पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम बहादूर राय यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी केलेले भाषण

Posted On: 18 JUN 2022 9:57PM by PIB Mumbai

नमस्कार!

आपल्या देशातल्या जनतेला प्रेरणा देण्यासाठी ऋषी-मुनींनी मंत्र दिला होता- ‘चरैवेति-चरैवेति’.
एका पत्रकारासाठी, नव्या कल्पनांचा शोध आणि समाजासमोर नवीन काहीतरी आणण्याची तळमळ हा मंत्र म्हणजे एक नैसर्गिक साधना आहे. मला आनंद आहे, की राम बहादूर राय  आपल्या जीवन यात्रेत अशा पद्धतीने या ‘साधनेत’ व्यग्र राहिले, की आज त्यांची आणखी एक विशेष कामगिरी आपल्या सर्वांसमोर आहे. मला आशा आहे, की ‘भारतीय संविधान-अनकही कहानी’ हे पुस्तक आपले शीर्षक सार्थ ठरवेल आणि भारतीय संविधान अधिक व्यापक स्वरुपात देशासमोर मांडेल. या अभिनव प्रयत्नांसाठी राम बहादूर राय यांचे आणि या प्रकाशनात सहभागी झालेल्या सर्वांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.

मित्रांनो,
आपण सर्व जण देशातील बुद्धिवादी वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे आहात. स्वाभाविक आहे की आपण या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी विशेष दिवस आणि वेळ निवडली आहे. ही वेळ देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची आहे. आजच्या 18 जून या दिवशीच मूळ संविधानाच्या पहिल्या मसुद्यावर तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी स्वाक्षरी केली होती, ज्यामुळे   आपल्या संविधानाच्या लोकशाही गतीशीलतेचा पहिला दिवस अधोरेखित झाला होता. आणि आजच्या दिवशीच संविधानाकडे विशेष दृष्टीकोनातून बघणारे हे पुस्तक आपण प्रकाशित करत आहोत. हीच आपल्या संविधानाची सर्वात मोठी ताकद आहे, जी आपल्याला विचारांचे वैविध्य आणि तथ्य आणि सत्याचा शोध याची प्रेरणा देते.  

मित्रांनो,
आपले संविधान स्वतंत्र भारताच्या अशा दृष्टीकोनाच्या स्वरुपात आपल्या समोर आले होते, जे देशातील अनेक पिढ्यांचे स्वप्न पूर्ण करू शकेल. संविधान निर्माण करण्यासाठी संविधान समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती, स्वातंत्र्याच्या अनेक महिने आधी! या बैठकी मागे एक खूप मोठा ऐतिहासिक संदर्भ, वेळ आणि परिस्थिती होत्या. इतिहास आणि संविधानाचे जाणकार असलेल्या आपल्या सर्वांना या गोष्टीची माहिती आहे. परंतु, मी या मागचा एक भावनिक पैलू देखील बघतो. अनिश्चिततेने भरलेल्या त्या कालखंडात आपले स्वातंत्र्य आंदोलन अनेक आव्हानांचा सामना करत होते, तरीही आपल्या देशाचा आत्मविश्वास एवढा अढळ होता, की त्याला आपल्या स्वातंत्र्याबद्दल पूर्ण विश्वास होता. स्वातंत्र्य मिळण्याच्या बराच काळ आधीच देशाने स्वातंत्र्याची तयारी सुरु केली होती आणि आपल्या संविधानाच्या रुपरेषेबाबत चर्चा सुरु केली होती. यामधून दिसून येते, की भारतीय संविधान केवळ एक पुस्तक नाही; तर तो एक विचार आहे, एक निष्ठा आणि स्वातंत्र्यावरचा विश्वास आहे.

मित्रांनो,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा दरम्यान देश आज स्वातंत्र्य चळवळीचे न सांगितले गेलेले अध्याय समोर आणण्याचा सामुहिक प्रयत्न करत आहे. सर्वस्वाचा त्याग केल्यावरही विसरले गेलेले योद्धे, स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा देऊनही विस्मरणात गेलेल्या घटना, आणि स्वातंत्र्य लढ्याला ऊर्जा देणारे विचार, जे स्वातंत्र्यानंतर आपल्या निश्चयांपासून दूर गेले.     

देश आज पुन्हा एका धाग्यात हे गुंफत आहे ज्यायोगे भविष्यातल्या भारतामध्ये आपल्या इतिहासाची जाणीव आणि अभिमान अधिक अधिक दृढ होईल. म्हणूनच आज देशाचा युवक,अकथित इतिहासाचा शोध घेत आहे,त्यावर पुस्तके लिहित आहे. अमृत महोत्सवाअंतर्गत अनेक कार्यक्रम होत आहेत. ‘भारतीय संविधान – अनकही कहानी’ हे पुस्तक देशाच्या याच अभियानाला नवे  बळ देण्याचे काम करेल. स्वातंत्र्याच्या इतिहासाबरोबरच संविधानाचा  हा अकथित अध्याय देशाच्या युवकांना एक नवा विचार देईल, त्यांच्या  विचारांची कक्षा रुंदावेल. रामबहादूर यांनी आपल्या या पुस्तकाची एक प्रत मला आधीच पाठवली होती. त्याची पाने चाळताना मला अनेक विचार आणि रंजक बाबी आढळल्या. एका ठिकाणी आपण लिहिले आहे, ‘भारताच्या संविधानाच्या इतिहासाला स्वातंत्र्य संग्रामाचा लुप्त  प्रवाह  मानला गेला आहे.मात्र असे नाही. संविधानाबाबत माहिती असणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.’ पुस्तकाच्या सुरवातीला आपण हेही लिहिले आहे की,आणीबाणीच्या काळात मीसाखाली तुरुंगात असताना,संविधानाबाबत आपल्याला  विशेष रुची निर्माण झाली.म्हणजे संविधानाने आपल्याला आपल्या अधिकारांची जाणीव करून दिली आणि याबाबत सखोल ज्ञान प्राप्त करत असताना, संविधानाची संकल्पना  म्हणजे नागरी कर्तव्य असल्याचे आपण जाणले.अधिकार आणि कर्तव्य यांची सांगड आपल्या संविधानाला वैशिष्ट्यपूर्ण करते. आपल्याला अधिकार आहेत तसेच कर्तव्यही आहे आणि कर्तव्य असतील  तरच  अधिकारही तितकेच मजबूत राहतील. म्हणूनच स्वातंत्र्याच्या अमृत काळात आज देश कर्तव्यबोधावर बोलत आहे, कर्तव्यावर इतका भर देत आहे.  

मित्रहो,  

आपण जेव्हा एखादा संकल्प घेऊन वाटचाल करू लागतो तेव्हा आपली माहितीच आपली जाणीव बनते.बोध आपले प्रबोधन करतो. म्हणूनच एक राष्ट्र म्हणून आपण आपल्या संविधानाचे जितके सखोल ज्ञान घेऊ तितकाच आपण संविधानाच्या सामर्थ्याचा व्यापक उपयोग करू शकू.

आपल्या संविधानाच्या संकल्पनेला गांधीजीनी नेतृत्व कसे दिले,धर्माच्या आधारावर स्वतंत्र निवडणूक प्रणाली नष्ट करून सरदार पटेल यांनी भारतीय संविधानाला जातीयतेपासून मुक्त केले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेत बंधुतेचा समावेश करून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेला आकार दिला आणि डॉ राजेंद्र प्रसाद यांच्यासारख्या विद्वानानी, भारताच्या मूळ धारणेची  संविधानासमवेत सांगड घालण्याचा कसा प्रयत्न केला अशा अनेक अपरिचित पैलूंचा हे पुस्तक परिचय करून देते. हे सर्व पैलू,भविष्यात आपली दिशा कोणती असायला हवी याचे मार्गदर्शनही करतील.

मित्रहो,

भारत एक मुक्त विचारांचा देश राहिला आहे. जडत्व हा आपला मूळ स्वभाव नाही. संविधान सभेच्या स्थापनेपासून त्यासंदर्भातील चर्चेपर्यंत, संविधानाचा स्वीकार केल्यापासून ते आजपर्यंत आपण सातत्याने वेगवान आणि प्रगतीशील संविधानाची प्रचीती घेतली आहे. आपण प्रश्न उपस्थित केले,वाद-विवाद, चर्चा केल्या,सुधारणा केल्या. हीच अखंडता आपल्या जनमानसात कायम राहील याचा मला विश्वास आहे. आपण सातत्याने संशोधन करत राहू,पहिल्यापेक्षा अधिक उज्वल भविष्य घडवत राहू. आपण सर्व  परिपक्व लोक अशाच प्रकारे देशाच्या या गतीमानतेचे नेतृत्व करत राहाल असा मला विश्वास आहे.आपणा सर्वाना खूप-खूप धन्यवाद !   

***

ST/N.Chitale/R.Agashe/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1837247) Visitor Counter : 177