माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहितीचा मुक्त प्रवाह आणि अचूक माहितीची गरज एकाच रथाची दोन चाके : अनुराग ठाकूर
सतराव्या आशियाई प्रसारमाध्यम परिषदेला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले मार्गदर्शन, कोविड 19 बाबत जनतेला शिक्षित करत असल्याबद्दल केले कौतुक
प्रसारमाध्यमे सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम असून लोकांमधे योग्य समज आणि दृष्टिकोन घडवण्याची त्यात अफाट क्षमता : अनुराग ठाकूर
"पीआयबी फॅक्ट चेक "अंतर्गत खोट्या बातम्यांच्या धोक्याचा सरकारने वेळीच केला सामना
Posted On:
25 MAY 2022 7:29PM by PIB Mumbai
भारतीय प्रसारमाध्यमांनी कोविड 19 महामारीच्या कसोटीच्या काळात वठवलेल्या भूमिकेचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कौतुक केले आहे.
सतराव्या आशियाई प्रसारमाध्यम परिषदेला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी आज मार्गदर्शन केले. कोविड विषयक संदेश, महत्वाच्या सरकारी मार्गदर्शक सूचना आणि डॉक्टरांनी दिलेला मोफत सल्ला देशभरातील प्रत्येकापर्यंत पोहोचावा याची काळजी भारतीय प्रसारमाध्यमांनी घेतली,असे ते म्हणाले.
दूरदर्शन आणि आकाशवाणीने तत्पर तसेच प्रत्यक्ष बातमीदारी, सार्वजनिक आरोग्याविषयक कार्यक्रमांचे आयोजन यामाध्यमातून, आपले जनसेवेचे व्रत निष्ठेने पार पाडले, आदर्श घालून दिला असे त्यांनी सांगितले.
चूकीची माहिती पसरवण्या बाबतच्या दुसऱ्या साथीवरही त्यांनी बोट ठेवले. पडताळणी न केलेले दावे आणि खोटा आशय यामुळे लोकांमधे प्रचंड भीतीचे वातावरण पसरले. मात्र पत्र सूचना कार्यालयाच्या वस्तुस्थितीची जाणीव करून देणाऱ्या "पीआयबी फॅक्ट चेक " अंतर्गत खोट्या बातम्यांच्या धोक्याचा सरकारने वेळीच कठोरपणे सामना केला ,असे ठाकूर यांनी नमूद केले.
कोविड 19 विरुद्धच्या लढ्यात सरकारच्या यशावर अनुराग ठाकूर यांनी प्रकाश टाकला. 1.3 अब्ज लोकसंख्येचे लसीकरण करणे खूप आव्हानात्मक होते. सरकार, कोविड योद्धे आणि नागरी समाज यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भारताने आपल्या बहुसंख्य लोकसंख्येचे लसीकरण केले आहे असे त्यांनी यासंदर्भात सांगितले.
हा भार वाटून घेतल्याबद्दल त्यांनी प्रसारमाध्यमांना श्रेय दिले. “या प्रयत्नात, भारतीय प्रसारमाध्यमांनी, कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण केल्याने होणाऱ्या फायद्यांबद्दल लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. लस घेण्याबाबतचा संभ्रम वा संकोच हे त्यापैकीच एक मोठे आव्हान होते. योग्य संदेश आणि शिक्षणाच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांनी ते मोडून काढले.
लसीकरणाबाबत स्पष्ट संदेश जावा आणि गैरसमज दूर व्हावेत यासाठी आपले पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी आकाशवाणी तसेच दूरचित्रवाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला मार्गदर्शन केले.
यंदाच्या आशियाई माध्यम शिखर परिषदेची संकल्पना "फ्यूचर फॉरवर्ड, रिइमॅजिनिंग मीडिया" ही आहे आणि माध्यमांच्या बदलत्या वितरण यंत्रणेवर भर देत ठाकूर म्हणाले की, आजचे माध्यम उच्च तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि वाढती नाविन्यपूर्णता अनुभवत आहे. परवडणाऱ्या मोबाइल उपकरणांद्वारे इंटरनेटच्या वाढीमुळे माध्यम उद्योग पुन्हा तेजीत आहे. ते पुढे म्हणाले की प्रसारणाचा वाढता वेग आणि माध्यम सामग्रीच्या गुणवत्तेत सुधारणा यामुळे 5G तंत्रज्ञान हे वापरकर्त्याचा अनुभव आणखी समृद्ध करेल.
तथापि, ठाकूर यांनी असेही सांगितले की तांत्रिक प्रगती काहीही असो सामग्रीची सत्यता नेहमीच केंद्रस्थानी राहील. माहितीच्या मुक्त प्रवाहाच्या अधिकाराबद्दल आपण बोलू शकतो, योग्य माहितीच्या प्रसाराच्या गरजेबद्दलही बोलायला हवे, असेही ते म्हणाले.
कान येथे चित्रपटाद्वारे नुकत्याच झालेल्या भारतीय सॉफ्ट पॉवरच्या अभूतपूर्व प्रदर्शनाचे स्मरण करून ठाकूर म्हणाले की, भारतीय चित्रपटाने जगभरातील लाखो लोकांच्या हृदयावर राज्य केले आणि भारताची ओळख निर्माण केली. या महोत्सवात भारतातील चित्रपटांना चित्रपट रसिकांकडून मिळालेली दाद हे याचे द्योतक आहे. 3000 चित्रपट प्रदर्शित करून, भारतात दरवर्षी सर्वाधिक चित्रपटांची निर्मिती होते. भारतात चित्रपटाच्या शूटिंगला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी कान येथे जाहीर केलेल्या प्रोत्साहनांचा पुनरुच्चार केला.
भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनाला प्राधान्य देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान अंतर्गत जगातील सर्वात मोठ्या चित्रपट संवर्धन प्रकल्पाची घोषणा केली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, भाषा आणि शैलींमधील 2200 हून अधिक चित्रपटांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळवून दिले जाईल असे ठाकूर यांनी प्रेक्षकांना सांगितले आणि जतन हे पिढ्या जोडते; आपल्या पूर्वजांनी जपलेली मूल्ये नव्या पिढ्यांनी जाणून घेतली पाहिजेत, स्वीकारली पाहिजेत आणि आत्मसात केली पाहिजेत असेही ते म्हणाले.
ठाकूर यांनी ब्रिटीश राजवटीपासून देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली आणि ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपण आपली ऐतिहासिक नैतिकता, पारंपारिक मूल्ये सांस्कृतिक आचार-विचार पुन्हा जगत आहोत. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाविषयी आपली तरुण पिढी अधिक जागरूक होत आहे.
जगात प्रसारमाध्यमांच्या सकारात्मक भूमिकेवर आपला दृढ विश्वास व्यक्त करून ठाकूर यांनी समारोप करताना सांगितले की, सक्षमीकरणाचे प्रभावी साधन म्हणून लोकांच्या धारणा आणि दृष्टिकोनांना योग्य आकार देण्याची प्रचंड क्षमता माध्यमांमध्ये आहे.
***
S.Kakade/V.Joshi/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1828307)
Visitor Counter : 274