पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशातील भीमावरम येथे महान स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या 125 व्या जयंती सोहळ्याचे केले उद्घाटन
पंतप्रधानांनी अल्लुरी सीताराम राजू यांच्या 30 फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण केले
"स्वातंत्र्य लढा हा केवळ काही वर्षांचा, काही क्षेत्रांचा किंवा काही लोकांचा इतिहास नाही"
“अल्लुरी सीताराम राजू हे भारतीय संस्कृती, आदिवासी अस्मिता , शौर्य, आदर्श आणि मूल्यांचे प्रतीक आहेत "
आपला नवभारत हा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नातील भारत असावा. असा भारत - ज्यामध्ये गरीब, शेतकरी, मजूर, मागास, आदिवासी सर्वांना समान संधी असेल
"आज नवीन भारतामध्ये नवीन संधी, मार्ग, विचार प्रक्रिया आणि शक्यता आहेत आणि आपले युवक या शक्यता प्रत्यक्षात साकारण्याची जबाबदारी उचलत आहेत"
"आंध्र प्रदेश ही शूर वीरांची आणि देशभक्तांची भूमी आहे"
130 कोटी भारतीय प्रत्येक आव्हानाला सांगत आहेत - 'दम है तो हमे रोक लो'- तुमच्यात ताकद असेल तर आम्हाला थांबवून दाखवा '
Posted On:
04 JUL 2022 4:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील भीमावरम येथे महान स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या 125 व्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन केले. आंध्र प्रदेशचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन, मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यावेळी उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, समृद्ध वारसा लाभलेल्या आंध्र प्रदेशच्या महान भूमीला अभिवादन करण्याचे भाग्य लाभल्याचा त्यांना विशेष आनंद झाला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, अल्लुरी सीताराम राजू यांची 125 वी जयंती आणि रम्पा क्रांतीची 100 वर्षे सारखे प्रमुख कार्यक्रम एकाचवेळी साजरे होत असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी महान “मण्यम वीरुडू” अल्लुरी सीताराम राजू यांच्या स्मृतीला वंदन केले आणि संपूर्ण देशाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहिली. या महान स्वातंत्र्यसैनिकाच्या कुटुंबातील सदस्यांची भेट झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आंध्र प्रदेशची ‘आदिवासी परंपरा’ आणि या परंपरेतून उदयाला आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनाही पंतप्रधानांनी अभिवादन केले.
अल्लुरी सीताराम राजू गारु यांची 125 वी जयंती आणि रम्पा क्रांतीची 100 वर्षे देशभरात वर्षभर साजरी केली जाईल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. पंडरंगी येथील त्यांच्या जन्मस्थळाचा जीर्णोद्धार, चिंतापल्ली पोलीस ठाण्याचे नूतनीकरण, मोगल्लू येथे अल्लुरी ध्यान मंदिराचे बांधकाम, हे कार्य अमृत महोत्सवाच्या भावनेचे प्रतीक आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याबाबत सर्वांना परिचित करण्याचा संकल्प आजच्या कार्यक्रमातून प्रतिबिंबित होतो असे पंतप्रधान म्हणाले.
स्वातंत्र्य लढा हा केवळ काही वर्षांचा, काही क्षेत्रांचा किंवा काही लोकांचा इतिहास नाही, असे पंतप्रधानांनी नमूद केले. हा इतिहास भारताच्या कानाकोपऱ्यातील त्याग, तप आणि बलिदानाचा इतिहास आहे. “आपल्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आपल्या विविधतेच्या सामर्थ्याचे , संस्कृतीचे आणि एक राष्ट्र म्हणून आपल्या एकजुटीचे प्रतीक आहे” असे ते म्हणाले.
अल्लुरी सीताराम राजू हे भारताची संस्कृती, आदिवासी अस्मिता, शौर्य, आदर्श आणि मूल्यांचे प्रतीक असल्याचे सांगत पंतप्रधानांनी सीताराम राजू गारु यांचा जन्मापासून ते त्यांच्या बलिदानापर्यंतचा जीवनप्रवास आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांनी आपले जीवन आदिवासी समाजाच्या हक्कासाठी, त्यांच्या सुख-दु:खासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केले. “अल्लुरी सीताराम राजू हे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ च्या त्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात जी देशाला एकतेच्या एका धाग्यात जोडत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की भारताच्या अध्यात्माने अल्लुरी सीताराम राजू यांना आदिवासी समाजाप्रति करुणा आणि दयाळूपणाची भावना, अस्मिता आणि समानतेची भावना, ज्ञान आणि साहस दिले. अल्लुरी सीताराम राजू तसेच रम्पा क्रांतीदरम्यान ज्या युवकांनी बलिदान दिले, त्यांचे बलिदान आजही संपूर्ण देशासाठी ऊर्जा आणि प्रेरणास्रोत आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला. “देशातील युवकांनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले. आज देशाच्या विकासासाठी पुढे येण्याची युवकांसाठी ही सर्वोत्तम संधी आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
“आज नव्या भारतात नव्या संधी, नवे मार्ग, नव्या विचार प्रक्रिया तसेच शक्यता निर्माण होत आहेत आणि आपले युवक या शक्यता प्रत्यक्षात साकार करण्यासाठी जबाबदाऱ्या स्वीकारत आहेत,” याकडे त्यांनी निर्देश केला.
पंतप्रधान म्हणाले की आंध्र प्रदेश ही नायकांची आणि देशभक्तांची भूमी आहे. येथे पिंगळी वेंकय्या यांच्यासारखे स्वातंत्र्य वीर निर्माण झाले ज्यांनी आपल्या देशाचा राष्ट्रध्वज तयार केला. ही कानेगंटी हनुमंथू, कंदुकुरी वीरेशलिंगम पंतुलू आणि पोट्टी श्रीरामुलू यांच्यासारख्या महान नायकांची भूमी आहे. अमृत काळात अशा सर्व स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने साकार करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे असे ते म्हणाले. आपला नवीन भारत हा त्यांच्या स्वप्नांतील भारत असायला हवा. गरीब, शेतकरी, श्रमिक, मागासलेले, आदिवासी अशा सर्वांनाच समान संधी असणारा भारत. पंतप्रधान म्हणाले की गेल्या 8 वर्षांत, केंद्र सरकार आदिवासी समुदायांच्या कल्याणासाठी अथकपणे काम करत आहे.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच देशातील आदिवासींचा अभिमान तसेच वारसा यांचे प्रदर्शन करणाऱ्या वस्तुसंग्रहालयांची उभारणी होत आहे असे त्यांनी सांगितले. “अल्लुरी सीताराम राजू यांच्या स्मरणार्थ आदिवासी स्वातंत्र्य सैनिक वस्तुसंग्रहालयाची उभारणी करण्याचे देखील काम आंध्र प्रदेशात लांबासिंगी येथे सुरु आहे. त्याचप्रमाणे, 15 नोव्हेंबर रोजी असलेली भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आता राष्ट्रीय आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, परदेशी राज्यकर्त्यांनी आपल्या देशातील आदिवासी समुदायांवर फार अत्याचार करण्याचे गुन्हे केले आणि त्यांची संस्कृती उध्वस्त करण्याचे प्रयत्न केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आदिवासी कला आणि कौशल्ये यांना स्कील इंडिया अभियानाच्या माध्यमातून नवी ओळख मिळत आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ च्या दिशेने केलेल्या प्रयत्नांतून आदिवासी कला कौशल्यांना उत्पन्नाचे एक माध्यम म्हणून स्थान मिळत आहे. आदिवासी लोकांना जंगलातील बांबूसारखी उत्पादने कापण्यापासून रोखणारे कित्येक दशकांपूर्वीचे कायदे आम्ही बदलले आणि आदिवासींना जंगलातील उत्पादनांवर हक्क प्रस्थापित करून दिला असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, किमान आधारभूत मूल्याने खरेदी केल्या जाणाऱ्या वन उपजांची संख्या 12 वरून 90 केली. सुमारे 3000 हून अधिक वन गण विकास केंद्रे तसेच 50,000 हून अधिक वन गण स्वयंसाहाय्यता गट आदिवासी उत्पादनांना आणि कलेला आधुनिक संधींशी जोडून देण्याची काम करत आहेत. आकांक्षित जिल्हे योजनेमुळे आदिवासी जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे तसेच शिक्षणाच्या क्षेत्रात, 750 पेक्षा अधिक एकलव्य विद्यालयांची स्थापना करण्यात आली असून राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत मातृभाषेतून शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले जात आहे.
पंतप्रधान म्हणाले, “मान्यम वीरुदू” अल्लुरी सीताराम राजू यांनी ब्रिटिशांविरुध्द दिलेल्या लढ्यातून हे दाखवून दिले की, -‘हिम्मत असेल तर मला थांबवून दाखवा’. आज आपला देश देखील अनेक आव्हानांशी सामना करत आहे. अशावेळी तशाच धाडसासह 130 कोटी देशवासीय, एकी आणि सामर्थ्याने, समोर ठाकलेल्या प्रत्येक आव्हानाला सांगत आहेत,- ‘हिम्मत असेल तर आम्हांला थांबवून दाखवा’, असे पंतप्रधान भाषणाच्या शेवटी म्हणाले.
या कार्यक्रमाची पार्श्वभूमी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरु असलेल्या सोहोळ्याचा भाग म्हणून, स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच या योगदानाविषयी देशातील लोकांना माहिती करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भिमावरम येथे महान स्वातंत्र्य सैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या 125व्या जयंतीच्या एक वर्ष कालावधीच्या सोहोळ्याची सुरुवात केली. 4 जुलै 1897 रोजी जन्मलेल्या अल्लुरी सीताराम राजू पूर्व घाट प्रदेशातील आदिवासी समुदायांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या लढ्यासाठी सदैव स्मरणात राहतील. 1922 मध्ये सुरु झालेल्या राम्पा उठावाचे नेतृत्व त्यांनी केले होते. स्थानिक लोक त्यांना “मान्यम वीरुदु” म्हणजे जंगलांचा नायक असे म्हणतात.
या एक वर्ष चालणाऱ्या सोहोळ्यासाठी सरकारने अनेक उपक्रमांच्या मालिकेचे नियोजन केले आहे. विझीनगरम जिल्ह्यातील पांडरंगी येथील अल्लुरी सीताराम राजू यांचे जन्मस्थळ आणि राम्पा उठावाला 100 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल या उठावाची सुरुवात ज्या पोलीस स्थानकावरच्या हल्ल्याने झाली ते चिंतपल्ली पोलीस स्थानक या दोन्ही ठिकाणांचा जीर्णोद्धार केला जाणार आहे. सरकारने, मोगाल्लू येथे अल्लुरी ध्यान मंदिराची उभारणी करण्यास मंजुरी दिली असून या मंदिरात अल्लुरी सीताराम राजू यांचा ध्यानमुद्रेतील पुतळा बसविण्यात येणार आहे, तसेच या मंदिरात भित्तीचित्रे आणि कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानावर आधारित संवादात्मक प्रणालीद्वारे या महान स्वातंत्र्यसैनिकाची जीवन कहाणी सादर करण्यात येईल.
S.Tupe/S.Kulkarni/ S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1839121)
Visitor Counter : 357
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam