पंतप्रधान कार्यालय
गुजरातमधल्या आटकोट इथे मातुश्री के डी पी मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
प्रविष्टि तिथि:
28 MAY 2022 10:59PM by PIB Mumbai
भारत माता की – जय
भारत माता की – जय
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, गुजरात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सी आर पाटिल, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी पुरुषोत्तम रुपाला, मनसुख मंडाविया, डॉ. महेन्द्र मुंजपरा,आमचे ज्येष्ठ नेते वजुभाई वाला, विजय रुपाणी, पटेल सेवा समाज ट्रस्टचे सर्व विश्वस्त, सर्व दाता, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने इथे जमलेले पूज्य संतगण, गुजरात सरकारचा मंत्रीवर्ग,खासदार, आमदार आणि प्रचंड उकाडा असूनही आटकोट मध्ये आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो,
मातुश्री के डी पी मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचा प्रारंभ आज इथे झाला याचा मला आनंद आहे.सौराष्ट्रमध्ये आरोग्य सेवा अधिक उत्तम होण्यासाठी हे रुग्णालय सहाय्य करेल.सरकारच्या प्रयत्नांना जेव्हा जनतेच्या प्रयत्नाची जोड लाभते तेव्हा सेवा करण्यासाठी आमचे बळ अनेक पटींनी वाढते. राजकोट मध्ये उभारण्यात आलेले हे आधुनिक रुग्णालय याचे मोठे उदाहरण आहे.
बंधू-भगिनीनो,
केंद्रात, भाजपच्या नेतृत्वाखालचे रालोआ सरकार राष्ट्र सेवेची आठ वर्षे पूर्ण करत आहे. आठ वर्षापूर्वी आपण सर्वांनी मला निरोप दिला मात्र आपणा सर्वांचा स्नेह वृद्धींगत होत आहे. आज गुजरातच्या धरतीवर आलो असताना मस्तक झुकवून गुजरातच्या सर्व नागरिकांचा आदर करू इच्छितो. आपण मला जे संस्कार दिलेत,आपण जे शिक्षण दिले, समाजासाठी कसे जगावे या सर्व बाबींचे मला ज्ञान दिले त्याच्या बळावर गेली आठ वर्षे मातृभूमीच्या सेवेत मी कोणतीही कसर ठेवली नाही.हे आपण दिलेले संस्कार आहेत,या भूमीचे संस्कार आहेत, पूज्य बापू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या पवित्र धरतीचे संस्कार आहेत की आठ वर्षात चुकुनही असे काही घडू दिले नाही, असे काही केले नाही की ज्यामुळे देशाच्या नागरिकांना आपली मान खाली घालायला लागेल.
या वर्षांमध्ये आम्ही गरिबांची सेवा,सुशासन आणि गरीब कल्याण याला सर्वाधिक प्राधान्य दिले. सबका साथ-सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा मंत्र घेऊन वाटचाल करताना आम्ही देशाच्या विकासाला नवी गती दिली आहे. या आठ वर्षात आम्ही पूज्य बापू आणि सरदार पटेल यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.पूज्य बापू यांना असा भारत हवा होता जो प्रत्येक गरीब,वंचित,पिडीत, आपले आदिवासी बंधू-भगिनी,आपल्या माता-भगिनी या सर्वाना सबल करेल. जिथे स्वच्छता आणि आरोग्य जीवनशैलीचा एक भाग बनतील,स्वदेशी उपायांद्वारे अर्थव्यवस्था समर्थ होईल.
मित्रहो,
तीन कोटी पेक्षा अधिक गरिबांना पक्के घर,10 कोटीपेक्षा जास्त कुटुंबे उघड्यावर शौचापासून मुक्त,9 कोटीपेक्षा अधिक गरीब भगिनींना धुरापासुन मुक्ती, अडीच कोटीपेक्षा जास्त गरीब कुटुंबाना वीज जोडण्या, 6 कोटी पेक्षा जास्त कुटुंबाना नळाद्वारे पाणी पुरवठा, 50 कोटीपेक्षा जास्त भारतीयांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत इलाजाची सुविधा. बंधू-भगिनीनो,ही केवळ आकडेवारी नव्हे तर गरिबांची प्रतिष्ठा सुनिश्चित करण्यासाठी आमच्या कटिबद्धतेची प्रचीती आहे.
मित्रहो,
बंधू-भगिनीनो,गरिबांचे सरकार असेल तर त्यांची सेवा कशी केली जाते, त्यांना सबल करण्यासाठी कसे काम करते हे आज अवघा देश पाहत आहे. 100 वर्षातल्या सर्वात मोठ्या संकटाच्या काळात कोरोना महामारीच्या काळात देशाने हे सातत्याने अनुभवले. महामारी सुरु झाल्यानंतर गरिबांच्या अन्नधान्याची समस्या आली,तेव्हा आम्ही देशाच्या अन्नधान्याची कोठारे देशवासीयांसाठी खुली केली. आमच्या माता-भगिनींना सन्मानाने जगण्यासाठी जनधन बँक खात्यात थेट पैसे जमा केले, शेतकरी आणि मजुरांच्या बँक खात्यात पैसे जमा केले,गरिबांघरची चूल विझू नये, स्वैपाकघर सुरु राहावे यासाठी आम्ही मोफत गॅस सिलेंडरचीही व्यवस्था केली.उपचारासाठीचे आव्हान तीव्र झाल्यानंतर आम्ही चाचण्यांपासून ते उपचारापर्यंतच्या सुविधा गरिबांसाठी सुलभ केल्या. लस आली तेव्हा प्रत्येक भारतीयाला लस मिळेल, मोफत लस मिळेल याची खातरजमा केली.आपण सर्वांनी लस घेतली आहे ना ? लसीकरण झाले आहे ना ? त्यासाठी एक पैसा तरी द्यावा लागला आहे का ? एक रुपया तरी खर्च करावा लागला का ?
बंधू-भगिनीनो,
एकीकडे कोरोनाचे बिकट संकट,जागतिक महामारी आणि सध्या आपण तर पाहताच आहात की युद्धही सुरु आहे.दूरचित्रवाणीवर येणाऱ्या युद्धाच्या बातम्या प्रत्येकालाच चिंतीत करतात.अशा परिस्थितीतही, आमचे सातत्याने यासाठी प्रयत्न राहिले आहेत की आमच्या गरीब बंधू-भगिनींना,मध्यमवर्गाला, समस्यांना तोंड द्यावे लागू नये.सरकारच्या सुविधा शंभर टक्के नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आमचे सरकार अभियान चालवत आहे. ज्याच्या हक्काचे जे आहे तो हक्क त्याला मिळायलाच हवा.
जेव्हा प्रत्येक नागरिकापर्यंत सुविधा पोहोचवणे हे उद्दिष्ट असते तेव्हा भेदभाव नष्ट होतो,भ्रष्टाचाराला थारा राहत नाही.सगे-सोयरे,जात-पात हा भेद राहत नाही.म्हणून मुलभूत सुविधांशी निगडीत योजना शंभर टक्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी आम्ही राज्य सरकारानाही प्रेरित करत आहोत, सहाय्य करत आहोत.आमचा हा प्रयत्न, देशातल्या गरिबांना, देशाच्या मध्यम वर्गाला सबल करेल, त्यांचे जीवन अधिक सुखकर करेल.
आज इथे जसदण मध्ये पहिले सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि ते आटकोट मध्ये, इथे आल्यानंतर रुग्णालय पाहायला जाण्याची संधी मिळाली, सर्व दानशुराना आणि विश्वस्तांना भेटण्याची संधी मिळाली. विश्वस्तांनी सांगितले, साहेब इथे आलेला कोणीही रिकाम्या हाती परत जाणार नाही.विश्वस्तांचे हे शब्द,त्यांची ही भावना आणि एक आधुनिक रुग्णालय आणि तेही आपल्या घर परिसरात.भरतभाई बोघरा, पटेल सेवा समाजाचे सर्व सहकारी,या सर्वांचे कितीही अभिनंदन केले तरी ते कमीच पडेल. पटेल सेवा समाजाने समर्पित भावनेने आज जे इतके मोठे कार्य केले आहे त्यासाठी आपण सर्व अभिनंदनासाठी पात्र आहात.यातून प्रेरणा घेऊन आपण सर्व समाजाच्या सेवेसाठी काही करण्याची इच्छा बाळगता.
साधारणतः एखाद्या कारखान्याचे,बस स्थानकाचे, रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करायला गेल्यानंतर आपण मनापासून म्हणतो की आपणा सर्वांचे काम भरभराटीला यावे, लोकानी प्रयत्न करावेत,कारखान्यात उत्पादन भरघोस व्हावे.मात्र रुग्णालयासाठी काय म्हणावे, सांगा.रुग्णालय भरलेले राहावे असे तर म्हणू शकत नाही. म्हणूनच मी उद्घाटन तर केले आहे मात्र आपण समाजात असे आरोग्यदायी वातावरण राखावे की रुग्णालय रिकामेच राहावे. कोणाला इथे यायची आवश्यकताच लागू नये. सर्वांचेच आरोग्य निकोप राहिले तर कोणालाच इथे यायची गरज भासणार नाही आणि यायची गरज भासलीच तर प्रकृती पहिल्यापेक्षा जास्त सुधारूनच इथून घरी जाईल, असे काम या रुग्णालयात होणार आहे.आज गुजरातमध्ये आरोग्य क्षेत्राला जो वेग मिळाला आहे, ज्या पायाभूत सुविधा तयार झाल्या आहेत,ज्या स्तरावर काम होत आहे त्यासाठी भूपेंद्रभाई आणि त्यांच्या सर्व चमूला खूप-खूप शुभेच्छा देतो. या रुग्णालयाचा लाभ गुजरातच्या कानाकोपऱ्यातल्या सर्वसामान्यांना होणार आहे. आपले हे राजकोट तर अशा जागी आहे की आजूबाजूच्या तीन-चार जिल्ह्यातल्या लोकांना वाटेल की हे तर आपल्यासाठी जवळच आहे, इथून निघाल्यावर अर्धा-एक तासात पोहोचू.गुजरातला जे एम्स मिळाले आहे त्याचे काम आपल्या इथे राजकोट मध्ये वेगाने सुरु आहे.
काही काळापूर्वी मी जामनगर इथे आलो होतो, जामनगरमध्ये, जागतिक आरोग्य संघटनेद्वारा जागतिक पारंपरिक औषध केंद्र,आपल्या जामनगरमध्ये त्याचे भूमिपूजन झाले आहे. एकीकडे आपल्या जामनगर इथे आयुर्वेद आणि दुसरीकडे माझ्या राजकोट मध्ये एम्स आणि आटकोट मध्ये.बापू आपली तर शान अधिकच वाढली.मित्रहो, दोन दशकांपूर्वी आपली सेवा करण्याची संधी आपण मला दिली. 2001 मध्ये तेव्हा आपल्या गुजरातमध्ये फक्त 9 वैद्यकीय महाविद्यालये होती, आपण हे सर्व लक्षात ठेवता की विसरता ? नव्या पिढीला याची माहिती द्या. नाहीतर त्यांना समजणारच नाही की आधी काय परिस्थिती होती. फक्त 9 वैद्यकीय महाविद्यालये आणि डॉक्टर व्हावे अशी कितीतरी लोकांची इच्छा होती.मात्र तेव्हा डॉक्टर होण्यासाठीच्या अभ्यासक्रमाच्या केवळ 1100 जागा होत्या. इतके मोठे गुजरात आणि 2001 पूर्वी केवळ 1100 जागा. आपल्याला हे जाणून आनंद होईल की आज सरकारी आणि खाजगी महाविद्यालये मिळून 30 वैद्यकीय महाविद्यालये गुजरातमध्ये आहेत.इतकेच नव्हे तर गुजरातमधेही आणि देशाच्या प्रत्येक जिल्ह्यातही एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे उद्दिष्ट आहे. एमबीबीएस आणि पदव्युत्तर वैद्यकीय जागा एका काळात 1100 होत्या आणि आज 8000 जागा आहेत 8000.
बंधू-भगिनीनो,
त्यातही आम्ही नवे साहस केले आहे. गरीब आई-वडिलांच्या मुलांना डॉक्टर होण्याची मनीषा असावी की नसावी, जरा सांगा म्हणजे समजेल, असावी की नसावी, मात्र त्यांना आधी विचारा की आपण इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतले आहे की गुजरातीमध्ये.जर इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतले असेल तर डॉक्टर होण्यासाठीचे दरवाजे खुले मात्र गुजराती माध्यमात शिकले असाल तर डॉक्टर होण्याचे सर्व दरवाजे बंद. आता हा अन्याय आहे की नाही,अन्याय नव्हे का आम्ही नियम बदलले आणि निर्णय घेतला की डॉक्टर बनायचे असेल, किंवा इंजीनियर बनायचे असेल तर मातृभाषेतही अभ्यास करू शकतो. आणि लोकांची सेवा करता येऊ शकते.
मित्रांनो,
डबल इंजिनचे सरकार, दुहेरी लाभ तर होतीलच ना, होतील की नाही ? आणि आपल्या गुजरातच्या लोकांना समजवावे लागेल की मामाच्या घरी जेवायला गेले असाल आणि वाढणारी आपली आई असेल तर याचा अर्थ समजावा लागेल ? या डबल इंजिनच्या सरकारने गुजरातच्या विकासाला नव्या उंचीवर पोहचवण्याचे काम केले आहे. विकासाला अडसर ठरणाऱ्या सर्व अडचणी दूर केल्या आहेत. आणि जलद गतीने विकासाचा लाभ गुजरातला मिळत आहे. 2014 पूर्वी गुजरातमध्ये असे अनेक प्रकल्प होते, तर दिल्लीमध्ये असे सरकार होते, इथून प्रकल्प गेला तर त्यांना प्रकल्प दिसत नसे, त्यांना त्यामध्ये मोदी दिसायचे. आणि असे डोके खराब व्हायचे की लगेचच प्रकल्प रद्द -फेटाळला जायचा. अनेक कामे बंद करण्यात आली. एवढी उदासीनता, आपली नर्मदा माता , तुम्ही विचार करा, हे लोक नर्मदा मातेचा प्रवाह अडवून बसले होते. हे सरदार सरोवर धरण बांधण्यासाठी आम्हाला उपास करावे लागले होते. आठवतंय ना? आठवतंय ना मित्रांनो आणि हे उपास फलदायी ठरले आणि सरदार सरोवर धरण तयार झाले. सौनी योजना तयार झाली. आणि नर्मदा मातेने कच्छ-काठियावाडच्या भूमीवर येऊन आपले जीवन उज्वल बनवले. असे काम आपल्याकडे होते. आणि आता तर सरदार सरोवर, सरदार वल्लभभाई पटेल, जगातील सर्वात उंच पुतळा, संपूर्ण जगभरात सरदार साहबांचे नाव गाजत आहे आणि लोक जातात तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते की आपल्या गुजरातमध्ये एवढे मोठे काम , एवढ्या लवकर पूर्ण झाले. हीच तर गुजरातची ताकद आहे.
पायाभूत सुविधांच्या जलद गतीने विकासाचा लाभ गुजरातला मिळाला आहे. अभूतपूर्व गतीने, अभूतपूर्व प्रमाणात आज गुजरातमध्ये पायाभूत विकासाची कामे सुरु आहेत. याचा लाभ गुजरातच्या अनेक विस्तारित भागांना मिळाला आहे. एक काळ होता की उद्योग केवळ वडोदरा ते वापी परिसरात आढळायचे. राष्ट्रीय महामार्गावरून गेले तर त्याच्याआसपास सगळे कारखाने दिसायचे. हाच आपला औद्योगिक विकास होता. आज तुम्ही गुजरातच्या कुठल्याही दिशेला जा, छोटे-मोठे उद्योग, कारखाने वेगाने सुरु आहेत. आपल्या राजकोटचा इंजीनियरिंग उद्योग , मोठमोठ्या गाड्या कुठेही बनत असतील, गाडी मोठी असेल किंवा छोटी , मात्र त्याचा छोट्यातील छोटा भाग तुमच्या राजकोटमधूनच जातो. तुम्ही विचार करा, अहमदाबाद–मुंबई बुलेट ट्रेन, अतिजलद गाडीचे वेगाने काम सुरु आहे . वेस्टर्न डेडिकेटेड कॉरिडोर मुंबई पासून दिल्ली पर्यंत आणि त्यातील लॉजिस्टिक व्यवस्थेचे काम जलद गतीने सुरु आहे. या सगळ्याचा लाभ गुजरातचा महामार्ग जेव्हा रुंद होईल, दुहेरी, तिहेरी सहा पदरी होईल आणि सगळ्यामुळे गुजरातच्या बंदरांची ताकद वाढण्यात मदत होईल. हवाई -कनेक्टीव्हीटी , आज गुजरातमध्ये अभूतपूर्व विस्तार पहायला मिळत आहे. आणि रो-रो फेरी सेवा, मला आठवतंय की जेव्हा आम्ही छोटे होते, तेव्हा वृत्तपत्रात वाचायचो की हि रो-रो फेरी सेवा काय आहे ? मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मी विचारले ही रो-रो सेवा काय आहे ? कुठल्या भागात आहे? लहानपणापासून ऐकत आलो होतो. आज रो-रो फेरी सेवा सुरु झाली आहे. आणि हे लोक 300-350 किलोमीटर ऐवजी सूरतहून काठियावाड़ला जायचे असेल तर आठ तासांचा प्रवास वाचवून वेळेत आम्ही पोहचयचो.
विकास कसा होतो, हे आज आपण पाहिलेआहे. एमएसएमई गुजरातची सर्वात मोठी ताकद बनून उदयाला आले आहे. एक काळ होता, संपूर्ण सौराष्ट्र्मध्ये मिठाशिवाय कुठलाही उद्योग नव्हता. काठियावाड़ रिकामे होत होते. उपजीविका मिळवण्यासाठी कच्छ-काठियावाड़च्या लोकांना देशाच्या कानाकोपऱ्यात भटकावे लागायचे. मात्र आज भारतातील लोकांना कच्छ-काठियावाडला भेट देण्याची इच्छा होते. बंदरे ओस पडली आहेत हे गुजरातचे चित्र बदलले आहे , मित्रांनो . आपला मोरबी इथला टाइल्स उद्योग जगभरात लोकप्रिय झाला आहे.
आपला जामनगरचा ब्रास उद्योग , जगात त्याची पोहच वाढत आहे,आता तर फार्मा उद्योग , औषध निर्मिती कंपन्या , एके काळी सुरेन्द्रनगरच्या आसपास एखादी औषध कंपनी यावी यासाठी गुजरात सरकार अनेक सवलती द्यायचे. मात्र काही होत नव्हते. आज औषध निर्मिती करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या गुजरात आणि सौराष्ट्रच्या भूमीवर पुढे मार्गक्रमण करत आहेत. अनेक विस्तार असे आहेत , ज्यात गुजरात जलद गतीने पुढे जात आहे. आणि म्हणूनच बंधू-भगिनींनो, गुजरातच्या औद्योगिक विकासाचा जो काही लाभ झाला आहे , त्यात एक जिल्हा -एक उत्पादन अभियान संपूर्ण देशभरात चालवण्यात आले आहे. आणि सौराष्ट्रची ओळख देखील बनले आहे. आणि ती आपल्या काठियावाड़ची ओळख, आपल्या कच्छची ओळख, आपल्या गुजरातची ओळख बनली असून साहसी स्वभाव, पाण्याचे दुर्भिक्ष्य असूनही आयुष्य जगणारा गुजरातचा नागरिक आज कृषी क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण करत आहे. हीच गुजरातची ताकद आहे. आणि हे सामर्थ्य प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी सरकार दिल्लीमध्ये बसलेले असो किंवा सरकार गांधीनगर इथे बसलेले असो, आपण चारही दिशेने पुढे वाटचाल करत आहोत, मित्रांनो .
आज जेव्हा इतक्या आरोग्य संबंधी सुविधा वाढत आहेत ,त्याबद्दल माझ्या वतीने सर्व नागरिकांचे अभिनंदन करतो. तुम्ही विश्वास ठेवा, आताच भूपेन्द्रभाई म्हणत होते, , प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्मान योजना सारख्या जगातील मोठ्या योजना आपल्या इथे सुरु आहेत. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक लोक याचा लाभ घेऊ शकतील अशी योजना आपल्याकडे सुरु आहे. युरोपच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक लोकांना लाभ मिळावा या उद्देशाने या योजना भारतात सुरु आहेत. 50 कोटी लोकांना आयुष्मान कार्ड द्वारा कितीही गंभीर आजार असो, पाच लाख रुपयांपर्यंतचा उपचाराचा खर्च सरकार उचलत आहे.
मित्रांनो,
गरीबी आणि गरीबांच्या अडचणी याबद्दल मला पुस्तकात वाचावे लागले नाही. टीव्हीच्या पडद्यावर पाहावे लागले नाही . मला माहित आहे , गरीबीत कसे जीवन जगतात. आजही आपल्या समाजात माता-भगिनी आजारी असतील, वेदना होत असतील, तरी त्या कुटुंबातील कुणालाही सांगत नाहीत. वेदना सहन करत राहतात आणि घरातली कामे करत राहतात. आणि जर घरात कुणी आजारी असेल, त्याचीही सुश्रुषा करतात. स्वतःला होणाऱ्या त्रासाबद्दल माता-भगिनी कुणालाही सांगत नाहीत. आणि जेव्हा वेदना वाढतात तेव्हा देवाकडे प्रार्थना करतात की मला घेऊन जा. माझ्यामुळे माझी मुले दुःखी आहेत.मुलांना समजले तर म्हणतात, आपण एखाद्या चांगल्या रुग्णालयात जाऊन उपचार करून घेऊ. तेव्हा आई म्हणते, खूप मोठे कर्ज होईल. आणि मला आता असे किती जगायचे आहे. आणि तुमच्या डोक्यावर कर्ज होईल, तुमची पूर्ण पिढी कर्जाच्या ओझ्याखाली दबून जाईल,. देवाने जितके दिवस दिले आहेत, तेवढे दिवस जगेन. मला रुग्णालयात जायचे नाही. मला कर्ज काढून उपचार करून घ्यायचे नाहीत. आपल्या देशाच्या माता-भगिनी पैशांमुळे उपचार करून घेत नव्हत्या. मुलाच्या डोक्यावर कर्जाचा भार नको म्हणून रुग्णालयात जात नव्हत्या.
आज त्या मातांसाठी दिल्लीत एक मुलगा बसला आहे. मातांना दुःख होऊ नये, त्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल, मात्र पैशांमुळे शस्त्रक्रिया थांबू नये यासाठी आयुष योजना चालवण्यात येत आहे. आणि मला आनंद आहे की या रुग्णालयातही , आयुष्मान कार्ड घेऊन येणाऱ्या व्यक्तीला सरकारच्या योजनेचा पूर्ण लाभ मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आणि यासाठी कुणालाही स्वतःच्या खिशातून पैसे देऊन उपचार करून घ्यावे लागतील असा दिवस येणार नाही. तुम्ही विचार करा, जन औषधि केन्द्र, मध्यमवर्गीय कुटुंब असो किंवा ठराविक उत्पन्न असलेला वर्ग असो, आणि कुटुंबातील एका वृद्ध व्यक्तीला समजा मधुमेह आजार असेल,तर त्याला महिन्याला 1200-1500 रुपयांची औषधे घ्यावी लागतात. त्यांना रोज इंजेक्शन घ्यावे लागत असेल किंवा गोळ्या घ्याव्या लागत असतील. आणि इतकी महाग औषधे . सामान्य़ मध्यमवर्गीय कुटुंबांचे काय होत असेल ? आपल्या भारताच्या कानाकोपऱ्यात जनऔषधि केन्द्र उघडण्यात आली आहेत आणि ज्या औषधांसाठी महिन्याला 2000 रुपये खर्च व्हायचे , ती औषधे जर 100 रुपयात मिळत असतील आणि कुणालाही औषधांशिवाय दुःखी व्हावे लागणार नाही. यासाठी भारतात शेकडोंच्या संख्येने जन औषधि केन्द्रे चालवली जात आहेत. ज्यामुळे सामान्य़ माणूस स्वस्तात औषधे खरेदी करून स्वतःच्या आरोग्याकडे कुठलेही नवे कर्ज न घेता लक्ष देऊ शकेल.
बंधू आणि भगिनींनो,
स्वच्छता, पाणी, पर्यावरण या सर्व गोष्टी आरोग्यासाठी आवश्यक आहेत. आरोग्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतो. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तम राहो, तंदुरुस्त रहा, आपल्या गुजरातमधील एकेक बालक निरोगी राहो, आपल्या गुजरातचे भविष्य तंदुरस्त राहो, याच संकल्पासह आज या शुभ प्रसंगी समाजाच्या सर्वघटकांना मनापासून शुभेच्छा देतो. दात्यांना शुभेच्छा देतो, या दात्यांच्या मातांना शुभेच्छा देतो , ज्यांनी असे संस्कार देऊन मुले घडवली. ज्यांनी समाजासाठी एवढे मोठे काम केले आहे. त्या सर्वांना शुभेच्छा देऊन, तुम्हा सर्वांना प्रणाम करतो, तुम्ही लोकांनी इतका प्रेमाचा वर्षाव केलात, एवढ्या कडक उन्हातही लाखोंच्या संख्येने इथे आलात, हाच आशीर्वाद माझी सर्वात मोठी ताकद आहे. हेच माझे धन आहे.हजारो भगिनी आपल्या काठियावाड़ी परंपरेनुसार कलश डोक्यावर घेऊन उभ्या राहून मला आशीर्वाद देत होत्या. आपल्या माता-भगिनी , समाजातील सर्व भगिनीनी जणू काही आपल्या घरात शुभ कार्य असल्याप्रमाणे मला आशीर्वाद दिले आहेत. मी त्या तमाम माता-भगिनींना प्रणाम करतो. त्यांच्या आर्शिवादाला अनुरूप भारत आणि गुजरातची सेवा यापुढेही घडत राहो. यासाठी तुमचे आशीर्वाद कायम राहोत. खूप-खूप धन्यवाद.
भारत माता की – जय
भारत माता की – जय
खूप-खूप धन्यवाद !
***
G.Chippalkatti/N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1829220)
आगंतुक पटल : 209
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam