पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील राजभवन येथे जलभूषण इमारत आणि क्रांतिगाथा या क्रांतिकारकांच्या दालनाचे केले उद्घाटन


"महाराष्ट्राला जगतगुरू श्री संत तुकाराम महाराजांपासून ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत समाजसुधारकांचा अतिशय समृद्ध वारसा आहे"

"स्वातंत्र्य लढ्याला काही घटनांपुरते मर्यादित ठेवण्याची प्रवृत्ती आहे मात्र भारताला स्वातंत्र्य मिळण्यामागे असंख्य लोकांच्या 'तपस्ये'चा सहभाग आहे"

“स्वातंत्र्य चळवळीची ‘स्थानिक ते जागतिक’ ही भावना आत्मनिर्भर भारत अभियानाची ताकद आहे”

"महाराष्ट्रातील अनेक शहरे 21व्या शतकात देशाची विकास केंद्रे होणार आहेत"

Posted On: 14 JUN 2022 6:21PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील राजभवन येथे जलभूषण इमारत आणि क्रांतिगाथा या क्रांतिकारकांच्या दालनाचे उद्घाटन केले. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते.

प्रारंभी पंतप्रधानांनी वट पौर्णिमा आणि कबीर जयंतीनिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राने देशाला अनेक क्षेत्रात प्रेरणा दिली आहे. जगतगुरू संत तुकाराम महाराजांपासून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत समाजसुधारकांचा अतिशय समृद्ध वारसा महाराष्ट्राला आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातून संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत रामदास आणि संत चोखामेळा यांनी देशाला ऊर्जा दिली आहे. स्वराज्याबद्दल बोलायचे झाल्यास, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना दृढ करते, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले. राजभवनाच्या स्थापत्य रचनेत प्राचीन मूल्ये आणि स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणींचा समावेश केला आहे, असे मत त्यांनी मांडले. राजभवनाचे लोकभवनात रूपांतर करण्याच्या भावनेचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा संबंध आपण जाणतेपणाने किंवा अजाणतेपणाने काही निवडक घटनांपुरता मर्यादित ठेवतो. खरे तर भारताच्या स्वातंत्र्यामध्ये अगणित लोकांची ‘तपस्या’ होती आणि स्थानिक पातळीवर घडलेल्या अनेक घटनांचा एकत्रित परिणाम राष्ट्रीय पातळीवर दिसत होता. साधने जरी वेगवेगळी असली तरी संकल्प एकच होता, असे पंतप्रधान म्हणाले. सामाजिक, कौटुंबिक किंवा विचारधारांच्या भूमिकांच्या पलीकडे या चळवळीचे स्थान होते मग ती देशातील असो वा परदेशातील. या सर्वांचे लक्ष्य एकच होते- भारताला संपूर्ण स्वातंत्र्य. बाळ गंगाधर टिळक, चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके आणि मादाम भिकाजी कामा यांच्या बहु-आयामी योगदानाचे पंतप्रधानांनी स्मरण केले. स्वातंत्र्याच्या चळवळीचा प्रसार स्थानिक पातळीबरोबरच जागतिक पातळीवर झाला होता याकडे त्यांनी लक्ष वेधले. गदर पार्टी, नेताजींच्या नेतृत्वाखालील आझाद हिंद फौज आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांचे इंडिया हाऊस ही स्वातंत्र्य चळवळीच्या जागतिक व्याप्तीची उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले.

“स्थानिक पातळीपासून जागतिक पातळीपर्यंत पसरलेली ही भावना आत्मनिर्भर भारत अभियानाचा पाया आहेत”, असे ते म्हणाले.

अनाम वीरांच्या योगदानाकडे बराच काळ दुर्लक्ष करण्यात आले असे पंतप्रधान म्हणाले. महान स्वातंत्र्य सैनिक श्यामजी कृष्ण वर्मांच्या अस्थी भारतात आणण्यासाठी इतका विलंब झाला की अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्या भारतात घेऊन आले.

मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे, मात्र महाराष्ट्रात अशी अनेक शहरे आहेत जी 21 व्या शतकात देशाच्या विकासाची केंद्रे बनतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. याच विचाराने एकीकडे मुंबईच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण केले जात आहे आणि त्याच वेळी इतर शहरांमध्ये देखील आधुनिक सुविधांमध्ये वाढ केली जात आहे असे त्यांनी सांगितले.

उपस्थितांपैकी प्रत्येकाकडे कोणतीही भूमिका असो, त्यांनी राष्ट्रीय वचनपूर्तीला बळकटी आणण्याचे उद्दिष्ट ठेवले जाईल याची सुनिश्चिती केली पाहिजे अशी मागणी पंतप्रधानांनी केली. राष्ट्राच्या विकासामध्ये सर्वांच्या प्रयत्नांच्या महत्त्वाबाबत त्यांनी केलेल्या उपदेशाचा देखील त्यांनी याप्रसंगी पुनरुच्चार केला.

जल भूषण हे वर्ष 1885 पासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान राहिले आहे. जुन्या  इमारतीचे आयुष्य संपल्यानंतर ती पाडण्यात आली आणि त्याजागी नवी इमारत उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली. भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ऑगस्ट 2019 मध्ये नव्या इमारतीची कोनशीला रचण्यात आली. नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये जुन्या इमारतीचे वैशिष्ट्य असणारे सर्व घटक जतन करण्यात आले. वर्ष 2016 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन  राज्यपाल विद्यासागर राव यांना राज भवनाच्या इमारतीमध्ये बंकर सापडला. पूर्वीच्या काळात, ब्रिटीश सैन्यातर्फे शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा साठविण्याची गुप्त जागा म्हणून या बंकरचा वापर केला जात असे. या बंकरचे 2019 साली नूतनीकरण करण्यात आले. महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाच्या स्मरणार्थ या बंकरमध्ये वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचे वस्तुसंग्रहालय म्हणून एक दालन विकसित करण्यात आले. या दालनाच्या माध्यमातून वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, सावरकर बंधू, मादाम भिकाजी कामा, व्ही.बी.गोगटे, 1946 चा नौदलातील उठाव यासह इतर अनेकांच्या योगदानाला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

 

***

ST/PJ/ShaileshP/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1833994) Visitor Counter : 203