पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी राजकोटमधील अटकोट येथे मातुश्री के. डी. पी  मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाला दिली भेट


“हे रुग्णालय लोकांचे जीवनमान सुधारण्याच्या प्रयत्नांमधील सरकारी आणि खाजगी समन्वयाचे उदाहरण आहे”

"गेल्या 8 वर्षांत गरीबांना 'सेवा', 'सुशासन' आणि 'गरीब कल्याण'ला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले

"गेल्या 8 वर्षात देशातील जनतेला खजिल व्हावे लागेल असे एकही गैरकृत्य घडले नाही"

“सरकारने योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी विविध अभियान सुरू केले”

Posted On: 28 MAY 2022 4:57PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजकोटमधील अटकोट येथे नव्याने बांधण्यात आलेल्या मातुश्री के. डी. पी  मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाला भेट दिली. श्री पटेल सेवा समाज या रुग्णालयाचे व्यवस्थापन पाहतात. ते या भागातील लोकांना उच्च दर्जाची वैद्यकीय उपकरणे आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतील. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला, डॉ मनसुख मांडविया, डॉ महेंद्र मुंजपारा, संसद सदस्य, गुजरात सरकारचे मंत्री आणि संत समाजाचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी रुग्णालयाच्या उद्घाटनाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, हे रुग्णालय सौराष्ट्रातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आहे. हे रुग्णालय लोकांचे जीवनमान सुधारण्याच्या प्रयत्नांमधील सरकारी आणि खाजगी समन्वयाचे उदाहरण आहे.

रालोआ सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने देशसेवेची संधी दिल्याबद्दल पंतप्रधानांनी जनतेचे आभार मानले. मातृभूमीप्रति 8 वर्षांच्या सेवाकाळाच्या पूर्वसंध्येला गुजरातच्या भूमीवर आलो आहे, हे सयुक्तिक आहे, असे ते म्हणाले. देशसेवेची संधी आणि संस्कारदिल्याबद्दल त्यांनी गुजरातच्या जनतेला वंदन केले. ही सेवा आपली  संस्कृती आहे, आपल्या मातीच्या संस्कृतीत आणि बापू-पटेलांच्या संस्कृतीत आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, गेल्या 8 वर्षात देशातील जनतेला खजिल व्हावे लागेल असे एकही गैरकृत्य घडले नाही. या आठ वर्षांत गरीबांची सेवा, ‘सुशासनआणि गरीब कल्याणला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या मंत्राने राष्ट्र विकासाला चालना दिल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, पूज्य बापू आणि सरदार पटेल यांनी गरीब, दलित, वंचित, आदिवासी, महिला इत्यादींच्या सक्षमीकरणाचे स्वप्न पाहिले होते. एक असा भारत, जिथे स्वच्छता आणि आरोग्य हे राष्ट्राच्या चेतनेचा भाग बनले आहेत. पंतप्रधान म्हणाले की, बापूंना स्वदेशी उपायांद्वारे

अर्थव्यवस्था मजबूत होणारा भारत अभिप्रेत होता. आता 3 कोटींहून अधिक कुटुंबांना पक्के घर मिळाले आहे, 10 कोटींहून अधिक कुटुंबांना  उघड्यावर शौचाला जाण्यापासून मुक्ती मिळाली आहे, 9 कोटींहून अधिक भगिनींची स्वयंपाकघरातील धुरापासून मुक्तता  करण्यात आली आहे, आणि 2.5 कोटींहून अधिक कुटुंबांना वीज जोडणी मिळाली आहे. 6 कोटींहून अधिक कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची जोडणी मिळाली आहे आणि 50 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराचे आरोग्य कवच मिळाले आहे. ते म्हणाले की ही केवळ संख्या नाही तर गरीबांची प्रतिष्ठा आणि देशसेवेप्रति आमच्या समर्पणाचा पुरावा आहे.

पंतप्रधान म्हणाले की, 100 वर्षात एकदा येणाऱ्या या महामारीच्या काळातही गरीबांना त्यांच्या जीवनात कोणतीही अडचण भासू नये याची आम्ही काळजी घेतली आहे. जनधन बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले, गरिबांना मोफत सिलिंडर देण्यात आले आणि प्रत्येकासाठी चाचणी आणि लस मात्रा मोफत देण्यात आल्या.

पंतप्रधान म्हणाले की, सध्या युद्ध सुरू असतानाही आम्ही लोकांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, त्यांच्या सरकारने योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी विविध अभियान सुरू केले. जेव्हा प्रत्येकाला त्यांचे हक्काचे मिळेल तेव्हा भेदभाव आणि भ्रष्टाचाराला वाव राहणार नाही, यावर त्यांनी भर दिला. या प्रयत्नामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे जीवन सुसह्य होईल, असे ते म्हणाले.

गुजराती भाषेत बोलताना पंतप्रधानांनी पटेल समुदायाने लोकसेवेच्या महान कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की 2001 मध्ये जेव्हा गुजरातच्या जनतेने त्यांना सेवा करण्याची संधी दिली तेव्हा फक्त 9 वैद्यकीय महाविद्यालये होती, आता गुजरातमध्ये 30 वैद्यकीय महाविद्यालये आहेत. मला गुजरात आणि देशातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभे राहिलेले पहायचे आहे. आम्ही नियम बदलले आहेत आणि आता वैद्यकीय आणि अभियांत्रिकीचे विद्यार्थी त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घेऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

उद्योगाविषयी बोलताना मोदी म्हणाले की, पूर्वी फक्त वडोदरा ते वापीपर्यंत उद्योग दिसत होते, आता गुजरातमध्ये सर्वत्र उद्योगधंदे उभे राहिले आहेत. महामार्ग रुंद झाले आहेत आणि एमएसएमई ही गुजरातची मोठी ताकद म्हणून उदयाला आली आहे. औषध निर्मिती उद्योगही तेजीत आहे. तेथील लोकांचे धैर्यवान चरित्र ही सौराष्ट्रची ओळख आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की गरीबी काय असते हे त्यांना चांगले माहित आहे आणि कुटुंबातील महिला आजारी  असूनही घरातील कामे करत राहते आणि कुटुंबाची गैरसोय होऊ नये म्हणून उपचार घेणे टाळत असते. आज तुमचा एक मुलगा दिल्लीत आहे, जो कोणतीही आई उपचाराविना परत जाणार नाही याकडे लक्ष देत आहे. म्हणूनच पंतप्रधान जन आरोग्य अभियान योजना सुरू करण्यात आली आहे, ते म्हणाले. त्याचप्रमाणे स्वस्त औषधांसाठी जनऔषधी केंद्रे आहेत आणि प्रत्येकाच्या उत्तम आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे, असे सांगत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1828982) Visitor Counter : 133