पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी साबरकांठा येथील साबर डेअरी परिसरात 1000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि भूमिपूजन
या प्रकल्पांमुळे या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक शेतकरी आणि दूध उत्पादक यांच्या उत्पन्नात वाढ होणार
“शेतकरी उत्पादन संघटनांच्या माध्यमातून छोटे शेतकरी अन्नप्रक्रिया उद्योग, मूल्य संलग्न निर्यात आणि पुरवठा साखळीशी जोडले जात आहेत
“शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत निर्माण करण्याचे धोरण फलदायी ठरत आहे”
Posted On:
28 JUL 2022 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील साबरकांठा येथील गधोडाचौकी परिसरातल्या साबर डेरी येथे 1000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. हे प्रकल्प स्थानिक शेतकरी आणि दूध उत्पादक यांना अधिक सक्षम करतील आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी मदत करतील. या प्रकल्पांच्या कामामुळे या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळणार आहे. या प्रसंगी पंतप्रधानांनी सुकन्या समृद्धी योजनेच्या लाभार्थी तसेच या भागातील सर्वाधिक प्रमाणात दूध उत्पादन करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा सन्मान देखील केला. इतर मान्यवरांसह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमातील उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, “आज साबर डेरीचा विस्तार झाला आहे.शेकडो कोटी रुपयांचे नवे प्रकल्प या भागात उभारण्यात येत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज दूध भुकटीचे संयंत्र आणि जंतूविरहित पॅकिंग विभागासाठी आणखी एक लाईन यांची भर पडल्यामुळे साबर डेरीची क्षमता आणखी वाढणार आहे.” पंतप्रधानांनी यावेळी साबर डेरीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या भुराभाई पटेल यांचे देखील स्मरण केले. या प्रदेशाशी आणि स्थानिक लोकांशी दीर्घ काळापासून असलेल्या संबंधांचा देखील पंतप्रधानांनी उल्लेख केला.
या भागात दोन दशकापूर्वी पडलेला दुष्काळ आणि टंचाईच्या परिस्थितीचे स्मरण करत तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून काम करताना आपण कशा प्रकारे जनतेचे सहकार्य मिळविले आणि या भागातील परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला याची देखील आठवण त्यांनी काढली. पशु पालन आणि डेअरी उद्योग हे त्या प्रयत्नांतील महत्त्वाचे घटक होते असे ते म्हणाले. जनावरांसाठी पशुखाद्य, औषधे पुरवून आणि गुरांसाठी आयुर्वेदिक उपचारपद्धतीचा स्वीकार करण्याला प्रोत्साहन देऊन या भागात पशुपालनाला चालना देण्यासाठी उचललेल्या पावलांबद्दल देखील त्यांनी माहिती दिली. गुजरात ज्योतिग्राम योजना या भागातील विकासाची उप्रेरक ठरली याचा त्यांनी उल्लेख केला.
गेल्या दोन दशकांमध्ये करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे गुजरात राज्यातील दुग्धव्यवसायाची उलाढाल 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे ही बाब पंतप्रधानांनी अभिमानाने नमूद केली. यापूर्वी 2007 आणि 2011 या वर्षीच्या गुजरात भेटींची आणि दुग्धव्यवसायात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी केलेल्या आवाहनाची मोदी यांनी आठवण काढली. आता बहुतांश समित्यांमध्ये महिलांचे चांगलेच प्रतिनिधित्व आहे आणि बहुतेक व्यवहारांमध्ये दुधाचे पैसे महिलांनाच देण्यात येतात असे ते म्हणाले.
अशा प्रकारचे प्रयोग इतर भागांमध्ये देखील राबविण्यात येत आहेत असे पंतप्रधानांनी सांगितले. देशात आज, 10,000 एफपीओ म्हणजे शेतकरी उत्पादक संघटनांच्या स्थापनेचे काम जोरात सुरु आहे. या संघटनांच्या माध्यमातून छोटे शेतकरी अन्न प्रक्रिया उद्योग, मूल्य संलग्न निर्यात आणि पुरवठा साखळीशी जोडले जातील. गुजरातमधील शेतकऱ्यांना देखील याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे असे पंतप्रधान म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत निर्माण करण्याचे धोरण फलदायी ठरत आहे असे त्यांनी सांगितले. फलोत्पादन, मस्यव्यवसाय तसेच मध उत्पादन या उद्योगांतून शेतकऱ्यांना उत्तम कमाई होत आहे. खादी आणि ग्रामोद्योगाची उलाढाल पहिल्यांदाच एक लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचली आहे. या क्षेत्रात ग्रामीण भागात दीड कोटींहून अधिक नवे रोजगार निर्माण झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविणे यासारख्या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांसाठी नव्या संधी निर्माण होत आहेत. वर्ष 2014 पर्यंत देशात 400 दशलक्ष लीटर पेक्षाही कमी इथेनॉल मिश्रित केले गेले. आज हे प्रमाण 400 कोटी लीटरच्या जवळपास पोहोचले आहे. आमच्या सरकारने गेल्या 2 वर्षात विशेष मोहीम राबवून 3 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डांचे वितरण केले आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
नीम लेपित युरिया, बंद झालेल्या खतनिर्मिती प्रकल्पांचे पुनरुज्जीवन, सूक्ष्म खतांना प्रोत्साहन आणि जागतिक बाजारपेठेत किमती वाढल्या असल्या तरी देशातील शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात युरिया उपलब्ध करून देणे या आणि अशा अनेक उपाययोजनांमुळे गुजरातमधील शेतकऱ्यांसह देशातल्या शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. सुजलाम सुफलाम योजनेमुळे साबरकांठा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाणी उपलब्ध झाले आहे. याशिवाय जिल्ह्यात आणि जवळपासच्या भागामध्ये कनेक्टीव्हिटी लक्षणीयरीत्या वाढली आहे. रेल्वे आणि महामार्ग प्रकल्पांमुळे या भागातील दळणवळणाची सुविधा सुधारली. याचा फायदा पर्यटनवाढीला आणि रोजगारनिर्मितीला होत आहे, असे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे स्मरण करतानाच पंतप्रधानांनी स्थानिक आदिवासी नेत्यांच्या बलिदानाचे स्मरण केले. सरकारने भगवान बिरसा मुंडा जी यांची जयंती 15 नोव्हेंबर रोजी आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषित केली आहे, असे त्यांनी सांगितले. देशभरातील आदिवासी जमातीमधील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ सरकार एक विशेष संग्रहालय देखील उभारत आहे." आदिवासी जमातीमधील देशाची एक कन्या देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर प्रथमच विराजमान झाली आहे. श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांना देशाने राष्ट्रपती केले आहे. 130 कोटी भारतीयांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे, असे गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला.
सर्वांनी हर घर तिरंगा मोहिमेत उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी देशवासियांना केले.
प्रकल्पाविषयी अधिक माहिती:
पंतप्रधानांनी साबर डेयरी इथल्या पावडर प्लांटचे उद्घाटन केले. या प्लांटची क्षमता 120 (MTPD) मेट्रिक टन प्रतिदिन इतकी आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा एकूण खर्च 300 कोटी रुपयांहून अधिक आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करताना जागतिक दर्जाच्या अन्न सुरक्षा निकषांचे पालन केले आहे. हे अत्यंत ऊर्जा कार्यक्षम असून जवळजवळ याद्वारे शून्य उत्सर्जन अपेक्षित आहे. कारखाना अत्याधुनिक असून पूर्णपणे स्वयंचलित आणि बल्क पॅकिंग लाइनने सुसज्ज आहे.
पंतप्रधानांनी साबर डेअरी येथे अॅसेप्टिक मिल्क पॅकेजिंग प्लांटचे उद्घाटनही केले. हा एक अत्यंत अद्वितीय असा प्रकल्प असून याची क्षमता 3 लाख लीटर प्रतिदिन इतकी आहे. 125 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हा कारखाना उभारण्यात आला आहे, या प्लांटमध्ये अत्याधुनिक ऑटोमेशन सिस्टीम असून उच्च ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान वापरले आहे. या प्रकल्पामुळे दूध उत्पादकांना चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होईल.
पंतप्रधानांनी साबर चीज आणि व्हे ड्रायिंग प्लांट प्रकल्पाची पायाभरणीही केली. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 600 कोटी रुपये आहे. या प्रकल्पा अंतर्गत दररोज 20 मेट्रिक टन चेडर चीज, 10 मेट्रिक टन मोझारेला चीज आणि 16 मेट्रिक टन प्रक्रिया केलेले चीज इतके उत्पादन होणार आहे. चीझ उत्पादना दरम्यान तयार होणारा मठ्ठा देखील प्रतिदिन 40 मेट्रिक टन क्षमतेच्या व्हे ड्रायिंग प्लांटमध्ये वाळवला जाईल.
साबर डेअरी ही गुजरात सहकारी दुध विपणन महासंघाचा भाग आहे. अमूल ब्रांड अंतर्गत ही डेअरी दुध आणि दुग्ध जन्य उत्पादने तयार करते.
* * *
N.Chitale/Sanjna/Bhakti/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1845857)
Visitor Counter : 241
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam