पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातमधील आमोद येथे विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 10 OCT 2022 8:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर  2022

भारत माता की – जय,

भारत माता की – जय,

मंचावर उपस्थित गुजरातचे  मृदू आणि तितकेच कर्तव्यकठोर लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, 2019 च्या निवडणुकीत देशात सर्वाधिक मते मिळवून नवा विक्रम प्रस्थापित करणारे संसदेतील माझे सहकारी सी.आर. पाटील, केंद्रातील मंमंत्रिमंडळातील  माझे सहकारी आणि गुजरातचे सुपुत्र  मनसुख भाई मांडविया, मंचावर विराजमान  गुजरात सरकारचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि  मला आशीर्वाद देण्यासाठी  मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या  प्रिय बंधू-भगिनींनो

मित्रांनो,

आज सकाळी मी इथे येत असताना  एक दुःखद बातमी समजली. मुलायम सिंह यादव यांचे आज निधन झाले. मुलायम सिंग यादवजी, त्यांचे जाणे देशाची  मोठी  हानी  आहे. मुलायम सिंग यांच्याशी माझे नाते खूप खास राहिले आहे.  जेव्हा आम्ही दोघे मुख्यमंत्री असताना भेटायचो.त्यांना आणि मलाही, दोघांनाही, एकमेकांबद्दल आपुलकीची भावना जाणवायची. आणि 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाने 2014 च्या निवडणुकीसाठी  पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा केली  तेव्हा मी विरोधी पक्षात जे लोक होते,ज्यांच्याशी माझी आधीच ओळख होती, अशा काही  देशातील वरिष्ठ राजकारणी असलेल्या काही महान व्यक्तींना जे राजकीयदृष्ट्या आमचे विरोधक होते पण  त्या सर्वांना दूरध्वनी करून त्यांचे  आशीर्वाद घेण्याचा उपक्रम   मी राबवला होता. आणि मला आठवते आहे की, त्या दिवशी मुलायम सिंगजींचे ते आशीर्वाद, काही सल्ल्याचे दोन शब्द, ते आजही माझ्यासाठी बहुमूल्य आहेत. आणि मुलायमसिंगजींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मला 2013 मध्ये जे आशीर्वाद दिले होते, त्यात कधीही चढउतार येऊ दिले नाहीत. प्रखर राजकीय विरोध असतानाही.  2019 मध्ये संसदेचे शेवटचे अधिवेशन होते, मागच्या लोकसभेचे आणि संसदेत बोलण्यासाठी  मुलायमसिंगजींसारखे ज्येष्ठ नेते उभे राहिले आणि त्यांनी संसदेत जे सांगितले होते, ती गोष्ट या देशातील कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याच्या आयुष्यात  एक मोठा आशीर्वाद   असते,संसदेत  ते म्हणाले, कोणत्याही नोंदी न पाहता सांगितले होते .  कोणतेही राजकीय मतभेद मनात न बाळगता त्यांनी सांगितले होते की, मोदीजी सर्वांना सोबत घेऊन चालतात आणि त्यामुळेच 2019 मध्ये ते पुन्हा निवडून येतील आणि देशाचे पंतप्रधान होतील असा माझा  दृढ विश्वास आहे. किती मोठे मन असेल. ते जिवंत असे पर्यंत जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांचे आशीर्वाद मिळत राहिले. मी आज आदरणीय मुलायमसिंगजी यांना गुजरातच्या या धरतीवरून नर्मदेच्या तटावरून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, त्यांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या समर्थकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो..

मित्रांनो,

मी यंदा अशावेळी  भरूचमध्ये आलो आहे, जेव्हा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. जेव्हा आपण भारताचा इतिहास वाचतो आणि भविष्याबद्दल बोलतो तेव्हा भरूचची नेहमीच अभिमानाने चर्चा होते.या पृथ्वीने अशा अनेक सुपुत्रांना  जन्म दिला आहे, ज्यांनी आपल्या कार्याने देशाचा गौरव वाढवला आहे. जसे की, आपल्या धरतीचे सुपुत्र  कन्हैयालाल मानेकलाल मुन्शी जी. संविधान निर्मितीतील त्यांचे योगदान देश कधीही विसरू शकत नाही.सोमनाथ मंदिराच्या भव्य बांधकामात सरदारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या  मुन्शीसाहेबांची भूमिका कोणीही विसरू शकत नाही.इतकेच  नाही तर भारतीय संगीताला नव्या उंचीवर नेणारे महान कलाकार पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचेही या मातीशी नाते आहे. अशा महान व्यक्तींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आम्ही गुजरातचा गौरव वाढवण्याचे आणि  गुजरातला  विकसित करण्याचे काम करत आहोत.

बंधु आणि भगिनींनो,

गुजरातच्या, देशाच्या प्रगतीत गुजरातची प्रगती असो, देशाची प्रगती असो, त्यात भरूचचे योगदान खूप महत्त्वाचे आहे.भरुचचा सहभाग. एक काळ असा होता जेव्हा भरुच फक्त शेंगदाण्यासाठी ओळखले जायचे.आज माझ्या  भरुचचा उद्योग, व्यवसाय, व्यापार, बंदर अशा अनेक गोष्टींमध्ये  जयजयकार होत आहे. आणि आज माझ्या या दौऱ्यादरम्यान  गुजरातमध्ये जी पायाभरणी आणि लोकार्पणाची कामे होत आहेत, भूतकाळातील कोणत्याही एका सरकारच्याम्हणजेच गुजरातच्या भूतकाळातील अर्थसंकल्पापेक्षाही , जुन्या सरकारांच्या काळात गुजरातचा एकूण अर्थसंकल्प होता ना एका वर्षांचा त्याहूनही अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे मी एका दौऱ्यादरम्यान लोकार्पण आणि पायाभरणीचे कार्यक्रम केले आहेत.

बंधुंनो,

हे गुजरात कुठल्या कुठे पोहोचले आणि आता आपला भरूच जिल्हा देखील सर्व प्रकारच्या लोकांची वस्ती असलेला (कॉस्मोपॉलिटन )जिल्हा झाला आहे.इथे भारतातील जवळपास सर्व राज्यांचे बांधव बसलेले असतील.आणि जर तुम्ही संपूर्ण भरुच जिल्ह्यातून गेलात तर तुम्हाला कोणी केरळमधील, कोणी बंगालमधील, कोणी बिहारमधील आढळेल.देशभरातील लोक,एक काळ होता कलकत्ता, दिल्ली, मुंबई यांची कॉस्मोपॉलिटिन म्हणून ओळख होती. आज गुजरातचा इतका विकास झाला आहे की गुजरातचे अनेक जिल्हे कॉस्मोपॉलिटन झाले आहेत आणि संपूर्ण देशाला स्वतःसोबत प्रेमाने सामावून घेत राहू लागले आहेत.  गुजरातच्या विकासाच्या प्रवासाची ही उंची आहे.

बंधु आणि भगिनींनो,

आज पहिले बल्क ड्रग पार्क गुजरातला मिळाले आहे आणि तेही माझ्या भरुचला मिळाले आहे.रासायनिक क्षेत्राशी संबंधित अनेक संयंत्रांचे  लोकार्पणही करण्यात आले आहे.त्याचबरोबर कनेक्टिव्हिटीशी संबंधित दोन मोठे प्रकल्प,अंकलेश्वर, राजपिपला  आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी एकतानगर यांना जोडणारा रस्ता आणि सर्वात मोठी गोष्ट इतकी वर्षे बोलली जात होती.आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे  किती वर्षे यावर चर्चा होत होती. मी मुख्यमंत्री असतानाही व्हायची आणि इथून मोठे मोठे नेते दिल्लीत बसले असतानाही ती व्हायची. पण आमचे कोणी ऐकतच नव्हते.  ज्या पद्धतीने भरुच जिल्ह्याचा विकास होत होता.आता भरुच बडोदा किंवा सुरत विमानतळावर अवलंबून राहू शकत नाही, भरुचचे स्वतःचे विमानतळ असले पाहिजे आणि म्हणूनच अंकलेश्वर येथे नवीन विमानतळ बांधण्यासाठी आज पायाभरणी होत आहे.

मित्रांनो,

उद्योगांच्या बाबतीत, भरूच हा असा जिल्हा आहे, जिथे देशातील अनेक लहान राज्यांपेक्षा जास्त उद्योग आहेत. एकट्या भरुच जिल्ह्यापेक्षा राज्यात जास्त उद्योग आहेत.एका राज्यात जितके उद्योग असतात त्यापेक्षा जास्त उद्योग आपल्या भरूच जिल्ह्यात आहेत. आणि हे एका जिल्ह्यातील उद्योग ज्या संख्येने रोजगार देत आहेत हा देखील एक मोठा विक्रम आहे बंधूंनो. देश-विदेशातून इतका उद्योग-व्यवसाय केल्यानंतर आता विमानतळ उपलब्ध होत असताना विकासाच्या नव्या भरारीला नवी गती मिळणार आहे. आणि नरेंद्र भूपेंद्र यांचे  दुहेरी   इंजिन सरकार असताना विमानतळाचे कामही वेगाने पूर्ण होईल. विमानतळाच्या उभारणीमुळे उद्योगपतींची ये-जा, बड्या अधिकाऱ्यांच्या येण्या-जाण्याचा वेग वाढेल, विकासालाही गती मिळेल  निर्यातीला आणखी चालना मिळेल..

बंधु आणि भगिनींनो,

आज आपल्याला गुजरातचे वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.गुजरात नवा आहे, बदलला आहे आणि आणि प्रचंड उंच भरारी घेण्यासाठी धडपडणारा  असा हा  आपला  गुजरात आहे  बंधूंनो.आणि अशा अनेक गोष्टी आपल्या समोर दिसतात पण दोन दशकांपूर्वीचा तो दिवस आठवतो तेव्हा कसे  वाटते? बंधुंनो , दोन दशकांपूर्वी गुजरातची ओळख काय होती, व्यापारी एका ठिकाणाहून माल घेऊन दुसऱ्या ठिकाणी विकायचे आणि त्या दरम्यान  मिळणाऱ्या दलालीने आपला उदरनिर्वाह करायचे.शेतीत मागे.  उद्योगात मागे.हीच आपली ओळख होती कारण आपल्याकडे कच्चा मालच नव्हता. अशा परिस्थितीत  आज गुजरातने दोन दशकांत कठोर परिश्रम करून औद्योगिक क्षेत्रात विकासाची उंची गाठली आहे.सुटे भाग बनवण्याच्या छोट्या उद्योगांचे जाळे ज्या प्रकारे आपण सर्वांनी विणले  आहे, त्याच प्रकारे आपण सगळ्यांनी आपले स्वतःचे बंदर, आपली किनारपट्टी आणि विकासाचा वेग वाढवला आहे. आणि आमच्या आदिवासी बांधवांची, आमच्या मच्छीमार बंधू-भगिनींची किती  वाईट अवस्था  होती. विचारणारेही  कुणी नव्हते आज जे   20, 22, 25 वर्षांचे तरुण  आहेत, त्यांना माहितीही नसेल इथे जगण्यासाठी किती कष्ट करावे लागत होते . इथे आमचे भरूच रिकामे होत असे . एकेकाळी गुजरातमध्ये अशी परिस्थिती होती हे त्यांना माहितीही नसेल.

मोठ्या मेहनतीने गुजरातच्या जनतेच्या सहकार्याने आज या ठिकाणी पोहोचलो आहोत. आणखी उंच झेप घेण्यासाठी सर्वजण तयार होऊन बसले आहेत आणि म्हणूनच येणाऱ्या काळात उंच झेप घ्यायची आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या अमृत महोत्सवा बरोबर अमृत काळाची सुरुवात झाली आहे, त्याच प्रमाणे गुजरातच्या युवा वर्गासाठी ही सुवर्ण काळाची सुरुवात झाली आहे. बंधुनो, ही सुवर्ण काळाची संधी घालवायची नाहीये. बंधुनो, कोणत्याही जागी विकास कधी होतो? विकास करायचा असेल तर एकसारखं वातावरण असायला हवं, अनुकूल वातावरण हवं, प्रोत्साहन देणारं वातावरण असायला हवं, बंधूंनो, अडथळे निर्माण करणारं वातावरण चालत नाही. आणि यामध्ये सर्वात जास्त गरज असते कायदा आणि सुव्यवस्थेची. चांगल्यात चांगली पायाभूत सुविधा, आणि या सर्वाबरोबर धोरण आणि हेतूही असायला हवा. एकटं धोरण असून काही होत नाही, धोरण कितीही चांगलं असो, पण हेतू चांगला नसेल तर सर्वच व्यर्थ ठरतं. बंधुनो, या भरूचची ओळख कोणाला नाही, संध्याकाळी पांचबत्ती विस्तारला जायचं असेल तर केवढी अडचण व्हायची, बंधुंनो, कायदा सुव्यवस्थेची कशी वाईट स्थिती होती, होती की नाही? कधी कोणाचं अपहरण व्हायचं, कधी कोणाला घर रिकामं करायची धमकी मिळायची, असे दिवस होते. आज कायदा सुव्यवस्थेने या भरूचच्या लोकांना सुख शांतीच जीवन दिलं की नाही? सुख-शांतीचं जीवन जगत आहेत की नाही? आणि याचा लाभ सर्वांना मिळाला की नाही मिळाला? याला मिळाला, त्याला नाही मिळाला, असं नाही झालं, सर्वांना मिळाला. शांती असेल कायदा सुव्यवस्था असेल तर याचा सर्वात जास्त लाभ आपल्या आदिवासी बंधू, गरीब बंधूना मिळतो. नाहीतर इथं भरूच मध्ये आदिवासी मुलीला काम देऊन त्यांच्याबरोबर कसे व्यवहार व्हायचे, आणि आदिवासी त्यांच्या बद्दल राग व्यक्त करत होते. मात्र जेव्हा मला माझ्या आदिवासी बंधू-भगिनींची साथ मिळाली, तेव्हा माझ्या आदिवासी बंधू-भगिनींचे उदंड आशीर्वाद मला मिळत राहिले. एक काळ होता, आरोग्याच्या सुविधा नव्हत्या, रुग्णालयात जायचं असेल तर सूरत पर्यंत, बरोडा पर्यंत धावपळ करावी लागत होती. शेती, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर राहून देखील आम्हाला पाण्यासाठी व्याकूळ व्हावं लागत होतं. असे दिवस बघितले आहेत. मला आठवतं, अनेक वर्षांपूर्वी भरूचमध्ये पिण्याच्या पाण्याचं संकट होतं, अशा संकटाचा सामना भरूच करत होता. पूर्ण खार पट्टा आत जात होता, एवढंच नाही आपल्या भरूच जिल्ह्यात किती धार्मिक स्थळं आहेत, संपूर्ण नर्मदेचा किनारा तर आहेच. मात्र त्याचा विकास करण्यात त्यांनी कुचराई केली. भारताचा आत्मा तोडण्याचा प्रयत्न होत होता. बंधु-भगिनीनो ही तर 20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 25-25 वर्षांच्या युवा पिढीला माहित नसणं स्वाभाविक आहे. पण आपण जेव्हा मला सेवा करण्याची संधी दिलीत, एक-एक समस्या सोडवत गेलो, गुंते सोडवत गेलो, रस्ता शोधत गेलो आणि परिस्थिती बदलत गेलो. कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलायचं झालं, तर मोठ-मोठ्या व्यक्तींना तुरुंगात टाकलं बंधुनो. त्यांना ही समजलं की आता आपल्याला योग्य मार्गावर चालावं लागेल, आणि त्यामुळे गुजरातच्या मुलांना आज कर्फ्यू, हा शब्दच माहीत नाही. नाहीतर आपल्या भरूचमध्ये थोड्या-थोड्या काळाने कर्फ्यू लागत होता. आणि आज ज्या माता-भगिनी कन्या आहेत ना, त्यांना माहिती देखील नसेल की आपल्या घरी जे वृद्ध आहेत त्यांना भूतकाळात गरबा खेळायचा असेल तर किती त्रास सहन करावा लागत असे. आज गुजरातच्या शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींना शिक्षणासाठी बडोद्याला जायचं असेल तर त्या निश्चिंत होऊन जातात, महाविद्यालयात शिकतात, ये-जा देखील करतात, आणि आता तर भरूच जिल्ह्याने देखील शिक्षणाच्या क्षेत्रात मोठा विकास केला आहे. कोणत्याही युवतीला रात्री उशीरापर्यंत काम करायचं असेल, रेल्वे स्थानकामधून घरी जायचं असेल, बस स्थानकावरून घरी जायचं असेल, तर तिच्या मनात भीतीचा लवलेशही राहू नये, अशी परिस्थिती आपण सर्वांनी निर्माण केली आहे. आणि या ठिकाणी जेव्हा बाहेरचे लोक येतात ना, आता जेव्हा या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम सुरु आहे, खेळांच्या स्पर्धा. देशभरातले हजारोच्या संख्येने खेळाडू सध्या गुजरातमध्ये हजर आहेत. तेव्हा खेळ संपल्यावर संध्याकाळी गरबा बघायला जातात. संपूर्ण रात्र. त्यांना हे बघून आश्चर्य वाटतं की असं दृश्य, जसं काही या ठिकाणी तर रात्रच होत नसावी. बंधुनो-भगिनींनो, भरूचचा विकास करायचा असेल तर औद्योगिक विकास आवश्यक होता. आणि या वेळी बडोदि-वापी एक प्रमुख महामार्ग, काही,अगदी संख्येने थोडे कारखाने बघून  लोक जयजयकार करत, की आमच्याकडे औद्योगिक विकास झाला. आपण बघितलं की इथे अविकसित प्रदेश आहेत, त्या ठिकाणी देखील आम्ही विकास केला, आणि आदिवासींच्या विकासाबरोबर झगडीया सारख्या विस्तारासाठी उद्योग घेऊन गेलो. कोरड्या प्रदेशात उद्योग  घेऊन गेलो, ज्यामुळे शेतीची जमीन सुरक्षित राहिली आणि औद्योगिक विकास देखील झाला. आणि आज आपला गुजरात उत्पादनाचं केंद्र झाला आहे. निर्यातीचं केंद्र झाला आहे. बंधुनो, दोन दशकांपूर्वी त्याचा मागमूसही नव्हता. बंधुनो, आज दाहेज-2, दाहेज-3, सायखा, विलायत हे विकासाचे, आपल्या समृद्धीचे नव-नवीन दरवाजे उघडले आहेत. आधुनिक महामार्गांची गोष्ट असो, रो-रो फेरी सेवा, ही रो-रो फेरी सेवा विकासाची खूप मोठी शक्ती म्हणून उदयाला आली आहे. बंधुनो, दहेजचा विशेष गुंतवणूक प्रदेश, त्याची ताकत केवढी वाढू लागली आहे. याचमुळे गुजरात सरकारचा उदार धोरणांचा फायदा मिळू लागला आहे. आणि विशेषतः पेट्रोलियम केमिकल आणि पेट्रो-केमिकल या क्षेत्रात जे काम सुरु होतं, त्याचा देखील फायदा  इथं आपल्या सर्वांना मिळत आला आहे. आणि बंधुनो, बघता-बघता जगभरातून हजारो-करोडो रुपयांची गुंतवणूक आपल्या दहेज आणि भरूच जिल्ह्यात आली. आणि 80 टक्के उत्पादन जे या ठिकाणी होतं ना, ते जगभरातल्या देशांमध्ये जातं. बंधुनो, आपण मेहनत करतो आणि आपला रुपया डॉलर घेऊन परततो. ही ताकत माझा दाहेज आणि भरूच जिल्हा देत आहे. आज देशातल्या केमिकल आणि पेट्रोलियमशी संबंधित संपूर्ण क्षेत्रासाठी दाहेज मॉडेल  बनला आहे.

बंधुनो-भगिनींनो,

आज ज्या नवीन प्रकल्पाचं लोकार्पण झालं आहे, त्याने गुजरातची शक्ती तर वाढतच आहे, त्याच बरोबर माझा भरूच जिल्हा देखील ऊर्जामय  बनत आहे. आणि या ठिकाणी जी उत्पादन केन्द्रे  विकसित झाली आहेत, बंधुनो, हे डबल इंजिन सरकार डबल फायद्यांचं उत्तम उदाहरण ठरले आहेत. केमिकलचे प्रकल्प यामध्ये गुजरात आणि केंद्रसरकारच्या कंपन्यांची देखील भागीदारी आहे. इथे उत्पादित होणारी रसायनं, उत्पादन उद्योग, याचा फायदा कपडा उद्योगाला देखील मिळणार आहे. आपल्याला माहित आहे की, कपडा उद्योगाला फायदा होतो तेव्हा कापूस उत्पादक शेतकऱ्याला देखील लाभ होतो. सर्वात जास्त मजुरी, रोजगार देणारं क्षेत्र आहे. आपल्या विणकर बंधू-भगिनींना, हातमाग चालवणाऱ्या बंधू-भगिनींना देखील मोठा फायदा होतो. तसंच खतं, आणि बंधुनो, आपल्याकडच्या खतांचं मोठं नाव झालं आहे. आणि आवश्यक रसायनं, खतं आपल्या भरूचमध्ये बनवली जातात आणि देशभरात ती उपलब्ध केली जातात. जी.ए.सी.एल इथल्या नव्या उत्पादन केंद्रामुळे 2500 कोटी पेक्षाही जास्त नवीन उलाढाल होईल. त्यामुळे 700 कोटी रुपयांचं परदेशी चलन, देशाच्या सेवेत येईल, हे देखील देशभक्तीचं काम आहे. आणि बंधुनो, ते भरूच करत आहे. आणि आता मी भरूचला आलो आहे, तर मी आपल्याला आठवण करून देतो की, मी तर रोज म्हणतो की देशाला लवकरात लवकर पुढे न्यायचं असेल तर प्रत्येक नागरीक देखील मोठं काम करू शकतो. सामान्य नागरीक देखील देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो. आपल्याला असं वाटत असेल की जो केवळ स्वतःसाठीच मेहनत करतो तो देशाला पुढे कसा घेऊन जाईल. अरे तुम्ही 'वोकल फॉर लोकल'चा मंत्र धरून ठेवा, कोणत्याही प्रकारच्या परदेशी उत्पादनापासून दूर राहीन, दिवाळी येत आहे, बाजारात असे काही फटाके येतील, जे दोन मिनिटं आकाशात जाऊन चमकतील, पण आपल्याला हे माहित नसतं की, ते किती गरिबांची मेहनत फुकट घालवतात. आपण भारतात बनलेले फटाके घेऊ, ते कदाचित कमी चमकतील, कदाचित त्याचा लखलखाट, आवाज कमी असेल, पण बंधुनो, माझ्या गरीब बंधूंच्या घरी प्रकाश येईल. दोन मिनिटं आकाशात चमकतील किंवा नाही, पण 12 महिने त्यांच्या जीवनात चमक येईल. मग आपण आपल्या देशाचं का घेऊ नये, इथला एक कारखाना 700 कोटी रुपयांची बचत करू शकेल, माझ्या भरूच जिल्ह्याच्या नागरिकांनी निर्णय घ्यावा, ते देखील इतका पैसा वाचवून माझ्या देशाची संपत्ती वाचवू शकतील.     

बंधू भगिनीनो,

आपल्याला हे समजल्यावर संतोष होईल की आपण 2014मध्ये आपण मला आशीर्वाद देऊन दिल्लीला पाठवले. आधी जे काम गुजराथेत केलं त्याचा अनुभव होता. आपला आशीर्वाद होता, आपले संस्कार होते हे तर आपल्याला माहिती आहे. आपल्याला माहितीच आहे मी जेव्हा 2014 मध्ये दिल्लीला गेलो तेव्हा संपूर्ण जगात भारत अर्थव्यवस्थेत दहाव्या स्थानावर होता. आज भारत पाचव्या स्थानावर पोचला आहे. आणि एवढंच नव्हे तर सहा वरून पाच वर जाताना आपल्या देशाचा अभिमान कित्येक पटीने वाढलेला आहे कारण पहिल्या पाच नंबरावर जे होते ते 250 वर्षांपर्यंत आमच्यावर राज्य करत होते. आपण गुलाम होतो. आता त्यांना पाठी टाकून या माझ्या देशाचे उत्साही तरुण माझ्या देशाला पुढे घेऊन गेले आहेत आणि यासाठी तरुण वर्ग, शेतकरी, मजूर, छोटा व्यापारी, छोटे साहसवीर या सर्वांचा अभिमानावर अधिकार आहे. आणि जेव्हा देश दहाव्या स्थानापासून पाचव्या स्थानावर जातो तेव्हा त्याचा अधिकार आणि हक्क आपल्या मेहनतीला सुद्धा  आहे. आणि मी आपल्या वतीने देशवासीयांमधील अशा पुरुषार्थ करणाऱ्या लोकांना प्रणाम करतो.

बंधू भगिनींनो,

भरूचमध्ये आपणास एक अभिमान वाटेल असं काम होत आहे. आपल्याला माहितीच आहे, इतिहासात कोणी प्याऊ बांधले तर लोक पिढ्यान पिढ्या लक्षात ठेवायचे. प्याऊमधून एक लोटा पाणी पिऊन गेलेले लोकसुद्धा आशीर्वाद देऊन जात कारण पाणी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे.  आज जेव्हा भारत सरकार औषधांच्या उत्पादनाचे एवढे मोठे केंद्र उभारत आहे. जीव-रक्षणाचे काम करत आहे.  त्याच वेळेला हे माझे भरूचवासी कितीतरी मोठे माणुसकीचे कार्य करत आहेत आणि किती गौरवास्पद आहे कारण यामुळे अगणित जीव वाचणार आहेत, आपल्यामुळे भावांनो. आणि त्याचमुळे हजारो नवीन रोजगार येणार आहेत. आपण बघितले की करोनाने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं होते. केवढे तरी मोठे संकट होते. सर्वांना वाटत होते की कसं वाचणार? त्यामध्येच आम्हाला कळून चुकले की फार्मा सेक्टर हे किती महत्त्वपूर्ण आहे,  औषध उद्योग किती महत्त्वाचा आहे आणि गुजरातने गेल्या दोन दशकांमध्ये जी झेप घेतली आहे. कोरोनाशी गुजरात ही लढाई लढत असताना या व्यवस्थेने सुद्धा मोठी झेप घेतली आहे. भावांनो गुजरात मध्ये तयार झालेल्या औषधाने, गुजरातमध्ये तयार झालेल्या लसीने, लाखो लोकांचे जीव वाचवले आहेत. आनंदाची गोष्ट आहे की आज देशातील औषध कंपन्यांतला 25% हिस्सा गुजरातचा आहे. आज तुमच्याशी बोलताना मला त्या दिवसाची आठवण येते जेव्हा काही लोकांनी भरुचचा विकास होऊ न देण्यासाठी सर्व शक्ती एकवटली होती. भरूच अंकलेश्वरमध्ये नवीन उद्योग किंवा उद्योगांचा विस्तार करण्यात मोठ्या मोठ्या अडचणी आणल्या गेल्या होत्या. जेव्हा केंद्रात आमचे सरकार तयार झाले, गुजरातला नरेंद्र भूपेंद्र या डबल इंजिनची शक्ती मिळाली, तेव्हा या सर्व अडचणी आम्ही संपवून टाकल्या. आपणा सर्वांच्या घामाची ताकद बघा भावांनो, आपले भाडभूतचे धरण त्याला थांबवण्यासाठी आले होते, पाणी कमी होते ना! माझ्या भरूचच्या लोकांना शुद्ध 24 तास पिण्याचे पाणी मिळाले, भरूच जिल्ह्यांमधील शेतांना सुद्धा पाणी मिळावे त्यासाठीचे काम झाले. त्यामध्ये सुद्धा या नक्षलवादी मानसिकतेच्या लोकांनी अडचणी आणल्या. या लोकांनी पहिल्यांदा सरदार सरोवर धरण होऊ नये म्हणून भरपूर प्रयत्न केले आणि आता हे अर्बन नक्षल नवीन रूपात इथे प्रवेश करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांनी रुपडे बदलले आहे. उत्साही, नवोन्मेषी युवकांना फसवत आहेत. माझ्या आदिवासी बांधवांना मला हे खास करून सांगायचे आहे की नक्षलवाद बंगालमध्ये सुरू झाला. झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेशाचा थोडा भाग, ओडिसा, आंध्रा, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील गडचिरोलीत आमच्या आदिवासी युवकांच्या जीवनाचा  नक्षलवाद्यांनी नाश केला. त्यांच्या हातात बंदूका दिल्या, मरणाशी खेळण्यासाठी त्यांना भडकवले. चारही बाजूने संकट वाढले त्यावेळी माझ्यासमोर आव्हान होते की उमरग्यापासून अंबाजीपर्यंत मी गुजरातमध्ये नक्षलवाद्यांना घुसायला देणार नाही. मला माझ्या आदिवासी बंधू भगिनींना वाचवायचे आहे मला त्यांच्या जीवनात या प्रकारच्या आजाराने प्रवेश करू नये म्हणून मी उमरगांपासून अंबाजीपर्यंत विकास केला आणि मोठ्या संतोषाने मला सांगावसे वाटते की माझे म्हणणे माझ्या आदिवासी बंधू भगिनींनी मानले, विश्वास ठेवला की चांगले दिवस येणार आहेत आणि परिणामी गुजरातमध्ये नक्षलवाद त्या मार्गाने आला नाही. त्यासाठी मी माझ्या आदिवासी बंधू भगिनींचे आभार मानतो. तोपर्यंत आता वरून उड्डाण करत अर्बन नक्षल घुसत आहेत. मला गुजरातच्या युवा पिढीचा नाश होऊ द्यायचा नाही. आपण आपल्या मुलांना सावध करा. सांगा, अर्बन नक्षलांनी आपल्या देशाला बरबाद करण्याचा विडा उचलला आहे. ते विदेशी शक्तींचे एजंट बनून आले आहेत. त्यांच्यासमोर गुजरात कधीही झुकणार नाही. गुजरात त्यांनाच धुळीला मिळवून राहील. या विश्वासाने भावांनो आपल्याला पुढे जायचे आहे. असेही दिवस होते की आमच्याकडे आदिवासी मुख्यमंत्री होऊन गेले आहेत. तरीही उमरगाव पासून अंबाजीपर्यंत विज्ञान शिक्षणाच्या शाळा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आहेत, आहेत की नाहीत? आपणच मला सांगा की दहावी आणि बारावीत सायन्स नसेल आणि किती आरक्षणाच्या गोष्टी केल्या तरी मुलं मुली डॉक्टर बनू शकतील का? इंजिनियर बनवायचं असेल तर दहावी बारावीत सायन्सच्या शाळा हव्यात. तेही झाले नाही आपल्याकडे आदिवासी मुख्यमंत्री होऊन गेले तरीही उमरगा ते अंबाजी या भागात हाताच्या बोटावर मोजा्ण्याइतक्या शाळा सुद्धा  नाहीत. मी आल्यानंतर पूर्ण विस्तार करत दहावी आणि बारावीच्या शाळा बनवल्या आणि आज माझी आदिवासी भावंडे कॅनडामध्ये विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात आहेत, डॉक्टर होत आहेत, वकील होत आहेत. आणि मी अभिमानाने सांगतो की माझी आदिवासी लेकर गुजरातचं नाव उजळून टाकत आहेत. कोणाला कल्पनाही करता येणार नाही की आदिवासींच्या नावावर यूनिवर्सिटी असेल म्हणून.  आपल्या गुजरातमध्ये बिरसा मुंडा यूनिवर्सिटी, गुरुगोविंद युनिव्हर्सिटी  ही विद्यापीठे आदिवासी तरुणांसाठी नवा आत्मविश्वास आणि संधी मिळाली आहे.

बंधू-भगिनींनो,

गुजरातमध्ये वनबंधू योजनेने आदिवासी समाजाच्या सशक्तीकरणात फार मोठी भूमिका निभावली आहे. माझ्या आदिवासी समुदायाने पशुपालन करावे, शेतकऱ्यांसारखी आधुनिक शेती करावी आणि त्यांच्या जीवनात बदल घडवून यावा. आधी कसं चालत होतं की आदिवासींच्या नावावर योजना यायच्या. मागील काळात सरकारच्या योजना अशा चालायच्या की म्हणे पाच कोंबड्यांसाठी लोन मिळेल आणि आदिवासींना वाटत असे  की  ओहो ओहो एवढ्या कोंबड्या मग त्यांची एवढी अंडी मिळतील, त्यानंतर कोंबड्या. थोड्याच दिवसात पक्के घर बांधू असे वाटत असे. पाच कोंबड्यांसाठी कर्ज घेऊन योजना घेतल्यावर कोंबडे घरोघरी येत त्याच दिवशी लाल बत्तीवाले साहेब गावी यायचे, गावातच थांबायचे आणि माझा आदिवासी बांधव आपल्या पाहुणचारात कुठे कमी होऊ नये म्हणून पाचापैकी एक कोंबडे त्यांना खाऊ घालायचा. आता या पाच यापैकी एक कोंबडी त्याला खाऊ घातली. असे दोन चारदा झाले की त्यांची अंडी राहिली बाजूला. त्यापासूनच्या कोंबड्याही बाजूला राहिल्या आणि उलट कर्जदार झाला. आम्ही आल्यावर आदिवासी बांधवांचे जीवन बदलून टाकले.

बंधू भगिनींनो,

ही विकास यात्रा म्हणजे आदिवासींचे योगदान, त्यांनी दिलेला सन्मान आहे. भगवान बिरसा मुंडाचा जन्मदिवस, ज्याला आपल्या आदिवासी देवाच्या रूपात पाहतात आम्ही त्याला आदिवासी दिन म्हणून घोषित केले. गुजरातसह संपूर्ण देशात जो आदिवासी स्वातंत्र्याच्या लढाईत लढले होते त्यांच्या आठवणींचे स्मारक बनवलं. आजही आदिवासी भागातून जे उत्पादन मिळते त्याची चिंता, माझ्या आदिवासी बांधवांची गोष्ट असो की मच्छीमार बांधवांचे दोन्ही मार्गाने विकासाचा वेग वाढवला पाहिजे. त्यांचे प्रयत्न आणि येणाऱ्या काळात भरूच अंकलेश्वर सुद्धा अहमदाबाद गांधीनगर सारखे विकसित होत आहे. लोक न्यूयॉर्क- न्यूजर्सीबद्दल बोलतात तसे भरूच अंकलेश्वरबद्दल बोलतील. हीच आपल्या सामर्थ्याची ओळख करून देणारी व्यवस्था आहे आणि मी तर तरुणांना सांगतो की येणारी 25 वर्षं आपली आहेत. इथे विकास यात्रेत सोबत आलात. खांद्याला खांदा लावून बाहेर पडलात. आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात. गुजरातच्या विकास यात्रेत नवीन वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही संकल्प घेतला आहे. म्हणून आज नर्मदा तटावर वसलेल्या माझ्या बंधू भगिनींना मी अनेका शुभेच्छा देतो आणि आपण सर्व भरूच जिल्ह्याला नव्या उंचीवर घेऊन जाऊ या विश्वासाने माझ्याबरोबर म्हणा, भारत माता की जय, भारत माता की जय.

 

 

 

G.Chippalkatti/Sonal C/Rajashree/Vijaya/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1866889) अभ्यागत कक्ष : 323