पंतप्रधान कार्यालय

वाराणसीतील 1800 कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक विकास उपक्रमांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन आणि पायाभरणी


“काशीमध्ये आज वारसा आणि विकासाचे एकत्रित चित्र”

''माझी काशी 'साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास' चे उत्तम उदाहरण आहे"

''तात्पुरता लाभ देणारे सोपे मार्ग देशाचे भले करू शकत नाही, हा संदेश काशीच्या नागरिकांनी संपूर्ण देशाला दिला आहे”

"सरकारने नेहमीच गरिबांचे प्रश्न सोडवण्याल प्राधान्य दिले, त्यांच्या सुख-दु:खात साथ देण्याचा प्रयत्न केला"

''आमच्यासाठी विकास म्हणजे केवळ झगमगाट नाही तर आमच्यासाठी विकास म्हणजे गरीब, दलित, वंचित, मागास, आदिवासी, माता-भगिनींचे सक्षमीकरण''

Posted On: 07 JUL 2022 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जुलै 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसीच्या सिगरा येथील डॉ.संपूर्णानंद क्रीडा संकुलात आयोजित एका कार्यक्रमात 1800  कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी करण्यात आली.  यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

सुरुवातीलाच पंतप्रधानांनी, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उत्तरप्रदेश आणि काशीच्या जनतेने दिलेल्या भरघोस पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले.

काशी नेहमीच चैतन्यमय आणि निरंतर प्रवाही नगरी राहिली आहे. आता काशीने विकास आणि वारशाचे जजतन एकाच वेळी होऊ शकेल, असे चित्र संपूर्ण देशासमोर मांडले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. इथे हजारो कोटी रुपयांच्या योजना आणि प्रकल्प पूर्ण झाले आहेत तर अनेक योजनांची आणि प्रकल्पांची कामे सुरु आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. विकास प्रकल्प, काशीला अधिक गतिशील, प्रगतीशील आणि संवेदनशील बनवत आहे, याचा उल्लेख त्यांनी केला. माझी काशी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ चे उत्तम उदाहरण आहे, असे ते म्हणाले.

काशीच्या जागरूक नागरिकांनी ज्या प्रकारे देशाला दिशा देण्याचे काम केले आहे ते पाहून मला आनंद होत आहे. शॉर्टकट म्हणजेच कोणत्याही तात्पुरत्या फायदे देणाऱ्या सोप्या मार्गाने देशाचे भले होऊ शकत नाही, हा संदेश काशीच्या नागरिकांनी संपूर्ण देशाला दिला आहे, असे काशीचे खासदार असलेले पंतप्रधान म्हणाले. तात्पुरत्या आणि तत्कालिक सोप्या उपायांपेक्षा  दीर्घकाळ टिकणाऱ्या  उपायोजना आणि प्रकल्पांना प्राधान्य दिल्याबद्दल त्यांनी स्थानिक जनतेची  प्रशंसा केली. पायाभूत सुविधा आणि इतर क्षेत्रातील सुधारणांमुळे शहरात पर्यटन वाढले आहे तसेच व्यवसाय आणि जीवन सुलभतेच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

आगामी श्रावण महिन्याबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, देशभरातून आणि जगभरातून बाबा विश्वनाथांचे भक्त मोठ्या संख्येने काशीत येणार आहेत. विश्वनाथ धाम प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा पहिला श्रावण उत्सव असेल, असे त्यांनी सांगितले. विश्वनाथ धामबद्दल संपूर्ण जगात किती उत्साह आहे हे गेल्या काही महिन्यांत लोकांनी अनुभवले आहे, असे ते म्हणाले.  भक्तांना शक्य तितका समृद्ध आणि उत्तम सुविधांचा अनुभव मिळवा या उद्देशाने सरकार प्रयत्न करत आहे. विविध धार्मिक यात्रा सुलभ आणि सोयीस्कर केल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.

आमच्यासाठी विकास म्हणजे केवळ झगमगाट नाही. आमच्यासाठी विकास म्हणजे गरीब, दलित, वंचित, मागास , आदिवासी, माता आणि भगिनींचे सक्षमीकरण आहे , असे पंतप्रधान म्हणाले. सरकार पक्की घरे आणि प्रत्येक घरात जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी देण्यासाठी निरंतर कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले.

आमच्या सरकारने नेहमीच गरिबांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्या सुख-दु:खात साथ देण्याचा प्रयत्न केला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. विनामूल्य  कोरोना लसीपासून ते गरिबांना मोफत धान्य देण्यापर्यंत सरकारने जनतेची सेवा करण्याची एकही संधी सोडलेली नाही. डिजिटल इंडिया, आयुष्मान भारत, वाढत्या वैद्यकीय पायाभूत सुविधांमुळे लोकांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत.एकीकडे देशातील शहरे धूरमुक्त करण्यासाठी आम्ही सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या सुविधा विस्तारत आहोत, तर दुसरीकडे, आम्ही आपल्या नावाड्यांना  डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या बोटी सीएनजीशी जोडण्याचा पर्यायही देत आहोत आणि गंगा नदीची  काळजीही घेत आहोत, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

नवीन क्रीडा केंद्र उपलब्ध होत असल्याने खेळाडूंचा उत्साह पंतप्रधानांनी नमूद केला.काशीमध्ये ऑलिम्पिक खेळांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकार काम करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.सिगरा येथील पुनर्विकास केलेल्या स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय सुविधा निर्माण केल्या जात आहेत. हे सहा दशक जुने स्टेडियम 21 व्या शतकातील सुविधांनी सुसज्ज असेल,असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी काशीच्या जनतेला  गंगा आणि वाराणसी स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.  त्याचप्रमाणे  जनतेच्या पाठिंब्याने आणि बाबा विश्वनाथ यांच्या आशीर्वादाने शहरासाठी केलेले सर्व संकल्प पूर्ण होतील असा विश्वास व्यक्त केला.

विकासाशी संबंधित विविध उपक्रमांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी

वाराणसी मधील पायाभूत विकासाचे निर्धारित केलेले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधानांनी गेल्या आठ वर्षांमध्ये वेगवेगळ्या अनेक विकास कामांची उद्‌घाटने आणि पायाभरणी केली आहेत. यामुळे या शहराचे रूप पालटले आहे. या प्राथमिक उद्दिष्टातून पुढे जाणाऱ्या प्रयत्नांमुळे लोकांच्या जीवनमानातील सुलभतेत अजून वाढ झाली आहे.

या दिशेने अजून एक पाऊल टाकत या कार्यक्रमांच्या अंतर्गत पंतप्रधानांनी 590 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. वाराणसी स्मार्ट सिटी आणि शहरी प्रकल्प या अंतर्गत असणाऱ्या विविध विकास कामांमध्ये नमो घाट फेज 1 चा पुनर्विकास याशिवाय स्नानासाठी असणाऱ्या जेटीची उभारणी, डिझेल आणि पेट्रोल इंजिन असणाऱ्या पाचशे बोटींचे सीएनजीमध्ये रूपांतरण, जुन्या काशीतील कामेश्वर महादेव भागाचा पुनर्विकास आणि हर्हुआ आणि दासेपूर गावातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या सहाशे जागांची उभारणी, लहरतारा-चौका घाट उड्डाणपुलाखालील भाग विकसित करणे, पर्यटकांसाठीच्या सुविधा तसेच दशाश्वमेध घाटावरील बाजारपेठ, आयपीडीएस फेज तीन अंतर्गत नग्वा येथे 33/11 KV से उपकेंद्र या कामांचा समावेश आहे.

पंतप्रधानांनी यावेळी विविध रस्ते प्रकल्पांचाही उद्‌घाटन केलं यामध्ये बाबतपुर-कापशेथी-भदोही मार्गावरील उड्डाण पुलाचे चौपदरी मार्गाचे बांधकाम, सेंट्रल जेल मार्गावर वरुणा नदीवरील पूल, पिंडरा- कथीरा मार्ग, फुलपुर सिंधोरा लिंक मार्गाचे रुंदीकरण, ग्रामीण भागांमधील रस्त्यांचे मजबुतीकरण आणि रस्ते बांधणी, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत सात रस्त्यांची बांधणी आणि धारसौना-सिंधुरा मार्गाचे रुंदीकरण या प्रकल्पांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा सुधारण्याशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. यामध्ये वाराणसी शहरातील जुन्या सांडपाणी वाहिनीची ट्रेंचलेस तंत्रज्ञानाद्वारे पुनर्स्थापना, ट्रान्स वरुणा भागात 25000 हून अधिक घरांना सांडपाणी नलिका जोडणी, शहरातील सिस वरुणा परिसरात गळती दुरुस्तीची कामे; तातेपूर गावात ग्रामीण पेयजल योजना यांचा समावेश यामध्ये आहे.  महगाव येथील आयटीआय, बनारस हिंदू विद्यापीठातील वैदिक विज्ञान केंद्राचा टप्पा-2 रामनगर येथे मुलींसाठी शासकीय निवास, दुर्गाकुंड येथील शासकीय महिला वृद्धाश्रमात थीम पार्क अशा  विविध सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांचे उद्‌घाटन त्यांनी केले

बडा लालपूर येथे डॉ.  भीमराव आंबेडकर क्रीडा संकुलात सिंथेटिक ऍथलेटिक ट्रॅक आणि सिंथेटिक बास्केटबॉल कोर्ट आणि सिंधौरा येथे  पोलिस ठाण्याची अनिवासी इमारत, मिर्झामुराद, चोलापूर, जनसा आणि कपसेठी येथे पोलीस ठाण्यात बराक आणि खोल्यांचे बांधकाम, पिंडरा येथे  अग्निशामक केंद्राची इमारत आणि विविध पोलिस आणि अग्नी सुरक्षा प्रकल्पांचे उद्‌घाटन पंतप्रधानांनी केले.

या कार्यक्रमात, पंतप्रधानांनी 1200 कोटी रुपयांपेक्षा अधिक  किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणीही केली. यामध्ये लहरतारा - बनारस हिंदू विद्यापीठ  ते विजया सिनेमा या रस्त्याच्या सहा पदरी रुंदीकरणासह  पांडेयपूर उड्डाणपूल ते रिंगरोड रस्त्याचे चौपदरीकरण; कचहरी ते संदाहा रस्त्याचे चौपदरीकरण; वाराणसी भदोही ग्रामीण रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण; वाराणसी ग्रामीण भागात पाच नवीन रस्त्यांची बांधणी आणि चार सीसी रस्त्यांचे बांधकाम; बाबतपूर रेल्वे स्थानकाजवळ बाबतपूर-चौबेपूर रस्त्यावर  आरओबीचे बांधकाम, अशा विविध  रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे.  या प्रकल्पांमुळे शहर आणि ग्रामीण रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मोठी मदत होईल.

या प्रदेशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पंतप्रधानांनी जागतिक बँकेचे साहाय्य असलेल्या  यूपी गरिबांसाठी पर्यटन विकास प्रकल्पांतर्गत असलेले  सारनाथ बौद्ध सर्किट, अष्टविनायकसाठी पावन पथ, द्वादश ज्योतिर्लिंग यात्रा, अष्ट भैरव, नव गौरी यात्रा, पंचकोसी परिक्रमा यात्रा मार्गावरील पाच थांब्याची पर्यटन विकास कामे तसेच जुन्या काशीमधील विविध वॉर्डांमध्ये पर्यटन विकास कामे यांच्यासह विविध प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांनी केली.

सिगरा येथील क्रीडा स्टेडियमच्या पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.

 

 

 

 

R.Aghor /Sonal C/Sonali/Vijaya/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1839924) Visitor Counter : 188