पंतप्रधान कार्यालय
‘वाणिज्य भवन’ आणि ‘निर्यात पोर्टल’च्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
Posted On:
23 JUN 2022 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2022
मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री पीयूष गोयल जी, श्री सोमप्रकाश जी, श्रीमती अनुप्रिया पटेल जी, उद्योग आणि निर्यात क्षेत्राशी संबंधित सर्व सहकारी, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो!
नव्या भारतात, नागरिक केंद्री प्रशासनाच्या ज्या मार्गाने देश गेल्या आठ वर्षांपासून वाटचाल करतो आहे, आज त्याच दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.देशाला आज नवे आणि आधुनिक वाणिज्य भवन आणि त्यासोबतच निर्यात पोर्टल या दोन्हीची नवी भेट मिळाली आहे. या दोन्हीमध्ये एक प्रत्यक्ष पायाभूत सुविधेचे आणि दुसरे डिजिटल सुविधेचे प्रतीक आहे. ह्या दोन्ही गोष्टी, व्यापार आणि वाणिज्यशी संबंधित आमच्या प्रशासनात सकारात्मक बदल आणणाऱ्या तसेच, आत्मनिर्भर भारताच्या आपल्या आकांक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत. आपल्या सर्वांचे, व्यापार आणि वाणिज्यशी संबंधित, निर्यातीशी संबंधित सर्व समुदायाचे आणि विशेषतः आपल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचेदेखील मी याप्रसंगी खूप खूप अभिनंदन करतो. आज देशाचे पहिले उद्योगमंत्री डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी आहे. त्यांची धोरणे, त्यांचे निर्णय, त्यांचे संकल्प, त्यांच्या संकल्पांची सिद्धता यामुळे, स्वतंत्र भारताला दिशा देण्यात अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. आज देश त्यांना आपली विनम्र श्रद्धांजली वाहत आहे.
मित्रांनो,
मला विश्वास आहे, की नव्या वाणिज्य भवनात आपण एक नवी प्रेरणा, एक नवा संकल्प मनात घेऊन प्रवेश करत आहोत. हा संकल्प उद्योगपूरक वातावरण निर्मितीचा आहे आणि उद्योगस्नेही वातावरणाच्या माध्यमातून, लोकांचे जीवनमान सुखकर करण्याचा आहे आणि या दोघांमध्ये जो संबंध आहे, तो आहे, सहज उपलब्धतेचा. सरकारसोबत संवाद आणि सरकारी सुविधा सहजपणे उपलब्ध असण्यात कसलीही अडचण येऊ नये, असे ‘ईज ऑफ अॅक्सेस’- म्हणजेच नागरिकांना सर्व गोष्टींची सहज उपलब्धता मिळवून देण्याला सरकारचे प्राधान्य आहे. देशातल्या नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, बँकिंग सुविधा उपलब्ध असाव्यात, सरकारी धोरण-निर्मितीत सहभाग असावा. गेल्या आठ वर्षांच्या प्रशासनाच्या मॉडेलमध्ये याच सगळ्या गोष्टींना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. भारताने आपल्या आर्थिक विकासासाठी जी धोरणे तयार केली आहेत, जे निर्णय घेतले आहेत, त्यातही ह्याच दूरदृष्टीची झलक आपल्याला दिसते. गावात, छोट्या
छोट्या शहरात, मुद्रा योजनेतून तयार झालेले कोट्यवधी स्वयंउद्योजक असोत, लाखो एमएसएमई पॉलिसीज आणि बँक पतपुरवठ्याच्या रूपाने मिळालेले प्रोत्साहन असो, रस्त्यावरच्या लाखो फेरीवाल्यांना मिळणारा बँकेचा कर्जपुरवठा असो, हजारो स्टार्ट अप्सच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे असो.. या सगळ्यांच्या पाठीशी जी मूळ भावना आहे, ही आहे- ईज ऑफ अॅक्सेस म्हणजे गोष्टींची सहज उपलब्धता. सरकारच्या योजनांचा लाभ सगळ्यांपर्यंत पोहोचला तरच सगळ्यांचा विकास होणे शक्य आहे . मला आनंद आहे, की हीच ‘ईज ऑफ अॅक्सेस’ आणि ‘सबका विकास’या भावना ह्या नव्या वाणिज्य भवनातही आपल्याला दिसतात.
मित्रांनो,
आपल्या सर्वांमध्ये एक वाक्प्रचार आजकाल अतिशय प्रचलित झाला आहे- SOP म्हणजेच, Standard Operating Procedure. याचा अर्थ काम करण्याची एक निश्चित पद्धत. आधीच्या सरकारांमध्ये SOP असायचे की सरकार कोणता तरी प्रकल्प सुरू करेल, मात्र तो पूर्ण केव्हा
होईल, याची काहीही शाश्वती नसे. राजकीय स्वार्थासाठी घोषणा केल्या जात. मात्र, त्या पूर्ण कधी होणार, कशा होणार, याबद्दल काहीही गांभीर्य नसायचे. ही धारणा आम्ही कशी बदलली, याचेही हे
भवन एक उदाहरण आहे आणि आता जसे सांगितले गेले, की आज एक आणखी योगायोग आहे, की 22 जून 2018 ला या भवनाची पायाभरणी झाली होती, आणि आज 23 जून 2022 रोजी तिचे लोकार्पण होत आहे. याच दरम्यान कोरोनामुळे अनेक अडचणी देखील आल्या. मात्र असे असूनही जो संकल्प केला होता तो आज सिद्ध झाला आहे आणि आपल्यासमोर आहे. म्हणजे ही नव्या भारताची काम करण्याची पद्धत आहे. ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन होईल, त्याचे उद्घाटन करण्याच्या दिशेनेदेखील ठरल्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम सुरु केले जाते. इथे दिल्लीतच गेल्या काही वर्षांतली अशी अनेक उदाहरणे तुम्हाला दिसतील. आता काही दिवसांपूर्वी देखील या प्रगती
मैदानाजवळ एकात्मिक वाहतूक मार्गिकेचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली. सरकारचे प्रकल्प अनेक वर्ष रखडायला नको, वेळेवर पूर्ण व्हावे, सरकारी योजना आपल्या ध्येयापर्यंत पोचाव्यात, तोच देशाच्या करदात्यांचा खरा सन्मान असतो आणि आता तर पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याच्या रुपाने आपल्याकडे एक आधुनिक मंचदेखील आहे. नव्या भारताच्या आकांक्षा लक्षात घेता या नव्या वाणिज्य भवनाला देखील संबंधित क्षेत्रात देशाला गतिशक्ती द्यायची आहे.
मित्रांनो,
भूमिपूजनापासून लोकार्पणापर्यंत, वाणिज्य भवन या कालखंडात व्यापार क्षेत्रात आपल्या उपलब्धींचे देखील द्योतक आहे. मला आठवते, भूमिपूजनाच्या वेळी मी नवोन्मेष आणि जागतिक नवोन्मेष निर्देशांकात सुधारणा करण्याच्या गरजेवर भर दिला होता. आज आपण जागतिक नवोन्मेश निर्देशांकात 46 व्या स्थानावर आहोत आणि सातत्याने सुधारणा करत आहोत. भूमिपूजनाच्या दिवशी आपण व्यवसायातील सुलभता यात सुधारणा करण्याच्या गरजेवर चर्चा केली होती. आज
जेव्हा या इमारतीचा, या भवनाचा लोकार्पण सोहळा होतो आहे, तेव्हा आतापर्यंत 32 हजारपेक्षा जास्त अनावश्यक अनुपालन रद्द करण्यात आले आहेत. 32 हजार, तुम्ही विचार करू शकता? भूमिपूजनाच्या वेळी वस्तू आणि सेवा कर लागू होऊन थोडेच दिवस झाले होते, अनेक प्रकारच्या शंका-कुशंका जोरावर होत्या. आज दर महिन्याला 1 लाख कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर जमा होणे हे नित्याचेच झाले आहे.
वाणिज्य भवनाच्या वेळी आपण GeM पोर्टलवर जवळजवळ 9 हजार कोटी रुपयांच्या ऑर्डरची चर्चा केली होती. आज या पोर्टलवर आपल्या 45 लाख व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे आणि GeM वर सव्वा दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ऑर्डर देण्यात आल्या आहेत.
मित्रांनो,
तेव्हा मी सांगितले होते की 2014 नंतर मोबाईल उत्पादन कंपन्या कशा, 2 हून वाढून 120 झाल्या आहेत. आज ही संख्या 200 पेक्षा जास्त आहे आणि आपण ‘मोबाईलची आयात करणारे’ ही ओळख मागे टाकून ‘जगातली मोठी मोबाईल फोन निर्यातदार शक्ती म्हणून पुढे आलो आहोत. 4 वर्षांपूर्वी भारतात 500 पेक्षा देखील कमी फिनटेक स्टार्टअप्सची नोंदणी झाली होती. आज हीच संख्या जवळजवळ 2300 च्या पुढे गेली आहे. तेव्हा दर वर्षी आपण 8 हजार स्टार्टअप्सना मान्यता देत होतो, आज ही संख्या 15,000 च्या वर जाते आहे. ध्येय ठरवून प्रामाणिक प्रयत्नांमुळे 100 वर्षांतली इतकी मोठी जागतिक महामारी असूनही आपण इतके सगळे मिळवले आहे.
मित्रांनो,
संकल्पातून सिद्धी ही विचारधारा आज नव्या भारतात बनली आहे, त्याचे उत्तम उदाहरण आपली निर्यात व्यवस्था आहे. भूमिपूजन कार्यक्रमात आपण जागतिक निर्यात वाढविण्यासाठी, निर्यात वाढविण्यासाठी, भारताला उत्पादनासाठीचे प्राधान्याचे केंद्र बनवण्यासाठी एकत्र संकल्प केला होता. गेल्या वर्षी ऐतिहासिक जागतिक उलथापालथ झाली तरीही, सगळ्या पुरवठा साखळ्या मोडून पडल्या तरीही भारताने 670 अब्ज डॉलर म्हणजेच 50 लाख कोटी रुपयांची एकूण निर्यात केली. आपल्याला माहीत आहे, की हा आकडा किती अभूतपूर्व आहे. गेल्या वर्षी देशाने ठरवले की कुठलेही आव्हान आले तरीही 400 अब्ज डॉलर म्हणजेच 30 लाख कोटी रुपयांच्या वस्तू निर्यात करायच्या. पण आपण याच्याही पुढे जाऊन 418 अब्ज डॉलर म्हणजेच 31 लाख कोटी रुपयांची निर्यातीचा विक्रम केला. मित्रांनो, गेल्या वर्षांतल्या या यशाने उत्साहीत होऊन आम्ही आता निर्यातीचे ध्येय सुद्धा वाढवले आहे, त्यासाठी आमचे प्रयत्नदेखील दुप्पट केले आहेत. ही जी नवी ध्येये आहेत, ती प्राप्त करण्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न खूप गरजेचे आहेत. इथे उद्योग, निर्यात आणि निर्यात प्रोत्साहन परिषद यांचे सदस्यदेखील उपस्थित आहेत. माझी आपणा सर्वांना आग्रहाची विनंती आहे की, आपण आपल्या स्तरावर देखील निर्यातीची तात्कालिक नव्हे तर दीर्घकालीन ध्येये ठरवावीत. ध्येयेच नव्हे तर,तिथपर्यंत कसे पोचावे, यात सरकारची काय मदत मिळू शकते, यावरदेखील आपण मिळून काम करू, हे अतिशय गरजेचे आहे.
मित्रांनो ,
नॅशनल इम्पोर्ट-एक्स्पोर्ट फॉर इयरली अनालिसिस ऑफ ट्रेड म्हणजेच निर्यात( NIRYAT) मंच याच दिशेने उचललेले एक पाऊल आहे. यात निर्यातदार, सरकारचे विविध विभाग , राज्य सरकारे, सर्व हितधारकांसाठी आवश्यक वास्तविक माहिती सहज उपलब्ध होईल. यामुळे माहितीचे आदान- प्रदान शक्य होईल, आपले जे उद्योग आहेत, आपले निर्यातदार आहेत त्यांना महत्वाचे निर्णय घेण्यात मदत होईल. या पोर्टलद्वारे जगातील 200 पेक्षा अधिक देशांमध्ये निर्यात होणाऱ्या 30 हून अधिक वस्तू गटांशी संबंधित आवश्यक माहिती तुम्हा सर्वांना उपलब्ध होईल. यावर आगामी काळात जिल्हा-निहाय निर्यात संबंधी माहितीही मिळेल. निर्यातीशी संबंधित माहितीही मिळेल.आणि एक जिल्हा, एक उत्पादन मोहीम जोरात असून ती इथेही जोडली जातील. यात जिल्ह्यांना निर्यातीचे महत्वपूर्ण केंद्र बनवण्याच्या प्रयत्नांना देखील बळ मिळेल . मला विश्वास आहे, हे पोर्टल देशातल्या राज्यांमध्ये निर्यात क्षेत्रात निकोप स्पर्धेला प्रोत्सहन देण्यातही मदत करेल. आम्हाला राज्यांमध्ये एक निकोप स्पर्धा हवी आहे. कोणते राज्य किती जास्त निर्यात करते , किती जास्त देशांना निर्यात करते, किती जास्त विविध वस्तू निर्यात करते.
मित्रांनो,
विविध देशांच्या विकास यात्रेचा अभ्यास केला तर एक गोष्ट सामायिक दिसते की त्या देशांची प्रगती तेव्हाच झाली, जेव्हा त्यांची निर्यात वाढली. म्हणजेच विकसनशील ते विकसित देश बनण्यात निर्यातीची खूप मोठी भूमिका असते. यामुळे रोजगाराच्या संधी देखील वाढतात, स्वयंरोजगाराच्या देखील संधी वाढतात. मागील आठ वर्षांमध्ये भारतदेखील आपली निर्यात सातत्याने वाढवत आहे. निर्यातीशी संबंधित उद्दिष्टे साध्य करत आहे. निर्यात वाढवण्यासाठी उत्तम धोरणे, सुलभ प्रक्रिया , उत्पादनांना नवी बाजारपेठ मिळवून देणे यात याची खूप मदत झाली आहे. आणि आता आपण लॉजिस्टिक मदतीवर देखील तेवढेच लक्ष देत आहोत जेणेकरून आपल्या निर्यातीचे प्रत्येक काम किफायतशीर असेल. तुम्हालाही माहित आहे की उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना उत्पादन वाढवण्यात कशा प्रकारे मदत करत आहे. आपल्या निर्यातदार मित्रांच्या प्रतिसादाच्या आधारे जे धोरणात्मक बदल झाले आहेत , त्यामुळेही खूप मदत झाली आहे. आज सरकारचे प्रत्येक मंत्रालय, प्रत्येक विभाग, समग्र सरकारचा दृष्टिकोन ठेवून निर्यात वाढवण्यास प्राधान्य देत आहे. एमएसएमई असो, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय असो, कृषी मंत्रालय असो की वाणिज्य असो, सारेच जण सामायिक उद्दिष्टासाठी सामायिक प्रयत्न करत आहेत.आपण पाहतो आहोत की आपल्या निर्यातीत खूप मोठी संख्या अभियांत्रिकी वस्तूंची असते.त्यांची निर्यात वाढवण्यात विशेषतः एमएसएमई क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. आपण हेदेखील पाहत आहोत की कशा प्रकारे देशातल्या नवनवीन क्षेत्रांमध्ये निर्यात वाढत आहे. अनेक आकांक्षित जिल्ह्यांमधूनही निर्यात कैक पटींनी आता वाढली आहे. कापूस आणि हातमाग उत्पादनांच्या निर्यातीत 55 टक्के वाढ झाली असून तळागाळापर्यंत काम कसे चालले आहे, हेच यातून दिसते, सरकार वोकल फॉर लोकल अभियान, ‘एक जिल्हा, एक उत्पादन ’ योजनेद्वारे स्थानिक उत्पादनांवर भर देत आहे , यामुळेही निर्यात वाढण्यात मदत झाली आहे. आता आपली अनेक उत्पादने जगातील नवनवीन देशांना प्रथमच निर्यात केली जात आहेत. आता आपली स्थानिक उत्पादने खऱ्या अर्थाने जलद गतीने जागतिक बनत आहेत. आता पहा, सीताभोग मिठाई आणि नारकेल नारु म्हणजे नारळ आणि गुळापासून बनवलेल्या लाडूंची पहिली खेप बहारिनला निर्यात केली आहे. नागालैंडची ताजी किंग मिरची लंडनच्या बाजारात जात आहे.तर आसामची ताजी बर्मा द्राक्षे (बरमीज ग्रेप्स) दुबईला निर्यात केली जात आहेत. छत्तीसगढ़च्या आपल्या आदिवासी बंधू-भगिनींची वन उत्पादने महुआ फुलांची उत्पादने फ्रान्सला तर कारगीलची खुमानी दुबईला निर्यात केली जात आहे. अर्बुआ, बेलाइज़, बरमूडा, ग्रेनाडा आणि स्वित्झर्लंडसारख्या नव्या बाजारपेठांमध्ये हातमागाशी संबंधित उत्पादने पाठवण्यात आली आहेत. आपले शेतकरी, विणकर आणि आमच्या पारंपरिक उत्पादनांना निर्यात परिसंस्थेशी जोडण्यासाठी आम्ही मदत करत आहोत आणि जीआय टॅगिंग करण्यावर देखील भर देत आहोत.गेल्या वर्षी आम्ही यूएई आणि ऑस्ट्रेलियाबरोबर व्यापार करारांना अंतिम रूप दिले. तर इतर देशांबरोबर देखील खूप प्रगती झाली आहे . परदेशात आपले राजनैतिक दूतावास आहेत त्यांचीही मी विशेष प्रशंसा करू इच्छितो. अत्यंत आव्हानात्मक वातावरणाचे भारतासाठी संधीत रूपांतर करण्याचे काम ते करत आहेत. आपले सर्व दूतावास यासाठी अभिनंदनास पात्र आहेत. त्यांच्या कामाची प्रशंसा जितकी करू तेवढी कमी आहे.
मित्रांनो ,
नवीन व्यापारासाठी , व्यवसायांसाठी , नवीन बाजारपेठा निश्चित करून, त्यांच्या गरजा ओळखून त्यानुसार उत्पादने तयार करणे हे देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे . भूतकाळात आपल्या व्यापाऱ्यांनी दाखवून दिले आहे की परस्पर भागीदारी आणि विश्वासावर आधारित व्यापार कसा समृद्ध होऊ शकतो. मूल्य आणि पुरवठा साखळीची ही शिकवण आपल्याला स्वातंत्र्याच्या अमृतकाळात मजबूत करायची आहे. याच मूल्यांच्या आधारे आपण युएई आणि ऑस्ट्रेलियाबरोबर व्यापार करार केले आहेत. अन्य देश आणि क्षेत्रांबरोबर देखील वेगाने असे करार करण्याच्या दिशेने आपण पुढे वाटचाल करत आहोत.
मित्रांनो ,
मागील 8 वर्षातील देशाच्या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. याच भावनेने काम करत स्वातंत्र्याच्या अमृतकाळात पुढील 25 वर्षांसाठी आपण जे संकल्प केले आहेत, त्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. आज नवी इमारतही उभी राहिली आहे. नवे पोर्टलही सुरु झाले आहे. मात्र इथेच आपली जबाबदारी संपत नाही,एक प्रकारे नव्या संकल्पांसह , नव्या ऊर्जेने नव्या कामगिरीसाठी वेगाने वाटचाल करण्याचे काम सुरु झाले आहे. मी प्रत्येक विभागाला विनंती करतो की आतापर्यन्त जी पोर्टल आणि जे मंच आपण तयार केले आहेत , त्यांच्या कामगिरीचे वेळोवेळी विश्लेषण व्हायला हवे. ज्या उद्दिष्टांसह आपण ही साधने विकसित केली आहेत ती किती पूर्ण होऊ शकत आहेत आणि जर कुठे समस्या असेल तर त्यावर उपाय शोधण्यात यावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मी उद्योग क्षेत्रातील मित्रांना, निर्यातदारांनादेखील आवाहन करतो की कि तुम्ही मोकळेपणाने तुमचे म्हणणे सरकार समोर मांडा , अभिनव सूचना घेऊन या , उपाय घेऊन या, आपण एकत्रितपणे तोडगा काढू . तुम्ही निर्यात पोर्टलला भेट द्या आणि सांगा की यात आणखी काय समावेश करता येईल काय वगळता येईल. जिल्हा स्तरावर निर्यात वाढवण्यासाठी कोणत्या तरतुदी करता येतील? आपल्याला जिल्हा स्तरावर निर्यातीत निकोप स्पर्धा आणायची आहे. आपल्या उत्पादकांमध्ये जागतिक दर्जाच्या पॅकिंगमध्ये शून्य दोष, शून्य परिणाम अशी स्पर्धा आपल्याला आणायची आहे. सर्वांच्या सूचना, सर्वांचे प्रस्ताव, सर्वांच्या प्रयत्नांतूनच आपण आपले भव्य संकल्प तडीस नेऊ शकतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या नवीन इमारतीसाठी शुभेच्छा आणि या शुभ कार्यात मला सहभागी होण्यासाठी निमंत्रित केल्याबद्दलही मी विभागाचा खूप-खूप आभारी आहे. खूप-खूप धन्यवाद! खूप-खूप शुभेच्छा !
S.Kulkarni/R.Aghor/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1836538)
Visitor Counter : 295
Read this release in:
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Urdu
,
English
,
Hindi
,
Manipuri
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam