जलशक्ती मंत्रालय
भारत आणि बांगलादेश संयुक्त नदी आयोगाची मंत्रिस्तरावरील 38 वी बैठक नवी दिल्ली येथे संपन्न
कुशियारा नदीच्या पाण्याच्या अंतरिम वाटपाबाबतच्या सामंजस्य कराराच्या मसुद्याला दोन्ही बाजूंकडून अंतिम स्वरूप
Posted On:
26 AUG 2022 10:46AM by PIB Mumbai
भारत आणि बांगलादेश यांच्यात मंत्रिस्तरावरील संयुक्त नदी आयोगाची 38 वी बैठक 25 ऑगस्ट, 2022 रोजी नवी दिल्ली येथे संपन्न झाली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केले. बांगलादेशच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व बांगलादेशचे जलसंपदा मंत्री झाहीद फारूक यांनी केले. जलसंपदा विभागाचे उपमंत्री एकेएम इनामूल हक शमीम हे देखील बांगलादेशच्या शिष्टमंडळाच्या वतीने यावेळी उपस्थित होते.
या द्विपक्षीय बैठकीत सामायिक नद्यांच्या पाण्याचे वाटप, पूरासंदर्भातील माहितीचे आदान-प्रदान, नदी प्रदूषणावरील उपाय, गाळ व्यवस्थापनावर संयुक्त अभ्यास करणे, नदी किनाऱ्यावरील संरक्षक कामे यांसह परस्पर हिताच्या अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा झाली. कुशीयारा नदीच्या पाण्याच्या अंतरिम वाटपावरील सामंजस्य कराराचा मसुदा यावेळी अंतिम केला गेला. त्रिपुरातील सबरूम शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी फेनी नदीवरून पाणी घेण्याच्या ठिकाणाची रचना आणि स्थान निश्चित करण्याच्या निर्णयाचे दोन्ही बाजूंनी स्वागत केले. यासंदर्भात ऑक्टोबर 2019 मध्ये भारत-बांग्लादेश मध्ये सामंजस्य करार झाला होता.
भारत बांगलादेशला सहकार्य करत असलेल्या महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक म्हणजे वास्तविक वेळेत पूरासंदर्भातली माहिती सामायिक करणे हे होय. बांगलादेशला अनपेक्षित पूरस्थिती हाताळण्यास मदत करण्यासाठी भारताने अलीकडेच पूरासंदर्भातली माहिती सामायिक करण्याचा कालावधी 15 ऑक्टोबरच्या पुढेही वाढवला आहे.
माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी आणखी 8 नद्यांचा समावेश करून सहकार्याचे हे क्षेत्र विस्तृत करण्यावर बैठकीदरम्यान सहमती झाली. या विषयासंदर्भात जेआरसीच्या तांत्रिक स्तरावर अधिक चर्चा केली जाईल.
भारत आणि बांग्लादेश यांच्यात संयुक्त नदी आयोगाची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली आहे. उभय देशांच्या सामाईक/सीमेवरील/सीमेपलीकडील नद्यांच्या परस्पर हितसंबंधित समस्या सोडवण्यासाठी द्विपक्षीय यंत्रणा म्हणून या आयोगाची स्थापन करण्यात आली आहे.
***
SonaT/SampadaP/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1854607)
Visitor Counter : 410