच वेळी दूसरा भारत-आफ्रिका संरक्षण संवादही सुरु होत आहे. भारत आणि आफ्रिकी देशांमधील ही मैत्री, हे संबंध, त्या जुन्या विश्वासावर टिकून आहेत, जो विश्वास काळानुरूप अधिक दृढ होत आहे, नवे आयाम गाठतो आहे. आफ्रिकेतून आलेल्या माझ्या मित्रांना मी सांगू शकतो की आज आपण गुजरातच्या ज्या भूमीवर आले आहात, त्या गुजरातचा आफ्रिकेसोबत अतिशय जुना आणि आत्मीय संबंध आहे. आफ्रिकेत जी पहिली ट्रेन चालली होती, तिच्या निर्मिती कार्यासाठी याच, इथल्याच गुजरातच्या कच्छच्या भूमीतले लोक आफ्रिकेत गेले होते. आणि अतिशय खडतर परिस्थितीत, आमच्या कामगारांनी जीव तोडून मेहनत करत, आफ्रिकेत आधुनिक रेल्वेगाडीचा पाया रचण्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. एवढंच नाही, आजही जर आपण आफ्रिकेत गेलात, तर तिथे दुकान हा शब्द तुम्हाला सहज ऐकू येईल. हा ‘दुकान’ शब्द गुजराती आहे. भाजी-पोळी हे शब्द देखील आफ्रिकेच्या लोकांच्या जीवनमानाचा भाग झाले आहेत. महात्मा गांधी यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या नेत्याची जन्मभूमी जर गुजरातची होती, तर आफ्रिका ही त्यांची पहिली कर्मभूमी होती. आफ्रिकेबद्दल ही आत्मीयता आणि आपलेपण, भारताच्या परराष्ट्र व्यवहार धोरणाचा भाग आजही आहे. कोरोनाकाळात जेव्हा लसीबद्दल, संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात होती, तेव्हा भारताने आपल्या आफ्रिकी मित्र देशांना प्राधान्य देत लस पोहोचवली होती. आम्ही प्रत्येक गरजेच्या वेळी औषधांपासून ते शांतता अभियानापर्यंत, आफ्रिकेसोबत खांद्याला खांदा लावून चालण्याचे प्रयत्न केले आहेत. आता संरक्षण क्षेत्रातील आमच्यातील सहकार्य आणि समन्वय या संबंधाना नवी ऊंची प्राप्त करुन देईल.

मित्रांनो,

ह्या आयोजनातील एक महत्वाचा पैलू, “इंडियन ओशन रिजन प्लस” च्या संरक्षण मंत्रालयांची परिषद हा देखील आहे. यात, आपले 46 देश सहभाग घेत आहेत. आज आंतरराष्ट्रीय सुरक्षितेशी संबंधित, जागतिक व्यापारा पर्यंत, सागरी सुरक्षा हा विषय एक जागतिक प्राधान्याचा विषय म्हणून पुढे आला आहे. 2015 साली माझ्या मॉरिशस दौऱ्याच्या वेळी, मी ‘या प्रदेशातील सर्वांची सुरक्षा आणि विकास’  म्हणजे सागरचा दृष्टिकोन मांडला होता. सिंगापूरच्या शंग्रिला संवादात मी म्हटल्याप्रमाणे, भारत-प्रशांत महासागर प्रदेशात, आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून ते अमेरिकेपर्यंत, भारताचा सहभाग सर्वसमावेशक आहे. आज जागतिकीकरणाच्या ह्या युगात, मर्चेन्ट नेव्हीच्या भूमिकेचा विस्तारही झाला आहे. जगाच्या भारताकडून ह्या अपेक्षा वाढल्या आहेत. आणि मी जगाला दिलासा देऊ इच्छितो, की आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, भारत सर्वतोपरी प्रयत्न करत राहणार आहे. आम्ही कुठेही मागे हटणार नाही. म्हणूनच, हा डिफेंस एक्सपो भारताप्रती असलेल्या विश्वासाचे प्रतीक देखील आहे. इतक्या सगळ्या देशांच्या उपस्थितीचे खूप मोठे सामर्थ्य गुजरातच्या भूमीवर आज दिसते आहे. मी आज ह्या आयोजनात, भारताच्या सर्व मित्र देशांचे आणि त्यांच्या प्रतिनिधींचे हार्दिक स्वागत करतो. ह्या भव्य आयोजनासाठी गुजरातची जनता आणि विशेषतः मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन करतो. गुजरातच्या विकासाबाबत, औद्योगिक सामर्थ्याबाबत, देश आणि जगभरात गुजरातची जी ओळख आहे, त्याला, आजच्या ह्या डिफेंस एक्सपोमुळे अधिकच तेज मिळाले आहे, नवी ऊंची मिळाली आहे. येत्या काळात, गुजरात, संरक्षण उद्योगाचेही एक मोठे केंद्र बनेल, आणि भारताची सुरक्षा तसेच सागरी सामर्थ्यात मोठे योगदान देईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.

