पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत लाभ जारी केले


"प्रत्येक देशवासीय अत्यंत संवेदनशीलतेसह तुमच्यासोबत आहे या वस्तुस्थितीचे पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजना हे प्रतिबिंब आहे "

"या कठीण प्रसंगी भारतमाता तुम्हा सर्व मुलांसोबत आहे"

"या कठीण प्रसंगी, चांगली पुस्तके तुमचे विश्वासू मित्र बनू शकतात"

"आज आमचे सरकार 8 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत असताना, देशाचा आत्मविश्वास आणि देशवासियांचा स्वतःवरचा विश्वास अभूतपूर्व आहे"

"गेली 8 वर्षे गरीबांच्या कल्याणासाठी आणि सेवेसाठी वाहिलेली आहेत"

मागील 8 वर्षे गरीबांच्या कल्याणासाठी आणि सेवेसाठी समर्पित आहेत"

“आता गरीबातील गरीब लोकांना लाभ मिळण्याची खात्री वाटत आहे. हा विश्वास वाढवण्यासाठी आमचे सरकार आता 100% सक्षमीकरणाची मोहीम राबवत आहे”

Posted On: 30 MAY 2022 2:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मे 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत लाभ जारी  केले. केंद्रीय मंत्री  स्मृती इराणी, मंत्रिमंडळाचे  इतर अनेक सदस्य आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी कोरोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या मुलांना आयुष्यात भेडसावत असलेल्या अडचणींबद्दल सहानुभूती व्यक्त केली. दररोज नवा  संघर्ष, दररोज नवी  आव्हाने. आज  ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होत आहे , त्या आपल्यासोबत असलेल्या मुलांचे दुःख शब्दात मांडणे खूप कठीण आहे, असे पंतप्रधानांनी मुलांना सांगितले. मी पंतप्रधान म्हणून नव्हे तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून बोलत असल्याचे ते म्हणाले.

अशा परिस्थितीत, आई आणि वडील दोघांचेही छत्र  गमावलेल्या अशा कोरोनाग्रस्त मुलांच्या अडचणी कमी करण्यासाठी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन हा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक देशवासीय  अत्यंत संवेदनशीलतेसह तुमच्या पाठीशी आहे या वस्तुस्थितीचेही पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन हे एक प्रतिबिंब आहे " असे पंतप्रधान म्हणाले.  जर कुणाला व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज हवे असेल तर त्यासाठी देखील पीएम-केअर्स मदत करेल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. इतर दैनंदिन गरजांसाठी अन्य  योजनांद्वारे दरमहा 4 हजार रुपयांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. वयाच्या 23 व्या वर्षी 10 लाख रुपयांव्यतिरिक्त आयुष्मान कार्डद्वारे आरोग्य सुरक्षा  आणि मानसिक आणि भावनिक मदतीसाठी संवाद हेल्पलाइनद्वारे भावनिक समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महामारीच्या सर्वात वेदनादायक परिणामांना इतक्या धैर्याने तोंड दिल्याबद्दल पंतप्रधानांनी मुलांना सलाम केला आणि सांगितले की पालकांच्या प्रेमाची भरपाई कशानेही होऊ  शकत नाही. या कठीण काळात  भारतमाता तुम्हा सर्व मुलांसोबत आहे. पीएम केअर फॉर चिल्ड्रेनच्या माध्यमातून देश आपली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी महामारीच्या काळातली  मानवी दयाळूपणाची उदाहरणे सांगितली,  विशेषत:  बाधित लोकांच्या कल्याणासाठी लोकांनी कसे योगदान दिले. कोरोना काळात रुग्णालये उभारणे , व्हेंटिलेटर खरेदी करणे आणि ऑक्सिजन संयंत्र  उभारणे यासाठीही या निधीची मोठी मदत झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकले, तसेच अनेक कुटुंबांचे भवितव्यही वाचू शकले.

निराशेच्या गडद वातावरणातही , जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर प्रकाशाचा किरण नक्कीच दिसतो, असे  पंतप्रधान म्हणाले.  याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणून त्यांनी आपल्या देशाचा उल्लेख केला. निराशेचे रूपांतर पराभवात होऊ देऊ नका, असा सल्ला पंतप्रधानांनी मुलांना दिला. त्यांनी मुलांना त्यांच्या वडीलधाऱ्यांचे आणि त्यांच्या शिक्षकांचे ऐकायला  सांगितले. या कठीण काळात चांगली पुस्तकेच त्यांचे विश्वासू मित्र बनू शकतात, असेही ते म्हणाले. त्यांनी मुलांना निरोगी राहण्यास सांगितले तसेच खेळांमध्ये सहभागी होऊन खेलो इंडिया आणि फिट इंडिया चळवळीचे नेतृत्व करण्यास सांगितले. तसेच योग दिनाच्या कार्यक्रमातही  सहभागी होण्यास सांगितले. ते म्हणाले की, नकारात्मकतेच्या त्या वातावरणात भारताचा आपल्या सामर्थ्यावर विश्वास होता.  आम्ही आपल्या शास्त्रज्ञांवर, आपल्या डॉक्टरांवर आणि आपल्या तरुणांवर विश्वास ठेवला. आणि आपण जगासाठी  चिंता न बनता आशेचा किरण म्हणून उदयाला  आलो. आपण समस्या बनलो नाही तर त्यावर तोडगा उपलब्ध करून देणारा बनलो. आपण जगभरातील देशांमध्ये औषधे आणि लस मात्रा  पाठवल्या. एवढ्या मोठ्या देशातही,  आम्ही प्रत्येक नागरिकापर्यंत ही लस पोहोचवली, ते म्हणाले. आपला देश वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून वाटचाल करत आहे आणि जग आपल्याकडे नव्या आशेने  आणि विश्वासाने पाहत आहे, असे ते म्हणाले.

आज जेव्हा आमचे सरकार 8 वर्षे कार्यकाळ पूर्ण करत आहे, तेव्हा देशाचा विश्वास, देशवासियांचा स्वतःवरचा विश्वास अभूतपूर्व आहे, याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. भ्रष्टाचार, हजारो कोटींचे घोटाळे, घराणेशाही, देशभर पसरत असलेल्या दहशतवादी संघटना आणि प्रादेशिक भेदभाव या दुष्टचक्रात देश 2014 पूर्वी  अडकला होता , त्यातून आता बाहेर पडत आहे. ही घटना देखील तुम्हा मुलांसाठी एक उदाहरण आहे. सर्वात कठीण दिवसही निघून जातात, असे ते म्हणाले.

स्वच्छ भारत मिशन, जन धन योजना किंवा हर घर जल अभियान यांसारख्या कल्याणकारी धोरणांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की सरकार सबका साथ सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या भावनेने वाटचाल करत आहे. मागील  8 वर्षे गोरगरिबांच्या कल्याणासाठी आणि सेवेसाठी समर्पित होती असे त्यांनी सांगितले. कुटुंबाचा एक सदस्य या नात्याने आम्ही अडचणी कमी करण्याचा आणि देशातील गरिबांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

तंत्रज्ञानाचा वापर वाढवून सरकारने गरीबांचे हक्क सुनिश्चित केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आता सरकारच्या योजनांचा लाभ आपल्याला नक्की मिळेल, निरंतर मिळत राहील असा विश्वास गरीबातील गरीब व्यक्तीला वाटत आहे. हा विश्वास वाढवण्यासाठी आमचे सरकार आता 100% सक्षमीकरणाची मोहीम राबवत आहे.

गेल्या आठ वर्षांत भारताने जी उंची गाठली आहे, त्याची कल्पनाही कोणी केली नव्हती , असे पंतप्रधान म्हणाले. आज जगभरात भारताचा गौरव  वाढला आहे, जागतिक मंचावर आपल्या भारताची ताकद वाढली आहे. भारताच्या या प्रवासाचे नेतृत्व युवाशक्ती करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. "तुम्ही तुमचे आयुष्य केवळ  तुमच्या स्वप्नांसाठी समर्पित करा, ती पूर्ण होणारच आहेत", असे सांगून पंतप्रधानांनी समारोप केला

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829414) Visitor Counter : 162