पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातमधे जामनगर इथे विविध विकासकामांच्या शुभारंभा प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 10 OCT 2022 11:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10  ऑक्टोबर  2022

 

भारत माता की- जय,

भारत माता की- जय,

मंचावर विराजमान, 2019 च्या निवडणुकीत संपूर्ण भारतात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले गुजरातचे लोकप्रिय मृदू आणि भक्कम मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, तसेच गुजरात प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि माझे संसदेतील सहकारी, सी.आर.  पाटील, गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळातील इतर सर्व सदस्य, खासदार, आमदार आणि मोठ्या संख्येने इथे आलेले जामनगरच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो

मित्रांनो,

भरुचपासून जामनगरपर्यंत गुजरातच्या समृद्धीचा, गुजरातच्या विकासाचा विस्तार करण्याचा हा अनुभव खरोखरच अद्भुत आहे. आज येथे 8 प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. पाणी, वीज, दळणवळणाशी संबंधित या प्रकल्पांसाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आज वाल्मिकी समाजासाठी खास समाज मंदीर देखील समर्पित करण्यात आले आहे. यामुळे आपल्या बंधू-भगिनींना विविध सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनात खूप मदत होईल.

मित्रांनो,

आज जामनगरने कमालच केली आहे.  मला विमानतळावरून इथे यायला उशीर झाला, कारण वाटेत झालेले भव्य स्वागत आणि मिळालेले आशीर्वाद, एवढा उत्साह, उमेद मी कधीच विसरू शकत नाही, माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यामुळे मला अधिक समाधान लाभले. आणि वृद्ध माता आशीर्वाद देतात, आशीर्वाद देतात, यापेक्षा काशीच्या भूमीवर मोठे पुण्य काय आहे. छोट्या काशीचे आशीर्वाद आणि मोठ्या काशीचा खासदार.  नवरात्र नुकतीच झाली. कोरोनाच्या दोन वर्षात सगळं काही थंडावले होते. यावेळी मी पाहिलं की गुजरातच्या कानाकोपऱ्यात नवरात्री साजरी होत होती आणि जामनगरमध्येही नवरात्री मोठ्या थाटात साजरी झाली. नवरात्र संपली, दसरा झाला आणि आता दिवाळीची तयारीही सुरू झाली आहे. तुम्हाला आठवत असेल की सुमारे दोन दशकांपूर्वी याच सुमाराला  जामनगर, सौराष्ट्र, कच्छसह संपूर्ण गुजरात भूकंपाने हादरला होता.  जणू काही गुजरात मृत्यूच्या पांघरुणाखाली झोपला होता. आणि दु:खाचे ते दिवस खूप भयंकर होते, त्या भूकंपानंतरची पहिली नवरात्र, पहिली दिवाळी गुजरातमध्ये कोणत्याही घरात नवरात्री साजरी झाली नाही किंवा दिवाळी साजरी झाली नाही.

भूकंपाच्या शोकांतिकेने इतकी निराशा आणली होती की, गुजरात कधीच रुळावर येणार नाही, असे आपण जवळजवळ गृहीत धरले होते. पण ही खंबीर प्रजा, खंबीर प्रजा. इथे तर खंबीर असलेलेच वाचले आहेत. अशी खंबीर प्रजा बघता बघता उभी राहिली. आत्मविश्वास, संकल्पशक्तीने निराशा झटकून टाकली आणि गुजरात उभाच राहिला नाही तर बघता बघता गुजरात धावू लागला. देशाला आज गती देण्याच्या सामर्थ्यासह पुढे जात आहे. तुम्ही आठवा, जो कच्छ मृत्यूची चादर पांघरुन झोपला होता, त्या कच्छचा विकास बघण्यासाठी, कच्छचे सौंदर्य पाहण्यासाठी, कच्छचा निसर्ग पाहण्यासाठी देश आणि जग इथे कच्छमध्ये येते. आणि आमच्या जामनगर पक्षी अभयारण्यात पक्षी पाहायला येतात. मी आज जामनगरला आलो आहे, मला जामनगरवासियांना विनंती करायची आहे, दोन महिन्यांपूर्वी कच्छच्या भुजिया डुंगर येथे भूकंपात आपण ज्यांना गमावले त्यांच्या स्मरणार्थ स्मृतीवन नावाचे स्मारक उभारले आहे, एक अप्रतिम स्मारक बांधले गेले आहे.  अमेरिकेतील 9-11 नंतर पॉइंट झिरोचे काम किंवा जपानमधील हिरोशिमाचे काम, त्यानंतर बांधलेल्या स्मारकापेक्षा हे जराही उणे नाही. गुजरात भूकंपात प्राण गमावलेल्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आले आहे. त्यात जामनगरमध्ये प्राण गमावलेल्यांच्या स्मृतीही तिथे ठेवण्यात आल्या आहेत. म्हणूनच माझी विनंती आहे की ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांनी एकदा स्मृतीवन येथे जायला हवे आणि आपल्या प्रिय व्यक्तीचे नाव लिहिले आहे, तिथे पुष्प अर्पण करावे. जामनगरच्या कोणत्याही बांधवाला कच्छला जायचे असेल तर भुज येथील या स्मृतिवनाला भेट द्यायला विसरू नका ही विनंती.

बंधू-भगीनींनो,

आज जेव्हा मी जामनगरच्या भूमीत आलो आहे, तेव्हा मला जाम साहेब महाराज दिग्विजय सिंह यांना सन्मानाने आदरांजली वाहायची आहे. महाराजा दिग्विजय सिंह यांनी आपल्या दयाळू स्वभावाने आणि स्वत:च्या कार्यातून दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी पोलंडशी संबंध जोडले, वात्सल्यमूर्ती बनून त्या नागरिकांना मोठे केले. त्याचा लाभ, आजही संपूर्ण भारताला मिळत आहे. काही काळापूर्वी भारतातील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते, हजारो विद्यार्थ्यांना बॉम्ब आणि गोळीबारातून सुखरुप बाहेर काढायचे होते. संकट मोठे होते, पण आपण जोपासलेल्या नात्यामुळे ते त्यातून बाहेर आले. पण पोलंड सरकारने यानंतर जी मदत केली त्यामागचे कारण म्हणजे दिग्विजय सिंह यांचा दयाळू स्वभाव. जाम साहेब शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.  आणि जामनगरचा विकास करुन महाराजा दिग्विजय सिंह जी जाम साहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करुया. आणि सध्याचे जाम साहेब खत्रतुल्य सिंह जी यांचे तर माझ्यावर खूप आशीर्वाद राहिले आहेत. त्यांची भेट घेत आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आम्ही सर्व नेहमीच प्रार्थना करतो. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळत राहावे.  मित्रांनो, जामनगरने क्रिकेटच्या विश्वात आपला झेंडा रोवला आहे. जामनगर क्रिकेटच्या जगात आजही भारताचा तिरंगा डौलाने फडकतो आहे. जामनगर आणि सौराष्ट्रच्या खेळाडूंनी क्रिकेटमध्ये मोठी ताकद दाखवली आहे. आणि जेव्हा आपण चषक घेतो ना तेव्हा गुजरातच्या गौरवाचा विचार मनात येतात.

इतकी प्रतिभासंपन्न , सेवा-भावनेने या भूमीला वंदन करून नेहमीच आनंद आणि समाधान मिळते. आणि त्याचबरोबर तुमची मनापासून निरंतर सेवा करण्याचा माझा जो  प्रण आहे ना तो आणखी मजबूत होतो.

बंधू-भगिनींनो,

आताच भूपेन्द्र भाई पंचशक्तीचे वर्णन करत होते. हे विकासाचे पाच संकल्प करून गुजरातने स्वतःला मजबूत केले आहे आणि हे पाच संकल्प हिमालयाच्या सामर्थ्याप्रमाणे आज गुजरातला पुढे नेत आहेत. पहिला संकल्प जनशक्ती, ज्ञानशक्ती, जलशक्ती, उर्जाशक्ती आणि संरक्षण शक्ती या पाच संकल्पांच्या मजबूत आधारावर या  गुजरातची भव्य इमारत भक्कमपणे नवी उंची गाठत आहे.  20-25 वर्षांपूर्वी आपली काय दशा होती, आठवतंय का, कशी स्थिती होती.  गुजरातचे जे 20-25 वर्षांचे युवक आहेत, जी मुले जन्माला येत आहेत, ती सर्वजण भाग्यवान आहेत कारण त्यांच्या वाडवडिलांनी जी संकटे पाहिली, ती संकटे त्यांनी मुलांच्या नशिबात येऊ दिली नाहीत. आम्ही संपूर्ण ताकदीनिशी या संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अभियान राबवले. आज मी वाटेत पाहत होतो, खूप मोठ्या संख्येने तरुण मुले-मुली उभे होते. घरी तुम्ही विचारा, मित्रांनो , 20-25 वर्षांपूर्वी जामनगर आणि काठीयावाड़ची स्थिती कशी होती. इथे  शेतांमध्ये पाण्यासाठी किती अडचणींचा सामना करावा लागला होता, मुले तहानलेली असायची, तेव्हा आईला कळशी घेऊन तीन-तीन किलोमीटर दूर पाणी भरायला जावे लागत होते. असे दिवस आम्ही पाहिले आहेत. आणि आज स्थिती इतकी बदलली आहे की त्या दुःखद अडचणी आठवणार देखील नाहीत, कितीतरी वेळ टँकरची प्रतीक्षा करायची, येणार, नाही येणार, आला तर त्यासाठी रांगेत उभे रहायचे आणि त्यातही कितीतरी वेळा टँकरजवळ पोहचले तर ऐकायला मिळायचे पाणी संपले आहे. संपूर्ण  काठीयावाड़ची अशीच परिस्थिती होती.

एक काळ असा होता, मला चांगले आठवतंय, तेव्हा मी राजकारणात नव्हतो. तेव्हा मी वृत्तपत्रात एक  छायाचित्र पाहिले होते आणि ते छायाचित्र जामनगरचे होते. आणि ते छायाचित्र कुठलं होतं ? गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री जामनगरला आले होते. खास कशासाठी तर, एका पाण्याच्या टाकीच्या उदघाटनासाठी आले होते. आणि त्या पाण्याच्या टाकीच्या उदघाटनाची बातमी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर छापून आली होती. आणि आज माझ्या प्रवासात भूतकाळात गुजरातच्या अर्थसंकल्पात खर्चासाठी एकूण तरतूद होती त्यापेक्षाही कितीतरी अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करत आहे. यावरून समजेल की गुजरातने आता कुठल्याही परिस्थितीत पुढे मार्गक्रमण करण्याची गती थांबवू नये. आता आपल्याला उंचच उंच भरारी घ्यायची आहे. आणि आपल्याला मान उंचावून बाहेर पडायचे आहे, मित्रांनो.

जेव्हा मी सर्वप्रथम गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा जामनगरच्या आसपासचे आमचे आमदार जेव्हा यायचे, तेव्हा काय घेऊन यायचे माहित आहे, सर्व पक्षांचे आमदार यायचेत्यांची मागणी असायची, साहेब, मदत कार्य लवकर सुरु करा. आमच्या इथे थोडी माती टाका म्हणजे रस्ता तयार होईल, कच्च्या मातीच्या रस्त्याची मागणी आमदार करायचे, आज माझा आमदार म्हणाला असता, साहेब, पेव्हर रोड हवा आहे. साहेब, आता छोटा नाही, चार पदरी रस्ता हवा. एक काळ होता, पाण्याचा विषय निघायचा, तेव्हा आमदार सांगायचा, साहेब, आमच्या भागात हॅन्डपंप बसवा. आणि आज सौनी योजनेमुळे नर्मदा माता संपूर्ण गुजरातची परिक्रमा करायला निघाली आहे. मित्रांनो, एक काळ होता, माता नर्मदेची परिक्रमा करून  पुण्य कमावले जायचे, ती माता आपल्यावर खुश झाली आहे आणि ती गुजरातच्या कानाकोपऱ्यात परिक्रमा करून लोकांना आर्शीवाद देत आहे. नवचैतन्य देत आहे, नवी उर्जा देत आहे.

जेव्हा मी सौनी योजना सुरु केली होती, राजकोटच्या सभागृहात त्यावेळी विरोध करणारे होते , त्यांना बरे वाटले नाही. त्यांनी टीका करायला सुरुवात केलीनिवडणूक जवळ आल्या आहेत, हे मोदी नवीन काहीतरी घेऊन आलेत. ही सौनी योजना तर कठीण आहे, तेव्हा मी म्हटले , हे पहा, तुम्ही हॅन्डपंपच्या पलीकडे विचारच करू शकत नाही. मी इतकी मोठी पाईपलाईन बसवेन, ज्यातून तुम्ही मारुति कारमध्ये बसून फिरू शकाल, आणि आज पाईप बसवले आहेत आणि सौनी योजना जलाशय भरत आहे, शेतांना मुबलक पाणी मिळत आहे. आणि यावेळी तर माझ्या शेतकरी बांधवांना कापसाचा भाव, शेंगदाण्याचा भाव चांगला मिळाला आहे, त्यामुळे ते आनंदित आहेत. यापूर्वी असा भाव कधीही मिळाला नव्हता, आता आपल्या लालपुर मध्ये पाणी पोहचले आहे, लाखो हेक्टर जमिनीला पाणी मिळाले आहे. पाईपलाईनद्वारे जामनगर, द्वारका , राजकोट, पोरबंदरच्या लाखो लोकांना शुद्ध पेयजल मिळेल.

गुजरातमध्ये जल जीवन मिशनचे जे काम सुरु आहे, ज्या गतीने काम सुरु आहे, त्यासाठी भूपेन्द्र भाई आणि त्यांच्या टीमचे मी अभिनंदन करतो. भारत सरकारची योजना जलद गतीने गुजरातमध्ये लागू करण्याचे  काम तुमच्या सरकारने केले आहे. आपल्या माता-भगिनींचा आशीर्वाद मिळाला आहे, कारण पाण्याचा संपूर्ण भार  माता-भगिनींवर असतो. घरी पाहुणे येणार असतील आणि पाण्याची टंचाई असेल तर सर्वात जास्त काळजी माझ्या माता-भगिनींना वाटते. आणि या माता-भगिनींच्या डोक्यावरील कळशी कोण उतरवणार, हा पुत्रच उतरवणार, मित्रांनो. आज 100 टक्के पाईपद्वारे पाणी पोहचवण्याचे काम आम्ही करत आहोत , हर घर जल अभियानला यातून बळ मिळणार आहे.

आमचे सरकार गरीबांच्या कल्याणासाठी निरंतर काम करत आहे. या कोरोना काळात आम्हाला  सर्वप्रथम देशातील गरीबांची चिंता होती. आम्ही निर्णय घेतला की एकाही गरीबाच्या घरात चूल पेटणार नाही अशी वेळ येऊ नये , त्यासाठी गरीबाच्या घरात मोफत धान्य पोहचवून या देशातील  80 कोटी लोकांना एकही वेळ उपाशी राहू दिले नाही.  आणि आपल्याकडे तर अन्नाचा एक घास खाल्ला असेल तर आशीर्वाद  द्यायला कुणी विसरत नाही, आणि मला देशातील 80 कोटी लोकांचा आशीर्वाद  मिळत आहे, कोटी-कोटी आशीर्वाद  मिळत आहेत.

तुम्हां सर्वांचे आशीर्वाद मला मिळत आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आता डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे, कोणत्याही आपत्तीच्या काळात देशातील गरिबांच्या घरातील चूल विझता कामा नये यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

दुसरी गोष्ट म्हणजे एक देश,एक रेशनकार्ड हा उपक्रम. काही काळापूर्वी जामनगरला फार प्रसिद्धी मिळालेली नव्हती. जशी छोटी काशी तसेच जामनगर देखील छोटेच वाटायचे. आज गावच्या भाषेत सांगायचे तर आपले जामनगर पंचरंगी झाले आहे,पंचरंगी. आणि शहरी भाषेत सांगायचे तर संपूर्ण जिल्हाच कॉस्मोपॉलिटिन होऊन गेला आहे. देशभरात कामासाठी फिरणारे लोक आज जामनगर जिल्ह्यात उदरनिर्वाह करत आहेत. देशातील कोणीही उपाशी राहू नये यासाठी एक देश एक रेशनकार्ड योजनेतून मोठे काम करण्यात आले आहे. येथे आलेली व्यक्ती बिहारमधून येथे आलेला असो, उत्तरप्रदेशातून, महाराष्ट्रातून,आंध्र प्रदेशातून, तेलंगाणातून अथवा कर्नाटकातून येथे आलेली असो आणि त्याच्याकडे त्याच्या मूळ गावातले रेशनकार्ड असो, त्याला येथील रेशन दुकानातून सामान मिळेल आणि त्याच्या घरची चूल पेटत राहील असे काम आपण केले आहे. जामनगरचे नाव तर देशातील मोठे उर्जा क्षेत्र असलेले तेल शुद्धीकरण क्षेत्रात देखील प्रसिध्द पावले आहे. देशातील एकूण कच्च्या तेलाच्या साठ्यापैकी 35% तेलाचे शुद्धीकरण माझ्या जामनगरच्या भूमीमध्ये केले जाते. हे जाणून घेतल्यावर कोणत्याही जामनगरवासियाची मान अभिमानाने उंचावल्याशिवाय राहणार नाही.जामनगरमधील औद्योगिक विकासासाठी नरेंद्र आणि भूपेंद्र यांचे दुहेरी इंजिनचे सरकार मनःपूर्वक कामाला लागले आहे. सुमारे 20 वर्षांपूर्वी आपल्या शहरात वाहतुकीची परिस्थिती काय होती याची जरा आठवण काढून बघा. आता जामनगरमधील रस्ते रुंद असावेत, शहरातील यंत्रणा विकसित असावी, पादचारी पूल बांधले जावेत, ओव्हरपास तसेच उड्डाणपूल बांधले जावेत, शहराच्या समृद्धीसह सामान्य मानवी सुविधा वाढविता याव्यात यासाठी आम्ही काम करत आहोत. आणि यामुळे गुजरातच्या पश्चिमेला समुद्र किनाऱ्यावर वसलेले एकटे जामनगर आजच्या युगात आपल्या सर्वांचे पालनपोषण करत आहे.

जामनगर हे शहर भारताच्या कानाकोपऱ्यातील भागाशी जोडलेले असावे यासाठी 26 हजार कोटी रुपये खर्चून अमृतसर-भटिंडा-जामनगर कॉरिडॉरची निर्मिती होते आहे. हा कॉरिडॉर जामनगरला संपूर्ण उत्तर भारतात सशक्त करण्याचे काम करणार आहे. येथील क्षमता, येथील उत्पादने, येथील लहान-मोठे उद्योगधंदे यांची ओळख समग्र उत्तर भारतात एका रेल्वे मार्गामुळे होणार आहे. पंजाब, हरियाणा,राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यापैकी कोणतेही राज्य असो, एका कॉरिडॉरच्या माध्यमातून गुजरातमधील व्यापार उद्योगांतून निर्माण झालेले उत्पादन, एवढेच नव्हे तर येथील भाजीपाला आणि फळे देखील कमीतकमी खर्चात उत्तर भारतात पोहोचणार आहेत. आपल्या गुजराती समाजाचे एक वैशिष्ट्य आहे की आपण बिनकामाच्या ठरलेल्या वस्तूंचा देखील सदुपयोग करण्यात तज्ञ आहोत. आमरस खाल्ला असेल तर आंब्याच्या कोयींपासून आपण मुखवास बनवू, पण कुठल्याही गोष्टी वाया जाऊ देणार नाही. आपल्या हरिपारमधील 40 मेगावॉटचा सौर उर्जा प्रकल्प हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. जी जमीन उजाड, टाकाऊ समजली जात होती त्याच जमिनीवर आपण ही कामगिरी करून दाखविली आहे. नदी-नाल्यांच्या आजूबाजूची जी जागा असेल, जी कशासाठीही उपयोगात आणलेली नसेल अशा जागेचा देखील आम्ही उपयोग करून दाखविला आहे.  

मित्रांनो,

शेतकऱ्यांच्या कल्याणाचा प्रश्न असो किंवा गरिबांचे जीवन अधिक सुसह्य करावयाचे असेल, उद्योगांचा विकास असेल किंवा पायाभूत सुविधांमध्ये वाढ करायची असेल, अशा प्रत्येक क्षेत्रात गुजरात राज्याने विकासाची नवी उंची गाठली आहे. जामनगर शहराने तर जागतिक पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. कोरोनाच्या आजारामुळे आता लोक डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेला ओळखू लागले आहेत, तर या संघटनेचे जागतिक पारंपारिक औषधी केंद्र देखील आपल्या जामनगरमध्ये सुरु झाले आहे. जामनगरमध्ये आयुर्वेद विद्यापीठ तर होतीच, त्या मुकुटावर या नव्या केंद्रामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.जामनगरच्या आयुर्वेद विद्यापीठाला आता राष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठाचा दर्जा मिळाला आहे. आपले जामनगर म्हणजे छोटी काशी आहे, पण आमचे जामनगर सौभाग्य नगर म्हणून देखील प्रसिध्द आहे. जामनगरमध्ये तयार होणारे कुंकू, बांगड्या, टिकल्या, बांधणीची उत्पादने ही आमच्या सौभाग्यनगराची ओळख आहे. आणि आमच्या सरकारने तर गुजरातच्या बांधणी कलेच्या विकासासाठी हस्तकला सेतू योजनेच्या माध्यमातून अनेक नवी प्रोत्साहनपर अनुदाने दिली आहेत. सरकारच्या अनेक योजनांमुळे जामनगरचा पितळ उद्योग भरभराटीला आला आहे. मला आठवते, जेव्हा मी नुकताच पंतप्रधानपदाचा कार्यभार हाती घेतला होता, त्या काळात जामनगरहून अनेक चिंताजनक बातम्या यायच्या, सारे बंधुगण मला भेटण्यासाठी येत असत. त्याकाळच्या चिंताजनक परिस्थितीतून पितळ उद्योगाला मुक्त करून आपण पुढे मार्गक्रमण करतो आहोत.

बंधू-भगिनींनो,

आपले जामनगर असो किंवा राजकोट असो, माझ्या काठीयावाडच्या भूमीतील अभियांत्रिकी उद्योगांचे सामर्थ्य असे आहे की ते छोटीशी पिनदेखील बनवतात आणि विमानाचे सुटे भाग देखील येथे तयार होतात, अशा प्रकारची ताकदवान यंत्रणा आम्ही येथे उभारली आहे.

 मित्रांनो,

देशात आता व्यवसाय-उद्योग करणे सोपे झाले आहे. व्यवसाय करताना कमीतकमी त्रास व्हावा, सरकारचा किमान हस्तक्षेप असावा हाच माझा सगळ्यात मोठा उद्देश आहे. छोट्या-छोट्या उद्योगांमध्ये देखील सरकारचा कमीतकमी हस्तक्षेप असावा याला मी प्राधान्य दिले आहे. पूर्वीच्या काळी, सरकारकडे काम मागितले की, एक अर्ज भरा, दुसरे काही काम असेल तर परत दुसरा अर्ज भर, इतक्या प्रकरचे अर्ज असायचे की कारखान्यात केवळ सरकारी अर्ज भरण्यासाठी कारकून ठेवला तरी यांचे अर्ज संपत नसत. पण. आपल्याला हे ऐकून आनंद होईल, विशेषतः लहान उद्योजकांना याचा विशेष आनंद होईल की आता व्यवसाय-उद्योगासंदर्भात सरकारकडून दिल्या जाणाऱ्या  33 हजार लहान लहान परवानग्या मी रद्द करून टाकल्या. या निर्णयाचा सर्वात जास्त लाभ एमएसएमई क्षेत्रातील उद्योगांना झाला. याखेरीज सरकारी कायदे हा देखील मोठा चिंतेचा विषय होता. पूर्वीचे सरकार काय काय करत असे, देवच जाणे. आपल्याकडे असे देखील कायदे होते, की तुमचा जर कारखाना असेल आणि त्यात शौचालय-स्वच्छतागृह असेल आणि त्याच्या भिंती तुम्ही दर सहा महिन्यात चुन्याने रंगविल्या नसतील, आणि सरकारच्या ते लक्षात आले तर तुम्हाला सहा महिन्यांची शिक्षा, आता काय बोलणार सांगा.

असे कितीतरी नियम होते, ब्रिटिशकालीन कायदे  पाळले जात होते... मला माझ्या देशाच्या व्यापारी जगाला  तुरुंगात टाकायचे नाही , मी तब्बल दोन हजार कायदे रद्द केले आहेत.आणि इथे बसलेल्या व्यापारी मित्रांच्या मनात अजून काही कायदा असेल तर मला सांगा, मी नक्की तो रद्द करेन. कोणत्याही गोष्टीसाठी तुरुंगात टाकणे या गुलामगिरीच्या मानसिकतेतून निर्माण झालेल्या  गोष्टी आहेत, यातून  सुटका करण्यासाठी मी मोहीम सुरू केली आहे. आणि ही मोहीम सुरूच राहणार आहे. 'व्यवसाय सुलभता ' याला आमचे प्राधान्य आहे. सरकार किती भार टाकते ,याची मोजदादही पूर्वी होत नव्हती.कारण प्रत्येकाला अडवत या टेबलवर जा, त्या टेबलावर जा..इथे  आरती करा  तिथे पूजा करा , तिथे नैवेद्य दाखवा , हेच होत असे . व्यवसाय सुलभतेसाठी कायद्याच्या अधीन राहून  नियम बदलले, त्यामुळे आपण  जागतिक क्रमवारीत मोठी झेप घेतली.यापूर्वी 2014 मध्ये मी आलो, तेव्हा तुम्ही मला पंतप्रधान म्हणून सेवा करायला पाठवले, तेव्हा भारत 142 व्या क्रमांकावर होता, पाच-सहा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आता आपण वेगाने वाटचाल करत  63 व्या क्रमांकावर पोहोचलो आहोत.आणि आपण आणखी जोर लावला तर आपण  50 च्या खालीही जाऊ शकतो.  एवढी मोठी सुधारणा केवळ कागदावरच नाही, तर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना त्याचा लाभ प्रत्यक्ष मिळायला हवा, असे काम झाले आहे.

जगात भारताची अवस्था बघा साहेब, किती लोकांचा सकाळचा चहा खराब होत असेल  जगभरातील लोक लिहितात, जागतिक  बँक लिहिते , आंतराष्ट्रीय नाणेनिधी  लिहिते , मोठे अर्थतज्ज्ञ लिहितात की.  संपूर्ण जग महागाईत बुडाले असताना , इतकी  महागाई गेल्या 50 वर्षांत इंग्लंडमध्ये दिसली नाही, इतकी महागाई अमेरिकेत गेल्या 45  वर्षांत दिसली नाही.विकासदर  स्थिरावला आहे, व्याजदर वाढले आहेत. जगभरात आर्थिक क्षेत्रात उलथापालथ झाली आहे.त्यात  एकमात्र भारत असा आहे की , जो वेगवान वाटचाल करत आहे. 2014 पूर्वी, भारत जगातील अर्थव्यवस्थांमध्ये 10 व्या क्रमांकावर होता, आणि इतक्या अल्प  कालावधीत भारताने  10 वरून 5 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आपला क्रमांक आहे. सहावरून  पाच वर गेलो तर संपूर्ण देश एका उर्जेने भरला होता.कारण काय होते ते माहीत आहे, मोदी पंतप्रधान आहेत म्हणून नाही, गोष्ट अशी आहे की ,आधी पाचव्या क्रमांकावर जे  लोक होते ज्यांनी 250 वर्षे आपल्यावर  राज्य केले, आपल्याला  गुलाम बनवले, आज भारत त्यांना मागे टाकून पुढे गेला आहे.आणि या सगळ्यात सरकारने केवळ स्वतःच्याच पाठीवर कौतुकाची थाप मारलेली नाही तर आम्ही खुल्या मनाची माणसे  आहोत, आणि त्यासाठी माझा मजूर बांधव असो, शेतकरी बांधव असो, फेरीवाले असो, व्यापारी-उद्योजक असो, या सर्वांना याचे श्रेय जाते.या सगळ्यांमुळेच देशाची प्रगती होत आहे, यासाठी  मी त्यांना शतशः वंदन करतो.

मित्रांनो,

गुजरात सरकारने आठवडाभरापूर्वी नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले  आणि सगळीकडून त्याची प्रशंसा झाली. गुजरातला  कुठेही थांबू देणार नाही, अशाप्रकारचे हे औद्योगिक धोरण आणल्याबद्दल मी भूपेंद्र आणि त्यांच्या चमूचे  खूप खूप अभिनंदन करतो.आणि त्या नवीन उद्योग धोरणात, नवीन स्टार्टअप आणि सूक्ष्म उद्योग क्षेत्रासाठीही  अत्यंत लाभदायक  व्यवस्था करण्यात आली आहे. गुजरातच्या अधिकाधिक तरुणांना लाखोंच्या संख्येने रोजगार मिळावा, माझी इच्छा आहे की, गुजरातच्या तरुणांनी या नव्या औद्योगिक धोरणाचा लाभ घ्यावा,त्याचा अभ्यास करावा  त्यांना सहाय्य करायला मी   तयार आहे.

जामनगरचे बंदर क्षेत्र ,आपला समुद्रकिनारा विविधतेने भरलेला आहे. शेकडो प्रकारची जैवविविधता आणि आता भारताने प्रकल्प  डॉल्फिन सुरू केला आहे.चित्त्याचा तर देशात जयघोष झाला आता आम्ही  डॉल्फीनवर  लक्ष केंद्रित करणार आहोत, जामनगर येथे एक डॉल्फिन पार्क आहे, त्याच्या संवर्धन आणि विकासासाठी योजना तयार करण्यात आल्या आहेत.आणि त्यामुळे जामनगर, व्दारका,बेट व्दारका या  संपूर्ण समुद्रकिनारी पर्यावरण - पर्यटन हे  मोठे क्षेत्र म्हणून विकसित होणार आहे. आणि बंधू आणि भगिनींनो, मी भूपेंद्रभाईंना मवाळ आणि कणखर  म्हणतो ना याचा अनुभव गुजरातने बरोबर घेतला आहे. ज्या लोकांनी समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीर बांधकाम केले , ते शांतपणे भुईसपाट. आणि गंमत बघा, कणखर मनाचा माणूस जेव्हा  नेतृत्व करतो तेव्हा ते तळागाळापर्यंत कळतेमग कोणताही विरोध होत नाही. हा कणखरतेचा परिणाम आहे, इतकेच नाही तर भूपेंद्रभाई संपूर्ण गुजरातच्या  समुद्र किनारे   स्वच्छ करून घेत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करणे प्रत्येकाच्या भल्याचे आहेत  आणि गुजरातने  गेल्या 20 वर्षांत शांतता पहिली आहे. त्यामुळे समृद्धीची दारे खुली झाली आहेत बंधुनो, एकतेच्या संकल्पासह खांद्याला खांदा लावून गुजरात वाटचाल करत आहे. पूर्वी तर रोज दंगल व्हायची, जामनगरचाही यात समावेश होता, आज आपण त्या सगळ्यातून  मुक्त झालो आहोत, आज गुजरातमध्ये नरेंद्र भूपेंद्र दुहेरी  इंजिनचे सरकार आहे, सर्व योजना वेगाने सुरू आहेत.आणि ही गती कायम ठेवायची आहे, आणि या विकासयोजना जामनगर आणि सौराष्ट्रचा आधारस्तंभ बनल्या आहेत . मला विश्वास आहे की आम्ही तरुण आणि वृद्धांच्या जीवनात शांतता आणण्याच्या दृष्टीने   काम करत आहोत.

बंधु आणि भगिनींनो,

जामनगरच्या धरतीला मानवंदना , तुम्हा सर्वांचे अभिनंदन.आणि पुन्हा एकदा संपूर्ण मार्गावर माता भगिनी जो आशीर्वाद देत होत्या त्यांच्या दर्शनाने जीवन धन्य होवो, आजचा दिवस माझ्यासाठी धन्यतेचा आहे. इतके सारे आशीर्वाद, त्यांचेही  मी आभार मानतो, दोन्ही हात वर करून माझ्यासोबत बोला

भारत माता की- जय, भारत माता की – जय   

G.Chippalkatti/Vinayak/Sushama/Sanjana/Sonal C/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 


(Release ID: 1867059)