पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी राज्यसभेत उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांना निरोप दिला


“या वर्षी जेव्हा आपण 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करू तेव्हा देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सभापती आणि पंतप्रधान हे स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले आहेत आणि यातील प्रत्येकजण अतिशय सामान्य कुटुंबातून आलेला आहे”

"उपराष्ट्रपती म्हणून तुम्ही युवा कल्याणासाठी चांगला वेळ दिलात"

"तुमचा प्रत्येक शब्द ऐकला जातो, पसंत केला जातो आणि त्याचा आदर केला जातो ... आणि कधीही त्याला विरोध केला नाही"

"एम. वेंकैय्या नायडू जी यांचे वन लाइनर चतुराईने वापरलेले असतात"

"आपल्याला देशाबद्दल काही वाटत असेल, आपले विचार मांडण्याची कला अवगत असेल, भाषिक विविधतेवर विश्वास असेल तर भाषा आणि प्रांत कधीच आपल्यासाठी अडसर ठरत नाहीत आणि हे तुम्ही सिद्ध करून दाखवले आहे."

"वेंकैय्याजींबद्दलची एक प्रशंसनीय गोष्ट म्हणजे भारतीय भाषांप्रती त्यांची आवड"

"तुम्ही अनेक निर्णय घेतले आहेत जे वरिष्ठ सभागृहाच्या उज्वल वाटचालीत नेहमीच लक्षात राहतील"

"मला तुमच्या गुणवत्तेत लोकशाहीची परिपक्वता दिसते"

Posted On: 08 AUG 2022 3:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांच्यासाठी निरोपाचे भाषण दिले. वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या उपराष्ट्रपतींप्रती पंतप्रधानांनी आदर व्यक्त केला.

पंतप्रधानांनी नायडू यांच्या बुद्धी आणि चातुर्याच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. नवभारतात नेतृत्वात बदल झाल्याचे नमूद करत पंतप्रधान म्हणाले, “या वर्षी जेव्हा आपण 15 ऑगस्ट साजरा करू, तेव्हा या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सभापती आणि पंतप्रधान हे स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले आहेत. आणि त्यातील  प्रत्येकजण अतिशय सामान्य कुटुंबातून आलेला आहे.” याला मोठे प्रतीकात्मक मूल्य आहे आणि ही एका नव्या युगाची झलक आहे, असेही ते म्हणाले.

सार्वजनिक जीवनात बजावलेल्या सर्व भूमिकांमध्ये उपराष्ट्रपतींनी देशातील युवकांना सातत्याने प्रोत्साहन दिल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली. त्यांनी सभागृहातही युवा सदस्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले. “उपराष्ट्रपती म्हणून तुम्ही युवकांच्या कल्याणासाठी बराच वेळ दिलात. तुमचे अनेक कार्यक्रम युवा शक्तीवर केंद्रित होते,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले. उपराष्ट्रपतींनी सभागृहाबाहेर केलेली  25 टक्के भाषणं  युवकांसमोर केली होती असे पंतप्रधानांनी नमूद केले .

विविध पदे भूषविलेल्या एम. वेंकैय्या नायडू यांच्याशी असलेले निकटचे संबंध पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून उपराष्ट्रपतींची वैचारिक बांधिलकी, आमदार म्हणून काम, खासदार म्हणून दिलेले योगदान , भाजपचे अध्यक्ष म्हणून संघटन कौशल्य, मंत्री पद भूषवताना केलेली मेहनत आणि मुत्सद्दीपणा आणि उपराष्ट्रपती आणि सभापती म्हणून त्यांचे समर्पण आणि सन्मान यांचे त्यांनी कौतुक केले.  “मी एम. वेंकैय्या नायडूजींसोबत गेल्या अनेक वर्षांपासून काम केले आहे. मी त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारतानाही पाहिले आहे आणि त्यांनी ती प्रत्येक जबाबदारी समर्पित वृत्तीने पार पाडली आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की सार्वजनिक जीवनातील लोकांना एम. वेंकैय्या नायडू यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.

पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतींच्या बुद्धीचे आणि शब्द वापरण्याचे चातुर्य अधोरेखित केले. ते म्हणाले “तुमचा प्रत्येक शब्द ऐकला जातो, पसंत केला जातो आणि त्याचा आदर केला जातो. आणि कधीही विरोध  केला जात नाही”. पंतप्रधान पुढे म्हणाले “एम. वेंकैय्या नायडूजी यांचे वन लाइनर्स प्रसिद्ध आहेत. ते खुमासदार असतात. भाषांवरील नेहमीच त्यांचे उत्तम प्रभुत्व हिले आहे”. पंतप्रधान म्हणाले की, सभागृहात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी, उपराष्ट्रपतींच्या प्रचंड अभिव्यक्ती कौशल्याने मोठा प्रभाव पाडला आहे. “एम. वेंकैय्या नायडूजी जे सांगतात त्यामध्ये उत्कटता आणि महत्वपूर्ण बाबी दोन्ही असतात. ते अतुलनीय तितकेच थेट असते.  तुम्ही जे बोलता त्यामध्ये बुद्धी आणि खुमासदारपणा, जवळीक असते आणि ज्ञान आणि अनुभवाने परिपूर्ण असते, असे ते म्हणाले.

नायडू यांनी  निवडलेल्या विचारसरणीला जिथे तात्काळ समर्थनाची  शक्यता नव्हती त्या दक्षिण भारतातील एम. वेंकैय्या नायडू यांच्या  राजकीय कारकिर्दीच्या विनयशील सुरुवातीचा संदर्भ देत, पंतप्रधान म्हणाले की, राजकीय कार्यकर्ता ते त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षापर्यंतचा उपराष्ट्रपतींचा प्रवास हा त्यांची  विचारधारेवरील निष्ठा  आणि समर्पण भावनेच्या  दुर्दम्य दृढतेचे प्रतिबिंब आहे. "आपल्याला देशाप्रती भावना असेल, आपले विचार मांडण्याची कला असेल, भाषिक विविधतेवर विश्वास असेल तर भाषा आणि प्रांत हे कधीच आपल्यासाठी अडथळे ठरत नाहीत आणि तुम्ही हे सिद्ध केले आहे," असे पंतप्रधान म्हणाले. उपराष्ट्रपतींच्या मातृभाषेवरील प्रेमाचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. वेंकैय्याजींबद्दलची एक प्रशंसनीय गोष्ट म्हणजे त्यांना असलेली भारतीय भाषांची आवड, सभागृहाचे अध्यक्षपद त्यांनी ज्याप्रकारे सांभाळले यावरून हे दिसून आले आहे. त्यांनी राज्यसभेच्या कामकाजाची उत्पादकता वाढवण्यात योगदान दिले, असे पंतप्रधान म्हणाले.

उपराष्ट्रपतींनी यंत्रणा स्थापित केल्या,  त्यांच्या नेतृत्वाने सभागृहाच्या कामकाजाला नवी उंची प्राप्त करून दिली, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. सभागृहातील उपराष्ट्रपतींच्या नेतृत्वाच्या काळात, सभागृहाच्या कामकाजात 70 टक्क्यांची वाढ झाली, सदस्यांची उपस्थिती वाढली आणि विक्रमी 177 विधेयके मंजूर झाली किंवा त्यावर चर्चा झाली. “तुम्ही असे अनेक निर्णय घेतले आहेत जे वरिष्ठ सभागृहाच्या आगामी वाटचालीत स्मरणात राहतील”, असे पंतप्रधान म्हणाले.

सभागृहातील उपराष्ट्रपतींच्या  व्यवहारकुशल, विवेकशील, निग्रही वर्तनाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. आणि एका मर्यादेपलीकडे जाऊन सभागृहाच्या कामकाजात  व्यत्यय आणणे हा सभागृहाचा अवमान होतो यावर दृढ विश्वास ठेवल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. "मला तुमच्या मानदंडांमध्ये लोकशाहीची परिपक्वता दिसते", असे पंतप्रधान म्हणाले. कठीण प्रसंगातही संपर्क, संवाद आणि समन्वयाच्या  सहाय्याने त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरु ठेवले असे सांगत पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतींची प्रशंसा केली. ‘सरकारला प्रस्ताव देऊ द्या, विरोधकांना विरोध करू द्या आणि सभागृहात तो निकाली काढू द्या’. या एम. वेंकैय्या नायडू यांनी अवलंबलेल्या  दृष्टिकोनाचे त्यांनी  कौतुक केले. या सभागृहाला  दुसऱ्या सभागृहाकडून आलेली विधेयके  स्वीकारण्याचा, नाकारण्याचा किंवा त्यामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार आहे, मात्र  दुसऱ्या  सभागृहाकडून आलेली विधेयके रोखण्याचा  त्यात व्यत्यय आणण्याचा  विचार आपल्या लोकशाहीत नाही, असे ते म्हणाले.

सभागृह आणि देशासाठी दिलेल्या मार्गदर्शन आणि योगदानाबद्दल पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतींचे आभार मानले.

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Thakur/S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1849801) Visitor Counter : 177