पंतप्रधान कार्यालय

बालयोगी सभागृहात उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या निरोप समारंभाला पंतप्रधान उपस्थित


"व्यंकय्याजी यांचा नेहमी सक्रिय आणि व्यस्त राहण्याचा स्वभाव त्यांना पुढील काळात सार्वजनिक जीवनाशी जोडून ठेवेल"

"सर्व खासदारांकडून त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा आपण नेहमीच प्रयत्न केला पाहिजे"

"भाषिणी सारखे उपक्रम आणि संसदीय चर्चेतून उदयाला येणाऱ्या नवीन शब्दांचे वार्षिक संकलन व्यंकय्याजी यांचा मातृभाषेप्रति प्रेमाचा वारसा पुढे नेतील"

Posted On: 08 AUG 2022 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली येथील जीएमसी बालयोगी सभागृहात उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या निरोप समारंभाला उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना, पंतप्रधानांनी व्यंकय्या नायडू यांच्या नेहमी सक्रिय आणि व्यस्त राहण्याच्या स्वभावाकडे लक्ष वेधले, हा स्वभाव त्यांना नेहमीच सार्वजनिक जीवनातील घडामोडींशी जोडून ठेवेल.मोदी यांनी व्यंकय्या नायडूंसोबतच्या त्यांच्या दीर्घ सहवासाच्या आठवणी सांगितल्या. वाजपेयी सरकारमध्ये मंत्री म्हणून नायडू यांची निवड करताना  ग्रामीण विकासाच्या खात्यासाठी त्यांना दिलेले प्राधान्य याबाबत आठवण सांगितली. या खात्याचा कारभार सांभाळताना त्यांनी  अलौकिक कर्तृत्व दाखवले.  नायडू यांनी ग्रामीण विकास आणि शहरी विकास ही दोन्ही खाती सांभाळली याकडे   पंतप्रधानांनी लक्ष वेधले.  राज्यसभेचे सभापती  आणि उपराष्ट्रपती पद भूषविणारे ते राज्यसभेचे  पहिले सदस्य असल्याच्या  दुर्मिळ योगायोगाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. हा अनुभव तसेच संसदीय कामकाज मंत्री म्हणून असलेल्या  अनुभवाची त्यांना सभागृह शिस्तबद्धतेने आणि   सहजतेने चालवण्यास मदत झाली, असे पंतप्रधान म्हणाले.

सभागृह , सदस्य आणि समित्यांच्या क्षमतांना सक्षम करण्याच्या  आणि त्या वाढवण्यासाठी केलेल्या  प्रयत्नांबद्दलही पंतप्रधानांनी नायडू यांची प्रशंसा केली. सभापती या नात्याने त्यांच्या सर्व संसद सदस्यांकडून  ज्या  अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा आपण खऱ्या अर्थाने  प्रयत्न करणे  हे महत्वाचे आहे असे पंतप्रधान म्हणाले.

प्रदीर्घ अशा सार्वजनिक जीवनात त्यांचा ज्या ज्या लोकांशी संपर्क आला त्या लोकांशी कोरोनाच्या निर्बंधाच्या काळात दूरध्वनीवर संपर्क साधून कठीण काळात त्यांना धीर देण्याचे  आणि  प्रोत्साहन देण्याचे काम उपराष्ट्रपतींनी  ‘टेलि-यात्रा’ या माध्यमातून कशाप्रकारे केले   याचे स्मरण करत पंतप्रधानांनी  नायडू यांच्या वेळेच्या  व्यवस्थापनाच्या शिस्तीचे कौतुक केले. त्याचप्रमाणे ते महामारीच्या काळात सर्व खासदारांच्या संपर्कात राहिले. बिहारच्या दौऱ्या  दरम्यान नायडूंचे हेलिकॉप्टर जबरदस्तीने उतरवावे लागले आणि एका शेतकऱ्याने त्यांना मदत केली या घटनेचीही  पंतप्रधानांनी आठवण करून दिली. नायडू यांनी आजपर्यंत त्या शेतकऱ्याशी  आणि त्यांच्या कुटुंबाशी संपर्क ठेवला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आगामी काळातही ते याच  समर्पण भावनेने आणि त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या माध्यमातून  जनतेला सार्वजनिक जीवनात मार्गदर्शन करत राहतील, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

मातृभाषेबद्दल नायडू यांना असलेला आदर अधोरेखित करत,  कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांसाठी सेवा आणि उत्पादने विकसित करण्यासाठी भाषिणी  - या भाषांसाठी असलेल्या राष्ट्रीय सार्वजनिक डिजिटल मंचाचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला.   दोन्ही सभागृहातील सदस्यांनी याकडे लक्ष द्यावे. देशाच्या भाषांना समृद्ध करण्यासाठी मातृभाषेतील चर्चेच्या माध्यमातून  उदयाला  आलेले नवे  चांगले  शब्द एकत्रित करून ते  शब्द संग्रहात जोडण्याचे काम करावे असे त्यांनी सभापती  आणि उपसभापतींना सांगितले. चांगल्या शब्दांचा संग्रह प्रकाशित करण्याची वार्षिक परंपरा सुरू करून आपण  व्यंकय्याजी यांचा मातृभाषेवरील प्रेमाचा वारसा पुढे नेऊ, असे ते म्हणाले.

 

* * *

S.Kakade/S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1850090) Visitor Counter : 141