मित्रांनो,

मी आता या पडद्यावर बघत होती, डीसाच्या लोकांमध्ये उत्साह काठोकाठ भरून ओसंडतो आहे. उमेद आणि चैतन्य दिसते आहे. डीसा वायूतळाची निर्मिती देखील देशाची सुरक्षा आणि ह्या क्षेत्राच्या विकासातील एक महत्वाचे यश आहे. डीसा आंतरराष्ट्रीय सीमेपासून केवळ 130 किलोमीटर दूर आहे.

आपले सैन्यदल विशेषता आपले हवाई दल डीसा इथे असेल तर पश्चिम सीमेवर कोणत्याही आगळीकीला आपण अधिक  उत्तम पद्धतीने चोख प्रत्युत्तर देऊ शकू. डीसा मधल्या बंधू  -  भगिनींनो, गांधीनगर इथून आपल्याला खूप - खूप शुभेच्छा देतो.आता डीसा, बनासकांठा, पाटण जिल्ह्याचे भाग्यही उजळले.या हवाई परिसरासाठी वर्ष  2000 मध्येच डिसाला जमीन देण्यात आली होती.मी इथे मुख्यमंत्री पदावर असताना या निर्मिती कार्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होतो. तत्कालीन केंद्र सरकार,त्या वेळी जे सरकार केंद्रात होते त्यांना  मी वारंवार याचे महत्व समजावत होतो. इतकी जमीन देण्यात आली मात्र 14 वर्षे काही काम झालं नाही. फायली अशा पद्धतीने तयार करण्यात आल्या, असे प्रश्न निर्माण करण्यात आले की तिथपर्यंत पोहोचल्या नंतरही योग्य पद्धतीने योग्य गोष्टी प्रस्थापित करण्यासाठी मला वेळ लागला. सत्तेवर आल्यानंतर डीसा इथे ऑपरेशनल बेस तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आपल्या सैन्य दलाची अपेक्षा आज पूर्ण होत आहे. संरक्षण क्षेत्रातले माझे सहकारी, चीफ ऑफ डिफेन्स अशा प्रत्येकाने मला या गोष्टीचे स्मरण करून दिले होते आणि आज  चौधरीजी यांच्या नेतृत्वाखाली ही बाब साकारत आहे. डीसाचे जितके अभिनंदन करायचे आहे तितकेच हवाई दलाचे माझे सहकारी ही अभिनंदनाला पात्र आहेत. हे क्षेत्र आता देशाच्या सुरक्षेचे प्रभावी  केंद्र ठरेल. बनासकांठा आणि पाटण यांनी जशी आपली ओळख निर्माण केली होती की  बनासकांठा पाटण, गुजरात मध्ये सौर शक्ती केंद्र म्हणून सामोरे येत आहे,तसेच बनासकांठा पाटण आता देशासाठी हवाई दलाचे शक्ती केंद्र ही ठरेल.

मित्रहो,

भविष्यात कोणत्याही बलवान राष्ट्रासाठी सुरक्षेचे काय महत्व असेल याचे मोठे उदाहरण म्हणजे अंतराळ तंत्रज्ञान. सैन्याच्या तीनही दलांनी, या क्षेत्रातली विविध आव्हाने जाणून त्याबाबत आढावा घेतला आहे अशी माहिती मला देण्यात आली आहे.या आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टीने आपल्याला  वेगाने काम करायला लागेल.  ‘मिशन डिफेन्स स्पेस’

हे देशाच्या खाजगी क्षेत्राला आपले सामर्थ्य दाखवण्याची संधी प्रदान करेल. अंतराळ क्षेत्रातल्या भविष्यातल्या शक्यता लक्षात घेता भारताला आपली सज्जता अधिक वाढवावी लागेल. आपल्या संरक्षण दलांना नवे कल्पक उपाय शोधावे लागतील. अंतराळ क्षेत्रात भारताचे सामर्थ्य मर्यादित राहता कामा नये आणि भारताच्या सामर्थ्याचा  लाभ केवळ भारताच्या लोकांपुरताच मर्यादित राहता कामा नये हे आमचे मिशनही आहे आणि आमचा दृष्टीकोनही आहे. अंतराळ तंत्रज्ञानात भारताचा उदार दृष्टीकोन बाळगणारी अंतराळ मुत्सद्देगिरी नव्या व्याख्या निर्माण करत आहे,नव्या शक्यता निर्माण करत आहे.याचा लाभ अनेक आफ्रिकी देशांना, अनेक छोट्या देशांना होत आहे. 60 पेक्षा जास्त विकसनशील देशांसमवेत भारत आपले अंतराळ विज्ञान सामायिक करत आहे. दक्षिण आशिया उपग्रह याचे उत्तम उदाहरण आहे. पुढच्या वर्षापर्यंत आसियानच्या दहा देशानाही भारताच्या उपग्रह डाटाचा उपयोग करता येईल.युरोप आणि अमेरिकेसारखे विकसित देशही आपल्या उपग्रह डेटाचा उपयोग करत आहेत. या सर्वांबरोबरच एक असे क्षेत्र आहे ज्यामध्ये समुद्री व्यापाराच्या अपार शक्यता दडलेल्या आहेत. याद्वारे आपल्या मच्छिमारांना अधिक उत्पन्न आणि उत्तम सुरक्षेसाठी वेळोवेळी सूचना मिळत आहेत.  अथांग स्वप्ने पाहणारे माझ्या देशाचे युवक, अंतराळ क्षेत्राशी संबंधित या शक्यता साकार करतील, वेळेत आणि अधिक गुणवत्तेसह साकार करतील हे आपण सर्व जाणतो. भविष्य साकारणारे आपले युवक अंतराळ तंत्रज्ञान नव्या शिखरावर नेतील. म्हणूनच या संरक्षण प्रदर्शनात या विषयाला प्राधान्य देण्यात आले आहे. गुजरातच्या या धरतीशी डॉ. विक्रम साराभाई  यांच्यासारख्या वैज्ञानिकांची प्रेरणा आणि अभिमानही जोडला गेला आहे. आपल्या संकल्पनांना ते नवी प्रेरणा देतील.

आणि मित्रहो,  

आज जेव्हा संरक्षण क्षेत्राबाबत चर्चा होत आहे,भविष्यात कोणत्या प्रकारे युद्ध लढली जातील याबाबत चर्चा केली जात आहे तर याची धुरा एका प्रकारे  युवकांच्या हाती आहे.भारताच्या युवकांचा नवोन्मेश आणि संशोधन यांची यात खूप मोठी भूमिका आहे. म्हणूनच  हे संरक्षण प्रदर्शन एका प्रकारे भविष्यातल्या झरोक्याप्रमाणे आहे.

मित्रहो,

दृढनिश्चय, नवोन्मेश आणि अंमलबजावणी हा मंत्र घेऊन भारत संरक्षण क्षेत्रात आगेकूच करत आहे. 8 वर्षांपूर्वी जगातला सर्वात मोठा संरक्षण आयातदार अशी भारताची ओळख होती. आपण जगभरातून माल खरेदी करत होतो, आणत होतो आणि त्यासाठी पैसे मोजत होतो. मात्र नव भारताने दृढनिश्चय केला,इच्छाशक्ती दर्शवली आणि आज  ‘मेक इन इंडिया’ भारताच्या संरक्षण क्षेत्राची यशोगाथा ठरली आहे. गेल्या पाच वर्षात आपली संरक्षण निर्यात 8 पटीने वाढली आहे, मित्रहो.आज आपण जगातल्या 75 पेक्षा जास्त देशांना संरक्षण सामग्री आणि उपकरणे निर्यात करत आहोत.2021-22 मध्ये भारताची संरक्षण निर्यात  1.59 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे  13 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. येत्या काळात ही निर्यात 5 अब्ज डॉलर म्हणजे 40 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. ही निर्यात केवळ काही उपकरणांच्या पुरती, काही देशांच्या पुरती मर्यादित नाही. भारतीय संरक्षण कंपन्या आज जागतिक पुरवठा साखळीचा महत्वाचा भाग बनत आहेत. जागतिक दर्जाच्या आधुनिक उपकरणांचा आज आपण पुरवठा करत आहोत.एकीकडे भारताच्या तेजस सारख्या आधुनिक लढाऊ विमानाबाबत अनेक देश स्वारस्य दर्शवत आहेत तर त्याचवेळी आपल्या कंपन्या अमेरिका, इस्रायल आणि इटली यासारख्या देशांनाही संरक्षण उपकरणांचे भाग पुरवत आहेत.

मित्रहो,  

भारतात तयार करण्यात आलेले ब्राम्होस क्षेपणास्त्र आपल्या श्रेणीतले सर्वात घातक आणि सर्वात आधुनिक मानले जाते हे ऐकल्यावर आपणा भारतीयांचा उर अभिमानाने भरून येतो. ब्राम्होसला अनेक  देशांमध्ये पसंती देण्यात येत आहे.

मित्रहो,  

भारताच्या तंत्रज्ञानावर आज जगाचा विश्वास आहे कारण भारताच्या सैन्याने क्षमता सिद्ध करून दाखवल्या आहेत.

भारताच्या नौदलाने आयएनएस विक्रांत सारखी आधुनिक विमानवाहू युद्धनौका आपल्या ताफ्यात समाविष्ट केली आहे. अभियांत्रिकीचे विशाल आणि विराट दर्शन घडवणारी ही युद्धनौका कोचीन शिपयार्ड लिमिटेड ने स्वदेशी तंत्रज्ञानाने उभारली आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत निर्मिती केलेले प्रचंड हे वजनाने हलके लढाऊ हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले आहे. अशाच प्रकारे आपले लष्कर स्वदेशी तोफांपासूनची खरेदी भारतीय कंपन्यांकडून करत आहे. गुजरातच्या हजीरा इथे उभारण्यात येत असलेला आधुनिक तोफखाना आज देशाच्या सीमांच्या संरक्षण क्षमतेत भर घालत आहे.

मित्रहो, देशाला या पल्ल्यापर्यंत आणण्यात आमची धोरणे, आम्ही केलेल्या सुधारणा आणि व्यवसाय सुलभता यांची मोठी भूमिका आहे. भारताने आपल्या संरक्षण खरेदीच्या बजेटपैकी 68 टक्के भारतीय कंपन्यांसाठी निर्धारित केले आहे.  

अर्थात एकूण अर्थसंकल्पापैकी, भारतात तयार झालेल्या, भारतीयांनीच तयार केलेल्या 68 टक्के वस्तू खरेदीसाठी आम्ही राखून ठेवल्या आहेत. हा खूपच मोठा निर्णय आहे. आणि हा निर्णय यासाठी झाला कारण भारताच्या सैन्याला जे प्रगतीशील नेतृत्व लाभले आहे, त्या सैन्यातील लोकांच्या धैर्यामुळेच हा निर्णय होऊ शकला. हा राजकीय इच्छाशक्तीने  होणारा निर्णय नाही. असा निर्णय सैन्याच्या इच्छाशक्तीमुळे होतो. आणि आज मला अभिमान आहे की माझ्याकडे असे जवान आहेत, माझ्या लष्कराकडे असे अधिकारी आहेत की ते अशा महत्वपूर्ण निर्णयांना पुढे नेत आहेत. याशिवाय आम्ही संरक्षण क्षेत्र, संशोधन आणि नवोन्मेषासाठी स्टार्टअप्स, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राकरता खुले केले.  आम्ही 25 टक्के संशोधन निधी शिक्षण क्षेत्र, नव्या पिढीच्या हाती सोपवण्याचा साहसी निर्णय घेतला. आणि माझा देशातील युवा पिढीवर विश्वास आहे. भारत सरकारने त्यांना शंभर रुपये दिले तर ते दहा हजार रुपये परत करतील, इतके सामर्थ्य देशातील युवा पिढीत आहे असा माझा पक्का विश्वास आहे. 

मला आनंद आहे की सरकारच्या प्रयत्नांसोबतच आपल्या सैन्य दलांनी पुढे येत ठरवले की देशाच्या रक्षणासाठी देशातच उत्पादन झालेले अधिकाधिक सामान खरेदी केले जाईल. सैन्य दलांनी एकत्र येत अनेक उपकरणांच्या दोन याद्याही निश्चित केल्या आहेत. यात एका यादीत केवळ देशात तयार झालेल्या वस्तूंची खरेदी करणे. तर दुसऱ्या यादीनुसार अगदीच अनिवार्य असेल तर ते बाहेरुन घेणे असे आहे. आज मला आनंद झाला आहे. मला सांगितले गेले की केवळ भारतात तयार होणाऱ्या आणखी 101 वस्तूंची भर त्यांनी आज यात घातली आहे. 

आत्मनिर्भर भारताचे सामर्थ्यही हा निर्णय दाखवत आहे, आणि देशाच्या जवानांचा अपल्या देशाच्या सैन्य सामग्री बाबत वाढत असलेल्या विश्वासाचेही प्रतीक आहे. या यादीनंतर संरक्षण क्षेत्रातील 411 अशा वस्तू आणि उपकरणे होतील, ज्या केवळ ‘मेक इन इंडिया’ अंतर्गतच भारत खरेदी करेल. तुम्ही कल्पना करा, इतका मोठा निधी भारतीय कंपन्यांचा पाया किती भक्कम करेल, आपल्या संशोधन आणि नवोन्मेषाला किती शक्ती प्रदान करेल. आपल्या संरक्षण उत्पादन क्षेत्राला किती पाठबळ देईल! आणि याचा किती मोठा फायदा माझ्या देशाच्या युवा पिढीला होणार आहे.  

मित्रांनो,

या चर्चे दरम्यान मी आणखी एक विषय जरूर मांडू इच्छीतो. आणि मला वाटते, आपण हे समजून घ्यायला हवे, जे  निरुपणकार असतात, ते ही कधी-कधी यात अडकतात. परंतु मला  जरूर सांगायचे आहे, आपल्याला जीवनाचा खूप अनुभव आहे. जेव्हा आपण   ट्रेनमध्ये प्रवेश करतो, जर एका सीटवर  चार लोक बसलेले आहेत आणि पाचवा आला तर हे चारही मिळून पाचव्याला घुसू देत नाहीत. अडवतात. अगदी तशीच स्थिती संरक्षण क्षेत्रातील विश्वात उत्पादन कंपन्यांची होत आहे. जगात संरक्षण उत्पादनांच्या पुरवठा क्षेत्रात निवडक कंपन्यांची मक्तेदारी सुरु आहे, त्या इतर कोणालाही घुसूच देत नव्हत्या. मात्र भारताने हिम्मत बांधत आपली जागा निर्माण केली आहे. जगासाठी आज भारतीय तरुणांचे हे कौशल्य एक पर्याय  बनून पुढे येत आहे मित्रांनो. भारतीय नवतरुणांचे संरक्षण क्षेत्रातील हे सामर्थ्य झळझळीतपणे पुढे येत आहे. ते जगाचे भले करणारे आहे. जगासाठी नवीन संधी प्रदान करणारे आहे. पर्याय म्हणून  नवीन संधी प्रदान करणारे आहे. आणि आपल्या तरुणांचे हे प्रयत्न पाहता मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळात देशाचे संरक्षण क्षेत्र मजबूत तर होईलच. सोबतच देशाच्या सामर्थ्यात, देशातील युवा सामर्थ्यातही अनेक पटीने वाढ होईल. आजच्या या संरक्षण प्रदर्शनात आपण ज्या वस्तू बघत आहोत, त्यात जागतिक परिदृश्याचेही संकेत दिसत आहेत. संसाधानाच्या कमरतेमुळे आपल्या संरक्षणात मागे राहाणाऱ्या जगातील छोट्या देशांना याचा मोठा लाभ होईल.  

मित्रांनो,

भारत संरक्षण क्षेत्रास संधींच्या अनंत आकाशाच्या रूपात पाहतो. सकारात्मक शक्यतांच्या रूपात पाहतो. आपल्या इथे आज उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूत दोन संरक्षण कॉरिडॉर्स वेगाने विकासाच्या दिशेने पुढे जात आहेत. जगातील अनेक मोठमोठ्या कंपन्या भारतात  गुंतवणूक करण्यासाठी येत आहेत.  या गुंतवणुकीच्या सोबतीने पुरवठा साखळीचे एक मोठे जाळे तयार होत आहे. या मोठ्या कंपन्यांना आपल्या एमएसएमई, आपल्या लघु उद्योगांनाही ताकद मिळते, आणि आपल्या एमएसएमई यासाठी सहयोग करतील.  मला विश्वास आहे की आपल्या या छोट्या छोट्या उद्योगांच्या हाती गुंतवणूक पोहोचणार आहे. या क्षेत्रात लाखो कोट्यवधींच्या गुंतवणुकीमुळे तरुणांकरिता या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. आणि आणखी एका नव्या विकासाच्या उंचीवर पोहचण्याची शक्यता निर्माण होत आहे. मी गुजरात संरक्षण प्रदर्शनात उपस्थित सर्व कंपन्यांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही या संधी भविष्यातील भारताच्या केन्द्रस्थानी ठेवून त्यास आकार द्यावा. ही संधी गमावू नका. तुम्ही नवन्वेष करा. जगातील सर्वोत्तम निर्माणाचा संकल्प घ्या. आणि सशक्त विकसित भारताच्या स्वप्नाला आकार द्या. मी नवतरुणांना, संशोधकांना, नवोन्मेषकांना विश्वासाने सांगतो की मी तुमच्या सोबत आहे.तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी माझा "आज" समर्पित करायला तयार आहे. 

मित्रांनो,

देश खूप वेगाने बदलत आहे. तुम्हीही याचा  अनुभव घेत असाल. असाही काळ होता जेव्हा हाच देश कबूतर सोडत असे. आज चित्ता सोडण्याची ताकद राखतो. अशा सामर्थ्याने घटना छोट्या होतात. परंतु संकेत खूप मोठे असतात. शब्द साधे सरळ असतात, मात्र सामर्थ्य अपरंपार असते, आणि आज भारताची युवा शक्ती, भारताचे सामर्थ्य विश्वासाठी आशेचे केंद्र बनत आहे. आणि आजचा हा डिफेंस एक्सपो त्याचेच एक रूप घेऊन तुमच्यासमोर सादर होत आहे. मी आपले संरक्षण मंत्री राजनाथ जी यांना हृदयापासून खूप-खूप शुभेच्छा देतो. त्यांनी या कामासाठी कठोर परिश्रम केले आहेत, पुरुषार्थ गाजवला आहे. ते कमी बोलतात, परंतु खूपच मजबूतीने काम करतात. मी त्यांचेही अभिनंदन करतो, त्यांच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या दीपावलीच्याही शुभेच्छा. आमच्या  गुजरातमधील लोकांना नववर्षाच्या शुभेच्छा.  

धन्यवाद !

 

* * *

G.Chippalkatti/R.Aghor/N.Chitale/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1869592) Visitor Counter : 160