पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 7 जुलै रोजी वाराणसीला भेट देणार


पंतप्रधान 1800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास उपक्रमांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी करणार

शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्यावर आणि सामान्य माणसाचे जगणे सुखकर करण्यावर या प्रकल्पांचा भर

एनईपीच्या अंमलबजावणीवरील अखिल भारतीय शिक्षा समागमचे पंतप्रधान करणार उद्‌घाटन

अक्षय पात्र माध्यान्ह भोजन स्वयंपाकघराचेही पंतप्रधान करणार उद्‌घाटन

Posted On: 04 JUL 2022 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जुलै 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 जुलै, 2022 रोजी वाराणसीला भेट देतील. दुपारी 2 च्या सुमारास पंतप्रधान वाराणसीमधील एलटी महाविद्यालय येथे अक्षय पात्र माध्यान्ह भोजन स्वयंपाकघराचेही  उद्‌घाटन करतील, ज्यामध्ये सुमारे एक लाख विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजन बनवण्याची  क्षमता आहे. दुपारी 2:45 च्या सुमारास, पंतप्रधान रुद्राक्ष-आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि परिषद केंद्राला भेट देतील. तिथे ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत अखिल भारतीय शिक्षा समागमाचे उद्‌घाटन करतील. त्यानंतर, दुपारी 4 वाजता, पंतप्रधान सिग्रा येथे डॉ. संपूर्णानंद स्पोर्ट्स स्टेडियमवर पोहोचतील , तिथे ते 1800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी करतील.

अनेक विकास उपक्रमांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी

गेल्या आठ वर्षांत पंतप्रधानांनी वाराणसीमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. त्यामुळे शहराचा कायापालट झाला  आहे. या उपक्रमांचा प्राथमिक भर  लोकांचे जगणे सुखकर करण्यावर  आहे. या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, सिग्रा येथील डॉ. संपूर्णानंद स्पोर्ट्स स्टेडियम येथील कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान 590 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्‌घाटन करतील.

यापैकी वाराणसी स्मार्ट सिटी आणि शहरी प्रकल्पांतर्गत विविध प्रकल्प  आहेत, ज्यात पहिल्या टप्प्यात नमो घाटचा पुनर्विकास आणि बाथिंग जेट्टीची उभारणी ; 500 बोटींच्या डिझेल आणि पेट्रोल इंजिनचे सीएनजीमध्ये रूपांतर; जुन्या काशीच्या कामेश्वर महादेव प्रभागाचा  पुनर्विकास आणि हरहुवा, दासेपूर गावात आर्थिकदृष्ट्या दुर्बल  गटासाठी  600 हून अधिक घरांची बांधणी ; लहरतरा-चौका घाट उड्डाणपुलाखाली नवीन फेरीवाला क्षेत्र  आणि शहरी सुविधा दशाश्वमेध घाट येथे पर्यटन सुविधा आणि बाजार संकुल; आणि आयपीडीएस टप्पा -3 अंतर्गत नागवा येथे 33/11 केव्ही उप केंद्र यांचा  समावेश आहे.

पंतप्रधान या प्रसंगी, बाबतपूर-कपसेठी-भदोही रस्त्यावरील ओव्हर ब्रिजचे चौपदरीकरण; सेन्ट्रल जेल रस्त्यावर वरुणा नदीवरील पुलाचे बांधकाम; पिंडरा-कथिराओ रस्त्याचे रुंदीकरण; फूलपूर-सिन्धौरा जोडरस्त्याचे रुंदीकरण; ग्रामीण भागातील 8 रस्त्यांचे बांधकाम आणि मजबुतीकरण; पंतप्रधान ग्राम  सडक योजनेतील 7 रस्त्यांचे बांधकाम आणि धरसौना- सिन्धौरा रस्त्याचे रुंदीकरण यासह विविध रस्ते प्रकल्पांचे उद्‌घाटन करणार आहेत.

जिल्ह्यातील पाणीपुरवठा आणि गटारे यांच्या व्यवस्थेत सुधारणा करण्याशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्घाटनदेखील पंतप्रधान करणार आहेत. यामध्ये वाराणसी शहरातील ओल्ड ट्रंक सांडपाणी वाहिनीचे ट्रेंचलेस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुनर्वसन, सांडपाण्याच्या वाहिन्या बसविणे, ट्रान्स वरुणा भागात 25,000 हून अधिक घरांसाठी  नालेजोडणीची व्यवस्था, शहराच्या सिस वरुणा भागात गळतीची दुरुस्ती, तातेपूर गावात ग्रामीण पेयजल योजना सुरु करणे इत्यादी कामांचा समावेश आहे. महागांव येथील आयटीआय, बीएचयू अर्थात बनारस हिंदू विश्वविद्यालयातील वेदिक विज्ञान केंद्राचा दुसरा टप्पा, रामनगर येथील मुलींचे सरकारी निवास, दुर्गाकुंड येथील महिलांच्या सरकारी वृद्धाश्रमात थीम पार्कची उभारणी यांसह विविध सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांशी संबंधित प्रकल्पांचे देखील उद्‌घाटन पंतप्रधान यावेळी करतील. 

शहराच्या बडा लालपूर भागातील डॉ. भीमराव आंबेडकर क्रीडा संकुलातील सिंथेटिक ॲथलेटिक ट्रॅक आणि बास्केटबॉल कोर्टचे देखील उद्‌घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सिन्धौरा येथील पोलीस स्थानक अनिवासी इमारत, वसतिगृहातील खोल्यांचे बांधकाम, मिर्झामुराद, चोलापूर,जनसा,कपसेठी पोलीस स्थानकांतील बरॅक आणि पिंडरा येथील अग्निशमन केंद्राची इमारत यांसह पोलीस आणि अग्नीसुरक्षा विषयक अनेक प्रकल्पांचे उद्‌घाटन मोदी यांच्या हस्ते होईल.

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान 1200 कोटींहून अधिक मूल्याच्या प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. यामध्ये पुढील विविध रस्त्यांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे: लहरतारा- बीएचयू ते विजय सिनेमा रस्त्याचे सहा पदरी रुंदीकरण,पांडेपूर फ्लायओव्हर ते रिंग रोड रस्त्याचे चौपदरी रुंदीकरण, कुचहेरी ते संदाहा रस्त्याचे चौपदरीकरण, वाराणसी-भदोही ग्रामीण रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण, वाराणसीच्या ग्रामीण भागात पाच नवे रस्ते आणि चार सीसी रस्त्यांचे बांधकाम, बाबतपूर-चौबेपूर रस्त्यावर बाबतपूर रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पुलाचे बांधकाम. या कामांमुळे शहरे आणि ग्रामीण रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होईल

या प्रदेशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान जागतिक बँकेच्या यूपी गरिबांसाठी पर्यटन विकास प्रकल्पाअंतर्गत असलेले सारनाथ बौद्ध मंडळ, अष्ट विनायकसाठी पावन पथ, द्वादश ज्योतिर्लिंग यात्रा, अष्ट भैरव, नव गौरी यात्रा, पंचकोसी परिक्रमा यात्रा मार्गावरील पाच थांब्याची पर्यटन विकास कामे तसेच जुन्या काशीमधील विविध वॉर्डांमध्ये पर्यटन विकास कामे यांच्यासह विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील.

सिग्रा येथील क्रीडा स्टेडियमच्या पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.

अखिल भारतीय शिक्षा समागम

रुद्राक्ष - आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि अधिवेशन केंद्रात अखिल भारतीय शिक्षा समागमचे पंतप्रधान उद्‌घाटन करतील. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे 7 ते 9 जुलै दरम्यान 'शिक्षा समागम' चे आयोजन करण्यात आले आहे.   विख्यात शिक्षणतज्ञ, धोरणकर्ते आणि शैक्षणिक धुरीणांना एकमेकांशी विचार विनिमय करून आणि त्यांचे अनुभव सामायिक करत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) 2020 प्रभावी अंमलबजावणीच्या आराखड्यावर  चर्चा करण्यासाठी 'शिक्षण समागम' एक व्यासपीठ प्रदान करेल. देशभरातील राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था ( आयआयटी, आयआयएम, एनआयटी, आयआयएस ईआर) (केंद्रीय, राज्य, डीम्ड, खाजगी) विद्यापीठांमधील,शैक्षणिक, प्रशासकीय आणि संस्थात्मक कामाशी संबंधित 300 हून अधिक  धुरीण यांच्या क्षमता बांधणीचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  विविध भागधारक त्यांच्या संबंधित संस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीने झालेली प्रगती,उल्लेखनीय कार्ये, कार्यान्वित केलेल्या सर्वोत्तम पद्धती आणि त्यांच्या यशोगाथा देखील सर्वांसमोर सादर करतील.

या तीन दिवस चालणाऱ्या शिक्षा  समागमादरम्यान, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत उच्च शिक्षणासाठी तयार केल्या गेलेल्या नऊ संकल्पनांवर गटचर्चा आयोजित केल्या जातील.यामध्ये  बहुविद्याशाखीय आणि समग्र शिक्षणकौशल्य विकास आणि रोजगारक्षमतासंशोधन, नवनिर्मिती आणि उद्योजकतादर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांची क्षमता बांधणीगुणवत्ता, श्रेणी आणि मान्यताडिजिटल सबलीकरण आणि ऑनलाइन शिक्षणन्याय्य आणि सर्वसमावेशक शिक्षणभारतीय ज्ञान प्रणालीआणि उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण या संकल्पनांचा यात समावेश आहे.

 

S.Kulkarni/Sushama/Sanjana/Sampada/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 


(Release ID: 1839202) Visitor Counter : 217