पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंडच्या देवघर इथे 16,800 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन
या प्रकल्पांमुळे या प्रदेशातील पायाभूत विकासाला गती मिळेल, दळणवळणाच्या सुविधा वाढतील, आणि प्रदेशातील लोकांचे जीवनमान सुधारेल
पंतप्रधानांच्या हस्ते देवघर विमानतळाचेही उद्घाटन; यामुळे बाबा बैद्यनाथ धामपर्यंत थेट हवाई सुविधा
देवघरच्या एम्समध्ये उभारण्यात आलेल्या आंतररुग्ण विभाग आणि शस्त्रक्रिया विभागाचेही पंतप्रधानांनी केले लोकार्पण
“राज्यांच्या विकास करुन, देशाचा विकास या तत्वावर सरकार काम करत आहे”
“जेव्हा एका सर्वसमावेशक दृष्टिकोनातून प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाते, त्यावेळी समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांसाठी उत्पन्नाचे नवनवे मार्ग खुले होतात.”
“आम्ही अभावांना संधीत रूपांतरित करण्यासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेत आहोत”
“जेव्हा सर्वसामान्य लोकांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी पावले उचलली जातात, राष्ट्रीय संपत्तीची निर्मिती केली जाते तेव्हा राष्ट्रीय विकासासाठीच्या नव्या संधी विकसित होतात”
Posted On:
12 JUL 2022 5:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झारखंडच्या देवघर इथे, 16,800 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. झारखंडचे राज्यपाल, रमेश बैस, मुख्यमंत्री हेमंत सोरेन, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, राज्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
बाबा बैद्यनाथ यांच्या कृपेने, आज 16,000 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी आज इथे करण्यात आली, असे पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले. या सर्व प्रकल्पांमुळे झारखंडमध्ये दळणवळणाच्या आधुनिक सोयीसुविधा, ऊर्जा, आरोग्य, श्रद्धास्थाने आणि पर्यटन विकासाला चालना मिळेल असे पंतप्रधान म्हणाले.
गेल्या आठ वर्षांपासून, राज्यांचा विकास करून त्यातून राष्ट्राचा विकास करण्याच्या तत्वावर देश काम करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या 8 वर्षात झारखंडला महामार्ग, रेल्वे, हवाई मार्ग, जलमार्ग या सर्व मार्गांनी जोडण्याच्या प्रयत्नामागेही, हाच विचार आणि तत्व प्राधान्याने आहे. या सर्व सुविधांचा राज्याच्या आर्थिक विकासावर सकारात्मक परिणाम होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
आज झारखंडला दुसरे विमानतळ मिळाले आहे. यामुळे बाबा बैद्यनाथ यांच्या भक्तांची मोठी सोय होणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ‘उडान’ योजनेअंतर्गत, सर्वसामान्यांना परवडणारा विमान प्रवास देण्याच्या सरकारच्या उद्दिष्टासंदर्भात बोलतांना आज सरकारच्या या प्रयत्नांचे फायदे देशभरात दिसून येत आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. ‘उडान’ योजनेअंतर्गत, गेल्या पाच-सहा वर्षांत सुमारे 70 जागांना विमानतळे, हेलिपोर्ट्स आणि वॉटर एरोड्रोम्सने जोडण्यात आले आहे. आज सर्वसामान्य भारतीयांना देखील 400 पेक्षा अधिक नव्या हवाई मार्गांवरुन विमान प्रवास करण्याची सुविधा मिळली आहे. एक कोटींपेक्षा जास्त लोकांनी अतिशय स्वस्त दरात विमान प्रवासाचा लाभ घेतला आहे, त्यातील अनेकांनी पहिल्यांदाच हा अनुभव घेतला आहे, असे पंतप्रधान म्हणाले, देवघर ते कोलकाता या मार्गावर आजपासून विमान सुरू झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच, रांची, दिल्ली आणि पाटणासाठीही लवकरच विमानसेवा सुरू होतील, अशी माहिती दिली. बोकारो आणि दुमका इथेही विमानतळे बांधण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दळणवळणाच्या सुविधा वाढवण्यासोबतच, केंद्र सरकार, देशातील श्रद्धा आणि अध्यात्माशी संबंधित महत्त्वाच्या तीर्थक्षेत्री सुविधा निर्माण करण्यावरही भर देत आहे. ‘प्रसाद’ योजने अंतर्गत बाबा बैद्यनाथ धाममध्ये आधुनिक सुविधांचा विस्तार करण्यात आला आहे. जेव्हा सर्वांगीण दृष्टीकोन ठेवून प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाते, तेव्हा त्यातून, समाजातील विविध घटकांसाठी उत्पन्नाचे नवनवीन मार्ग निर्माण होतात तसेच नव्या सुविधा नवीन संधी निर्माण करतात, असे पंतप्रधान म्हणाले.
झारखंड सारख्या राज्यासाठी गॅस-आधारित अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याचे लाभही पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले. पंतप्रधान ऊर्जा गंगा योजनेमुळे जुने चित्र बदलत आहेम असे ते म्हणाले. अभावांचे संधीत रूपांतर करण्यासाठी सरकार अनेक ऐतिहासिक निर्णय घेत आहे असे त्यांनी सांगितले. GAIL च्या जगदीशपूर-हल्दिया-बोकारो-धामरा पाइपलाइनच्या झारखंडमधील बोकारो-अंगुल विभागामार्फत ओदिशाच्या अकरा जिल्ह्यांमध्ये शहर गॅस वितरण नेटवर्कचा विस्तार होईल, असेही त्यांनी सांगितले.
सर्वांची सोबत, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न या गुरुमंत्रानुसार आपण वाटचाल करत आहोत असे पंतप्रधानांनी सांगितले. पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक करून विकासाचे नवे मार्ग आणि रोजगार-स्वयं रोजगाराच्या नवनव्या संधींचा शोध घेतला जात आहे. या सर्व उपक्रमांचे झारखंड राज्याला होणारे फायदे अधोरेखित करत ते म्हणाले की, आपण विकासासाठीच्या आकांक्षेवर भर दिला असून आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून एवढ्या मोठ्या कालावधीनंतर राज्यातील 18,000 गावांपैकी ज्या गावांचे विद्युतीकरण झाले त्यापैकी बहुतांश दुर्गम आणि अतिदूर वसलेली आहेत. गेल्या 8 वर्षांत सरकारने गावांना नळाने पाणीपुरवठा, रस्त्यांची तसेच गॅस जोडणीची सुविधा पुरविण्यासाठी मोहीम तत्वावर कामे केली आहेत असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
मोठ्या शहरांच्या पलीकडे आधुनिक सुविधांचा प्रसार करण्यासंदर्भात पंतप्रधान म्हणाले की, हे प्रकल्प म्हणजे, सामान्य नागरिकांचे जगणे अधिक सुलभ करण्यासाठी जेव्हा पावले उचलली जातात तेव्हा राष्ट्रीय मालमत्तेची उभारणी होते आणि राष्ट्रीय विकासासाठीच्या नव्या संधी उदयाला येतात याचाच प्रत्यक्ष पुरावा आहेत. “हा अत्यंत योग्य पद्धतीचा विकास आहे आणि आपल्याला एकत्र येऊन या विकासाचा वेग अधिक वाढविला पाहिजे,” ते म्हणाले.
देवघर येथील विकास प्रकल्प
देशभरातील भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थळ असलेल्या बाबा वैद्यनाथ धाम येथे थेट पोहोचण्याची सुविधा निर्माण करण्यासाठीचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत पंतप्रधान मोदी यांनी देवघर विमानतळाचे उद्घाटन केले. या विमानतळाच्या उभारणीसाठी अंदाजे 400 कोटी रुपये खर्च आला आहे. या विमानतळाच्या इमारतीमध्ये वर्षाला 5 लाख प्रवाशांची योग्य पद्धतीने हाताळणी करण्याची व्यवस्था आहे.
देवघर एम्स अर्थात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था म्हणजे या संपूर्ण भागातील आरोग्य सेवा क्षेत्राला मिळालेले वरदानच आहे. पंतप्रधान मोदी यांनी देवघर येथील एम्स संस्थेत सुरु होणारा नवा आंतर-रुग्ण विभाग तसेच शस्त्रक्रिया-गृह सुविधा यांचे लोकार्पण केल्यानंतर या संस्थेत रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्यविषयक सुविधांमध्ये अधिकच सुधारणा होणार आहे. देशाच्या सर्व भागांमध्ये उत्कृष्ट आरोग्य सुविधा विकसित करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसारच ही कामे होत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी 25 मार्च 2018 रोजी देवघर येथील एम्स संस्थेच्या उभारणीची पायाभरणी केली होती.
“देवघर येथील वैद्यनाथ धाम विकास” प्रकल्पातील विविध कामे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या “प्रसाद” योजनेअंतर्गत मंजूर झाल्यामुळे, देशभरातील धार्मिक दृष्टीने महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांवर जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करणे आणि अशा स्थळांवर पर्यटकांसाठी असलेल्या सोयींमध्ये सुधारणा करणे यासाठीच्या पंतप्रधानांच्या कटिबद्धतेला अधिक मजबुती लाभेल. पंतप्रधानांच्या हस्ते प्रत्येकी 2000 यात्रेकरूंच्या व्यवस्थेची क्षमता असलेले दोन मोठी यात्रेकरू मेळाव्यासाठीची सभागृहे, जलसर तलावाच्या समोरील बाजूचा विकास, शिवगंगा तळ्याचा विकास यांच्यासह अनेक विकासकामांचे यावेळी उद्घाटन होणार आहे. या विकासकामांमुळे निर्माण झालेल्या नव्या सोयींमुळे, बाबा वैद्यनाथ धाम क्षेत्राला भेट देणाऱ्या लाखो भाविकांना समृध्द पर्यटनाचा अनुभव घेता येईल.
पंतप्रधानांनी या भेटीदरम्यान 10,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध रस्ते प्रकल्पांची कोनशीला रचली. या प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र.-2 वरील गोरहार ते बरवाडा या टप्प्याचे सहा पदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्र.-32 वरील राजगंज- छास ते पश्चिम बंगालच्या सीमा भागापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण अशा अनेक कामांचा समावेश आहे. यावेळी पायाभरणी करण्यात आलेले प्रमुख प्रकल्प म्हणजे, राष्ट्रीय महामार्ग क्र.-80 वरील मिर्झाचौकी ते फराक्का या टप्प्याचे चौपदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्र. - 98 वरील हरिहरगंज ते पारवा मोर या टप्प्याचे चौपदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्र.-23 वरील पालमा ते गुमला या टप्प्याचे चौपदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्र.-75 वरील कुटचेरी चौक ते पिस्का मोर विभागात उन्नत कॉरीडॉर निर्मिती यांसह इतर अनेक प्रकल्प. या प्रकल्पांच्या कामामुळे या भागातील जोडणी सुविधेला अधिक चालना मिळेल तसेच सर्वसामान्य लोकांना येण्याजाण्यासाठी अधिक सोय होण्याची सुनिश्चिती होईल.
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विभागासाठीच्या सुमारे 3000 कोटी रुपये खर्चाच्या विविध उर्जानिर्मिती प्रकल्पांची कोनशीला रचली आणि उद्घाटन देखील केले. उद्घाटन करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये गेल कंपनीच्या जगदीशपूर-हल्दिया-बोकारो-धर्मा या वाहिनीतील बोकारो-अंगुल विभाग, हजारीबाग मधील बारही येथे एचपीसीएलचा नवा एलपीजी बॉटलिंग प्रकल्प आणि बीपीसीएलचा बोकारो एलपीजी बॉटलिंग प्रकल्प यांचा समावेश आहे.पर्वतपूर वायू संकलन केंद्र, झारिया ब्लॉक, तसेच ओएनजीसीच्या कोल बेड मिथेन अॅसेट या प्रकल्पांची देखील कोनशीला पंतप्रधानांच्या हस्ते रचण्यात आली.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, गोड्डा-हंसदिहा विद्युतीकरण विभाग आणि गरवाहा-महुरीया डबलिंग प्रकल्प या दोन रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण केले. या प्रकल्पांमुळे उद्योग आणि उर्जा निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांसाठी वस्तूंची वाहतूक सुरळीतपणे होण्यास मदत मिळेल. तसेच या प्रकल्पांमुळे दुमका ते असनसोल या दरम्यान रेल्वेगाड्यांच्या सुलभ प्रवासाची सुनिश्चिती होईल. पंतप्रधानांनी यावेळी रांची रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास, जासीदिह बायपास लाईन आणि गोड्डा येथे एलबीएच रेल्वे डब्यांची देखभाल करण्यासाठीचा डेपो या तीन रेल्वे प्रकल्पांची कोनशीला रचली. प्रस्तावित पुनर्विकासित रांची रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांच्या आवागमनातील सुलभता सुनिश्चित करण्यासाठी तसेच अधिक आरामदायी प्रवाससुविधेसाठी फूड कोर्ट, विशेष कक्ष, कॅफेटेरिया, वातानुकुलीत प्रतीक्षागृहे यांसारख्या जागतिक दर्जाच्या सुविधांची रेलचेल असणार आहे.
SRT/ST/ Radhika/Sanjana/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1840950)
Visitor Counter : 280
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam