पंतप्रधान कार्यालय

हैदराबाद इथल्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेसला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 26 MAY 2022 5:41PM by PIB Mumbai

तेलंगणच्या राज्यपाल तमिलसाई सौंदरराजन जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे  सहकारी  जी कृष्ण रेड्डी जी, तेलंगण सरकार मधले मंत्री, इंडियन स्कूल ऑफ़ बिझनेस कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष, अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग,शिक्षक वृंद,पालक आणि माझ्या प्रिय युवा मित्रहो,

आज इंडीयन स्कूल ऑफ बिझनेसने आपल्या गौरवास्पद प्रवासातला एक महत्वाचा टप्पा गाठला आहे.आय एस बी च्या स्थापनेला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आपण हा कार्यक्रम साजरा करत आहोत.आज अनेक मित्रांना पदवी प्राप्त झाली आहे,सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे.आयएस बीला यशाच्या या स्थानावर पोहचवण्यामागे अनेक लोकांची तपस्या आहे. त्या सर्वांचे स्मरण करत आपणा सर्वांना, आयएसबीचे प्राध्यापक,फॅकल्टी, सर्व विद्यार्थी,आय एस बीच्या माजी विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो.

मित्रहो,

2001 मध्ये अटल जी यांनी देशाला याचे  समर्पण केले होते.तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 50 हजार एक्झिक्युटिव्ह इथे प्रशिक्षित झाले आहेत. आशियातल्या सर्वोच्च बिझनेस स्कूल पैकी आयएसबी एक आहे. आयएसबी मधून शिकून बाहेर पडणारे व्यवसायकर्मी आहेत  ते देशाच्या व्यवसाय क्षेत्राला गती देत आहेत, मोठ-मोठ्या कंपन्यांचे व्यवस्थापन सांभाळत आहेत.इथल्या विद्यार्थ्यांनी अनेक स्टार्ट अप्स निर्माण केले आहेत,अनेक युनिकॉर्न्स निर्मिती मध्ये त्यांची भूमिका राहिली आहे. आयएसबीसाठी ही कामगिरी उत्तम आहेच त्याच बरोबर देशासाठीही अभिमानस्पद बाब आहे.

मित्रहो,  

हैदराबाद आणि मोहाली  प्रांगणांचा हा पहिला एकत्रित पदवीदान समारंभ आहे अशी माहिती मला देण्यात आली आहे. आज जे विद्यार्थी इथून यशस्वी होऊन बाहेर पडत आहेत त्यांच्यासाठी हा क्षण यासाठी विशेष आहे कारण या काळात देश आपल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचे पर्व साजरे करत आहे, अमृत महोत्सव साजरा करत आहे. आपण मागच्या 75 वर्षांच्या कामगिरीचे अवलोकन करत असतानाच आगामी 25 वर्षांच्या संकल्पांचा पथदर्शी आराखडाही तयार करत आहोत. स्वातंत्र्याच्या या अमृत काळात, येत्या 25 वर्षांसाठी आपण जे संकल्प घेतले आहेत ते साकार करण्यासाठी आपणा सर्वांची मोठी भूमिका आहे. आज भारतात लोकांमध्ये  असलेला जो आत्मविश्वास आहे, जी आशा आहे, नव भारत घडवण्यासाठी जी इच्छाशक्ती आहे त्यामुळे आपल्यासाठी अनेक संधींची दालने खुली झाली आहेत. आपण स्वतः पहा,आज भारत जी 20 राष्ट्रांमध्ये सर्वाधिक वेगाने विकास पावणारी अर्थव्यवस्था आहे.स्मार्ट फोन डाटा ग्राहकांमध्ये भारत अग्रस्थानी आहे.इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येच्या दृष्टीने पाहता भारत जगात दुसऱ्या स्थानावर आहे.जागतिक किरकोळ क्षेत्र निर्देशांकातही भारत दुसऱ्या स्थानावर आहे. जगातली सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकाची स्टार्ट अप परिसंस्था भारतात आहे. जगातले सर्वात मोठे तिसऱ्या क्रमांकाची ग्राहक बाजारपेठ भारतात आहे. अशा अनेक बाबी मी आपल्यासमोर मांडू शकतो. कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात आपणा सर्वांना आणि जगालाही भारताच्या सामर्थ्याची प्रचीती आली. शतकातल्या या सर्वात मोठ्या संकटाच्या काळात जागतिक पुरवठा साखळी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली,नंतर युद्धाने हे संकट अधिकच तीव्र केले. या  सर्व परिस्थितीतही भारत आज विकासाचे एक मोठे केंद्र म्हणून पुढे येत आहे. गेल्या वर्षी भारतात आतापर्यंतची विक्रमी थेट परकीय गुंतवणूक आली.आज जगाला हे जाणवत आहे की भारत म्हणजे व्यवसाय, आणि केवळ सरकारच्या प्रयत्नाने हे शक्य झाले नाही तर यामध्ये आयएसबी सारखी बिझनेस स्कूल,इथून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे व्यावसायिक, देशाचा  युवा वर्ग या सर्वांचे फार मोठे योगदान आहे. स्टार्ट अप्स असो किंवा पारंपरिक व्यवसाय असो, उत्पादन क्षेत्र असो किंवा सेवा क्षेत्र असो आपली युवा शक्ती हे सिद्ध करत आहे की ते जगाचे नेतृत्व करू शकतात.मी योग्यच बोलतोय ना,तुम्हा सर्वांचा स्वतःवर विश्वास आहे ना, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.  तुम्हा सर्वांचा स्वतःवर विश्वास आहे ना ?

मित्रहो,  

म्हणूनच आज जग भारताकडे, भारताच्या युवकांकडे आणि भारताच्या उत्पादनाकडे नव्या विश्वासाने,नव्या आदराने पाहत आहे.

मित्रहो,

भारत ज्या प्रमाणात लोकशाही पद्धतीने अनेक बाबी आपल्याकडे करू शकतो, ज्या पद्धतीने आपण इथे एखादे धोरण किंवा निर्णय लागू करू शकतो, तो अवघ्या जगासाठी अभ्यास करण्याचा, शिकण्याचा विषय ठरतो.म्हणूनच आपण अनेकदा भारतीय उपायांचा जागतिक अवलंब होताना पाहतो. म्हणूनच आपल्या वैयक्तिक लक्ष्यांशी देशाच्या उद्दिष्टांची सांगड घालण्याचे आवाहन मी आजच्या या महत्वाच्या दिवशी, आपणा  सर्वाना करतो. आपण जे शिकतो,आपण जो अनुभव घेतो, जे उपक्रम घेतो त्यातून देश हित कसे साधले जाईल हे नेहमीच विचारात घेतले पाहिजे, नक्कीच विचार करा. आज देशात व्यवसाय सुलभतेसाठी अभियान असो, दीड हजारापेक्षा जास्त कालबाह्य कायदे आणि हजारो अनुपालन रद्द करण्याचे काम असो, करविषयक अनेक कायदे समाप्त करून जीएसटी सारखी पारदर्शी प्रणाली निर्माण करणे असो, उद्योजकता आणि नवोन्मेशाला प्रोत्साहन देणे असो, नवे स्टार्ट अप धोरण असो,ड्रोन धोरण असो, अनेक नवी क्षेत्रे खुली करणे असो, 21  व्या शतकाच्या आवश्यकतेनुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करणे असो, हे सारे बदल आपल्यासारख्या युवकांसाठीच तर आहेत. आपल्यासारख्या युवकांना अनुकूल उपक्रम आहेत, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी, आपल्या कल्पनांचे देशाला बळ देण्यासाठी आमचे सरकार सदैव देशाच्या युवाशक्ती समवेत आहे.

आपण ऐकले असेल, एक गोष्ट मी वारंवार सांगतो ती म्हणजे  रीफॉर्म,परफॉर्म, ट्रान्सफॉर्म. हा मंत्र घेऊन देशाचे प्रशासन वाटचाल करत आहे. आपणासारखे व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, व्यावसायिक यांच्यासाठी हे अतिशय महत्वाचे आहे. या सर्व गोष्टी मी आपल्याला सांगत आहे कारण इथून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर आपण अनेक धोरणात्मक निर्णय घेणार आहात. धोरण हे केवळ कागदावर उत्तम असेल आणि प्रत्यक्षात जर अपेक्षित परिणाम देत नसेल तर ते  कुचकामी ठरते.म्हणूनच धोरणाची  अंमलबजावणी आणि त्याचे फलित  या आधारावर धोरणाचे मुल्यांकन झाले पाहिजे. रीफॉर्म,परफॉर्म, ट्रान्सफॉर्म या मंत्राने देशाची धोरणे, देशाच्या प्रशासनाची कशी नव्याने आखणी केली आहे हे आपणासारख्या युवकांनी अवश्य जाणून घ्यावे.

मित्रहो,

मागच्या आठ वर्षांची तुलना आपण जर त्या आधीच्या 3 दशकांशी केली तर एक बाब आपल्या नक्कीच लक्षात येईल.आपल्या देशात सुधारणाची गरज तर नेहमीच भासत होती मात्र राजकीय इच्छाशक्तीचा नेहमीच अभाव राहिला होता. तीन दशके सातत्याने राहिलेल्या राजकीय अस्थैर्याने देशाने दीर्घ काळ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव पाहिला. यामुळे देश सुधारणांपासून, मोठे निर्णय घेण्यापासून दूर राहिला. 2014 नंतर आपला देश राजकीय इच्छाशक्तीही अनुभवत आहे आणि सातत्याने सुधारणाही होत आहेत. प्रामाणिकपणे, इच्छाशक्ती  बाळगत सुधारणांची प्रक्रिया राबवली तर जन समर्थन आपोआपच वाढते. फिनटेकचे उदाहरण आपल्या समोर आहे. ज्या देशात बँकिंग हा एक विशेषाधिकार मानला जात असे त्याच देशात फिनटेक सामान्य जनतेच्या जीवनात परिवर्तन घडवत आहे.बँकांच्या प्रती विश्वास कायम ठेवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत असत तिथे आता जगातले 40 टक्के डिजिटल व्यवहार भारतात होत आहेत. आपले आरोग्य क्षेत्र एखादे मोठे आव्हान पेलू शकणार नाही असे मानले जात असे मात्र आरोग्य क्षेत्रातल्या सुधारणांसाठी देशाच्या इच्छाशक्तीची प्रचीती आपण शतकातल्या सर्वात मोठ्या महामारीच्या दरम्यान घेतली. कोरोनाच्या सुरवातीला आपल्याकडे पीपीई किटस तयार करणाऱ्याची संख्या अगदी नगण्य होती.कोरोनाशी निगडीत आवश्यक पायाभूत सुविधाही नव्हत्या.मात्र अगदी अल्पावधीत 1100 हून अधिक पीपीई निर्मात्यांचे जाळे भारतात तयार झाले. कोरोनाच्या चाचण्यांसाठी सुद्धा सुरवातीला अगदी मोजक्या प्रयोगशाळा होत्या. अगदी थोड्या अवधीत अडीच हजार पेक्षा जास्त प्रयोगशाळांचे जाळे उभारण्यात आले.कोरोना प्रतिबंधक विदेशी  लस आपल्याला मिळेल की नाही अशी चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आपण स्वदेशी लस तयार केली.इतक्या प्रमाणात लस तयार केली की भारतातही  190 कोटी पेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या आहेत.भारताने 100 पेक्षा जास्त देशानाही लस पाठवली आहे. अशाच प्रकारे गेल्या 8 वर्षात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 380 वरून वाढून 600 पेक्षाही जास्त झाली आहे. देशात वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर जागा 90 हजार वरून वाढून दीड लाखापेक्षा जास्त झाल्या आहेत.   

मित्रांनो,

 

गेल्या आठ वर्षात देशाने जी इच्छाशक्ति दाखवली, त्यामुळे एक मोठं परिवर्तन झालं आहे. आता यंत्रणाही सुधारणा प्रत्यक्षात आणण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी कार्यरत आहे. यंत्रणा तीच आहे, मात्र, आता परिणाम समाधानकारक मिळत आहेत. आणि या आठ वर्षात सर्वात मोठी प्रेरणा कोणती असेल तर ती आहे जनभागीदारी. देशातील जनता स्वतः पुढे येऊन सुधारणांना गती देत आहे. आणि आपण हे स्वच्छ भारत अभियानात पाहिले आहे. आणि आता वोकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत अभियानातील आपण जनभागीदारीची ताकद पाहत आहोत.  जनता जेव्हा सहकार्य करते तेव्हा परिणाम मिळतातच, लवकर मिळतात. म्हणजे सरकारी व्यवस्थेत सरकार सुधारणा करते, यंत्रणा अंमलबजावणी करते, आणि जनतेच्या सहयोगाने परिवर्तन होते. 

 

मित्रांनो,

हा तुमच्यासाठी एक मोठा अभ्यास आहे. सुधारणा, कामगिरी, परिवर्तन (Reform, Perform, Transform) यांचे समीकरण आपल्यासाठी एक संशोधनाचा विषय आहे. आयएसबी सारख्या मोठ्या संस्थेने याचे अध्ययन करुन, विश्लेषण करुन यास जगासमोर आणायला हवे. इथून जे तरुण शिकून बाहेर पडत आहेत त्यांनीही  सुधारणा, कामगिरी, परिवर्तन (Reform, Perform, Transform) हा मंत्र प्रत्येक क्षेत्रात अमलांत आणण्याचा प्रयत्न करायला हवा. 

 

मित्रांनो,

देशातील क्रीडा क्षेत्रात आलेल्या परिवर्तनाकडेही मला आपले लक्ष वेधायचे आहे. असे काय कारण आहे की 2014 नंतर खेळातील प्रत्येक मैदानात आपल्याला अभूतपूर्व प्रदर्शन पाहायला मिळत आहे? याचे सर्वात मोठे कारण आहे, आपल्या क्रीडापटूंचा आत्मविश्वास. आत्मविश्वास तेव्हा येतो जेव्हा योग्य प्रतिभावंत शोधला जातो, त्याची योग्य हाताळणी केली जाते, संधी दिली जाते, जेव्हा पारदर्शीपणे निवड केली जाते, प्रशिक्षण, स्पर्धेसाठी उत्तम पायाभूत सुविधा दिल्या जातात. खेलो इंडिया पासून ऑलिम्पिक पोडियम योजनेपर्यंत अशा अनेक सुधारणांमुळे आज क्रीडा क्षेत्राचे परिवर्तन होताना आपल्या डोळ्यासमोर पाहू शकत आहोत, अनुभव घेऊ शकत आहोत.

 

मित्रांनो,

व्यवस्थापनाच्या जगात कामगिरी, मूल्य वर्धन, उत्पादकता ( performance, value addition, productivity आणि motivation) आणि प्रेरणा, यावर खूप चर्चा होते. तुम्हाला जर सार्वजनिक धोरणात याचे उत्तम उदाहरण बघायचे असेल तर आपण आकांक्षी जिल्हे कार्यक्रमाचा जरुर अभ्यास करायला हवा. आपल्या देशात 100 पेक्षा अधिक असे जिल्हे होते, जे विकासाच्या स्पर्धेत बरेच मागे होते. देशात जवळपास सर्वच राज्यात एखाद दोन-एखाद दोन, काही ठिकाणी थोडे जास्त असे आकांक्षी जिल्हे आहेत. विकासा संबंधित मापदंडावर या जिल्ह्यांचे गुण खूपच कमी होते. देशाच्या एकूण कामगिरीवर, मानांकनावर, एकूण प्रदर्शनावर याचा थेट मोठा नकारात्मक प्रभाव पडत असे. अशात आधी सरकार काय करत असे, तर काहीच होत नाही, स्थिती बिकट आहे, असे समजून त्यांना मागास घोषित करत असे. हा तर मागास जिल्हा आहे, अशीच जर धारणा असेल तर त्यांच्या मनातही हेच येत असेल, असेच असेल, काही बदल होणार नाही. सरकारी यंत्रणेत जे अधिकारी सर्वात कमी काम करणारे मानले जात, निरुपयोगी मानले जात त्यांना बहुतांश वेळा या जिल्ह्यामंधे तैनात केले जायचे. जा बाबानों आता तुम्ही जाणे आणि तुमचे नशीब जाणे, पडून राहा ही भूमिका होती. 


परंतू मित्रांनो,

आम्ही दृष्टिकोन बदलला. कालपर्यंत ज्यांना मागास जिल्हे म्हटले जायचे, आम्ही म्हटले हे मागास नाहीत. हे आकांक्षी जिल्हे आहेत. आम्ही त्यांना आकांक्षी घोषित केले. आम्ही ठरवले की या जिल्ह्यांमधे विकासाच्या आकांक्षा जागवायच्या, विकासाची आस-भूख जागृत करायची. देशातील कार्यक्षम, तरुण अधिकाऱ्यांना निवडून त्यांना या जिल्ह्यामंधे पाठवण्यात आले. या जिल्ह्यात होणाऱ्या प्रत्येक कामावर विशेषकरुन लक्ष ठेवण्यात आले. काम होत असतानाच्या वेळीच लक्ष ठेवण्याची विशेष व्यवस्था केली आहे. ज्या त्रूटी आढळल्या त्या दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. मित्रांनो तुम्हाला ऐकून आनंद होईल, आज स्थिती अशी आहे, यातील काही जिल्हे देशातील उत्तम समजल्या जाणाऱ्या इतर जिल्हयांपेक्षा कितीतरी चांगली कामगिरी करत आहेत. ज्यांना कधी मागास जिल्हे म्हटले जायचे, देशाच्या विकास मापदंडांना प्रभावित करत, ते आज आकांक्षी जिल्हे होऊन देशाच्या विकासाला गती देत आहेत. आता आम्ही राज्यांना सांगितले आहे, या दृष्टिकोनाचा आणखी विस्तार करा. प्रत्येक जिल्ह्यात असे भाग असतात जे विकासाच्या बाबतीत इतरांच्या मागे राहिले आहेत. असे भाग शोधून आकांक्षी भाग अभियानाला आता चालना दिली जात आहे. देशात होत असलेले हे बदल, याची माहिती, तुम्हाला धोरणात्मक निर्णयात, व्यवस्थापनात खूपच सहाय्यभूत ठरेल.  

 

मित्रांनो,

तुमच्यासाठी हे सगळं जाणून घेणं यासाठी महत्वाचे आहे कारण आज देशात व्यवसायाचे अर्थही बदलत आहेत आणि व्यवसायाची कक्षाही रुंदावत आहे. भारतात आज आर्थिक पट (economic landscape) लघु, मध्यम, कॉटेज, अनौपचारिक उद्योगांपर्यंत विस्तारत आहे. हे व्यवसाय लक्षावधी लोकांना रोजगाराची संधी देत आहेत.  याचे सामर्थ्य खूप जास्त आहे. यात पुढे जाण्याची वचनबद्धता खूप अधिक आहे.  देश जेव्हा आज आर्थिक विकासाकरता नवा अध्याय लिहीत आहे तेव्हा आपण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आपण, छोटे व्यापारी, छोटे उद्योग यांचीही तितकीच काळजी घ्यायला हवी. आपण त्यांना अधिक मोठे मंच उपलब्ध करायला हवेत, वाढण्यासाठी आणखी चांगल्या संधी द्यायला हव्यात. आपण त्यांना देश-विदेशात नवनव्या बाजारांशी जोडण्यात मदत करायला हवी. आपण त्यांना जास्तीतजास्त तंत्रज्ञानाशी जोडायला हवे. आणि इथेच आयएसबी सारख्या संस्था, आयएसबी विद्यार्थी यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरते.  भविष्यातील व्यवसाय नेतृत्व म्हणून आपण सर्वांनी प्रत्येक व्यवसाय मोठा आणि विस्तारीत करण्यासाठी पुढे यायला हवे. जबाबदारी घ्यायला हवी.  

आणि तुम्ही पाहाल, छोट्या उद्योगांच्या विकासात मदत कराल तर तुम्ही लाखो उद्योजकांना घडवण्यात मदत कराल, कोट्यवधी कुटुंबांना मदत कराल. भारताला भविष्यासाठी सज्ज करण्याकरता, भारत आत्मनिर्भर व्हावा हे आपल्याला सुनिश्चित करायला हवे. यात आपल्या सर्व व्यवसाय-व्यावसायिकांची खूप मोठी भूमिका आहे. आणि तुमच्यासाठी हे एकप्रकारे देशसेवेचे महत्वाचे उदाहरण ठरेल.

 


मित्रांनो,

देशासाठी काही करण्याची, देशासाठी काहीही पणाला लावण्याची तुमची इच्छाशक्ती, देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल. मला आयएसबीवर, आयएसबीच्या विद्यार्थ्यांवर, तुम्हा सगळ्या तरुणांवर खूप विश्वास आहे. तुम्ही एका ध्येयासह या प्रतिष्ठित संस्थेतून बाहेर याल. तुम्ही आपले ध्येय राष्ट्राच्या संकल्पांशी जोडावीत. आपण जे काही करु त्यामुळे एका राष्ट्राच्या रूपात सशक्त होऊ, या वचनबद्धतेसह जेव्हा आपण कोणतेही प्रयत्न करु तेव्हा यश तुमच्या पायाशी लोळण घेईल. पुन्हा एकदा, ज्या ज्या मित्रांना आज पदक देण्याची मला संधी मिळाली, आणखीही ज्यांनी यश प्राप्त केले आहे त्यांच्या कुटुंबीयांना अनेक अनेक शुभेच्छा देतो. आणि आयएसबी,  भारताच्या विकास यात्रेत अशाच प्रकारे पिढ्या घडवत राहो, अशा पिढ्या राष्ट्रासाठी समर्पित भावनेने कार्य करत राहो, याच एका अपेक्षेसह आपल्या सगळ्यांना खूप-खूप धन्यवाद !


***

S.Tupe/S.Thakur/V.Ghode/NC/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1828690) Visitor Counter : 160