युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित देशव्यापी कार्यक्रमांचा अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम येथून आरंभ


केंद्रीय मंत्री 750 तरुण सायकलस्वारांसह 7.5 किमी अंतरापर्यंत सायकल चालवतील

नेहरू युवा केंद्र संघटनच्या वतीने 35 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांची राजधानी आणि देशभरातील 75 प्रतिष्ठित ठिकाणी सायकल रॅलीचे आयोजन

एकाच दिवशी प्रस्तावित या सायकल रॅलींद्वारे 1.29 लाख तरुण सायकलस्वार 9.68 लाख किमीपेक्षा अधिक अंतर कापतील

Posted On: 02 JUN 2022 2:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जून 2022

स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव-भारत @75 या महोत्सवाचा  एक भाग म्हणून युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय 3 जून 2022 रोजी देशभरात जागतिक सायकल दिनाचे आयोजन करत आहे. 12 मार्च 2021 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांच्या आरंभ कार्यक्रमात, पंतप्रधानांनी  केलेल्या उद्‌घाटनपर  भाषणातून प्रेरणा घेऊन, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने कृती आणि संकल्प @75 या स्तंभाखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची संकल्पना मांडली आहे.

जागतिक सायकल दिनाचा एक भाग म्हणून 3 जून 2022 रोजी, नेहरू युवा केंद्र संघटन (एनवायकेएस ) आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस ) या दोन प्रमुख युवा संघटनांच्या सहकार्याने युवा व्यवहार विभाग, दिल्ली येथे जागतिक सायकल दिनाचा आरंभ, 35 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या राजधान्यांमध्ये त्याचप्रमाणे देशभरातील 75 प्रतिष्ठित ठिकाणी आणि देशातील सर्व तालुक्यांमध्ये सायकल रॅलीचे आयोजन यांसारखे एकाच वेळी चार उपक्रम राबवत आहे.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री  अनुराग ठाकूर 3 जून 2022 रोजी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम येथून देशव्यापी कार्यक्रमांचा आरंभ  करतील यावेळी  केंद्रीय मंत्री 750 तरुण सायकलस्वारांसह 7.5 किमी अंतरापर्यंत सायकल चालवतील. नेहरू युवा केंद्र संघटनच्या वतीने  35 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांची राजधानी आणि देशभरातील 75 प्रतिष्ठित ठिकाणी सायकल रॅली काढण्यात येणार आहेत. या रॅली दरम्यान 75 सहभागी 7.5 किमी अंतर सायकलवरून कापतील.याशिवाय, नेहरू युवा केंद्र संघटन  आपल्या युवा स्वयंसेवकांच्या आणि युवा क्लबच्या सदस्यांच्या सहाय्याने आणि योगदानाने या सायकल रॅली देशातील सर्व तालुक्यांमध्ये  ऐच्छिक आधारावर काढत आहेत.

अशा प्रकारे, 3 जून 2022 रोजी जागतिक सायकल दिनानिमित्त देशभरात एकाचवेळी सायकल रॅली काढण्यात येणार आहेत.या उपक्रमाद्वारे, 3 जून 2022 रोजी प्रस्तावित सायकल रॅलींद्वारे 1.29 लाख तरुण सायकलस्वार 9.68 लाख किमीहून  अधिक अंतर पार करतील.

शारीरिक तंदुरुस्तीसाठीच्या  व्यायामाचा भाग म्हणून  आणि लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता,आजार इत्यादीपासून मुक्तता मिळवण्याच्या दृष्टीने, लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सायकल चालवण्यासाठी आणि ते  अंगिकारण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि प्रेरित करणे हा यामागचा उद्देश आहे. सर्वसामान्य नागरिकांनी सायकल चालवण्याचा  अवलंब केल्यास  कार्बन उत्सर्जन कमी होण्यासही मदत होईल. जागतिक सायकल दिन साजरा करण्याच्या  माध्यमातून, नागरिकांना त्यांच्या जीवनात दररोज किमान 30 मिनिटे शारीरिक व्यायामाचा  समावेश करण्याचा म्हणजेच फिटनेस की डोस आधा घंटा रोज. हा संकल्प करण्याचे आवाहन केले जाईल.

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1830443) Visitor Counter : 165